नाटककार वि. वा. शिरवाडकर यांनी ‘नटसम्राट’ नाटकात म्हटलं होतं- ‘आम्ही नट म्हणजे नुसते लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे!’ हे, जरी शंभर टक्के खरं असलं तरी हा माल टाकताना जी काही संकटांची महामालिका चारीबाजूंनी अंगावर शेकते, त्यामुळे अनेकजण भयाने पळ काढणं पसंत करतात, काही आपली वाट बदलतात. पण जे काही टिकतात तेच पुढे ‘नटसम्राट’ बनतात. एकूणच ग्लॅमरस, बहुरंगी असलेल्या सिने-नाट्य-मालिकेच्या दुनियेत आत शिरणं म्हणजे, एखाद्या महासागरात उडी घेण्यागत बनलं आहे. अनेक दिग्गज नटमंडळींच्या जीवनाचा प्रवास हा काट्याकुट्यांनी भरलेला होता आणि आहे. त्यांची आत्मचरित्रे, मुलाखती आजही खूप काही सांगतात, जी नव्या उमेदवारांना सजग करतात. बदलत्या वेगवान काळात त्यांचे रंगरूप बदलत चाललय, हेच खरे!
कलेच्या नावाखाली आणि ‘मागणी तसा पुरवठा’ या धंदेवाईक तत्त्वामुळे धनाढ्य दलाल नटमंडळींना दोन पैसे फेकून वाट्टेल ते चाळे करायला भाग पाडतात. कलाकारांना उड्या मारणारी माकडे करून टाकलीत. मग नाट्य अभ्यासात गोल्ड मेडल जरी पदरी असलं तरी या इंडस्ट्रीत भोग हे भोगावे लागतातच. अशावेळी नटमंडळींनी आनंद कसा काय शोधायचा? कुठे शोधायचा?
हा विषय नेमकेपणानं आणि हलक्याफुलक्या शैलीत नाटककार, दिग्दर्शक आनंद म्हसवेकर यांनी ‘तुझी माझी जोडी जमली’ या नाटकात मांडलाय. विषय तसा गंभीर, पण त्याची हाताळणी ही फुल विनोदी ढंगात! विनोदी नाटकाच्या यंदाच्या महाजत्रेत ही ‘जोडी’ लक्षवेधी ठरलीय!
चॅनलवरल्या एका लोकप्रिय कार्यक्रमातून सारं कथानक लवचिकपणे गुंफलं आहे. ‘तुझी माझी जोडी जमली’ हा त्या चॅनलवरला रसिकप्रिय कार्यक्रम. त्यात प्रत्येक वेळी एकेक चर्चेतली जोडी आणण्यात येते. त्यांच्याशी संवाद साधला जातो. कधी नवरा-बायको तर कधी दोन बिजनेस पार्टनर तर कधी आई-मुलगी! पहिल्यांदा यात ढोलकीच्या तालावर गण-गवळण येते पण त्यातही सेन्सॉर. लोकनाट्याला नवं रूप देण्याचा प्रयत्न होतो. काळूराव-बाळूराव हे दोघे सोंगाडे परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. आता हे दोघे ‘जोडी जमली’मध्ये शॉटफॉर्ममध्ये वायवाय आणि पीजे बनून येतात! वायवायचं पूर्ण नाव यज्ञोक्ष यरंडवणे तर पीजेचं प्रकाश जोंधळे! हे दोघे स्ट्रगलर नशीब आजमावण्यासाठी चित्रपटसृष्टीत आलेत. वायवाय हा औरंगाबादचा नाट्य शिक्षणातला गोल्ड मेडालिस्ट! नाटक-सिनेमा-सिरीयलमधले काटेरी, तापदायक, अपमानकारक प्रवासांमधील बोलके प्रसंग यात पुढे येतात. जे चक्रावून सोडणारे.
कलाकारांच्या जीवनात येणारं फ्रस्ट्रेशन, वादविवाद, अपमान, पिळवणूक यातून काहीदा आत्महत्या करण्यापर्यंतचा निर्णय आणि नेमक्या त्याचवेळी हिंदी सिरियलसाठी आलेली ऑफर! या ग्लॅमरस दुनियेत सारं काही अळवावरल्या पाण्यागत असतं. तेव्हा मिळेल ते पदरी पडलेलं छोटे का होईना, काम हाती घेऊन समाधान मानण्यातच खरं शहाणपण ठरतं. ससा आणि कासव यांच्यातल्या स्पर्धेत कासव विजेता ठरतो, जो शांतपणे, मिळेल त्यात समाधान मानतो. नाहक टेन्शन घेत नाही. हे सारं काही धम्माल विनोदी, हलक्याफुलक्या प्रसंगातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
नाटककार आनंद म्हसवेकर यांनी ‘स्ट्रगलर्स’ची प्रातिनिधिक सत्यकथाच मांडण्याचा प्रयत्न संहितेतून केला आहे. एकांकिका, नाटके, मालिका, चित्रपट यांत लेखनाचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा रंगधर्मी. एका पिढीने तर त्यांच्या पन्नासएक एकांकिका बघितल्या. महाराष्ट्रासह विदेशातही त्याचे प्रयोग झालेत. त्यांच्या नाट्यलेखनाचा भक्कम पाया हा एकांकिकेवर उभा झालाय. जॉर्ज ऑरवेलची कादंबरी ‘अॅनिमल फार्म’चे रूपांतर त्यांनी ‘गोल गोल राणी’त केले होते. ‘यू टर्न’ हे नाटक किंवा ‘गोजिरवाण्या घरात’ ही मालिका यातून त्यांनी ‘स्क्रिप्ट’ची हुकमत सिद्ध केली आहेच. एका वेगळ्या वळणावरला नाटककार म्हणून त्यांची ओळख बनलीय. देवेंद्र पेम यांचं ‘ऑल द बेस्ट’ किंवा संतोष पवार यांचं ‘यदाकदाचित’ याचे विक्रमी प्रयोग झाल्यानंतर त्याचा पार्ट-२, पार्ट-३ उभा झाला होता. त्याच प्रकारे म्हसवेकर यांनी ‘यू टर्न’चा पार्ट-२चे आव्हान स्वीकारूनही ‘हटके’ इनिंगही जिंकून दाखविली. डॉ. गिरीश ओक आणि इला भाटे यांनी एकाच दिवशी हे दोन्ही भाग साकार केल्याचेही स्मरते. या नव्या संहितेत असलेला ताजेपणा आणि वेग-गती ही जमेची बाजू. लोकनाट्याच्या उत्स्फूर्त लवचिकतेपासून सुरू झालेले नाट्य अखेरीस ग्लॅमरस दुनियेत येणार्यांना काही मोलाचे सल्ले देते, जे चिंतन करायला लावणारे आहेत.
लेखन आणि दिग्दर्शन एकहाती असल्याने सादरीकरणात नेमकेपणा आलाय. नाटक-चित्रपटांच्या पडद्यामागील घटनांमागे कुठेतरी सत्याची झालर आहे. प्रत्येक प्रसंगात चौघे कलाकार नवनवे मुखवटे परिधान करून वावरत असल्याने त्यांच्या हालचाली, देहबोली, संवाद यातले वेगळेपण नजरेत भरते. नाट्य कुठेही रेंगाळणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यांचा कुठेही अडसर किंवा अतिरेक यात नाही. उलट चौघे कलाकार आणि त्यांचे सादरीकरण यावर भर दिलाय. लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून हा एकखंबी तंबू पडद्यामागे म्हसवेकर यांनी लिलया पेललाय.
नाट्यात चार कलाकार. पण चौघेही हुकमाचे इरसाल इनोदी एक्केच! लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव यांच्या विनोदाची परंपरा चालवणारा आणि टाईमिंगची उत्तम जाण असलेला प्रणव रावराणे. त्याला साथसोबत करणारा तेवढ्याच ताकदीचा मुकेश जाधव. या दोघांनी प्रत्येक आठवणीतल्या प्रसंगात खेळवून ठेवलय. हसता-हसता नाटक एका उंचीवर नेलंय. त्यामागले त्यांचे परिश्रम नजरेत भरतात. ‘वायवाय’ बनलाय प्रणव रावराणे तर ‘पीजे’ बनलाय मुकेश जाधव! दोघांचे ‘प्लस पॉईंट’ लक्षात घेऊनच जणू नाटकातील काही प्रसंग तयार केलेत. प्रणवची चित्रपट, नाटक, मालिका यातील ‘क्रेझ’ रसिकांच्या प्रतिसादातून दिसून येते. ‘मुकेश’ने अनेक व्यक्तिरेखा वैशिष्ट्यपूर्ण साकार केल्यात. प्रणवची पत्नी, अभिनेत्री अमृता रावराणे हिने ‘आशा’सह अनेक भूमिका केल्यात, तर निखिला इनामदार ही मालिकेची सूत्रधार-निवेदिका या व्यक्तिरेखेबरोबरच इतर बर्याच रंगरूपात वावरली आहे. दोघींची देहबोली सर्वांगसुंदरच अशी आहे. दोघा जिवलग मित्रांच्या संघर्षमय प्रवासाला इथे विनोदाची मस्त फोडणी आहे. ‘सुखी आनंदी माणसाचा सदरा कुठे विकत मिळत नाही, तर तो स्वतःच स्वतःच्या मापाचा मापात शिवून घ्यायचा असतो!’ ही वनलाईन यात ठासून मांडण्यात हे चौघेजण यशस्वी झालेत. भट्टी चांगली जमली आहे.
मराठी नाटक खेडापाड्यापर्यंतच्या रसिकांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे सर्रास बोलले जाते खरे, पण त्यादृष्टीने संबंधितांचे प्रयत्न कितपत होतात, हा एक चर्चेचा किंवा परिसंवादाचा विषय ठरेल. ही निर्मिती मात्र त्याला अपवाद आहे. कारण लहान गावातील हॉलमध्ये, मैदानात, निवडक नेपथ्य हाती घेऊन कमी खर्चात याचे प्रयोग सुरू झालेत आणि शहरातील नाट्यगृहात तर व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग होत आहेतच. यापूर्वीही ‘यू टर्न’ नाटकाचे या प्रकारे प्रयोग झाले होते. ही ‘हास्यजत्रा’ ‘गाव तिथे प्रयोग’ या तत्त्वावर पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय. त्याचे कौतुक तसेच नोंद घेणे जरुरीचे आहे.
आपल्याच ‘चंदेरी-रुपेरी’ जीवनशैलीवर भाष्य करणारी दोन नाटके यंदा नव्या वर्षात रंगभूमीवर आलीत, हाही योगायोगच. एक निखिल रत्नपारखी यांचे ‘थँक्स डियर’ आणि दुसरी ही म्हसवेकरांची ‘जोडी…’! दोन्हीत नाट्यक्षेत्रातील ग्लॅमरस, टॅलेंट असणार्यांची होणारी कुचंबणा, अडचणी आहेत. पण वेगळ्या वाटेवरले, कथानकातले त्यातले आविष्कार! आरशात बघून आत्मपरीक्षणाच्या प्रयत्नात असलेल्या या दोन सशक्त संहिता आपल्या हाती असलेल्या भूमिकेचा विचार करायला लावणार्या आहेत.
‘कुणा एकाची रंगयात्रा’ या शीर्षकाखाली म्हसवेकर यांचे चाळीस वर्षांच्या रंगप्रवासावर आत्मकथन प्रसिद्ध झालंय. त्यासोबतच ही नाट्यनिर्मितीही रसिकांपुढे आलीय. हे त्यांचे वैयक्तिक अनुभवांवरील पुस्तक आणि ‘तुझी माझी जोडी जमली’ हे नाटक, या दोघांमध्ये तुलना करण्याचा मोह जरूर होतो. दोन्ही आविष्कार वाचक आणि रसिक यांना एका ग्लॅमरस दुनियेतली सफर घडवतात तसेच त्यात गुंतवूनही ठेवतात, यात शंका नाही.
तुझी माझी जोडी जमली
लेखन / दिग्दर्शन – आनंद म्हसवेकर
नेपथ्य / प्रकाश – अनिश-विनय
संगीत – सुखदा भावे-दाबके
निर्मिती प्रमुख – विनय म्हसवेकर
सूत्रधार – गोट्या सावंत
निर्मात्या – कांता म्हसवेकर / अमृता रावराणे
निर्मिती संस्था – जिव्हाळा / शांभवी आर्ट्स