सध्या नेमका कोणता ऋतू चालू आहे? अशाने आपल्या देशाचा इंग्लंड व्हायला किती वेळ लागेल?
प्राजक्ता गोळे, नागपूर
सध्या नाही, आपल्याकडे फक्त प्रदूषण हाच ऋतू आहे. आणि भारताचा इंग्लंड नव्हे तर इंग्लंडचा भारत कधी होईल हा प्रश्न पाहिजे. कारण हा ऋतू आता सगळीकडेच बारमाही असणार आहे.
कोकणातली भुतं कधी तुम्हाला भेटली आहेत का? हल्ली ती सगळी कुठे पसार झाली?
श्रीनिवास आंगचेकर, वैभववाडी
हो भेटलीयत ना. त्यातलंच एक प्रश्न विचारताय इथे.
तुम्ही वास्तवात अधिक अभिनय करता की रंगमंच आणि पडद्यावर?
सोनल कांबळे, नवापूर
सगळीकडे सगळे अभिनयच करत असतात हो! मीही करतो. फक्त पडद्यावर आणि नाटकात त्याचे पैसे मिळतात.
तुम्हाला अधिक प्रिय काय? कैर्या की आंबे?
श्रीकांत ठोंबरे, प्रभादेवी
कैर्यांचे आंबे होताना पाहणे फार आवडते. मात्र, आता झाडावरचे आंबेच पाहू शकतो. आता झाडावर चढणे. दगड मारणे नाही झेपत.
शालेय अभ्यासक्रमातच नाटक या विषयाचा समावेश असावा, असं तुम्हाला वाटतं का?
गीतांजली खोमणे, चिंचवड, पुणे
अभ्यासक्रम म्हटलं की सक्ती येते. तो एक इतर ऐच्छिक विषयात समाविष्ट करावा.
‘पडोसन’ सिनेमातला मेहमूद पाहिला की तुमची आठवण होते. या सिनेमाचा पुन्हा एकदा मराठी रिमेक करून त्यात तुम्ही मेहमूद बनलात, तर किशोर कुमार, सुनील दत्त आणि सायरा बानो यांच्या भूमिका कुणाला देता येतील?
सुगंधा चितळीकर, सातारा
अनुक्रमे भाऊ कदम, अमेय वाघ, केतकी थत्ते.
नाटक, सिनेमा, बाई आणि बाटली असं समीकरण नाटकाबाहेरच्या लोकांच्या डोक्यात असतं. त्यात खरंच तथ्य असतं का हो?
रोशन अब्बास, डोंगरी
ही लोकांची मनीषा असते. वास्तव वेगळं आहे.
तुमचा आवडता सुपरहीरो कोणता? तुम्हाला पडद्यावर कोणता सुपरहीरो साकारायला आवडेल?
अनया माजगावकर, मिरा रोड
महात्मा गांधी
माणूस प्यायल्यावर खरं बोलतो, असं म्हणतात; तुमचा अनुभव काय?
विनोद अवस्थी, बदलापूर
काय प्यायला की?… कारण प्रत्येक पेयांचे परिणाम वेगवेगळे असतात. माणूस मद्य घेतल्यावर भीड सोडून वागतो बोलतो हे खरं आहे. माझा अनुभव वेगळा आहे.
‘जाऊ तिथे पिऊ’ या माझ्या नव्या फार्समध्ये तुम्ही काम कराल का? मानधन मात्र सहा महिन्यांनी हातखंब्याला प्रयोग असल्यावरच मिळेल… निर्माता तिथला आहे ना!
प्रदीप राणे, पावस
मग, त्याचे प्रयोग सहा महिने त्याच्या फार्महाऊसवरच करू या!
मलाही तुमच्याप्रमाणे उत्तम विनोदी नट बनायचं आहे, त्यासाठी काय करावं लागेल?
प्रथमेश शिंदे, सांताक्रूझ
टक्कल!
देवरूखच्या एखाद्या चोरपर्यावर बसून तुम्ही एखादी संध्याकाळ संस्मरणीय केली आहेत का?
मिलिंद एकबोटे, वसई
चोरांच्या भीतीमुळे नाही केली…
हिंदी सिनेमातली तुमची आवडती आई, आजी आणि नायिका सांगा.
रेखा कुलकर्णी, दादर
अनुक्रमे निरुपा रॉय, दुर्गा खोटे, वहिदा रहेमान
मराठी सिनेमातला सगळ्यात डेंजर खलनायक कोण होता असे वाटते?
विक्रम सबनीस, कोल्हापूर
मी
संगीताचे अनेक प्रकार आहेत. तुमच्या आवडीचा प्रकार कोणता?
मनोज चव्हाण, पुलाची वाडी, पुणे
शास्त्रीय संगीत
संधीचे सोने करण्यासाठी नेमके काय करावे लागते?
प्रितेश कोळमकर, गायवाडी
सोने विकत घ्या…
आपल्याकडे विनोदनिर्मितीसाठी पुरुषांना स्त्रियांचे सोंग काढायला लावण्याचा प्रकार सर्रास सगळीकडे चालतो. हे कशाचे आकर्षण असावे?
कृत्तिका कारखानीस, रत्नागिरी
सवंग विनोदाचे.
तुमच्या आयुष्यात आजवरची सगळ्यात मोठी कौतुकाची, शाबासकीची थाप कोणती?
प्रफुल्लता धुरू, डहाणू
तशा खूप मिळालेयत, मोठी अजून मिळायचेय; मुळात ती कशी असते ते समजलं नाहीयेय..
—-
विचारून टाका प्रश्न…
तुम्हालाही अभिनेते वैभव मांगले यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला वैभव मांगले उत्तर देतील…