भारतीय जनता पक्षाने प्रतिष्ठेच्या केलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आणि आमचा बालेकिल्ला गेला हो, असा विलाप सुरू झाला. पुण्यातील चिंचवडच्या निवडणुकीत भाजपला यश मिळूनही ते नीट साजरे करता आले नाही, कारण, तिथे मविआचा उमेदवार आणि बंडखोर यांच्या मतांची बेरीज त्या विजयाचे पोलखोल करीत होती. शिवाय, कसबा पेठेत देशाच्या गृहमंत्र्यांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जवळपास सगळे मंत्रिमंडळ हजेरी लावून गेलेले असल्याने हीच निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची होती, हे स्पष्ट होते. त्याचे कारणही तसेच होते. कसबा आणि आसपासच्या पेठांचा परिसर हे पुण्याचे हृदय… थेट शिवकाळापासूनची परंपरा लाभलेल्या या मतदारसंघावर गेली २८ वर्षे भाजपचा झेंडा फडकत होता. तो काँग्रेसच्या धंगेकरांनी उतरवला.
पण, मुळात हा भाजपचा बालेकिल्ला होता का?
भाजपला महाराष्ट्रात विस्तारण्याची संधी मिळाली ती शिवसेनेबरोबर युती केल्यामुळे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा करिष्मा वापरून भाजपने राज्यभर हातपाय पसरले. भाजपला जो काही जनाधार मिळाला, त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. केंद्रातील लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून राज्यातील गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यापर्यंतच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना याची जाण होती. ते शिवसेनाप्रमुखांना योग्य सन्मान देत आणि शिवसेना हाच युतीतील मोठा भाऊ आहे, हे मान्य करीत. पण, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सत्तेत आल्यानंतर तंबूत शिरलेल्या या उंटाने तंबूवर मालकी सांगायला सुरुवात केली. सौहार्दाची भाषा बदलली आणि अरेरावी सुरू झाली. शिवसेनेबरोबरची युती तोडण्यापासून सुरू झालेला हा मस्तवालपणा शिवसेनेत फूट पाडून, फुटीर गद्दार हेच खरी शिवसेना आहेत, अशी ‘मान्यता’ (जिच्यावर महाराष्ट्रातील शाळकरी मुलेही हसतात, कारण जिथे ठाकरे तिथेच शिवसेना हे त्यांच्याही हृदयावर कोरले गेले आहे) मिळवून देण्यापर्यंत गेला. त्या गर्वाने भरलेल्या फुग्याला कसबा पेठेतील पराभवाने टाचणी लावली आहे. खरी शिवसेना गद्दारांचीच आहे आणि ती तुमच्यासोबतच आहे, तर ती सोबत असूनही तुमचा इतका दारूण पराभव कसा झाला?
कसबा पेठेत स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी दिली असती, ब्राह्मण उमेदवार असता, तर ही निवडणूक भाजपने जिंकली असती, असा एक सूर भाजपप्रेमी रूदाली गँगने लावला आहे. ब्राह्मण महासंघाच्या कोणा आनंद दवे नामक डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराने आमच्यामुळेच भाजपचा पराभव झाला आहे, असा हास्यास्पद दावा केला आहे. या जातीपातींच्या समीकरणांना शिवसेनाप्रमुखांनी कधीही थारा दिला नव्हता. पण, इथे या दाव्यांचे विश्लेषण करावेच लागेल. या मतदारसंघात ब्राह्मण मतदारांचे प्रमाण १३ ते १८ टक्के आहे, असे मानले जाते. मुळात, ही टक्केवारी निवडणुकीत निकाल ठरवण्याइतकी मोठी आहे का? बरे, या सगळ्यांनी मतदान करताना जात हाच घटक मुख्य मानला असता, तर दवे यांचे डिपॉझिट जप्त झाले असते का? जे नाराज आहेत, त्यांची एवढी चर्चा, पण, ज्यांनी भरभरून धंगेकरांना मतदान केले, त्यांच्याबाबतीत चकार शब्द निघत नाही प्रसारमाध्यमांमध्ये.
मुळात मेधा कुलकर्णी यांचा मतदारसंघ, गिरीश बापटांचा मतदारसंघ, मुक्ता टिळकांचा मतदारसंघ, हे काही स्वातंत्र्यपूर्व काळापासून भाजपचे मतदारसंघ नाहीत. कसबा पेठ हा जवळपास अर्धशतकाहून अधिक काळ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. इथल्या ज्या बहुजन समाजाने काँग्रेसची पाठराखण केली, तोच समाज १९९०च्या दशकात शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, राजकीय भूमिकांमुळे युतीकडे खेचला गेला आणि त्याचा फायदा दरवेळी भाजपच्या उमेदवारांना झाला. गिरीश बापट या परिसरातून नगरसेवक, आमदार, खासदार अशा पायर्या चढत वर गेले, त्यांनी इथे राजकीय अस्पृश्यता पाळली नव्हती, धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रचार केला नव्हता. बापट, अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, सतीश देसाई आदी समवयस्क मंडळींमधील सौहार्द हा पुण्यातील निरोगी राजकीय वातावरणाचा एक अनमोल ठेवा होता. जिथे अठरापगड कसबी कारागीरांची वस्ती आहे, त्या मतदारसंघात इथे हिरवा गुलाल उधळायचा असेल, तर मविआला मत द्या, कसबा पेठेचे कसाब पेठ करायचे असेल, तर मविआला मत द्या, असा भयंकर विद्वेषी प्रचार केला गेला. ज्या पक्षाच्या शुद्धतेवर, सचोटीवर इथल्या मतदारांचा भाबडा विश्वास होता, त्या पक्षाच्या लोकांनी पैसे वाटल्याचे आणि पैसे न घेणार्यांना मारहाण केल्याचे आरोप झाले. या कथित चारित्र्यसंपन्न पक्षाचे अध:पतन पाहून इथले मतदार अचंबित झाले असणार.
ही निवडणूक जिंकल्यानंतर धंगेकर म्हणाले, हा भाजपचा गड नव्हता, हा जनतेचा गड होता. मी जनतेत वावरणारा माणूस आहे. आमदार झालो तरी रवीभाऊ बदलणार नाही. दुचाकीवरून प्रचार करणार्या धंगेकरांच्या समोर सत्तेची, धनशक्तीची मस्ती चालली नाही, हा कोणाचा बालेकिल्ला आहे, ते या मतदारसंघातल्या नागरिकांनी मतदानातून दाखवून दिले. एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला समाजातल्या सर्व वर्गांपर्यंत नेण्याचे काम शिवसेनेने केले होते. शिवसेनाप्रमुखांच्या त्या उपकारांची जाण भाजपने ठेवली नाही. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिंध्यांना बहाल करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हे ठाकरे या नावाशी भावना जोडल्या गेलेल्या कसबा पेठवासीयांना पटले असेल का? भाजपने सर्व बळ लावून प्रचार केला, तरी चर्चा झाली युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जबरदस्त रोड शोची. जनतेच्या मनातली शिवसेना एकच आहे आणि ती कोणती आहे, ते त्या दिवशी स्पष्ट झाले आणि या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे, हेही त्याच दिवशी स्पष्ट झाले होते.
कसबा पेठ मतदारसंघातून आजवर जनतेने मोठ्या विश्वासाने युतीचे उमेदवार निवडून दिले होते. भाजपने युतीधर्म सोडला, मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला, या पक्षाने साधनशुचितेला तिलांजली दिली, त्याला सत्तेची राक्षसी हाव सुटली आणि अनिर्बंध सत्तेचा मदही चढला, हे पाहिल्यावर जनतेने या पक्षाला त्याची योग्य जागा दाखवून दिली. उगाच हा आमचा बालेकिल्ला होता हो, म्हणून गळे काढू नका. मनगटातले बळ वापरून जे लढतात, त्यांचे बालेकिल्ले बनतात, रडीचा डाव खेळणार्यांचे फार तर वाळूतले किल्ले बनतात. ते कधी ना कधी ढासळतातच.