(जन्या धोबी गाढवावर लादलेली कापडाची गाठोडी वाटत गावभर फिरतोय. चालता चालता चौकात येऊन उभा राहतो. एक वाड्यासमोर थांबून एका नागड्या पोराला आवाज देतो.)
जन्या : ओ, कलुषितराव! या इकडं!! (गाठोड्यातून काही पितांबरं काढून त्याच्या हातात देत) ही धोतरं वाड्यात पोस्त करा! नाही, आम्हीही केली असती हो! पण आम्ही पडलो प्रापंचिक माणसं! तिथं सगळी ब्रह्मचारी मंडळी राहतात ना? आणि तुम्ही पडले पंत-बुवांच्या गोटातले! तेव्हा हे तुम्हीच नेऊन द्या! (तोच पलीकडल्या जनी जवळकरीनच्या वाड्यातून आवाज येतो, तसा तो घाईने गाढव ओढत जाऊ लागतो. पण आतून एक जनीची सोबतीन पळत येते.)
सोबतीन : ओऽऽ, धोबीराऽव तुम्हाला आत बोलावलंय बाईनं!
जन्या : बाई एकट्या आहेत का?
सोबतीन : (गोंधळून) नाही!
जन्या : मग मला बोलावलं नसंल.
सोबतीन : कश्यावरून?
जन्या : नाही, म्हणजे चारचौघात बोलावून ओळख करून द्यायला अजून एवढी घसरट झाली कुठं आमची? म्हणून म्हंटलं!!! (उगाच हसतो.)
सोबतीन : अहो, तुम्हाला कापडं धुवायला देयची आहेत, म्हणून जनी बोलावतीय! तुम्हाला लगोलग घेऊन बोलावलं!
जन्या : आम्हाला घेऊन बोलावलं? आम्ही आमचं घेऊनच फिरतो की! (ह्यॅ, ह्यॅ करत हसतो.) व्हा पुढं! तुमच्या मागून चढतो मी! (तशी ती वाड्याच्या पायर्या चढू लागते. आणि गाढव खाली झाडाला अडकवून मागोमाग तो ही चढतो.)
(दोघं बाईच्या खोलीत येतात.)
जनी : नमस्कार मी जनी!
जन्या : आणि मी जन्या! तसं माझं दाखल्यावरचं नाव जनार्दनराव! पण अख्खं गाव जन्याच म्हणतं मला! फक्त इलेक्शन आले का पुन्हा मी जनार्दनराव होतो!
जनी : ते कसं?
जन्या : तेव्हा माझं व्होट पाहिजे र्हातं ना? त्यामुळं!
जनी : ओठ?
जन्या : ओठ नाही हो! व्होट!! मतं!! माझ्या ओठांचा त्यांना काय फायदा? ते मरू दे! तुम्ही का बोलावलं?
जनी : आता घ्या, माळ्याला फुलाचं आणि धोब्याला धुण्याचं सांगावं लागतं का?
जन्या : नाही! तशी सांगायची गरज न्हाई बघा! पण तुम्हाला धुवायचं काय म्हणतो मी?
जनी : (त्याच्या जवळ जात) तुम्ही असं काय काय धुता?
जन्या : (गडबडून) काय धुता म्हणजे? माणसाच्या अंगावरली A टू Z आख्खी कापडं आम्ही धुवून देतो.
जनी : आणि बाईमाणसाची?
जन्या : ती पण आम्हीच धुतो की! काढा की!
सोबतीन : ऐऽऽऽ मुडद्याऽऽऽ काही जिभंला हाऽड? सरळ बाईला काढा म्हणतो व्हय?
जन्या : आता घ्या? माझा म्हणायचा उद्देश सुपष्ट होता, बाई म्हणल्या धुता का? आता बाचक्या-बोचक्यातून, कपाटातून, दोरीवरून अशी कापडं काढून माझ्याकडे दिली तर मी धुवीन ना? आता त्याच्यासाठी एवढी लाम्हण लावण्याऐवजी मी फक्त तीन शब्दात `बाई कापडं काढा’, म्हणालो तर लगेच तुमच्या मनात शेण्खा! आणि एवढं शिव्या देण्यासारखं केलं काय मी? इव्ह टिझिंग, विनयभंग, रेप ? नाही तशी काही लोकं होती, पण पंतांचा सोगा पकडून पवित्र झाली हो ती!
सोबतीन : (खजील होत) मला वाटलं अंगावरले म्हणतात काय?
जन्या : तुम्हाला वाटून उपेग काय? शेवट देणार्या बाईच! त्यांनी दिलं, ते मी घेणार! त्याच्यात आमचा धंदा धुवायचा, गाठोड्यातलं, अंगावरलं जे दिलं ते धुणार! देताय ना मग?
जनी : (सोबतीनीकडे बघत) अय, दे की ते गाठोडं!
जन्या : (सोबतीनीकडे बघत) अय, दे की! बाई दे म्हणल्यावर देत जा की! ह्या अश्या होपलेसला ठेवता कश्याला हो तुम्ही? (तिच्या हातून बोचकं हिसकावून घेतो. जनीकडं बघत हसत हसत) बाई, येतो मी!
जनी : अवो! थांबा की! काही घेऊन जा ना? चहा-पाणी, दूध…?
जन्या : तसं तुमच्या हातचं विष बी चालंल मला! पण चहा नको!
जनी : का हो, शुगरबिगर आहे का तुम्हाला?
जन्या : नाही! नाही!! (हसत हसत) तसं असतं तर तुमची गोडी घ्यायला आलोच नसतो की! (गंभीर मुद्रा करत) माझा प्रॉब्लेम नॅशनल आहे.
जनी : नॅशनल? तो कसा?
जन्या : चहावाल्यानं चहा महाग केला हो, म्हणजे साखर महागली, पत्ती महागली, दूध महागलं, उकळायला गॅस महागला. त्यात भर म्हणून ह्या तलफेपायी लोकांनी दिल्ली दरबार चहावाल्याच्या हातात दिला. त्यानं तिथं बसून जे काही आंदण दिलंय, पार व्होल कंट्री शेकून निघायची कंडिशन केली हो! पण चाय गोड पडतो ना? त्यामुळं कुणी तलफ सोडीना. पण आय म्हणली, भाजून घ्यायचं नसंल तर तलफ सोड. म्हणून मी चहा सोडला.
जनी : मग वाईज दूध तरी घ्या हो!
जन्या : तुमचं दूध घेतलं असतं हो, पण लोकं काय म्हणतील? हा घोडा लहान राहिला का? अजून दूध प्यायला? अख्खी बदनामी होईल हो! एकवेळ माझी झाली तर चालंल पण तुमची नको!
जनी : मग दुसरं काही घेता का? नाही, तुम्ही पहिल्यांदाच आला आणि न घेता गेला तर बरं नाही दिसायचं हो!
जन्या : (आत येणार्या नाच्याकडे बघत) तुमचा लईच अग्रेव चाललाय म्हणून म्हणतो, जर मला काही द्यायचंच असंल तर कल्याण दरबाराचं कंत्राट मिळवून द्या.
जनी : ते हो मी कसं देणार?
जन्या : अहो पंत तुमच्या शेजारच्या माडीवर राहतात ना?
जनी : राहतात, पण त्यांना आमचा नाद नाही.
जन्या : हो मला माहित आहे त्यांना वेगळा नाद आहे. पण ह्या तुमच्या नाच्याला चोरून गायकी तेच शिकवताय ना?
जनी : तुम्ही कधी बघितलं?
जन्या : परवा रातच्याला हो!
जनी : (नाच्याकडे बघत) काय रे खरंय का?
नाच्या : (भीत) ते मला म्हणले, तू गायचं शिक. तुला नवीन फड काढून देतो नि सोंगाड्या करतो.
जन्या : बघा, मी म्हणलं ना? त्या माणसाला काही नीट चाललेलं बघवतच नाही. त्याच्यात मुंज्यासारखी रातीची गावभर फिरायची सवय? दर सहाहेक महिन्याला बाप्या माणसं खुळावत्याच पंत. पण ह्या येळची केस जरा येगळीच दिसतीय. (नाच्याकडे बघत) मग, आपला वशिला लागंल ना?
जनी : मुडद्या! माझ्या बरुबर राहून माझ्याच वाटोळ्यावर टपला होता काय? धोबीसाहेब काय म्हणताय होईल का त्यांचं काम? अरं बोल!
नाच्या : नाही म्हणजे…
जन्या : नाही? तुमचं हे राती भेटायचं प्रकरण चार घरी सांगितलं ना मी? तर गावभर बभ्रा व्हायला येळ लागायची नाही! बोल?
जनी : बोल की मेल्या! (जन्याकडं बघत) जाताना ह्या मेल्याला तिथं नेऊन सोडा, नाहीतरी पंतांनी नादावलाच आहे त्याला. देव जाणो कधी चालू फड जाळायचा? निदान तुमच्या उपेगी आला तरी ह्या जल्माची त्याची पुण्याई!
(जन्या नाच्याला घेऊन बाहेर जातो. )
(सुन्नवारवाडा. दरबार हॉलमधी पंतोजी कुबेरनगरीतील लढाईचे मोर्चेकरी ठरवत बसलेले. भोवतीने भाट मंडळी. तोच तिथे जन्या नाच्याला बखोट धरून आणतो. दोघं वाकून मुजरा करतात. हात हलवताना जन्याच्या हातात पंतांचं पितांबर लागतं.)
जन्या : (घाईने माफी मागत) सॉरी हो पंत! चुकून झालं. (उगाच हसत) तसंही धोब्याच्या हाताला धोतरं लागायचीच.
पंतोजी : (नाच्यावरून एक नजर फिरवून जन्यास उद्देशून) बोला, धोबीराव काय काम काढलंत?
जन्या : कामबीम काय काढणार? माझं काम कपड्यांचं! तुमचीच कापडं काढायला आलो होतो.
पंतोजी : (सावरून बसत) माझी कापडं? एवढी हिंमत?
जन्या : आवो, कापडं धुवायला काय गरज हिंमतीची? इथं गरजे कंत्राटाची! ते तुम्ही दिलं म्हणजे मी मोकळा. आणि तुमची सुटका.
पंतोजी : कसलं कंत्राट पाहिजे तुला?
जन्या : कापडं धुवायचं! मी असं बघतोय टीव्हीवर, पार मळलेली, माखलेली, घाणीत्नं बाहेर काढलेली पब्लिक तुमच्या बाजूनं लढाईला घेतलीत तुम्ही! त्यांची कापडं रहात असतील ना धुवायची? ते कंत्राट मला द्या बाकी काही नाही!
पंतोजी : ते? ते माझ्या हातात नाही बघा!
जन्या : तुमच्या कसं हातात नाही? ते माखलेले आदर्शराव? सौदामिनी, जॉयकर? तुम्हीच चिखल लावून माखवलेले. तुम्हीच आता साफसूफ करून लढायला उभे केलेत ना? तेंची घाणीनं भरलेली कापडं असतील ना?
पंतोजी : आहेत, असतात अशी कापडं! पण ती होलसेलमधी येडाराम नि सीभॉय धुवून देतात. म्हणजे माखवतात पण तेच. आणि धुतात पण तेच! त्यांचा भागीदारीत धुवून द्यायचा मोठा प्लॅन्(?)ट आहे.
जन्या : द्या की मग मला हे काम? मी त्यांच्यापेक्षा भारी धुवून देतो की? असे भट्टीत घातले का पांढरेफटक, वर नीळ लावायची नि कडक इस्त्री मारली का? नव्यासारखेच कपडे! (पंतोजीचे पाय पकडत) काही करा, पण तेवढं कॉन्ट्रॅक्ट मला द्या! मी ऐकलंय तुम्ही नौरंगजेबांचे धुते हात आहे म्हणून. त्यांचं उलीसक माखलं का, लगेच तुम्ही जिभल्या घेऊन हाजीर!
पंतोजी : अरे तुला हे झेपायचं नाही रे! हा धोबीघाट दिवसभर चालू असतो, तेव्हा कुठं एवढी पारदर्शक सफाई होते.
जन्या : झेपायचं तर सांगूच नका! तुम्हाला इकमाल, अजिमोद्दीन, ठिके, आदर्शराव वगैरेपैकी कुणी एकतरी आधी झेपला असता का? पण तुम्ही घेतलेच ना चढवून? पालख्यांत? आता भोई म्हणून त्यांना उरावर घेऊन पळवताना कधी कण्हला तरी का? एकदा सवय झाल्यावर, रूळल्यावर काही वाटत नाही हो! मग देताय ना कॉन्ट्रॅक्ट?
पंतोजी : नाही रे!
जन्या : बघा हं? मी तुमचं आणि (नाच्याकडे बोट दाखवत) नाच्याचं झेंगाट अख्ख्या गावाला बोंबलून सांगेन!
पंतोजी : (शांतपणे) सांग जा! मी आजवर एवढे जण खुळावले, नादावले. दिवसा, कधी रात्री पळवले. कुणी काही बोललंय? आता ह्याला कोण मोजतंय?
जन्या : बघा हं? तुमचा पाय सोडून ह्या पंज्यात मशाल धरली ना? तुमचा धुलाईचा प्लांट जाळून टाकीन मी!
(जन्या निर्धाराने उठतो. पंतोजीचा चेहरा काळाठिक्कर पडतो.)