आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर काही निर्णयांबाबत कौतुक होते आहे, तर काही निर्णयांवर टीकाही होते आहे. रिंकू सिंह, ऋतुराज गायकवाड, रवी बिश्नोई, मुकेश कुमार या चार उदयोन्मुख खेळाडूंची निवड न झाल्यामुळे आश्चर्य प्रकट होत आहे. तसेच रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंनी आणखी किती काळ ट्वेन्टी-२० संघातले स्थान टिकवून ठेवावे? फिरकीची चौकडी कशासाठी? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यांचा परामर्श…
– – –
विजयवीर फलंदाज रिंकू सिंह ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकला, यात त्याचा काहीच दोष नाही. कारण अखेरीस आम्हाला फक्त १५ खेळाडू निवडायचे असतात, अशा शब्दांत राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचा प्रमुख अजित आगरकरने रिंकूला वगळण्याचे विश्लेषण केले. परंतु रिंकू बदली खेळाडू म्हणून संघासमवेत प्रवास करीत असल्याचे सांगायला तो मुळीच विसरला नाही.
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर होऊन आता काही दिवस झाले आहेत. पण आगरकर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांच्या पत्रकार परिषदेनंतरही काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. रोहित आणि विराट आणखी किती काळ ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळणार? उपकर्णधार आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या ट्वेन्टी-२० विश्वचषक पूर्णत: खेळेल, याची खात्री देता येईल का? वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या मैदानांवर चार फिरकी गोलंदाजांची आवश्यकता आहे का? मधल्या फळीत रिंकू, सलामीवीर ऋतुराज गायकवाड, मधल्या फळीत यष्टीरक्षक-फलंदाज के. एल. राहुल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांची कामगिरी संघात निवडण्याइतपत योग्य झाली नाही का? असे अनेक मुद्दे निवडीनंतर चर्चेत आले आहेत.
अनुभवी दिग्गज कशासाठी?
भारतात धोनी पर्वाची खर्या अर्थाने सुरुवात झाली ती २००७मध्ये. हे वर्ष भारतासाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ची अनुभूती देणारे ठरले होते. कॅरेबियन बेटांवर झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. त्यामुळे राहुल द्रविडला कर्णधारपद सोडावे लागले. मग युवा महेंद्रसिंह धोनीकडे ते सोपवण्यात आले. या पार्श्वभूमीवर दक्षिण आप्रिâकेतील पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाकडून माफकच अपेक्षा करण्यात येत होत्या. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली या भारताच्या तत्कालीन त्रिमूर्तीने ट्वेन्टी-२० विश्वचषकापासून दूर राहणे पसंत केले होते. मग धोनीने ताज्या दमाच्या खेळाडूंना घेऊन चमत्कार घडवला आणि पहिल्या विश्वचषकावर मोहर उमटवली. परंतु आता त्याला १७ वर्षे झाली आहेत. भारताला ते यश पुन्हा मिळवता आलेले नाही. गेल्या काही ट्वेन्टी-२० विश्वचषकांमध्ये रोहित आणि विराटचे नेतृत्व पुरेसे नसल्याचे सिद्ध झाले असताना पुन्हा अनुभवालाच प्राधान्य देण्याची आवश्यकता होती का? ऑस्ट्रेलियासारख्या नामांकित संघाने स्टीव्ह स्मिथला विश्रांती देण्याचे धारिष्ट्य दाखवले. भारतालाही या पद्धतीने पाहता आले नसते का?
कारण कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी अनुभव हा मुद्दा सामना जिंकण्यासाठी महत्त्वाचा ठरतो, तसा ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी प्रत्येकदा उपयुक्तच ठरेल याची खात्री नसते. २०२३च्या संपूर्ण वर्षात भारतीय क्रिकेटने एकदिवसीय विश्वचषकाचे लक्ष्य समोर ठेवले होते. त्यामुळे रोहित आणि विराट ट्वेन्टी-२० प्रकाराचे सामने खेळले नाहीत. अगदी विश्वचषक संपल्यानंतरही आपण जे प्रयोग केले, त्यात सूर्यकुमार, ऋतुराज यांना नेतृत्व देऊन अनेक नवे पर्याय हाताळले. वर्षाच्या आरंभी भारत ट्वेन्टी-२० विश्वचषकाआधी अफगाणिस्तानविरुद्ध अखेरची मालिका खेळला, यात रोहित-विराट यांचे पुनरागमन झाले. रोहित आणि कोहली यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये जोरदार लयीत धावांचे इमले बांधत आहेत. पण त्यांचे सांघिक मूल्यमापन केल्यास त्यांचे अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु हे संघ तळाच्या स्थानांवर झगडत आहेत. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोहितने ६३ चेंडूंत १०५ धावांची आतषबाजी केली. पण तरीही मुंबई इंडियन्सने हा सामना २० धावांनी गमावला, हे उदाहरण ताजे आहेच.
यष्टीरक्षणाचे अचूक पर्याय
‘आयपीएल’मध्ये मधल्या फळीत सातत्यपूर्ण कामगिरी आणि यष्टीरक्षण या बळावर ऋषभ पंत आणि संजू सॅमसनने संघात स्थान मिळवले. पंतने अपघातानंतर केलेले पुनरागमन कौतुकास्पद आहे. पंत मागील दोन विश्वचषक स्पर्धांना मुकला आहे. याशिवाय सॅमसनसुद्धा आपली दावेदारी पक्की करण्यासाठी कामगिरीत कोणतीच कसूर करीत नाही. राहुलनेही यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये चांगली फलंदाजी केली आहे. पण या दोघांचा स्ट्राइक रेट राहुलपेक्षा अधिक चांगला आहे. भारताला आघाडीच्या फळीतील पहिली चार स्थाने निश्चित आहेत. त्यामुळे मधल्या फळीत फलंदाजी करू शकणारे यष्टीरक्षक म्हणून या दोघांची निवड झाली आहे. राहुलपेक्षा ते अधिक चांगले आहेत, असा अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया आगरकरने दिली आहे. पंत-सॅमसनच्या शर्यतीत कामगिरीआधारे जीतेश शर्मा, इशान किशन मागे पडले. यापैकी इशान हा दक्षिण आप्रिâका दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघात दिसलेला नाही.
हार्दिकवर विश्वास
मुंबई इंडियन्सचा संघ ‘आयपीएल’मध्ये दर्जाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही, याचे खापर कर्णधार हार्दिकवर फोडले जात आहे. पण हार्दिक वैयक्तिक कामगिरीचीही छाप पाडू शकलेला नाही. वेगवान गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू ही त्याची खासियत आहे. पण मोठ्या स्पर्धांप्रसंगी होणार्या दुखापती त्याच्या विकासाला अडथळा आणतात. परंतु चार फिरकी आणि तीन वेगवान गोलंदाजांसह खेळणार्या भारतीय संघासाठी हार्दिक हा वेगवान गोलंदाजीचा चौथा पर्याय असेल. ‘‘हार्दिकची तंदुरुस्ती हा कळीचा मुद्दा असतो. पण त्याची उपयुक्तता पाहता अन्य सक्षम पर्याय भारताकडे नाही,’’ असे आगरकरने सांगितले.
अष्टपैलू दुबेचे आक्रमक अस्त्र
मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करीत फिरकी गोलंदाजांना षटकार मारण्याची डावखुर्या शिवम दुबेची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. याचप्रमाणे कामचलाऊ मध्यमगती गोलंदाजी हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजेच हार्दिकला पर्याय, तसेच पाचवा वेगवान गोलंदाज त्याच्या निवडीचे निकष. मागील ‘आयपीएल’मध्ये चेन्नईच्या यशात दुबेचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी त्याने दुसर्या क्रमांकाचे एकूण ३५ षटकार खेचले होते. यंदाच्या ‘आयपीएल’मध्येही तो षटकारवीरांच्या यादीत अव्वल पाचजणांमध्ये स्थान टिकवून आहे. याशिवाय ‘आयपीएल’आधी त्याला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय संधीचेही त्याने सोने केले होते.
फिरकीची चौकडी कशासाठी?
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या खेळपट्ट्यांवर फिरकीची चौकडी कशासाठी? हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. भारतासाठी ‘प्राइम टाइम’ला म्हणजे रात्री ८ वाजता उपलब्ध होणार्या या सामन्याच्या साता समुद्रापार वेळा सकाळी १० वाजताच्या असतील. एखाद्या सामन्यात तीन फिरकी गोलंदाज खेळवायचे झाल्यास प्राधान्यक्रमाने जडेजा, कुलदीप आणि अक्षर यांचा क्रमांक लागू शकेल. मग यजुवेंद्र चहलची संघात आवश्यकता होती का? बराच काळ भारतीय संघाबाहेर राहिलेल्या चहलपेक्षा रवी बिश्नोईचा पर्याय अधिक समर्पक ठरला नसता का? बिश्नोईने २४ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३६ बळी मिळवले आहेत. याशिवाय त्याची इकॉनॉमी ७.५० इतकी प्रभावी आहे.
पॉवरप्लेमध्ये हमखास बळी मिळवणे, हेसुद्धा बिश्नोईचे वैशिष्ट्य. पण त्याची ही कामगिरी निवड समितीचे लक्ष वेधू शकली नाही. फिरकीच्या चौकडीबाबत रोहितने भूमिका मांडली की, ‘‘आम्ही अमेरिका-विंडीजमध्ये बरेच सामने खेळलो आहोत. चार फिरकी गोलंदाज का, याचे कारण मी तुम्हाला आताच स्पष्ट करणार नाही. पण या चौघांपैकी दोघांकडे मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करून ‘फिनिशर’ होण्याची क्षमता आहे.’’
वेगवान गोलंदाजीचे अतिरिक्त पर्याय
जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आहेत. या तिघांपैकी फक्त बुमराच चमकदार कामगिरी करतो आहे. बाकी दोघांची कामगिरी तितकीशी समाधानकारक नाही. त्यापेक्षा टिच्चून यॉर्कर टाकणार्या मुकेश कुमारला संधी देता आली नसती का? मुकेशने वर्षभरात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना १४ सामन्यांत १२ बळी घेतले आहेत. भारताकडे अष्टपैलू हार्दिक आणि दुबे हे आणखी दोन वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. पण हार्दिकला ‘आयपीएल’मध्ये गोलंदाजीची चुणूक दाखवता आलेले नाही, तर दुबेला चेन्नईने पुरेशी गोलंदाजीच दिलेले नाही. त्यामुळेच तर काही दिवसांपूर्वी रोहितने ‘इम्पॅक्ट प्लेयर’ने अष्टपैलू खेळाडू घडणे कमी झाले, अशी टीका केली होती.
रिंकूशिवाय कसे सामना जिंकू?
कोलकाता नाइट रायडर्सचा धडाकेबाज ‘फिनिशर’ रिंकूला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातून कसे काय वगळले जाऊ शकते? हा प्रश्न देशभरातील क्रिकेटरसिकांना पडलेला आहे. गतवर्षीच्या ‘आयपीएल’मध्ये गवसलेल्या उत्तर प्रदेशच्या रिंकूने नंतर ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही गाजवले. डेथ ओव्हर्समध्ये तो धोनीप्रमाणेच वादळी फलंदाजी करीत धावांचा पाऊस पडतो. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये इम्पॅक्ट
प्लेयरच्या नियमाने त्याच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. १५ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत रिंकूने ३५६ धावा केल्या आहेत. ८९ची धावसरासरी आणि १७६.२३ हा स्ट्राइक रेट ही त्याची वैशिष्ट्ये. पण ‘आयपीएल’मधील कामगिरीच्या आधारे हार्दिक, सिराज, अर्शदीप, पंतची निवड होऊ शकते, तर रिंकूला वेगळा न्याय का? चौथ्या फिरकी गोलंदाजाऐवजी रिंकूला संघात स्थान देता आले नसते का?
अपयशी ऋतुराज
रोहित, विराट, यशस्वी आणि सूर्यकुमार या चौघांनी आघाडीच्या फलंदाजीचे चार क्रमांक मिळवल्यानंतर शुभमन गिल हा राखीव खेळाडू म्हणून संघासमवेत जात आहे. परिणामी महाराष्ट्राचा हरहुन्नरी सलामीवीर ऋतुराज गायकवाड संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे संतापलेले माजी सलामीवीर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी निवड समितीवर पक्षपाताचा आरोप केला आहे. जर ऋतुराजची निवड झाली असती तर रोहित, यशस्वी, सूर्यकुमार आणि दुबे यांच्यानंतर एकंदर (मुंबईसह) महाराष्ट्राचा पाचवा खेळाडू भारतीय संघात असला असता. हे एक-तृतीयांश वर्चस्व टाळण्याच्या हेतूनेही ऋतुराज संघात स्थान मिळवू शकला नसेल. ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २७ वर्षीय ऋतुराजने १७ सामन्यांत ३५.७१च्या सरासरीने आणि १४०.०५च्या स्ट्राइक रेटने ५००धावा काढल्या आहेत. २०२३च्या उत्तरार्धात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने सर्वाधिक २२३ धावा काढल्या होत्या, त्या ५५.७५च्या सरासरीने आणि १५९.२८च्या स्ट्राइक रेटने. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत तो उपकर्णधारही होता. याशिवाय गतवर्षी ऋतुराजच्याच नेतृत्वाखाली भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. त्या तुलनेत गिलच्या खात्यावर १४ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २५.७६ची सरासरी आणि १४७.५७च्या स्ट्राइक रेटने ३३५ धावा आहेत. पण तरीही राखीव खेळाडू म्हणूनसुद्धा ऋतुराज वर्णी लावू शकला नाही.