परळ-भोईवाडा शिवसेना शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी तत्कालीन नगरसेवक नंदू विचारे यांनी माझ्यावर सोपवली होती. त्याच दरम्यान मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांचा जीवनपट मला माहीत असल्यामुळे त्यावरच नृत्याविष्कार सादर करण्याची कल्पना शाखाप्रमुख वसंतराव चौकेकर यांना दिली. उध्दवजी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे होते. त्यांना मात्र ही नृत्यविष्काराची कल्पना पसंत पडत नव्हती. शेवटी मीनाताईंचे जीवन माहीत असणार्या पुरुष व महिला कार्यकर्त्यांपुढे या कार्यक्रमाची एकंदर धाटणी व रूपरेषा सांगितल्यावर त्यांना त्यात काही वावगे वाटले नाही. शेवटी १०० कलावंतांच्या संचात `मीनाताई ठाकरे अर्थात माँ साहेब -आठवण एक साठवण’ हा अंतर्मुख करणारा साडेतीन तासाचा अतिशय सुरेख कार्यक्रम पार पडला. संकल्पना, निवेदन, लेखन, दिग्दर्शन अर्थात माझे होते.