स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं रामदास स्वामी यांनी म्हटलं आहे. प्रत्यक्ष जीवनात काय किंवा सिनेमाच्या जगात काय आईशिवाय पूर्णता नाही. पिढी बदलली तशी हिंदी सिनेमातील आईदेखील बदलली. समाजमनाचा आरसा असणार्या सिनेमातील आई आणि आईच्या भूमिका साकारणार्या अभिनेत्री दर दशकात बदलत गेल्या. डोक्यावर पदर घेऊन मुलांचं संगोपन करणारी, त्याला प्रेमाने `गाजर का हलवा’ खाऊ घालणारी आई पुढच्या काळात पदर खोचून घराबाहेर काम करणारी झाली. कालांतराने पडद्यावरील आईचा पदर काळाच्या पडद्याआड गेला आणि ती आधुनिक मॉम झाली. हिंदी सिनेमातील आईच्या भूमिकेत ज्यांनी ठसा उमटवला आहे अशा लीला चिटणीस, सुलोचना, नर्गिस, निरुपा रॉय, रीमा लागू, या अभिनेत्री चटकन आठवतात. याव्यतिरिक्तही अनेक अभिनेत्रींनी आईची भूमिका साकारली. या मातृदिनाच्या निमित्ताने सिनेमातल्या ‘माँ’चा हा कॅलिडोस्कोप.
`मेरे पास मां है’ हा एकच डायलॉग हिंदी सिनेमातील ‘माँ’चे महत्व अधोरेखित करणारा आहे. तयार होणार्या इमारतीच्या विटा आईने उचलल्या होत्या म्हणून ती इमारत दामदुपटीने घेणारा मुलगा असो की आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी प्राणाची आहुती देणारा मुलगा असो, हिंदी सिनेमातील मुलांसाठी आई म्हणजे सर्वस्वच. हिंदी सिनेमा जिच्याशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नसे अशा आईच्या भूमिकेतील सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे `निरुपा रॉय’. एके काळी हिरोईन म्हणून पडद्यावर झळकलेल्या निरुपा रॉय यांना पहिल्या डावात मनासारखं यश मिळालं नाही, पण दुसर्या डावात सुपरस्टार अमिताभ बच्चनची आई बनून त्यांनी ‘आई नंबर वन’ हा किताब मिळवला. ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमात तीन मुलांचे रक्त आजारी आईला देतात. मेडिकल सायन्समधील अशक्यप्राय गोष्ट प्रेक्षकांच्या गळ्यात उतरवण्यासाठी मनमोहन देसाई यांनी निरुपा रॉयसारखी सात्विक आईच निवडली. ‘मी अमिताभची आई आहे,’ असं सांगून अनेक दुय्यम ऐर्या गैर्या अभिनेत्यांची आई होण्यास त्या नकार देत असत. एकाच जन्मात त्यांनी वडील धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल यांच्या आईची भूमिका साकारण्याचा चमत्कारही करून दाखवला. परिस्थितीने गांजलेल्या मातांमध्ये त्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. पडद्यावर नवरा सोडून गेल्यावर अथवा इतर कारणांमुळे जेव्हा त्यांनी मुलांचा सांभाळ केला, तेव्हा त्यांची मुले गुणी आणि कर्तृत्ववान झाली. एक गमतीची गोष्ट म्हणजे बर्याचदा सिनेमाचे टायटल पडद्यावर येईपर्यंतच त्या गरिबीने गांजलेल्या असत. टायटल झळकल्यानंतरच्या दृश्यात, त्यांची परिस्थिती चांगली झालेली असे. नीटनेटका दिवाणखाना, रुपेरी केस, हातात पूजेचं ताम्हण किंवा गाजर हलव्याची डिश, पण चेहेर्यावरचे भाव कधीतरी गरिबीचे कढ प्यायल्याने येणार्या अलिप्ततेचे असतं. तेजी बच्चन, रामसरनी कपूर यांच्या खालोखाल जर कुणी अमिताभ आणि शशी कपूर यांची काळजी केली असेल, तर ती निरुपा रॉय यांनी.
खर्या जगात स्त्रियांचे वय वाढत नाही असं म्हणतात पण सिनेमातील जगात मात्र पुरुष हिरो वयाच्या सत्तरीतही तरुण म्हणून वावरू शकतात, आपल्यापेक्षा निम्म्याने कमी वयाची मुलगी यांची हिरोईन असते. या उलट लग्न झाल्यावर किंवा चेहर्यावर वय दिसायला लागल्यावर हिरोईन ते आई असा प्रवास सुरू होतो. ‘मुनीमजी’ (१९५५) चित्रपटात निरुपा रॉय यांना आधी देव आनंद यांच्या हिरोईनच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आलं होतं, पण आपल्यापेक्षा फक्त आठ वर्षांनी लहान असलेल्या हिरोच्या आईची भूमिका त्यांच्या वाट्याला आली. एकदा आईचा शिक्का बसला की पुन्हा हिरोईनची कामं मिळणं फार कठीण असतं. अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी तर आपल्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका पडद्यावर साकारली आहे. अमिताभ बच्चन, जितेंद्र, धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, मिथुन चक्रवर्ती या मुलांनी पृथ्वीतलावर जन्म घेतला, तेव्हा या रोहिणी आईचा प्रत्यक्षात जन्म देखील झाला नव्हता. सिनेमातील हिरोईन कशी असावी, कशी दिसावी याच्या भारतीय प्रेक्षकांच्या काही ठोस अपेक्षा आहेत. यामुळे हीरोंच्या तुलनेत हिरोईनची सिनेकारकीर्द लहान असते. तिच्या शेवटाला लग्न करून चित्रपटसंन्यास घ्यायचा किंवा आईच्या भूमिकेत आपली दुसरी इनिंग सुरू करायची याचा निर्णय अभिनेत्रींना घ्यावा लागतो. पण हिरोईन ते आईची भूमिका करणारी (दुय्यम) चरित्र अभिनेत्री हा बदल सोपा नसतो. मानधन, सेटवर मिळणारी वागणूक, चाहत्यांचं प्रेम यात कमालीचा फरक पडतो. इतके वर्ष ग्लॅमरने भरलेलं, लाईमलाईटमध्ये असलेलं आयुष्य असं वास्तवतेच्या पटावर मांडणं सर्व अभिनेत्रींना जमत नाही. म्हणूनच बहुतांश मोठ्या हिरोईन्स आईची भूमिका करण्यापेक्षा लग्न करून चित्रपट संन्यास घेणं पसंत करतात. कालांतराने मुलं मोठी झाली आणि नवरा मोठा निर्माता असेल तर मध्यवर्ती भूमिकेत दिसतात.
तारुण्याच्या पलीकडील अभिनेत्रींना मध्यवर्ती भूमिकेत पहायची सवय अजूनही आपल्या भारतीय चित्रपट प्रेक्षकांना नाही, त्यामुळे काही अपवाद वगळता असे चित्रपट चालत नाहीत. ज्या हिरोईन्सना हा बदल स्वीकारता येतो त्या सहजपणे सिनेमातील आईपण स्वीकारतात. राखी, वहिदा रेहमान, नूतन… अशी अनेक नावे सांगता येतील. अनेक चित्रपटात अमिताभ बच्चनच्या प्रेयसीची भूमिका साकारलेल्या राखीने ‘शक्ती’ चित्रपटात अमिताभच्या आईची भूमिका केली होती. ‘मेरे पास माँ है’च्या दोन दशकांनंतर ‘मेरे बेटे आयेंगे, मेरे करण-अर्जुन आयेंगे’ या संवादातून करण-अर्जुनच्या आईने प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला. आज मिम युगातही हा संवाद लोकप्रिय आहे. राखीने साकारलेल्या दुर्दम्य आशावादी आईला तोड नाही. तशी ‘कर्ज’ सिनेमातील आईही मुलाच्या दुसर्या जन्मात पण त्याला ओळखू शकली, पण ज्या कन्विक्शनने या आईने सगळ्यांना ठणकावून सांगितलं की करण-अर्जुन येणार, तो दुर्दम्य आशावाद वास्तवातील आयांना देखील जमला नसता.
नव्वदीच्या दशकाआधी हिंदी सिनेमात आईच्या डोळ्यात गंगा यमुना वाहत असायच्या. पडद्यावरील आई जितकी गरीब तितकी बॉक्स ऑफिसवर श्रीमंती दिसेल असा सिनेपंडितांना विश्वास होता. कित्येक हिंदी सिनेमांचे ब्लॉकबस्टर यशाचे गमक गरीब आई हे होते. या पडद्यावरच्या मातेच्या नशिबी कसलंच सुख नसायचं. लग्न झाल्यावर नवरा एकतर देवाघरी जायचा किंवा परागंदा व्हायचा. आता आपलं, मुलांचं कसं होणार याची काळजी, शहराकडे स्थलांतर, मुलाला मोठं करण्यासाठी धुणे भांडी करणं, शिलाई मशीन चालवणे, कष्टाची कामं करून झालेली अधू दृष्टी (डोळ्यावर तुटका चष्मा), डांग्या खोकला. मुलगा मोठा झाल्यावर परिस्थिती बदलो की ना बदलो, मुलाच्या आवडीचा गाजर का हलवा तर हवाच. अशी सोशिक आई घरासाठी वाटेल तो त्याग करण्यासाठी सदैव तत्पर असलेली, पुरुषसत्ताक विचारधारा पाळणारी असायची.
या प्रचलित प्रथेला छेद देणारे काही चित्रपट आले, प्रतिमेस छेद देणारी आई म्हटलं की अभिनेत्री नर्गिस यांनी साकारलेली ‘मदर इंडिया’ (१९५७) डोळ्यासमोर येते. आपला मुलगा चांगला आहे आणि इतर मुलांच्या संगतीमुळे तो बिघडतो अशी समस्त मातांची दृढ समजूत असते. मुलाच्या अनंत अपराधांना पोटात घालणारे क्षमाशील व्यक्तिमत्त्व आई अशी प्रतिमा. या प्रतिमेला छेद देऊन, मुलगा एका स्त्रीसोबत गैरवर्तन करतोय हे पाहून आई त्याला गोळी घालून ठार करतेय हे दृश्य १९५७ सालात पडद्यावर पाहणं पुरुषप्रधान संस्कृतीस खूप जड गेलं. ‘मदर इंडिया’मधील आईची भूमिका लेखकाने खूप ताकदीने मांडली होती. नवर्याच्या निधनानंतर दोन मुलांचे संगोपन करणारी ही आई अनेक संकटांना तोंड देत गरिबीत जगते. लालाच्या मुलीच्या अब्रूचे रक्षण करण्याचा प्रयत्न करताना ती स्वत:च्या मुलाला गोळ्या घालण्यासाठी बंदूक उचलते, तेव्हा ती भारतीय स्त्रीत्वाचं प्रतीक आणि रक्षणकर्ती आहे. या चित्रपटातील आई ममता, क्षमाशील आणि वेळ पडल्यास संहारक अशा तिन्ही रूपांत दिसते.
अशीच एक वेगळी आई दाखवली महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ सिनेमाने, आई तिच्या गुंड मुलाला त्याच्या इच्छेनुसार गोळी झाडून मुक्ती मिळवून देते. हा शेवट बघताना प्रेक्षक अक्षरश: थिजतो, पण पडद्यावर संजय दत्त मात्र समजूतदार डोळ्यांनी समाधानी हसू उमलवत, आईचं `देणं’ स्वीकारतो. इथे हिंसेचं समर्थन नाही. मात्र, माता ही केवळ तिच्या मुलांसाठी क्षमेचा महामेरू नसून, समाजाची सुजाण घटक म्हणूनही तिचं अस्तित्व असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. अशा मातृत्त्वावर कौतुकाचा वर्षाव केला गेला. जन्मदात्री आई, दाई माँ, मूल दत्तक घेतलेली आई यांना सिनेमाने नेहमी पूजनीय मानलं. प्रसंगी सिनेमातील सावत्र आई प्रेमळ झाल्यावर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलवला. पण हिंदी सिनेमाने जिला कायम सापत्न वागणूक दिली ती माता म्हणजे, ‘अविवाहित माता’ अथवा ‘कुमारी माता’.अविवाहित माता दाखवण्याचा हुकुमी फॉर्म्युला म्हणजे, खेडेगावात एक शहरी बाबू येतो, गावातील भोळ्या भाबड्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पोटुशी करतो आणि पोबारा करतो. काहीवेळा या शहरी बाबूचं प्रेम खरं असतं, पण त्याला खानदान की इज्जत, प्रतिष्ठा आपल्यापेक्षा हलक्या जातीतील किंवा गरीब मुलीसोबत लग्न लावण्याची परवानगी देत नाही. लग्नाआधी गर्भवती राहिलेल्या मुलीला तिच्या घरातील लोक ‘खानदान की इज्जत मिट्टी में मिला दी’ म्हणतात. मराठीत ‘शेण खाल्लेस पोरी’ असं म्हणतात. अशा प्रसंगात सिनेमावाले मुलीला एकतर आत्महत्या करायला लावत किंवा गर्भपात तरी करणं भाग पाडत. त्यांचे प्रेमिक, शोषणकर्ते नामनिराळे राहात आणि अविवाहित माता मात्र पाणवठा जवळ करत. या नेहमीच्या चित्रापेक्षा वेगळा विचार दिला तो ‘ज्युली’ (१९७५) या चित्रपटाने. वर्चस्व गाजवणारी अँग्लो-इंडियन आई म्हणून मनोरमा तिच्या अविवाहित, गरोदर मुलीला आधी गर्भपाताचा पर्याय देते, पण शेवटी ती तिच्या मुलीला गुपचूप मुलाला जन्म देण्यासाठी मदत करते, ज्याला नंतर अनाथाश्रमाकडे सुपूर्द केले जाते.
अनेक अविवाहित माता चित्रपटांमध्ये दर दशकात वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसतात. महेश मांजरेकर यांच्या ‘अस्तित्व’ सिनेमातील आई केलेल्या कृत्याची जबाबदारी उजळ माथ्याने स्वीकारते, तर ‘रिहाई’मधील (१९८८) खेडेगावातील हेमामालिनी पती मुंबईत असताना परपुरुषाकडून राहिलेला गर्भ आता माझ्या शरीराचा भाग आहे असं पतीला आणि गावकर्यांना सांगून गर्भपात करून घ्यायला नकार देते. ‘क्या केहना’ (२०००) या सिनेमानेही अविवाहित मातेचा वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर आणला. सामाजिक नियमांनुसार चालणारी, पण स्वत:च्या इच्छा आकांक्षाही जपणारी प्रीती झिंटा लग्नाआधी गरोदर राहिल्यामुळे शाळा, समाजाचा बहिष्कृततेचा सामना करते. आधी जबाबदारी झटकणारा प्रियकर कालांतराने पश्चात्ताप होऊन प्रीती आणि बाळाचा स्वीकार करण्याची तयारी दाखवतो, तेव्हा प्रीती मुलाच्या जन्मदात्या पित्याऐवजी अडचणीच्या प्रसंगी तिच्या पाठीशी ठाम उभ्या राहिलेल्या पुरुषाशी लग्न करते.
या सिनेमासाठी रचलेल्या गोष्टीत काहीवेळा खर्या गोष्टींची झलक दिसते. अभिनेत्री नीना गुप्ता यांनी लग्नाशिवाय झालेल्या मुलीचं (मसाबा) एकल मातृत्व स्वीकारलं होतं. ‘पा’ (२००९) हा चित्रपट अमिताभ-अभिषेक या पिता-पुत्राच्या नात्याची गोष्ट सांगणारा आहे, परंतु यातील आई विद्या बालन आपले लक्ष वेधून घेते. ती प्रबळ इच्छाशक्ती असलेली, एकल अविवाहित पालक स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करते आणि प्रोजेरियाने ग्रस्त (वृद्धत्त्वाला गती देणारा दुर्मिळ रोग) असलेल्या मुलाचे संगोपन करते. ‘सनई चौघडे’ या चित्रपटात सई ताम्हणकर आणि सुबोध भावे यांनी साकारलेल्या पात्रातून कुमारी माता या विषयाकडे बघण्याचा भिन्न दृष्टिकोन मांडला.
सिनेसृष्टीतील आईबद्दल लिहिताना, जन्मदात्या आईसारखी माया करणार्या यशोदा मातांबद्दल लिहायला हवं. ही आई दत्तक आई, ट्रान्सजेंडर, सरोगेट, मूल वाढवणारा अविवाहित पिता किंवा प्रेमळ काळजी घेणारी असू शकते. ‘अमर प्रेम’मध्ये (१९७२) `पुष्पा, आय हेट टीयर्स’ या प्रसिद्ध संवादापेक्षा बरेच काही होते. शर्मिला टागोर यांनी एका वेश्येची भूमिका साकारली होती, जिच्या सहवासात आयुष्य वैराण असलेल्या राजेश खन्नाला विसावा मिळतो. सावत्र आईकडून वाईट वागणूक मिळाल्यावर तिने लहान नंदूला आईचं प्रेम दिलं. ‘लम्हें’मध्ये (१९९१) दाई जानच्या भूमिकेत वहिदा रहमानने प्रथम वीरेन आणि नंतर पूजाला मुलीसमान प्रेम दिलं ‘दरमियाँ’मध्ये (१९९७) आरिफ जकेरिया यांनी साकारलेल्या एका तृतीयपंथीराची आई म्हणून किरण खेरने मातृत्वाच्या संकल्पनेलाच आव्हान दिले होते. ‘कभी खुशी कभी गम’मध्ये (२००१) शाहरुख खानच्या दत्तक आईच्या भूमिकेत जया बच्चनला मुलगा समोर दिसण्याआधीच त्याची चाहूल लागते. अबराम या शाहरुख खानच्या मुलाच्या जन्मानंतर २०१३ साली `सरोगसी माते’चा मुद्दा भारतात मोठ्या प्रमाणात चर्चेत आला. पण दुसर्याच्या मुलासाठी आपला गर्भ वापरू देणार्या माता अबरामच्या जन्माआधीही होत्या. या विषयावर हिंदी अनेक सिनेमांनी भाष्य केलं आहे. १९८३ साली आलेल्या `दुसरी दुल्हन’ या सिनेमात एका वेश्येची भूमिका साकारताना शबाना आझमी यांनी शर्मिला टागोर यांना मातृत्त्वाचे सुख मिळवून देण्यासाठी सरोगेट मातेची भूमिका पार पाडली होती. वाईट परिस्थितीमुळे पैसे घेऊन गर्भाशय भाड्याने देत आहोत, जन्माला येणार्या मुलावर आपला कसलाही हक्क नाही असा करार करायचा. पण, नंतर मूल जन्माला आलं की नवजात शिशूला आणि आईच्या पान्ह्याला व्यावहारिक करार कळत नाहीत. जन्मदात्या आईची पोटच्या मुलातील भावनिक गुंतागुंत वाढते. ती कथा या विषयावरील चित्रपटात सांगितली जायची. ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘फिलहाल’, ‘आय एम अफिया’, कृती सेननचा ‘मिमी’ हे चित्रपट सरोगसी माता या विषयावर येऊन गेले, पण बॉक्स ऑफिसवर फार कमाल करू शकले नाहीत. २०१९ साली आलेल्या ‘गुड न्यूज’ सिनेमाने मात्र सरोगसी मातेला बॉक्स ऑफिसवर श्रीमंत (तीनशे कोटी) केलं. या विषयावर विनोदी चित्रपट बनवताना दिग्दर्शक राज मेहता यांनी कियारा अडवाणी आणि करीना कपूर यांच्या गर्भांची अदलाबदली करून विनोद निर्मिती केली होती.
काळानुरूप आई बदलत गेली. ‘मुलगी दिली तिथे मेली. दिल्या घरी सुखी रहा… समजून घे’ असं सांगणारी आई आज मुलीच्या आवडीनिवडीची पर्वा करते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मधील (१९९५) फरीदा जलाल यांनी साकारलेली आई मुलीला लग्नमंडपातून प्रिय व्यक्तीसोबत पळून जाण्यासाठी प्रोत्साहित करते. ‘कल हो ना हो’मध्ये (२००३) जया बच्चनची स्वतंत्र जेनिफर, एकल पालक रेस्टॉरंट चालवते, तिच्या सासू-सासर्यांच्या आडमुठेपणाने वागते. ती विशेष गरजा असलेल्या मुलाचे संगोपन करत आहे आणि तिने तिच्या पतीच्या विवाहबाह्य अपत्याला दत्तकही घेतले आहे. कुटुंबाला एकत्र ठेवणारी आणि पतीच्या आत्महत्येशी जुळवून घेणारी ती खरी आघाडीची महिला आहे. ‘हजार चौरासी की माँ’ (१९९८) या सिनेमातली जया बच्चन सर्व सामाजिक अडथळे तोडून मृत मुलाची नक्षलवादी विचारसरणी समजून घेण्यासाठी नाट्यमय प्रवासाला निघते.
लैंगिकतेविषयी उघडपणे बोलणे आपल्या समाजात हीनतेचे मानले जाते आणि समाजाचे प्रतिबिंब हिंदी चित्रपटात पडत असल्यामुळे सुरुवातीच्या सिनेमातील मातादेखील या विषयांवर आपलं मत व्यक्त करत नसत. आजच्या सिनेमातील माता त्यांच्या मुलाच्या लैंगिकतेबद्दल शंका वाटत असल्यास स्पष्ट शब्दात विचारतात. ‘दोस्ताना’मधील (२००८) पंजाबी आईच्या भूमिकेत किरण खेरला जेव्हा आपला मुलगा समलिंगी असल्याचे समजते, तेव्हा तिला मनातून वाईट वाटतं, पण शेवटी मुलाची आवड आणि लैंगिकता स्वीकारते. असं करण्याने आजच्या पिढीतील प्रेक्षकांच्या पसंतीस ही आई उतरते. पूर्वीच्या माता त्यांच्या मुलांशी लैंगिक संबंधांबद्दलच्या कोणत्याही चर्चेपासून दूर राहायच्या. ‘शुभ मंगल सावधान’मध्ये (२०१७) अलीबाबा आणि चाळीस चोरांची उपमा वापरून अभिनेत्री सीमा पाहवा तिच्या अनोख्या शैलीत नवीन लग्न झालेल्या आपल्या मुलीला लैंगिक शिक्षण देते.
सिनेमा हा नेहमीच समाजाचं प्रतिबिंब राहिला आहे. बदलत्या काळानुसार आईची पात्रेही विकसित झाली आहेत. रोना धोना करणार्या मातांचे युग संपले. चित्रपटांमधील आई स्वत:चा विचार करू लागली आहे. आजच्या आईत आत्मविश्वास तर आहेच पण त्याचबरोबर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणि त्यांचा स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी त्या एक पाऊल पुढे जातील. ‘अस्तित्व’ (२०००) सिनेमाची एका अशा आईबद्दल सांगते जी नवर्याच्या अधिपत्याखाली जगताना स्वत:ची ओळख शोधण्याचा प्रयत्न करते. वेळ येते तेव्हा एक आई आणि पत्नी या नात्याने, ती तिच्या प्रतिष्ठेसाठी उभी राहते आणि तिच्या पती आणि मुलाने थोपवलेल्या पितृसत्तेचा निषेध करते. ‘देवदास’ (२००२) चित्रपटात किरण खेरला एक स्वाभिमानी आई दाखवण्यात आलं आहे. अपमान झाल्यावर खचून न जाता तिची मुलगी पारो हिचे लग्न देवदासच्या कुटुंबापेक्षा उच्चवर्गात करून देण्याची ती शपथ घेते. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये असे निर्णय घेण्याची क्षमता फक्त पुरुष पात्रांकडे असायची. ‘देवदास’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा वडिलांकडून आईकडे गेलेल्या अधिकाराचे सूक्ष्म बदल प्रतिबिंबित करतो. ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये (२०१२) श्रीदेवीने एका घरगुती स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली आहे जिला इंग्रजी बोलण्याचे कौशल्य नाही. यामुळे तिला स्वत:च्या घरातही किंमत नाही. हीच एक साडी नेसलेली घरगुती आई इंग्रजी बोलण्याच्या कोर्समध्ये सामील होते आणि ती आत्मविश्वासाने इंग्रजीमध्ये संवाद साधू शकते, तेव्हा टर उडवणार्या कुटुंबात त्याच घरगुती आईला मानाचं स्थान निर्माण होतं. ‘हैदर’मधील (२०१४) गझलाच्या तब्बूच्या पात्राने आई आणि तिचा मुलगा यांच्यातील गहन आणि गुंतागुंतीचे नाते दाखवले गेले आहे. गझला ही एक अशी स्त्री आहे जी स्वत:च्याही सुखाचा विचार करते.
काही वेळा ‘माता न तू वैरीणी’ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो मुख्यत: सावत्र आईबद्दल होता. पण सिनेमाच्या शेवटपर्यंत त्या आईला नायक नायिकेबद्दल जिव्हाळा वाटू लागे. ‘बेटा’मध्ये अरुणा इराणी यांनी केलेली अनिल कपूर यांच्या आईची भूमिका सावत्र आईच्या खलवृत्तीचा कळस होती. अशा अनेक खलनायिका सावत्र आईच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हॉलिवुडमधला ‘स्टेपमॉम’ हा ज्युलिया रॉबर्ट्सचा सिनेमा आला, तेव्हा त्या ‘माँ’ने बर्याच सिनेरसिकांचे लक्ष दुसर्या बाजूकडे वेधले. आपल्याकडे ‘हम साथ साथ हैं’मध्ये रीमा लागू यांनी अभिनित केलेली, मोहनीश बहलची सावत्र आई प्रेमळ आहे अशी खात्री होता होताच, परिस्थिती पालटते. ‘धडकन’ सिनेमात सावत्र आई आणि नात्यांनी गांजलेला अक्षयकुमार.
‘बधाई हो’ (२०१८) या सिनेमात वयात आलेल्या मुलाची चाळीस वर्षीय आई पुन्हा गर्भवती होते याची गोष्ट विनोदी पद्धतीने चित्रित करण्यात आली आहे. या वेगळ्या विषयाचे सिनेरसिकांनी भरपूर कौतुक केले. प्रियंवदा कौशिकच्या भूमिकेत नीना गुप्ता समाजाची चेष्टा आणि मुलांचा विरोध सहन करून कोणत्याही परिस्थितीत गर्भपात न करता मूल जन्माला घालायचं यावर ठाम आहे. ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ (२०२३) या सिनेमाची कथा आधुनिक हिरकणीची गोष्ट सांगते. तिच्या दोन मुलांचा ताबा मिळविण्यासाठी नॉर्वेजियन सरकारविरूद्ध लढा देऊन प्रचंड संघर्ष करणारी आई यात पाहायला मिळते.
हिंदी चित्रपटात वात्सल्यसिंधू सुलोचना बाई ते मॉर्डन मॉम रिमा लागू अशा अनेक मराठी अभिनेत्रींनी हिरोंवर आईची ममता केली आहे. ‘मुघल-ए-आझम’मध्ये मुलाची बाजू घेऊन अकबर बादशहाला चार गोष्टी सुनवणारी, शहजादा सलीमची आई… दुर्गा खोटे. ‘कर्मा’ सिनेमात बांगड्यांच्या आवाजात फोनवर नवर्याशी संवाद साधणारी मूकबधीर नूतन.. ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’मधील सुंदर दिसणारी तरुण आई रिमा लागू… ‘हम दिल दे चुके सनम’मधील स्मिता जयकर. नीना कुलकर्णी, सुहास जोशी, सविता प्रभुणे (‘तेरे नाम’मध्ये सलमानची आई), प्रतीक्षा लोणकर (‘इक्बाल’), नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करताना करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’मधील रणवीर सिंगची पंजाबी आई क्षिती जोग. ‘गली बॉय’मधील मुस्लीम आई अमृता सुभाष. अशा अनेक मराठी अभिनेत्रींनी हिंदी सिनेमात माँ केवळ साकारलीच नाही तर तिला वेगळा आयाम दिला.
हिंदी सिनेमात जर अमिताभची माँ लोकप्रिय असेल तर मराठी सिनेमात ‘श्यामची आई’ सर्वात लोकप्रिय आहे. आचार्य अत्रे यांनी १९५३ साली प्रदर्शित केलेल्या ‘शामच्या आई’चं गारूड प्रेक्षकांच्या मनावर आजही कायम आहे. सत्तर वर्षांनी याच विषयावर आजच्या पिढीतील एका दिग्दर्शकाला याच विषयावर सिनेमा काढवासा वाटतो. प्रत्येकाची आई अशीच असते का? असा प्रश्न पाडणारा आणि आई कशी असावी? याच उत्तर देणारा हा सिनेमा.
‘आत्मविश्वास’ या मराठी सिनेमात, आपला मुलगा ड्रगच्या विळख्यात सापडला आहे असं कळल्यावर भर रस्त्यावर चाबकाने फोडत जाणारी जमदग्नी आई नीलकांती पाटेकर यांनी उभी केली होती, त्यांचा तो पडद्यावरचा रुद्रावतार बघून प्रेक्षकांनीही हा सिनेमा आपल्या आईने बघायला नको रे बाबा अशी विनंती केली असणार. या सगळ्या आयांपेक्षा वेगळी आई समोर आली ती दादा कोंडके यांच्या चित्रपटातून, आजच्या पिढीला रत्नमाला या नावापेक्षा त्या परिचित आहेत, त्या ‘आये’ म्हणून. त्यांनी आई म्हणून साकारलेल्या चित्रपटांची नावे, ‘सोंगाड्या’ (१९७१), ‘एकटा जीव सदाशिव’ (१९७२), ‘हर्या नार्या झिंदाबाद’ (१९७२), ‘थापाड्या’ (१९७३), ‘पांडू हवालदार’ (१९७५), ‘प्रीत तुझी माझी’ (१९७५), ‘रामराम गंगाराम’ (१९७७), ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ (१९७८), ‘लक्ष्मी’ (१९७८), ‘ह्योच नवरा पाहिजे’ (१९८०), ‘आली अंगावर’ (१९८२), ‘नवरे सगळे गाढव’ (१९८२), ‘ढगाला लागली कळ’ (१९८५), ‘मुका घ्या मुका’ (१९८७). कणखर आवाज, मोठे डोळे, ग्रामीण वेष, ग्रामीण भाषा आणि त्यात दादा कोंडकेसारखा अवखळ मुलगा यांच्यातील आई-मुलगा नातेसंबंध बघताना प्रेक्षक खिळून राहत असे, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.
किंबहुना सुलोचनादीदींसारख्या पडद्यावरील आयांनी सालस, लाघवी, आपल्या मुलांची काळजी घेताना त्याच्याबद्दल अपशब्द न बोलता फक्त मुलावर प्रेम करणार्या, आईचे चित्र रंगवले होते, पण दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्या रूपाने चित्रपटसृष्टीला दिली. रत्नमाला यांनी त्याला खर्या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली.
समाज बदलत गेला तशी सिनेमातील आई देखील बदलत गेली. मुले आईवडिलांना घरातून बाहेर काढतात, तेव्हा वडील संघर्ष करून श्रीमंत होतात आणि मुलांना धडा शिकवतात असं राजेश खन्ना यांच्या ‘अवतार’ (१९८३) सिनेमात दाखवलं गेलं होतं. याच सिनेमावर आधारित ‘आई’ या मराठी चित्रपटात मुले आईवडिलांना घरातून बाहेर काढतात, तेव्हा वडीलांऐवजी नीना कुलकर्णी संघर्ष करून श्रीमंत होते आणि मुलांना धडा शिकवते असं दाखविण्यात आलं. याचाच अर्थ जुन्या सिनेमातील दुबळी, परावलंबी आई आता स्वकर्तृत्त्वाने बिझनेस वुनम झाली आहे. ‘चूल आणि मूल’ ही चौकट मोडून आई म्हणतेय मेरे पास गाडी, बंगला, पैसा और बच्चे भी हैं.