हा गणेशोत्सवाचा काळ… महाराष्ट्राची ओळख असलेल्या महाउत्सवाचा काळ. या काळात संपूर्ण राज्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात श्री गणरायांचं आगमन होतं आणि १० दिवस भक्तीचा, प्रबोधनाचा जागर मांडला जातो. राज्यात एक वेगळं चैतन्य सळसळताना दिसतं. ही परंपरा गेल्या वर्षीपासून काहीशी खंडित झाली. राज्यावर किंवा देशावरच नव्हे, तर सगळ्या जगावर ओढवलेलं कोरोनाचं संकट त्याला कारणीभूत होतं. कोरोनाकहरामुळे राज्य सरकारला गेल्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर नाईलाजाने निर्बंध लादावे लागले, तेव्हा भाविक नाराज निश्चित झाले- मात्र, कोणत्याही कारणाने गर्दी केली की कोरोनाचा प्रादुर्भाव कसा वाढतो, याची कल्पना त्यांना होती. सरकारची मजबुरी त्यांना समजत होती. गणेशोत्सवात मुंबई-पुण्यातले चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना होतात. मात्र गेल्या वर्षी शहरांतला कोरोना गावोगावी पसरू नये यासाठी स्थानिक पातळ्यांवर काही निर्बंध पाळले गेले. एवढं सगळं केल्यानंतरही गणेशोत्सवानंतर दुसर्या लाटेने उचल खाल्ली. त्यामुळे या वर्षीही गणेशोत्सव नेहमीच्या जल्लोषात साजरा करता येणार नाही, याची भाविकांना कल्पना आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेचा जोर वाढवायचा नसेल तर राज्य सरकार आणि मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे घरातल्या वडीलधार्या व्यक्तीच्या नात्याने, अधिकाराने आणि जिव्हाळ्याने जे सांगत आहेत, त्याचं पालन केलं पाहिजे हे गणेशभक्तांना पटत आहे… पण ज्यांच्या बुद्धीवर राजकीय स्वार्थाचं पांघरूण पडलं आहे, त्यांचं काय करायचं?
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट जोरात होती, कोरोनाचा सामना कसा करायचा, याबद्दल वैद्यकीय जगातही संभ्रम होता, तेव्हापासून राज्यातील विरोधी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष ‘मंदिरे उघडा’ असा शंखनाद करतो आहे. आपण कसे धर्मप्रेमी आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ‘नादी लागलेली’ शिवसेना कशी धर्मप्रेम गुंडाळून बसली आहे, असं दाखवण्याचा तो केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न अजूनही सुरू आहे. धर्मावरच्या प्रेमामध्ये धार्मिकांच्या जीवितरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणं अपेक्षित नाही काय? मंदिरात, धार्मिक उत्सवांत गर्दी करण्याची परवानगी देऊन आपल्याच धर्माच्या लोकांचा जीव धोक्यात घालण्यात कसली धार्मिकता आहे? धार्मिकच जिवंत राहिले नाहीत तर धर्म कसा जिवंत राहील?
सरकारला विरोध करणे म्हणजे गर्दी करून ठणाणा करणे ही भाजपची एकमेव कल्पना आहे, हे दिल्लीत संसदेत हा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष होता, तेव्हापासून पाहायला मिळते आहे. तेव्हा संसदेचं कामकाज अकारण बंद पाडून वर ‘संसदेचं कामकाज सुरळीत चालवणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे,’ अशी साळसूद भूमिका हा पक्ष घेत होता. त्या काळात ज्या ज्या गोष्टींविरोधात शंखनाद केला, त्या सगळ्या आज याच पक्षाच्या राजवटीत विकोपाला गेल्या आहेत. सर्वसामान्य जनतेचं जिणं हैराण झालं आहे. महागाईने कंबरडं मोडलं आहे. सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडत चालले आहेत. हा ज्या सरकारच्या अननुभवी आणि अहंमन्य धोरणशून्यतेची फळं आहेत, त्याविरोधात जनतेच्या वतीने आंदोलन करायला का नाही सुचत यांना? केंद्रात आपलं सरकार आहे म्हटल्यावर जनता भरडली जात असली तरी भरडू दे, इतका निर्ढावलेपणा कुठून येतो?
राज्यात भाजप सत्तेत असता, तर त्याने राज्यातल्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून मंदिरं उघडण्याचा धोका पत्करला असता काय? जिथे भाजपची सत्ता आहे, त्या राज्यांतली मंदिरं खुली आहेत काय? मुळात कोरोनाकाळात अमुक प्रकारचे निर्बंध पाळा, हे करा, हे करू नका, असे निर्देश केंद्रसत्तेत बसलेले यांचे नेतेच देत असतात, याची स्थानिक नेत्यांना कल्पना नाही काय? राज्य सरकारने यांच्याच पक्षाच्या केंद्र सरकारचे निर्देश धुडकावावेत आणि राज्यस्तरीय नेत्यांचे बालहट्ट पुरवून जनतेचा जीव धोक्यात घालावा, अशी यांची इच्छा आहे काय?
राजकारणासाठी भाजपचे नेते कोणत्या स्तराला जातात, याची कल्पना एव्हाना राज्यातील सुबुद्ध जनतेला आलेली आहे. मात्र, ज्यांच्या आंदोलनाने भाजपमध्ये प्राण फुंकला आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचवले ते राळेगणचे महात्मा अण्णा हजारे यांचाही जीव मंदिरांसाठी कळवळावा, याचे महदाश्चर्य वाटते. मंदिरे उघडा नाहीतर आंदोलन करतो, असा इशारा हजारे यांनी दिला आहे. अण्णांनी ज्या लोकपालासाठी, माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केलं, त्याचं सध्या काय झालेलं आहे, याची अण्णांना कल्पना नाही का? त्याबद्दल किंवा केंद्रसत्तेच्या दमनशाही वरवंट्याबद्दल, चुकीच्या आर्थिक धोरणांबद्दल, कोरोनाच्या वाईट हाताळणीबद्दल, लसीकरणाच्या फज्ज्याबद्दल, वाढत्या महागाईबद्दल पुन्हा एकदा जंतरमंतरवर बसून उपोषण करण्याची हिंमत अण्णा दाखवू शकणार नाहीत. तेव्हा त्यांच्याभोवती जमलेले संधिसाधू नेते आणि पेड चॅनेल आता त्यांच्या वार्यालाही फिरकणार नाहीत. त्यांना देशद्रोही जाहीर करायलाही कमी करणार नाहीत बटीक चॅनेलांचे पोटावळे पत्रकार. तुलनेने इकडे शंखनाद करणे सोपे आहे. म्हणून त्यांनी राज्य सरकारला नको त्या मुद्द्यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे.
महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाशी खेळायला निघालेल्या या सगळ्यांचं करायचं तरी काय?
श्री गणराय हे बुद्धीचं दैवत आहे… या बुद्धिदात्याकडे आपण या मंडळींसाठी बुद्धीच मागू शकतो… तशी बुद्धी त्यांच्याकडे खूप आहे, पण ती स्वार्थांध आणि कुटील होऊन बसली आहे, त्यामुळे बाप्पा तू यांना ‘सद्बुद्धी’ दे, बाकी राज्य सांभाळायला मुख्यमंत्री खंबीर आहेतच!