झाडावर सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट आला आणि तो वाचता वाचता रणदिवेंचे डोळे चमकले. ते मनात जी लिंक जोडायचा प्रयत्न करत होते, ते काम या रिपोर्टने सोपं केलं होतं. खाजगी गाडी काढून प्रशांतच्या घरी जाण्याचं फर्मान त्यांनी काढलं आणि काही क्षणांत ते तिथे पोहोचलेही.
– – –
`विंटेज पर्ल` रिसॉर्टवर दोन दिवस राहायला गेलेला विनीत सोलकर हा मध्यमवयीन उद्योजक अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याने बस्तरवाडी पोलिस स्टेशनची सगळी यंत्रणा कामाला लागली होती. पत्नी आणि दोन मित्र, त्यांच्या पत्नी यांच्यासह विनीत या रिसॉर्टवर विश्रांतीसाठी गेला होता. त्यासाठी अनेक दिवस नियोजन सुरू होतं. रिसॉर्टवर गेल्यावर पूर्ण विश्रांती घ्यायची, मजा करायची, मित्रमंडळींबरोबर गप्पा मारायच्या, आनंदात वेळ घालवायचा, अशी सगळी जय्यत तयारी झाली होती. त्यानुसार पहिला दिवस छान मजेत गेलाही होता. मात्र पहाटे फिरायला जातो, असं सांगून विनीत जो बाहेर पडला, तो परत आलाच नाही. दुपारपर्यंत वाट बघून अखेर त्याची बायको अंजली हिनं इतर मित्रमंडळींसह पोलिस स्टेशन गाठलं होतं.
विनीत पहाटे किती वाजता बाहेर पडला, काय सांगून गेला होता, इथली काही माहिती होती का, असे अनेक प्रश्न रणदिवेंनी अंजलीला विचारले. तिने दुःख सावरत जमतील तशी उत्तरं दिली. तिला काहीच माहिती नाही, एवढंच रणदिवेंच्या लक्षात आलं.
या जंगलमय भागात विनीतला शोधणं अवघडच काम होतं. स्थानिक लोकांची, मदत पथकामधल्या सदस्यांना मदतीला घ्या, अशा सूचना रणदिवेंनी केल्या आणि शोधकार्याला प्रारंभ झाला.
दोन दिवसांच्या या ट्रिपमध्ये रिसॉर्टवर तीनही कुटुंबांत कोणताही वाद झालेला नाही, असंच पोलिसांना सांगण्यात आलं होतं. मात्र, जग्गू नावाच्या कर्मचार्याशी आदल्या रात्री विनीतचं जोरदार भांडण झाल्याचं समजलं आणि रणदिवेंनी त्याला चौकशीसाठी बोलावलं. त्याने सांगितलं, की त्या रात्री दिवसभराचं काम संपवून तो घरी जायला निघाला, तेव्हा विनीत आणि त्याच्या मित्रांची पार्टी सुरू होती. जाता जाता त्यांच्यातले छोटेसे वाद जग्गूच्या कानावर पडले. त्यातल्या त्यात विनीतचाच आवाज जरा चढलेला वाटत होता.
“साहेब, जरा जपून हां, नाहीतर उद्या त्रास होईल,“ असं तो म्हणाला आणि त्यावरून विनीत अचानक खवळला.
“इकडे ये! तू मला शिकवणार, मी किती प्यायची ते? तुझ्या बापाची पितोय का?“ असं म्हणून जग्गूच्या अंगावर डाफरला. वास्तविक सकाळपासून अतिशय शांत वाटणारा, सभ्यपणे बोलणारा हा माणूस अचानक आपल्यावर भडकतो, याचंच जग्गूला आश्चर्य वाटत होतं.
जग्गूकडून ही सगळी माहिती समजल्यावर रणदिवेंना लक्षात आलं की आपल्याला जे दिसतंय, त्यापलीकडेही बरंच काही आहे. अर्थात, जग्गूही खरं बोलतोय की खोटं, हे समजून घ्यायला हवं होतंच.
“पुढे काय झालं? एक अक्षरही खोटं बोललास, तर पुन्हा कुठेही नोकरी करायची वेळच येणार नाही, माहितेय ना?“ रणदिवेंनी दम दिल्यावर जग्गूचा चेहरा एवढासा झाला.
“गरीब माणूस आहे साहेब, मोलमजुरी करून जगतो. घरी छोटी फॅमिली आहे माझी. त्यांना काही त्रास होईल, असं करणार नाही,“ तो गयावया करू लागला.
“मग जे बघितलंस, जे ऐकलंस, ते सगळं खरं खरं सांग,“ रणदिवेंनी पुन्हा त्याला दमात घेतला.
“ते असं म्हटल्यावर डोकं जरा हललंच, साहेब. पण मी जास्त नादाला लागलो नाही. साहेब असलात, म्हणून काहीपण ऐकून घेणार नाही असं ऐकवलं आणि तिथून बाहेर पडलो. माझा काही दोष नाहीये साहेब, ह्या प्रकरणात अडकवू नका मला!“ जग्गू रडायला लागला. तो नाटकं करत नाहीये, खरंच बोलतोय, याचा रणदिवेंना अंदाज येत होता, तरीही पुरावा हाती येईपर्यंत कुणावरही विश्वास ठेवून चालणार नाही, याबद्दल त्यांना शंका नव्हती.
कितीही चौकशी केली, उलटतपासणी केली, तरी सगळ्यात आधी विनीतचा पत्ता लागणं महत्त्वाचं आहे, याची त्यांना कल्पना होती. त्यांची पथकं जिवाचं रान करून विनीतचा शोध घेत होती. अखेर त्यांच्या शोधाला दिशा सापडली आणि विनीतची खबर लागली. बातमी अर्थातच चांगली नव्हती. विनीतचा मृत्यू झाला होता आणि मृतदेह जंगलातल्या नदीच्या काठावर सापडला होता. विनीतच्या शरीरावर आपटल्याच्या, खरचटल्याच्या खुणा होत्या. मृत्यू नक्कीच नैसर्गिक नाही, हे लक्षात येत होतं. मध्ये एक दिवस निघून गेला होता. मृत्यूचं कारण आणि इतर तपशील आता पोस्टमार्टेम रिपोर्टमध्येच लक्षात येणार होते. रणदिवेंच्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मृतदेहाच्या अंगावर ओरखडे होते. मृत्यूपूर्वी त्याची हल्लेखोराशी झटापट झाली असावी, हे लक्षात येत होतं. रणदिवेंना एकदम आठवलं, जग्गूच्या हातावरही खरचटल्याची जखम होती. म्हणजे जग्गू खोटं बोलत होता की काय? जग्गूला वार्यावर सोडून चालणार नाही, हे त्यांनी मनाशी पक्कं केलं. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला आणि पुढच्या तपासाला लागले.
विनीतबरोबर दोन मित्र या रिसॉर्टवर आले होते. एक होता, प्रशांत लोणारे. तो प्रसिद्ध बिझनेसमन होता. दिल्लीत नोएडामध्ये त्याच्या दोन कंपन्या होत्या. दोन वर्षांपूवी तो बिझनेस वाढवण्याच्या हेतूने आपल्या मूळ शहरात परत आला होता. दुसरा मित्र महेंद्र हा एका कॉर्पोरेट कंपनीत काम करत होता. महेंद्र आणि विनीतची काही वर्षांपासूनची मैत्री असली, तरी प्रशांत त्यांना नुकताच जॉइन झाला होता. अल्पावधीत त्याची विनीतशी घट्ट मैत्री झाली होती आणि या रिसॉर्टवर येण्यासाठीही विनीतनेच त्याला आग्रह केला होता, हेही रणदिवेंना चौकशीमध्ये समजलं.
या सगळ्यांशी रणदिवेंची भेट झाली होती, त्यांच्याकडे चौकशीही झाली होती, पण ती जुजबी. आता घटनेला गंभीर वळण लागल्यानंतर प्रत्येकाची सखोल चौकशी करायलाच हवी होती.
जग्गूच्या घरी एका हवालदाराला पाठवून रणदिवेंनी त्याला पोलिस स्टेशनवर बोलावून घेतलं. त्याच्याशी बराच वेळ ते काहीतरी बोलत होते. खरंतर जग्गूच्या हातावर ओरखडे दिसल्याचं साहेबांना आठवत होतं, मग त्याला सरळ आत टाकून त्याची धुलाई करायला हवी होती, बरोबर सगळे गुन्हे कबूल केले असते, असं हवालदार शिंदेंना वाटत होतं. साहेबांचं तंत्र काहीतरी वेगळंच असावं, असा विचार करून ते आपल्या कामाला लागले.
रणदिवेंनी त्याच दिवशी रिसॉर्टपासून ज्या ठिकाणी विनीतचा मृतदेह सापडला, त्या रस्त्यावर कसून तपासणी चालू केली.
फॉरेन्सिक टीमलाही बोलावण्यात आलं होतं. एकही पुरावा त्यांना नजरेआड करायचा नव्हता. रिसॉर्टमधून बाहेर पडणार्या रस्त्यावर तसे अनेकांच्या चपलांचे ठसे होते. त्यावरून विनीत नक्की कुठल्या दिशेने गेला असावा, याचा माग काढता येणं अशक्य होतं. मात्र त्याच्या फेवरेट सिगारेटचं थोटूक एका ठिकाणी पडलेलं दिसलं आणि रणदिवेंची बॅटरी चार्ज झाली. त्यांनी पुढेही पाहणी केली, तर आणखी एक दोन थोटकं मिळाली. विनीत अस्वस्थ होता, हे उघड होतं.
थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी नदी लागत होती. तिथेच एका उंचवट्याच्या शेजारी असलेल्या झाडापाशी त्यांच्या पथकातल्या एकानं रणदिवेंना बोलावलं. झाडाच्या खोडावर रक्त लागलेलं दिसत होतं. हे रक्त विनीतचं असणार, याबद्दल खात्री होतीच, पण त्यातून आणखीही काही हाती लागण्याची शक्यता होती. फॉरेन्सिक टीमने तातडीने नमुने गोळा गेले.
“साहेब, रक्ताचे नमुने त्या जग्गूचेच असणार बघा,“ शिंदेंनी छातीठोकपणे सांगितलं. रणदिवेंनी रागाचा लूक दिल्यावर शिंदे एकदम नरमले.
“म्हणजे, असू शकतील, असं वाटतंय,“ त्यांनी एकदम सारवासारव केली.
“रिपोर्ट येईपर्यंत थांबूया का, शिंदे?“ रणदिवेंच्या या प्रश्नावर शिंदेंची बोलती बंद झाली.
रिपोर्ट मिळायला एक दिवस जाणार होता, तोपर्यंत इतर तपास थांबवून चालणार नव्हता. विनीतचा मित्र प्रशांत याच्याबद्दल रणदिवेंना विशेष उत्सुकता वाटत होती. मोठा बिझनेसमन असूनही तो इथे अगदी निवांत येऊन राहिला होता. विनीत आणि प्रशांत हे मित्र असले, तरी दोघांच्या आर्थिक स्थितीची तुलनाच होऊ शकत नव्हती. विनीतचा छोटा बिझनेस ठीकठाक चालू होता, तर प्रशांतचे हात आभाळाला टेकले होते. या प्रशांतला पुन्हा एकदा नीट भेटायला हवं, असं रणदिवेंनी ठरवलं आणि त्याला पोलिस स्टेशनला यायचं निमंत्रण दिलं.
“सर, मी फक्त या ट्रिपसाठी दोन दिवस वेळ काढला होता. मला प्लीज ह्या चौकशी आणि इतर गोष्टींमध्ये वेळ द्यायला लावू नका. आपण फोनवर बोलू शकतो. मला दिल्लीला एक अपॉइंटमेंट आहे,“ प्रशांत प्रामाणिकपणे त्याची अडचण सांगतोय, असं रणदिवेंना वाटलं.
“आता तपास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला कुठेच जाता येणार नाहीये, प्रशांतसाहेब,“ अशी स्पष्ट जाणीव रणदिवेंनी त्याला करून दिली. मग त्याला एकेक प्रश्न विचारू लागले. बोलता बोलता त्यांना जाणवलं, की प्रशांतच्याही हाताला छोटीशी जखम आहे. ती कशामुळे झाली, हे विचारल्यावर त्यानं उत्तर द्यायला टाळाटाळ केली. सगळ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील आणि तपासणीसाठी पाठवले जातील, याची रणदिवेंनी स्पष्ट कल्पना आधीच दिली होती.
झाडावर सापडलेल्या रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट आला आणि तो वाचता वाचता रणदिवेंचे डोळे चमकले. ते मनात जी लिंक जोडायचा प्रयत्न करत होते, ते काम या रिपोर्टने सोपं केलं होतं. खाजगी गाडी काढून प्रशांतच्या घरी जाण्याचं फर्मान त्यांनी काढलं आणि काही क्षणांत ते तिथे पोहोचलेही.
“पोलिसांपासून काही लपून राहत नाही, मिस्टर प्रशांत!“ असं म्हणून त्यांनी रिपोर्ट प्रशांतच्या समोर ठेवला. त्याचाही चेहरा पांढराफटक पडलेला दिसला, “तुम्ही अंजली मॅडमना आणखी पाठीशी घालायचा प्रयत्न करू नका, त्यांना बाहेर बोलवा!“ असं म्हटल्यावर तर प्रशांत अवाक् होऊ पाहत राहिला. रणदिवेंनी येता येता बंगल्याच्या एका बाजूला लावलेली अंजलीची कार बघितली होती आणि त्यावरूनच हा तर्क केला होता.
अंजली प्रशांतशी बोलायलाच त्याच्या घरी आली होती. ती बाहेर आली. तिच्या हातावरही ओरखडे होते आणि झाडावर सापडलेलं रक्त तिचंच होतं. पोलिसांकडे पुरावाच असल्याने तिला सगळं खरं सांगावं लागलं.
“विनीत चांगला होता, पण आहे त्यात समाधान मानणारा होता. त्याला काही मोठं अचिव्ह करायचं नव्हतं. दिवसेंदिवस तो बोअरिंग होत चालला होता. आम्हाला पैसेही कमी पडत होते. मला त्याचा कंटाळाच आला होता. तेवढ्यात माझी प्रशांतशी भेट झाली. आम्ही कॉलेजमेट्स. आमचं तेव्हा एकमेकांवर प्रेम होतं, पण लग्न झालं नाही. एवढ्या वर्षांनी त्याला भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की मी त्याच्याबरोबरच सुखी राहू शकते. पण त्यानं तसं करायला नकार दिला,“ हे ऐकल्यावर मात्र रणदिवेंनाही आश्चर्य वाटलं.
“विनीतशी माझी मैत्री झाली होती. तो साधा असला, तरी चांगला माणूस होता. मला त्याचा संसार मोडायचा नव्हता. तसं मी हिला स्पष्ट सांगितलं,“ आता प्रशांतनेही त्याची बाजू मांडली. त्यांच्या बोलण्यातून रणदिवेंना लक्षात आलं की प्रशांत खरंच मनाने चांगला होता. धंद्यात लबाड्या करत असला तरी त्याला माणुसकी होती. अंजली मात्र त्याच्यासाठी वेडी झाली होती. ती सतत त्याच्या मागे असायची. त्याच्याबरोबर वेळ घालवायला मिळावा, म्हणूनच तिने त्यालाही या ट्रिपसाठी तयार केलं होतं. प्रशांत-अंजलीबद्दल विनीतला ट्रिपमध्येच संशय आला, म्हणूनच त्यांच्यात वादावादी झाली आणि त्याचाच राग त्या रात्री जग्गूवरही निघाला.
दुसर्या दिवशी सकाळी विनीत फिरायला बाहेर पडला, तेव्हा तो परत येऊ नये, याच उद्देशानं अंजली त्याच्या मागे गेली. प्रशांतने योगायोगाने ते बघितलं आणि तोही तिच्या मागे धावला. जंगलात झटापट झाली, तेव्हा विनीत तिथे पोहोचला, पण तोपर्यंत अंजलीने विनीतला बेसावध गाठलं होतं. त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच झाडापाशी दोघांची झटापट झाली. अंजलीनेच त्याला खाली ढकलून दिलं. ती एवढी बेभान झाली होती, की प्रशांतने तिला आवरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या हातावर तिच्याच नखांचे काही ओरखडे उमटले.
विनीतच्या मृत्यूला अंजलीच जबाबदार आहे, याबद्दल कल्पना असूनही विनीत केवळ माणुसकीच्या भावनेतून तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात, पोलिसांनी केलेला तपास आणि पुरावे यांच्या जोरावर गुन्हेगार सुटणं शक्यच नव्हतं. या तपासात जग्गूनेही पोलिसांना मोलाची साथ केली. त्यानं रणदिवेंना रिसॉर्टवरच्या दोन दिवसांतल्या अनेक महत्त्वाच्या खबरी सांगितल्या, त्यातूनच रणदिवेंच्या तपासाला दिशा मिळत गेली आणि खरा गुन्हेगार गजाआड होऊ शकला.