अबाबाबाबा बाबाबाबाबाऽऽ ते कोण बरं एका दमात चहाचा अख्खा खंबा रिचवताहेत? ठाण्याचे डरनाईक? होय. होय तेच ते. आणि ते त्यांच्या शेजारचे कोण? अहो ते ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’वाले इब्लिस. ते आपल्या सांगोल्यातल्या कार्यकर्त्यांशी काय बोलतायत मोबाईलवर ऐका…
कार्यकर्ता : हॅलोऽऽ कुटं हाय तुमी बापू… तीन दिवस झालं फोन लागंना तुमचा… अजून गोहाटीलाच हाय का?
बापू : नाय बा. वर्षावर हाये सध्या… मलबार हिल… बंबय.
कार्यकर्ता : वर्षावर काय करताय?
बापू : चहा पितोय… आणि कपबशीतनं नाय बरं का…
कार्यकर्ता : मंग नेते, तिथं काय बाटलीतनं देत्यात का च्या?
बापू : हां हां… काय क्वार्टर, काय ट्वेस्ट, एकदम बेस्ट! ओक्केमदी हाय समदं. बरं आपल्या तालुक्यात काय सध्या?
कार्यकर्ता : हितं अजून काय क्वार्टरमधनं च्या घ्यायची सुरू झालेली नाय खरं. अजून बी कपातनं, नाय तर पेल्यामदनंच च्या पितायेत लोकं…
बापू : मंग कसा विकास व्हनार आपल्या तालुक्याचा? आता मी तालुक्याला परतल्यावर सरकारमान्यच्या क्वार्टरची दुकानंच सुरू करूया आपन.
ओहोहो… आता आलं ध्यानात! असे नुस्ते चहाचे खंब्यावर खंबे नि क्वार्टरवर क्वार्टर रिचवल्या असणार लोकांनी चार महिन्यात. तेव्हाच तर फक्त ४ महिन्यांचं वर्षावरचं चहाचं बिल २ कोटी ३८ लाख ४४ पैसे आलं असणार ना? वरचे ४४ पैसे कसले म्हणताय? अहो ते बिस्किटांचे. आता विरोधक विचारतायत की ४ महिन्यांत वर्षाचा फक्त चहावर एवढा खर्च? एवढी उधळपट्टी?
अरे, हे काय प्रश्न झाले? आमचा चहा काय साधा असतो का? डायरेक्ट आसामवरनं मागवतो आम्ही चहाचे खोके. हां… साखर डायरेक्ट सुरतवरनं आणि आनंद अमूल फॅक्टरीतनं दूध पडतं आमच्या वर्षावरच्या चहात. गद्दारीचा वास मारला जावा म्हणून थोडी गोवा फेणी मिक्स करावी लागते. आता एवढा तर खर्च येणारच च्या साठी…
आयच्या घोवाला विचारून केला का एवढा खर्च फक्त चहावर? असा प्रश्न विरोधक विचारताहेत. तिकडे पोत्यांनी कांदा रस्त्यावर ओतून टाकताहेत शेतकरी, कांद्याला भाव नसल्यामुळे… फ्लॉवरचे दर पडल्यामुळे मळ्यात शेळ्या-मेंढ्या सोडताहेत. नी तुम्ही वर्षावरच्या चहावर पब्लिकच्या पैशातनं उधळ-माधळ करताय? चाळीसेक आमदार खरेदी केले, चुना लगाव आयोगाकडून धनुष्यबाण खरेदी केला म्हणून अख्खा महाराष्ट्र खरेदी केला असं वाटतंय का? मग अधिवेशनाच्या आधीच्या संध्याकाळी ठेवलेल्या तुमच्या महाग चहापानावर आम्ही बहिष्कार टाकणार नाही तर काय? आणि चहापानावर बहिष्कार टाकला म्हणून लगेच आम्ही देशद्रोही?
मंडळी, आता तुम्हीच सांगा की समजा विरोधक चहापानाला गेले असते नि लगेच चहा बिलाची रक्कम ३ कोटी ३८ लाख अशी बदललेली दिसली असती तर? काय नेम नाही हो यांचा! हे विरोधकांवर पाळत ठेवणार… गुंडांना सुपार्या देणार नि वरतून सुरक्षा काढून घेणार. त्यावर कुणी आवाज उठवला तर त्याला स्किझोफ्रेनिया झालाय म्हणणार… आरोप अतिशयोक्त आहेत, म्हणणार. विरोधकांच्या मुद्द्यांना पटेल असं उत्तर देता येत नाहीये, असं लक्षात आल्यावर त्यांना निर्बुद्ध म्हणणार, देशद्रोही म्हणणार? कंबोज, म्हस्के, मॅडम विचित्रा, शिरफिरासाट असे नवे डिलीव्हरी बॉईज अॅण्ड गर्ल्स यांच्या ‘खोकॅटो कंपनी’त भरती झालेत. त्यांच्या जोडीला ‘ठगी कंपनी’तले जुने डिलीव्हरीवाले भुंकय्या, टंगना, शिंदुर्गाणे वगैरे आहेतच. यांचे युनिफॉर्म शेम टू शेम असल्यामुळे कोण कुठल्या कंपनीकडून पार्सल घेऊन येतो हे लोकांना कळत नाही. पण नागपूर आणि दिल्लीच्या किचनमध्ये जे काय शिजतं, ते सगळं खोकी भरून वाटत राहायचं… डिलीव्हरी करत राहायची… एवढंच यांचं काम आहे. काय म्हणता? नाय नाय नवरतन चाळीसा दांपत्याला अजून नोकरीवरनं काढलेलं नाय. ती दोघ चिरकुटं अजून यांच्या नोकरीत हायत. त्यातल्या बाईंचे पिताश्री जात पडताळणी प्रकरण अंगाशी येतंय म्हटल्यावर फरार झालेत. म्हणून त्यांचा डिलिव्हरी स्पीड सध्या थोडा कमी आहे एवढंच. पण म्हंजे चार म्हयन्यात फक्त चहावर हे देशभक्त २ कोटी ३८ लाख उधळू शकतात, तर या डिलिव्हरी बॉईज नि गर्ल्सवर किती उधळत असतील? अबबबबबऽऽ रिक्षावाल्याला एकदम ईमान भेटल्यावर असंच व्हायाचं गड्या हो. च्या प्यायचा असतो, ढोसायचा नसतो हे पट्टीच्या बेशर्मवीरांना कोण सांगणार!
तर मंडळी, एकदा का शरम सोडली की काही वाटेनासं होतं माणसाला. जनाची पण नाही आणि मनाची पण नाही वाटत. मनाची थोडी तरी वाटली असती तरी आपल्या घरातली नुसती भांडीकुंडी पळवून चोरून न्यायची नाहीत, तर अख्खं घरच बळकावयला बघायचं आणि पुन्हा आम्ही मूळ घर बांधणार्यांचाच वारसा चालवत आहोत, अशा निर्लज्ज वल्गना भाषणांमधून करत राहायच्या, या प्रकाराला काय म्हणायचं? यांची आपली भाषणांची टकळी सुरूच… समोर अर्ध्या खुर्च्या रिकाम्या असल्या तरी… तोंडासमोरून पैसे देऊन जमवलेल्या गर्दीतले अर्धे प्रेक्षक आपले हजर राहण्याचे तास संपले की निघून जात असले तरी… आणि भाषणांत तरी काय सांगणार… तर आम्ही हे सुरू करतोय नि ते सुरू करतोय…
हे सुरू का ते सुरू
अन् चहा घ्या फरूफरू
भाषणांच्या बेकर्या
कमळबिस्कुट कुरूकुरू
आणि आता अशी वेळ आलीय की बिस्कीटांत चहाला विरघळावं लागणार आहे. कुरूकुरू बिस्कुटानं उगाच नाही थोडी पडती बाजू घेतलीय सध्या. चुना लाव आयोग काहीही निर्णय देऊ देत. पण त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज देण्यात आलंय. गद्दारांच्या ढुंगणामध्ये पाकपुक सुरू झालंय. आयला, कोर्टानं समजा सांगितलं की तुम्ही अपात्र आहात… तर सरकार टिकवण्यासाठी बिस्कुटात विरघळण्याशिवाय पर्याय नाही. आणि पात्र आहात असं म्हटलं तर पुढच्या निवडणुकीत लोक मूळ घराच्याच बाजूने उभे राहणार नि त्यावेळी बिस्कुटही नाही नि चहाही नाही, अशी ‘न घर का, न घाट का’ अशी परिस्थिती होणार.
प्रकरणं अंगावर शेकायला लागली की ‘देशद्रोही’ म्हणून विरोधकांना मोडीत काढायचा प्रयत्न करायचा, ही स्टाईल आता जुनी झालीय. खर्या देशद्रोह्यांचे शेअर्स आता पडायला लागलेत. त्यांना पाठीशी घालणार्यांचे मुखवटे फाटायला लागलेत. पार्लमेंटात, न्यायालयांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्येही. महागाईच्या चहाचे डाग थोबाडांवर फुगून दिसायला लागलेत. चिखलातून आता कमळं उगवणार नाहीत. जे विष पेरलंय तेच ना उगवून येणार, अध्यक्ष महोदय?