कार्तिक महिन्याच्या या अस्सल आणि अवघड संकेताचा यापूर्वी सर्वप्रथम शोध एका कविश्रेष्ठाला लागला होता. या शोधादरम्यान त्यांनी सार्या विवाहित पुरुषांसाठी म्हणून खास स्वगतरूपी जे गाणे लिहून ठेवले होते, त्यात त्यांनी संकेताने ‘जग हे बंदिशाला’ असे म्हटले होते. इथे ‘जग’ या शब्दाचा अर्थ ‘घर’ असा घ्यायचा होता. एकदा का हा अर्थ रुचला, की अशाच एका संकेताला निसर्गप्रचिती कशी आहे हे जाणवून देता येते. या कार्तिक महिन्यात दिवाळीनंतर पुढे तुळशीपूजन करायचे असते. या तुळशीपूजनावेळी आवळीपूजनही केले जाते. तुळस हे जसे सात्त्विकतेचे प्रतीक आहे तसे आवळी म्हणजे आंबट-तुरट चवीची खात्री आहे. प्रत्येक विवाहित पुरुषाला आपापली पत्नी ही तुळसरूपी गृहिणी असावी वाटते तर एखादी निव्वळ बोलून का होईना, घायाळ करणारी आवळीरूपी आंबट चिंबट मैत्रीण असावी वाटते.
—-
काल परवाची ही गोष्ट आहे. नवरात्र सुरू झाली होती. आम्ही या वर्षीच आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच एक गोष्ट त्याआधी केली होती. भाद्रपद महिन्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात सर्वपित्री अमावस्येला आमच्या ज्ञात-अज्ञात सर्व पितरांचे श्राद्ध घालून टाकले होते. या श्राद्धविधींमुळे आम्हाला बरेच धार्मिक बळ प्राप्त झाले असावे असा आमचा अंदाज बनला होता. या अंदाजाला अधिक ताकद यावी म्हणून आम्ही स्वत:हून ‘आता उपास-तापास करत जाऊ या’ असे आमच्या मनाला सांगितले होते. अमावस्येनंतर भाद्रपद संपल्या संपल्या आमच्या इच्छेसाठीच आश्विन महिना सुरू झाला आणि नवरात्रीचे नऊ उपास करण्याचा सुयोग आम्हालाही प्राप्त झाला. हा सुयोग घडवण्याला कारणीभूत आमच्या पत्नीमहोदया होत्या. त्या प्रत्येक वर्षी नवरात्रीचे नऊ उपास पाळत. आपल्या अंगभूत शक्तीमध्ये वाढ व्हावी हा त्यांचा त्यामागे हेतू असावा अशी दाट शंका आम्हाला नेहमीच वाटत आली आहे. ही शंका व्यक्त करण्याचे धाडस आम्हाला आजवर कधीही झाले नाही. कारण त्या केव्हाही, कोणत्याही निमित्ताने आमची बिनपाण्याने करायला कायम सज्जच असतात. आमच्या शंकेचे निराकरण आम्ही आजवर जरी करू शकलो नसलो तरी त्यांची सामर्थ्यवान प्रतिमा ज्या-ज्या गोष्टींमुळे घडत गेली, त्या सार्या गोष्टी आपणही न चुकता करायच्या हे ठरवून आम्हीही त्यांच्याप्रमाणेच उपास करायचे ठरवले होतेच. आमच्या मनाच्या समजावणीसोबत दुसरे कारणसुद्धा आमच्या उपासक्रमामागे होते.
आमच्या आयुष्यातील उपासाचा तो पहिला दिवस काल-परवाचा होता. आपण जे काही करतो आहोत त्यामागे काय-काय धार्मिक परंपरा आहेत याचा शोधही आम्हाला घ्यावासा वाटला. या शोधासाठी साहाय्य करणारे जे ग्रामज्योतिषी आमच्या गावात उपलब्ध होते ते ‘निर्णयिंसधु’, ‘धर्मिंसधु’ अशा शास्त्रोक्त ग्रंथाचे मोठे वाचकही होते. ते स्वत:हून ‘कुटुंबिंसधु’ नामक कौटुंबिकशास्त्राचे एकमेव भाष्यकार होते. त्यांचे भाष्य आपण ऐकावे हा हेतू बाळगून आम्ही त्यांना भेटायचे ठरवले… आश्विन महिन्याच्या प्रतिपदेची ती रम्य संध्याकाळी होती. आमच्या दशमस्थानी वास्तव्याला असलेल्या, उग्रांगना म्हणून विख्यात असलेल्या आमच्या पत्नीमहोदया ह्या रासदांडियाच्या प्रेक्षक म्हणून घरातून बाहेर निघाल्या होत्या. आजूबाजूच्या काही शेजारीण अनुयायी महिलाही त्यांच्या छायेत सुरक्षितपणे, निघण्याच्या तयारीत होत्या. निघता-निघता त्या आम्हाला म्हणाल्या, ‘मी काही अकरा वाजेपर्यंत येणार नाही! तुम्ही तुमची किल्ली तुमच्यासोबत न्या! कुठेही फिरून या पण मी यायच्या आधी घरी या! उगी मला नंतर तुमची शोधाशोध करायची वेळ आणू नका!’
त्या निघून गेल्या आणि आम्ही बदललेली कालगती पाहून स्वत:शीच खेद व्यक्त करत बसलो. स्वत:लाच म्हणालो की, ‘काय काळ आलाय बघा, नवरा घरी बसवून बायका खुशाल मध्यरात्रीपर्यंत बाहेर फिरत आहेत. हेच ते महिला सबलीकरण. दुसरे काय?’
मनातले स्वगतरूपी चिंतन आटोक्यात आणत आम्ही पायात चपला अडकवल्या आणि थेट ग्रामज्योतिषी एल. के. शास्त्रींच्या दारी पोचलो.
शास्त्रीबुवा दारातच उभे होते. उभ्या त्या अवस्थेत ते आपल्या छातीवरून हातही फिरवत होते. आम्ही त्यांना नमस्कार केला आणि विचारले, ‘शास्त्रीबुवा, दारातच उभे आहात, छातीवरूनही हात फिरवताय, काही दुखतेय का?’ आमचे हे बोल तसे वरोपांगी काळजी घेऊन व्यक्त होत गेले, तरी अंतर्मनात आम्ही म्हणत होतो की, ‘आज नेमकी बुवांची प्रकृती बिघडली असेल तर आपला टाईमपास टळतो वाटते. यांना आजच धाड भरायची होती काय?’
आमच्या या ओलाव्याच्या बोलांना ऐकून शास्त्रीबुवा म्हणाले, ‘अहो तसे काही नाही! या वयात पित्त उफाळलेलेच राहते. याला कारण म्हणजे जसजसे प्रौढ वय संपत जाते, तसे तसे चित्त अति अस्थिर होत असते. याला कारण म्हणजे केवळ ज्याची त्याची बायको असते. आयुर्वेदात जे त्रिदोष सांगितलेत ना, त्यांचा खरा अर्थ वेगळाच असतो. प्रत्येक विवाहित पुरुषाला हे त्रिदोष लग्नानंतर सहन करावेच लागतात!’ शास्त्रीबुवांच्या या कुट उत्तराने आम्हाला आमच्या विषयाआधीच हे काय असेल, याची जिज्ञासा जागी होऊन गेली. जागृत जिज्ञासेपोटी आम्ही त्यांना बोललो, ‘बुवा, आयुर्वेदातले कफ, वात, पित्त हे त्रिदोष आम्हालाही माहीत आहेत पण प्रत्येकाला हे दोष सहन करावेच लागतात असे काही नसते. अधूनमधून यातला एक दोष उफाळून येतो हे मान्य, पण कायम बाधा हे म्हणजे तुम्ही आमचे मापे काढणे सुरू केले असे म्हणायला हरकत नाही!’
आमच्या टीकात्मक विधानावर शास्त्रीबुवा प्रसन्न हसले आणि म्हणाले, ‘अहो तसे नाही हो! मी आधी तुम्हाला कफ, वात आणि पित्त यांचा कौटुंबिक अर्थ सांगतो मग तुम्हाला पटेल! चला, आधी आत बसूया!’
आम्ही आत बैठकीत बसलो तेव्हा शास्त्रीबुवा आम्हाला म्हणाले, ‘हे बघा आयुर्वेदातील जे त्रिदोष आहेत, त्यातील कफ आणि वात हे दोष म्हणजे दोन शब्दांचे संक्षेपरूप आहेत. क.फ. आणि वा.त. ह्या खर्या तर दोन अवस्था आहेत. ज्या अवस्था लग्नानंतरच नशिबात येतात. ह्या अवस्थांना कारणीभूत फक्त आपली बायको असते. ह्या बायकोमुळेच नंतर उत्तरआयुष्यात प्रत्येकाला पित्तदोषाची बाधा जडते ती हयातभर कायम राहते. क.फ. नावाची जी अवस्था आहे त्याला कफ म्हणून ओळखावे. हा कफ लग्नानंतरच्या दोन वर्षांत हमखास वाट्याला येतो. हा कफ अंगाखाद्यावर असतो. क.फ. म्हणजे ‘कष्टाचे फळ’. हे अतिलाडके दोषरूपी कर्मफळ कोण्याही विवाहित पुरुषाला वडलाची पदवी यायला निमित्त ठरते आणि हा कफ नंतर जसा जसा वाढतो, तसातसा त्या इसमाचा देह त्याच्यासाठीच जगतो.
वा.त. अर्थात वात नावाचा दोष हा लग्नानंतर विवाहित पुरुषाच्याच वाट्याला लग्नानंतरच्या पहिल्या दशकात येत असतो. ह्या दोषाचे कारण म्हणजे बायको असते. जसाजसा कोणाचाही विवाह जुना होत जातो, तसातसा हा दोष वाढत असतो. हे वृिंद्धगत होणारे जे काही असते ते म्हणजे ‘वागण्यामुळे तणाव’ किंवा ‘वा. त’ हे असते. घडते काय की अपराजिता या अर्थाला अचूक जागणारी प्रत्येकाची बायको आपल्या लग्नानंतर हळूहळू काही वर्षांतच गृहलक्ष्मीच्या पदवीसोबत ‘गृहस्वामिनी’ ही उपाधी धारण करते. एकदा का ती गृहस्वामिनी बनली की सासरकडच्या सार्यांचेच वैगुण्य मनमोकळेपणाने व्यक्त करीत फिरते. यासोबतच ती हिडिसफिडिस नावाची कृती करीत घरामध्ये रोजच नियंत्रणबाह्य परिस्थिती निर्माण करीत जाते. यामुळे संयुक्त कुटुंबपद्धतींमधील घराघरात वातावरणातील तणाव वाढत राहतो. हा वा.त. पुढे प्रत्येक पुरुषाचे चित्त अस्थिर ठेवतो. अस्थिर चित्त हे पित्त वाढवत बसते. कळले?’
शास्त्रीबुवांनी जसे आपले बोलणे थांबवले, तसतसे आमच्या मस्तिष्कात अतिवेगाने आमचे कौटुंबिक अनुभव आठवणे सुरू झाले. क्षणार्धात आठवून गेलेल्या सर्व घटना शास्त्रीबुवांचे संशोधन सार्थच करीत होत्या. ग्रामज्योतिषी ही उपाधी तर काय खरोखरीच शास्त्रीबुवा विश्वज्योतिषी आहेत आणि कुटुंबचिकित्सक म्हणून तर अग्रस्थानाचे अद्वितीय महापुरुष आहेत हे आम्ही मनोमन मान्य करून टाकले. भारावलेल्या अंत:करणाने आणि त्यांच्याविषयी दाटलेल्या आदराने आम्ही त्यांना म्हणालो, ‘परमआदरणीय बुवा, आम्ही आता धर्मपंथाच्या वाटेवर लागलो आहोत. येत्या दिवाळीपासून आम्हीही नवे काही करण्याच्या मानसिकतेत आहोत. आपण आमच्यासाठी काय आहात ते नव्याने सांगायची गरज नाही. कृपया आम्हाला आम्ही जे करणार आहोत त्यातले धार्मिक, सांस्कृतिक, कौटुंबिक असे सिद्ध झालेले तपशील सांगावेत ही विनंती आहे. यातून आम्हाला जर पथदर्शक असे काही भेटले तर आमचे भविष्य उज्ज्वल होईलच ही खात्री आहे!’
शास्त्रीबुवा आमचे मनोगत शांतचित्ताने ऐकतच होते. आमचे बोलणे आटोपल्यावर ते आम्हाला म्हणाले, ‘हे बघा मित्रवर्य, कोणताही उपक्रम दिवाळीपासून सुरू करणे हा एक स्तुत्य निर्णय आहे. दिवाळी ही कार्तिक महिन्यात येते. या कार्तिक महिन्याबाबतचे नवे असे काही संदर्भ मी शोधले आहेत. हे सारे ताजे संदर्भ मी माझ्या आयुष्यात प्रथमत:च लिखित स्वरूपात नोंदवले आहेत. यात कौटुंबिक तपशील जास्त आहेत. आधी तुम्हाला वाचून दाखवतो, मग तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. वाटले तर माझे वाचून झाल्यावर आपण चर्चाही करू या.’
शास्त्रीबुवांचे जे कोणते लिखाण होते ते ऐकायला आम्ही उत्सुक झालो होतोच. या उत्सुकतेमागे आमचा जो आशावाद होता, त्यात आम्हाला हे वाटत होते की, आपण जो काही उपक्रम सुरू करण्याचे धाडस करतो आहोत तो घरा-घरातील प्रत्येकाने स्वीकारला तर चौपट फायदाच होणार आहे. एकतर आम्हाला बिनभांडवली स्वरूपातच सुरुवात करायची होती हा भाग वेगळा आणि तो फक्त आम्हालाच माहीत होता. आम्ही उत्कृष्ट रसिक प्रेक्षकाच्या भूमिकेत तत्काळ प्रवेशत बुवांना म्हणालो, ‘वाचा आता! आमची उत्सुकता ओसंडून वाहणे सुरू झालेय बघा!’
शास्त्रीबुवांनी बाजूच्या टेबलावरची काही सुटी हस्तलिखिताची पाने हातात घेतली. त्या आधी चष्मा नीट पुसून डोळ्यांवर लावला आणि ते म्हणाले, ‘आम्ही वाचण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की, कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी दिवाळीची एक तिथी असते बरं का!’ आम्ही संमतिदर्शक होकारार्थी मान हालवली अन् पुढे बुवा वाचू लागले, ‘खरे पाहता कार्तिक महिना सुरू होतो तो बलिप्रतिपदा या तिथीने. ही तिथी जरी बळीराजा आणि वामन यांच्या पारंपरिक कहाणीची आठवण देणारी असली तरी ते प्रतीकात्मक रूपक आहे हे लक्षात घ्यायला हवे. ज्या बलिप्रतिपदा या तिथीने कार्तिक महिन्याची सुरुवात होते, त्या तिथीचा संकेतार्थ ‘बळी पती प्रथा’ असा काढता येतो. यासाठी आधार घेता येतो तो बळीराजाच्या कथेचा. या बळीराजाचे त्रिखंडात पसरलेले राज्य तसे वामनरूपी विष्णुदेवांनी तीन पावलांमध्ये व्यापले. हे व्यापलेले राज्यच दान म्हणून नंतर मागून घेतले होते. असेच काही ज्याची त्याची पत्नी करत असते. पतीरूपी नारायणाचाच पराभव करणारी ही गृहलक्ष्मी अवघ्या तीन पावलांमध्ये आपापल्या पतीचे आयुष्य जिंकून घेत असते. ही तीन पावले वेगवेगळ्या प्रसंगी पडत असतात. या पावलांमुळेच प्रत्येक विवाहिता ही पतीज्जेता असते तर तिला कायम अपराजिता हा बहुमानही प्राप्त असतो. कार्तिक महिन्याच्या काळात विवाहितेच्या सामर्थ्याचा शोध घ्यायचा असतो कारण इथूनच विवाह सोहळ्याच्या तारखा जास्त प्रमाणात सुरू केल्या जातात. तसे पाहिले तर बलीपतीप्रथा जेव्हा असते त्या दिवशी काय उपचार केले जातात हे आठवले तर एवढे लक्षात येते की हा एवढा एकच दिवस आहे ज्या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळत असते. हे ओवाळणे म्हणजे सर्वश्रेष्ठ उपहासाचे सर्वोत्तम प्रतीक आहे की काय, याचा शोध भीतीपोटीच कोणीही घेतलेला नाही. आजपर्यंतच्या सर्व कौटुंबिक विचारवंतांनाही पत्नीभयापोटी हे धाडस झालेले नाही. या ओवाळण्यामागे ‘कसे आवळून ठेवलेय या माझ्या कुंकुमश्रेष्ठीला अन् काय ध्यान आलंय माझ्या वाट्याला!’ ही भावना असते काय याचाही शोध आजवर लागलेला नाही. हे अतिशय खर्चीक ओवाळून घेणे म्हणायला हवे कारण या ओवाळणीत बोनस, महागाई भत्ता, बचत हे सारे स्वाहा होत असते.
निरनिराळ्या कुटुंबातील वेगवेगळ्या पतीज्जेत्या भार्यादेवींबाबत शोध अभियान राबवताना जी परंपरा सापडते, त्यात बलिप्रतिपदेच्या आदल्या दिवशी म्हणजे आश्विन महिन्याच्या अखेरच्या सायंकाळी अर्थात लक्ष्मीपूजनालाच सर्व व्यापारी मंडळी चोपडीपूजन करताना आढळते. ही त्यांची पद्धत म्हणजे त्यात गोपनीयरीत्या ज्ञात असलेले एक रहस्य होय. या मंडळींना हे अचूक माहीत असते की, उद्यापासून घरातील गृहलक्ष्मी ही आपल्याकडे स्वत: चालत येणार आहे. ती आपल्याकडे स्थायीलक्ष्मी म्हणून निवास करणार आहे. उद्याची तिथी ही शेतकरीरूपी बळीचा राज्यकारभार काढून घेण्याच्या परंपरेची जशी तिथी आहे, तशीच पतीरूपाने बळी पडलेल्या असंख्य नरदेहांची तिथी आहे. हे नरदेह म्हणजे हयातभराचे दैनंदिन हुतात्मे असतात याचीही त्यांना खात्री असते. हे सारे कसेकसे घडत जाते याचा तपास केला तर काय घडून गेले हे शोधावे लागते.
आधी घडते काय की कोणत्याही युवतीला जेव्हा एखादा उतावळा किंवा अनउतावळा विवाहोत्सुक युवक संभाव्य वधूरूपात प्रथमच पाहतो, तेव्हा त्याच्या हृदयात तिचा चेहरा आपल्या रूपातून पहिले पाऊल टाकतो. त्याच्या हृदयातला प्रेमाचा सुकलेला पाझर अचानक ओसंडून वाहून त्याला हृदयपूर येतो. या आवडलेल्या पहिल्या पुराच्या गटांगळ्यांतून तो तडकाफडकी होकार देतो. हे म्हणजे पुरुषाचे अंतर्मन जिंकणे होय. एकदा का दोन्ही बाजूंनी होकार घडून गेला, की विवाहाआधीच्या कालावधीत या विवाहोत्सुक युवकाला अशी भविष्यकालीन वधूरूपा आपल्या मधुर आणि आतुर बोलांमधून त्याच्या मेंदूवर भुरळ टाकते. या भुरळीमुळेच त्याच्या मस्तिष्कामध्ये प्रेमसंप्रेरकांचा पूर येत असतो. ही म्हणजे विवाहोपरांतच्या कायम भुणभुणीआधीची अंदाजरूपी चुणचुण असते. आपल्या अशा संवादातून ती दुसरे पाऊल मेंदूरूपी विचारकेंद्रात टाकून देते. या पावलामुळेच प्रत्येक विवाहोत्सुक युवकाची सारासार विवेकबुद्धी क्षीण होते आणि ‘तुझ्यासाठी काय पण’ म्हणत असे युवक लग्नाआधीच शरणागताची भूमिका घेतात. हे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या तिला टाकायला लावलेले जेतेपदाचे तिसरे पाऊल ठरते.
कार्तिक महिन्याच्या या अस्सल आणि अवघड संकेताचा यापूर्वी सर्वप्रथम शोध एका कविश्रेष्ठाला लागला होता. या शोधादरम्यान त्यांनी सार्या विवाहित पुरुषांसाठी म्हणून खास स्वगतरूपी जे गाणे लिहून ठेवले होते, त्यात त्यांनी संकेताने ‘जग हे बंदिशाला’ असे म्हटले होते. इथे ‘जग’ या शब्दाचा अर्थ ‘घर’ असा घ्यायचा होता. एकदा का हा अर्थ रुचला, की अशाच एका संकेताला निसर्गप्रचिती कशी आहे हे जाणवून देता येते. या कार्तिक महिन्यात दिवाळीनंतर पुढे तुळशीपूजन करायचे असते. या तुळशीपूजनावेळी आवळीपूजनही केले जाते. तुळस हे जसे सात्त्विकतेचे प्रतीक आहे तसे आवळी म्हणजे आंबट-तुरट चवीची खात्री आहे. प्रत्येक विवाहित पुरुषाला आपापली पत्नी ही तुळसरूपी गृहिणी असावी वाटते तर एखादी निव्वळ बोलून का होईना, घायाळ करणारी आवळीरूपी आंबट चिंबट मैत्रीण असावी वाटते. हे वाटणे म्हणजे त्या ओळीची आठवण देणे होय, ज्यात म्हटले गेले होते की,
घरचीशी तर माझे नाते,
दुसरीशी ती केवळ रुजवण
आवळीला कधी लाभेल का?
तुळशीसमान वृंदावन!
या ओळी लिहिणारा कवी हा जन्मठेप भोगत होता की काय कोण जाणे! त्याच्या ‘पॅरोलवरच्या कविता’ या १९५० साली प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहात ही कविता होती. या कवितेचा खरा अर्थ असा निघतो की नि:सत्त्व संसारातून बाहेर पडून थोडेफार रोमांचक असे जगताना रोमांचकारी घटकाची समजूत वरील काव्य उद्धृत करून घालायची असते!’ शास्त्रीबुवांनी हे वाचल्यानंतर – आपले वाचन थांबवले आणि आम्हाला ते म्हणाले, ‘मित्रोत्तमा, आम्हाला थोडे दमायला झाले आहे. आपण आता जरा चहा घेऊ या. चहा मलाच करावा लागणार आहे तेव्हा आपण जरा बातम्या पाहत बसा!’
शास्त्रीबुवा चहा करण्यासाठी उठून गेले आणि आम्ही तिथे एकटेच बसलो. अल्पकालाचा का एकांत होईना, तो चिंतन करायला लावतोच. आमच्याही मनात चिंतन सुरू झाले. मनातल्या चिंतनात काही गोष्टी पुन्हा आठवत गेल्या. अचानक आम्हाला हे आठवले की आमची आजी नेहमी म्हणायची की ‘माणसानं नेहमी विष्णुदेवाच्या लीला आठवाव्यात. काही नाही आठवले तर त्यांची झोपी जायची वेळ आणि उठण्याची वेळ लक्षात ठेवावी. आषाढीला विष्णुदेव निद्राधीन होतात आणि कार्तिकीला जागे होतात!’ आम्ही शास्त्रीबुवांकडे योगायोगाने कार्तिकज्ञानच घेत बसलो होतो. योगायोगाने आम्हाला आजीचे ते म्हणणेही आठवले, ज्यात ती म्हणते की
वेळेवर झोपे, वेळेवर जागे
जग राहिल, मागे-मागे!
आजीचे ते बोल आठवले आणि एकदम त्यातले मर्म आम्हाला हे जाणवले की देवाधिराज म्हणजे विष्णुदेव आणि त्यांचे कसे सारे नियमित होते. त्यांच्या निद्राकालातच इतर अवतारांचे उत्सव व सोहळे पूर्ण करून होतात. देवाधिराजांचे जागे होणे म्हणजे सुस्थिती आहे की नाही, याचा अंदाज येणे. पुढे मग सगळे आनंदोत्सवच सुरू होतात. आम्हीही मनोमन ठरवून टाकले की यापुढे लवकर आणि वेळेवर निद्राधीन व्हायचे आणि उशिरा जरी जागलो तरी वेळेवरच अर्थात आळस आटोपल्यावरच जागायचे. हा स्तुत्य संकल्प आम्हाला सुचताक्षणीच आवडून गेला अन् तेवढ्यात शास्त्रीबुवा चहा घेऊन आले. आम्ही आमचे चिंतन त्यांच्यासमोर चहा घेता घेता जेव्हा व्यक्त केले तेव्हा ते म्हणाले, ‘अहो धार्मिक परंपरासुद्धा खट्याळपणा व्यक्त करतात बरं का! आपल्या परंपरांवर टीका करण्यापेक्षा त्यातले चांगले शोधायचे असते. आता कार्तिकाचेच पाहा ना, डिंकाचा लाडू हा सार्या आबालवृद्धांचा आवडता पदार्थ आहे, तो या महिन्यातच खाण्याची संधी असते तर हिरवे सगळे आता उपलब्ध असते. हिरव्यागार पालेभाज्या खाऊन मन हिरवे करायचे असते अन् डिंकाचा लाडू खाऊन शरीर बळकट करायचे असते. हे करत असताना जर कोणी ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा!’ असे म्हणाले, तर त्याकडे सरळ दुर्लक्ष करायचे असते. असे दुर्लक्ष केले तरच कार्तिकातही थंडी ही गुलाब-गुलाबी वाटते नाहीतर ती थंडी काटेरी अन् टोचरी बनते. याच काळात गवतावरच्या दविंबदूवर अनवाणी चालून आपल्या तारुण्याला आठवायचे असते. हे सगळे करत असताना जर गेलेले दिवस पुन्हा येणार नाहीत याची दु:खी जाणीव जर झाली, तर सरळ या जाणिवेला कार्तिकबाधा समजून दुर्लक्ष करायचे असते, कारण वाढत्या थंडीमुळे सूर्यदेव सुखावह वाटण्याचा हा काळ असतो आणि पाण्याचा स्पर्श, वाढत जाणार्या लांब सावल्या नको वाटत असतात. वाढते वय म्हणजे थंडी, कटू आठवणी म्हणजे पाण्याचा स्पर्श आणि म्हातारपणाकडे जाण्याचा काळ म्हणजे लांब सावल्या समजाव्या आणि विसरून जावे, कारण याच काळात पुनर्निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा आवळा उपलब्ध असतो जो च्यवनप्राशचा मुख्य घटक असतो. हा आवळा म्हणे देवसान्निध्यातील वृक्ष आहे. आम्ही लहानपणी ‘खाऊन आवळा, कोणालाही आवळा’ असे म्हणत गल्लीबोळातून पळत फिरायचो. थोडक्यात काय तर शरीरात पुन्हा जोम आणणारा महिना कोणता तर कार्तिक महिना, हे लक्षात ठेवा आणि यातले मर्म प्राप्त करण्याच्या प्रयत्नात राहा. आम्ही तर त्याच प्रयत्नात आहोत!’ शास्त्रीबुवा आपले विचार व्यक्त करून जेव्हा थांबले तेव्हा आम्हालाही बरेच धार्मिक ज्ञान मिळालेले होते. आम्हीसुद्धा डोळस श्रद्धाळू म्हणून त्यांच्या त्या ज्ञानशलाका पकडून ठेवणार होतो. आमच्या दोघांच्या त्या संवादानंतर आमच्या मनातले पत्नीभयही कमी होणे सुरू झाले होते कारण आता आम्ही ज्ञानी बनण्याच्या मार्गावर होतो. पुढे येणार्या कार्तिकाआधीचा जो आश्विन महिना आम्ही सहन करीत होतो, त्या महिन्यात घरा-दारातला, आकाशातला, छायाचित्रातला चंद्र हा पूर्ण प्रभावी असल्याचे आम्ही न्याहाळत होतो पण आता त्या सार्या चंद्रांना जवळून पाहण्याचे धाडस आमच्या अंगी येऊ लागले होते. हे सगळे झपाट्याने घडत होते आणि कल्पनेतल्या चंद्रावरही डाग असतात आणि कोणतेही सौंदर्य हे पूर्ण सौंदर्य नसते, याची स्पष्ट कल्पना आम्हाला येऊ लागली होती. ही कल्पना स्फुरण्यामागे जी प्रेरणा होती ती म्हणत होती की कार्तिकातच शरीरात पुन्हा जोम आणि परंपरावादी म्हणून पुन्हा सामाजिक, कौटुंबिक प्रतिष्ठा प्राप्त कर! हेच ते कार्तिकज्ञान! हाच तो कुटुंबप्रमुख सखा कार्तिक!