□ गांधी-पटेलांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा ध्यास- राजकोट येथील कार्यक्रमात मोदी यांचे उद्गार
■ तुम्ही जो घडवू पाहताय, तो भारत त्यांनी दु:स्वप्नात पण पाहिलेला नसेल.
□ महाराष्ट्राच्या १८ प्रस्तावांना केंद्राच्या वाटाण्याच्या अक्षता. अभिजात मराठीसह मेट्रोसारखे प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत
■ आपला देश हे एक संघराज्य आहे, हे बौद्धिकात शिकवले जात नसावे.
□ ईडी हादरली; हायकोर्टात धावली… नवलानी खंडणी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी
■ काय असेल ते आपल्या आपल्यात सांभाळून घेता येते…
□ देशात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण १०२ टक्क्यांनी वाढले. रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड
■ नोटबंदीचे हेच घवघवीत यश
□ चंद्रकांत पाटील यांचा माफीनामा
■ पण, तोही किती मानभावी!
□ अयोध्येनंतर काशी, मथुरेत जागरूकता – आदित्यनाथ यांचे उद्गार
■ सगळीकडे खणत राहा, लोकांना त्यात गुंगवून ठेवा. हाताला काम देण्याची योग्यता नाही, मग रामनामाचाच आधार.
□ किडक्या डोक्याच्या लोकांकडून शाहू महाराजांना चुकीची स्क्रिप्ट : देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
■ ‘पहाटवारा’ सिनेमाच्या उत्तुंग अपयशानंतर बीजेपी प्रॉडक्शनच्या ‘तुमच्या गोटात आमचा माणूस’ या सिनेमानेही माती खाल्ली एवढाच या थयथयाटाचा अर्थ.
□ पुतीन वारले; खुर्चीवर डुप्लिकेट! ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा
■ आधी ओरिजिनल होते, याची तरी काय खात्री हो इतक्या अभेद्य तटबंदीच्या देशात.
□ महापुरुषांच्या घरी जन्मल्याने दैवत्व येत नाही- बसपाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांचे मत
■ ठिकठिकाणी आपले पुतळे त्यासाठी उभारावे लागतात… हो ना ताजने साहेब?
□ छाप्यांपूर्वी माहिती कशी मिळते? ईडी कारवायांबाबत सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्र्यांना जाब विचारणार
■ तुमचा क्रम चुकला आहे सुप्रिया ताई, हे टार्गेट सांगतात, मग ते कारवाई करायला धावत सुटतात.
□ मुलांना गुंड, दरोडेखोर बनवायचे असल्यास भाजपात जा- अरविंद केजरीवाल
■ हल्ली त्यांच्याच उत्कर्षाचा काळ आलेला दिसतो आहे दुर्दैवाने.
□ एके दिवशी आरएसएसचा भगवा ध्वज राष्ट्रीय ध्वज असेल यात शंका नाही : कर्नाटक सरकारमधील माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा
■ पोटातले ओठांवर आले… जे स्वातंत्र्य आपण मिळवले नाही, त्यावर आयत्या रेघोट्या मारायला उगवले…
□ मला १८ वर्षांपूर्वीच काँग्रेसने राज्यसभेचे तिकीट देण्याचे आश्वासन देऊनही आताही मला ते दिले नाही. माझी तपश्चर्या व्यर्थ गेली- अभिनेत्री नगमा
■ तपश्चर्या? राज्यसभेच्या खासदारकीसाठी? असल्या फुटकळ लाभांसाठी केली जाते ती क्षुद्र खटपट असते.
□ शेतकर्यांना जास्त पैसे मिळाले तर केंद्राला बघवत नाही – शरद पवार
■ बेकायदा आणि बेहिशोबी पीएम केअर्स फंड सोडल्यास बाकी कुठेही पैसे आले की यांना बघवत नाही.
□ मुंबईत महापालिका शाळांना पालकांची पसंती; ३५ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश
■ केजरीवालांसारखे ढोल वाजवायला शिकलं पाहिजे पण आपण.
□ मोदींनी राजकारणाची संस्कृती बदलली!- भाजप अध्यक्ष नड्डा यांचे कौतुकोद्गार
■ खरे बोललात… असंस्कृती आणि कुसंस्कृती प्रस्थापित केली त्यांनी.
□ तंबाखूमुळे देशात दरवर्षी १० लाख जणांचा मृत्यू
■ तरी बार मळायचं सोडत नाहीत लोक.
□ वेगवान गोलंदाजी कशी खेळावी हे गावसकर यांच्याकडून शिका- मियांदाद
■ आणि तुझ्याकडून माकडचेष्टा!
□ मी कपडे विकून लोकांना स्वस्तात गव्हाचे पीठ देईन- पाकचे पंतप्रधान शरीफ यांचे वक्तव्य
■ कुणाचे कपडे विकणार आहात तेही सांगा…
□ पाच वर्षांत ५१ पर्यटकांनी गमावला जीव; लोणावळ्यात गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून दक्षतेच्या सूचना
■ अशा ठिकाणी सुरक्षेच्या सूचना हव्यात, सुरक्षा रक्षक, लाइफ गार्ड हवेत.
□ भारतीय मुस्लीमांवर विश्वास ठेवा- फारुख अब्दुल्ला
■ बहुसंख्य हिंदूंचा तसा विश्वास आहेच. त्यांच्याकडूनही पुढाकार हवा.