विषाणूविरुद्ध जनतेची एकजूट झाली नसेल तर विषाणूला फैलाव करायला बराच वाव मिळतो. आपल्या आजूबाजूला किंवा ओळखीच्यांमध्ये कितीतरी जण आहेत जे मास्क लावत नाहीत, लस घ्यायला तयार नाहीत, इतर नियम पाळत नाहीत, कोविडसदृश्य लक्षणे असतानाही समाजात मुक्तपणे वावरतात, तपासणी करून घेत नाहीत, अलगीकरण करून प्रसार थांबवत नाहीत, इतर नियम पाळणार्या व्यक्तींची खिल्ली उडवतात, इतरांना नियम पाळण्यापासून परावृत्त करतात, हा सर्व कटच आहे असे समजून बिलकुल काळजी घेत नाहीत.
—–
ओमायक्रोनविषयी एका ओळीमध्ये मत सांगू का?
‘ओमायक्रोनविरुद्ध लढा जनसहभागाखेरीज अशक्य!’
होय. खूप मोठे विधान आहे हे आणि जबाबदारीने केले आहे. मात्र यात नवीन काहीही नाही. कारण करोनाविरुद्ध लढा जनसहभागाशिवाय शक्य नाही हे आपण दुसर्या लाटेमध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहेच. ज्या गावांमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे सर्व नियम पाळले आणि एकजुटीने काम करून समूह विलगीकरण केंद्रे काटेकोरपणे चालवली, त्या गावांमध्ये रुग्णमृत्यू कमी होते, तसेच रुग्णसंख्या देखील खूप लवकर नियंत्रणात आली. आणि ज्या गावांमध्ये लोकांचा कल नियम न पाळण्याकडे होता, विलगीकरण न करण्याकडे होता, तिथे रुग्णसंख्या आटोक्यात आणायला खूप कष्ट पडले.
विषाणूशी किंवा एकूणच साथीशी लढताना आपल्याकडे म्हणजे मानवाकडे एक हुकुमाचा एक्का आहे जो विषाणूकडे नाही. विषाणूकडे मेंदू नाही, विचार करण्याची क्षमता नाही. त्यामुळे विषाणू विचारपूर्वक किंवा स्वतःचा फायदा कसा होईल त्यानुसार त्याची वागणूक बदलू शकत नाही. म्हणून वूहानमधून आलेला मूळ विषाणू असो किंवा आत्ता दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला ओमायक्रोन असो, त्यांची मूळ वागणूक बदलेली नाही. जेव्हा शत्रू हल्ला करण्याची पद्धत बदलू शकत नाही तेव्हा या गोष्टीचा फायदा घेऊन आपण आपली सुरक्षा नक्कीच वाढवू शकतो. साथरोग नियंत्रणासाठी अनेक शतके ज्यांचा वापर यशस्वीपणे झाला आहे, असे विनामूल्य उपाय साथीमध्ये महत्वाचे आहेत. पण ज्या गोष्टी विनामूल्य असतात, त्यांना आपण कधीच महत्व देत नाही. सरकार त्या उपायांचा वापर करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आपण त्यातून पळवाट काढतो किंवा सहकार्य देत नाही. हे उपाय न केल्यास रुग्णसंख्या वाढते आणि पर्यायाने निर्बंध वाढतात. त्याने असंतोष वाढतो, नुकसान वाढते आणि जनतेचे सहकार्य अजून कमी होते. हा चक्रव्यूह भेदायचा असेल तर पूर्वजांनी वापरलेले उपाय पुन्हा मनापासून वापरायला हवेत.
सध्या या उपायांचे नाव ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ असे आहे.
विषाणू नक्की कुठे लपून बसलाय हे ओळखणे ही पहिली पायरी असते. त्यासाठी टेस्ट केल्या जातात. जेव्हा विषाणू सापडतो (टेस्ट पॉझिटिव्ह) तेव्हा तो आपल्याला सापडेपर्यंत कितीजणांपर्यंत पोचलाय यासाठी संपर्कातील लोकांची चाचणी करणे व विषाणू अजून पुढे जाऊ नये यासाठी अलगीकरण करणे हा टप्पा येतो. पहिली चाचणी निगेटिव्ह आली तरी आपण निवांत राहू शकत नाही, कारण लक्षणे १४ दिवसांपर्यंत येऊ शकतात. म्हणून सात दिवसांनी पुन्हा चाचणी केली जाते व पुढील सात दिवस लक्ष ठेवायला सांगितले जाते. सापडलेल्या रुग्णाला विलग करून (घरी अथवा केंद्रामध्ये) आजाराच्या पायरीनुसार उपचार केले जातात.
साथ थांबवणे सोपे आहे. पण कधी? प्रत्येक बाधित व्यक्तीपर्यंत आपण पोचत असू आणि त्याच्यापासून विषाणू पुढे जाऊ नये याची काळजी घेत असू तरच. त्याचप्रमाणे स्वतःला संसर्ग होऊ नये आणि चुकून झालाच तर तो आपल्यापासून पुढे जाऊ नये यासाठी समाजातील प्रत्येक जण काळजी घेत असेल तर.
ही काळजी कशी घ्यायची?
हे देखील सोपे आणि आपल्या आवाक्यातील आहे. घराबाहेर असताना एन ९५ मास्क (९५ टक्के सुरक्षा) आणि शक्य नसेल किंवा आवडत नसेल तर डबल मास्क (आतमध्ये सर्जिकल आणि बाहेरून कापडी मास्क) वापरावा (९० टक्के सुरक्षा). ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी तीन स्तर असलेला स्वच्छ कापडी मास्क वापरावा किंवा दोन कापडी मास्क वापरावेत. याने साधारण ५० टक्के सुरक्षा मिळेल. याखेरीज वेगळा मार्ग वापरत असाल तर सुरक्षा अजून कमी होते. फक्त सर्जिकल मास्क वापरायचा असेल तर गाठ मारून वापरा, ज्याने ८० टक्के सुरक्षा मिळेल. मास्कमध्ये कमीत कमी तीन स्तर असावेत, नीट फिटिंगचा मास्क असावा आणि इतरांसोबत असताना मास्क काढला नाही की झाले. बाधित आणि संपर्कातील व्यक्ती या दोघांनी मास्क लावलेला असेल तर संक्रमणाचा धोका अतिशय कमी होतो. गर्दीमध्ये जाणे टाळणे, वायुविजन वाढवणे इत्यादि प्रतिबंधात्मक उपाय सहाय्याला आहेतच!
करोनाला दूर ठेवून रुग्णसंख्या नियंत्रित ठेवणारे आणि निर्बंध देखील कमी ठेवणारे इतके साधे उपाय आहेत, तर नक्की घोडे कुठे पेंड खातंय? सरकार हे उपाय करत का नाहीये?
अहो, साथीच्या सुरुवातीपासून हे उपाय सरकार जमेल तसे करतेय, पण जनसहभाग नसल्याने यांचा परिणाम जाणवत नाही.
आता ओमायक्रोनचेच उदाहरण घ्या. तो दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडल्यानंतर गेल्या १५-२० दिवसांमध्ये जे प्रवासी भारतामध्ये आले त्यांना शोधून त्यांची तपासणी केली जातीये, पॉझिटिव्ह असतील तर विलग केले जातेय आणि संपर्कातील व्यक्तींना अलग केले जातेय. टेस्ट निगेटिव्ह असेल तर सात दिवस अलगीकरण केले जाते. सातव्या दिवशी पुन्हा टेस्ट केली जाते आणि पुढील सात दिवस देखील घरी अलगीकरण करायला सांगितले जाते. जनसहभाग असता तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमान प्रवाशांनी स्वतःहून पुढे येऊन तपासणी करून घेतली असती. सर्व प्रवाशांची तपासणी होईल तेव्हाच लपलेला ओमायक्रोन सापडेल. किंवा तो अजून आपल्या राज्यापर्यंत पोचला नाही हे तरी कळेल.
पण नाहीये ना जनसहभाग?
साथ रोखणे व रुग्णसंख्या नियंत्रित ठेवणे हे जनतेच्या हातात आहे. लहानपणापासून आपण एकीचे बळ ही कथा ऐकतो. एकत्र आलो की कोणत्याही मोठ्या संकटाला आपण तोंड देऊ शकतो. समाजातील जवळजवळ सर्व लोक वर सांगितलेले समूह-सुरक्षेचे उपाय मनापासून पाळत असतील, नियमानुसार सर्वांनी कोविड लसीकरण केले आहे, कोविडची प्रत्येक लक्षणविहीन किंवा सौम्य लक्षण असलेली केस देखील आपल्याला वेळेवर सापडत असेल आणि आपण विषाणू पुढे जाण्यापासून रोखत असू, तर मग कशी वाढेल रुग्णसंख्या आणि का येतील निर्बंध?
आपण मास्क न वापरल्याने, गर्दीत गेल्याने, बंदिस्त जागांमध्ये गेल्याने, मास्क न लावता इतरांना भेटण्याने विषाणूला शरीरात प्रवेशाची संधी देतो आणि मग सरकार काही करत नाही म्हणून चिडतो. जनतेने स्व-नियमन केले तर सरकारला कठोर नियम आणि शिक्षा करायची वेळ येत नाही.
वर विमान प्रवासाचा उल्लेख केला म्हणून एक मुद्दा स्पष्ट करते. एखाद्या देशात नवा व्हेरियंट सापडल्यावर त्या देशामधून येणारी विमानसेवा पूर्ण बंद करणे या कृतीला शास्त्रीय दृष्ट्या साथरोग नियंत्रणाच्या दृष्टीने अधिक महत्व नाही. याची बरीच कारणे आहेत.
१. नवा व्हेरियंट आत्ता निर्माण झाला आणि पहिली केस सापडली असे नसून ज्या देशांमध्ये नियमितपणे विषाणूच्या आरएनएची क्रमवारी तपासली जाते अशा देशामध्ये यंत्रणेच्या लक्षात आलेली ही पहिली केस आहे. ओमायक्रोनचा पहिला रुग्ण बहुदा ९ नोव्हेंबरच्या एका सँपलमध्ये सापडतो, पण हा विषाणू रिपोर्ट करण्यायोग्य आहे हे प्रयोगामधून सिद्ध व्हायला व जागतिक आरोग्य संघटनेला रिपोर्ट करायला २४ नोव्हेंबर उजाडले. मात्र गांभीर्य बघून २६ नोव्हेंबरला लगेचच या व्हेरियंटला ‘चिंताजनक उप-प्रकार’ ही पायरी देण्यात आली. मात्र हा पहिला संसर्ग लक्षात येईपर्यंत संसर्ग इतरांपर्यंत पसरलेला असतो आणि देशाबाहेर जायला सुरुवातही झालेली असते. म्हणून विविध देशांमध्ये ओमायक्रोनच्या केसेस लगेचच सापडू लागल्या. कारण गेल्या महिन्याभरात जवळजवळ प्रत्येक देशामध्ये १-२ केसेस तरी पोचल्याची शक्यता अधिक आहे. अमेरिकेतील पहिली केस २२ नोव्हेंबरलाच देशामध्ये दाखल झाली होती. कर्नाटकातील डॉक्टरची केस तर कोणताही प्रवास केल्याशिवाय आढळून आली आहे. त्यामुळे नवा व्हेरियंट आला की सर्व समाजावरच बारकाईने नजर ठेवावी लागते.
२. विमान प्रवासी इतर देशातून येणार्या विमानातून देखील येऊ शकतात. ब्रेक जर्नी किंवा कामासाठी इतर देशात गेले असल्यास असे घडू शकते. आपण केवळ काही देशांच्या प्रवाशांकडे लक्ष देत असल्याने हे इतर बाधित प्रवासी सुटू शकतात. जनसहभागाचे भान नसल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासाचा शिक्का पुसण्यासाठी काही प्रवासी कनेक्टिंग डोमेस्टिक विमानाने आलेले असू शकतात आणि ते तपासण्यांच्या जाळ्यामध्ये सापडत नाहीत.
३. साथरोग विज्ञानामध्ये एक संकल्पना आहे… आइसबर्ग फेनॉमेनन म्हणजे हिमनग समानता परिस्थिती. कोणत्याही आजाराची डोळ्यांना दिसणारी रुग्णांची संख्या ही नेहमीच हिमनगाचे टोक असते. उरलेला भाग तपासणीच्या टप्प्यात अजूनपावेतो आलेला नसतो. आजार सौम्य असेल तर असे हमखास घडते. आजार लक्षणविहीन असल्यास खूप सारे रुग्ण न सापडल्याने दृष्टिआड राहतात आणि कमी रुग्णसंख्या दिसून आपण योग्य ती खबरदारी घेत नाही. डेल्टा काय किंवा ओमायक्रोन काय, सापडणारे रुग्ण ५-१० असतात तेव्हा समाजामध्ये न सापडलेले रुग्ण/ बाधित व्यक्ती त्याच्या कितीतरी पट असतात आणि जनता नियम पाळत नसेल, तर शांतपणे नकळत संसर्ग पसरवत असतात. आपण फक्त विमानप्रवाशांवर किंवा एखाद्या देशावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा या गटाकडे दुर्लक्ष होऊ शकते. साथ थांबवायची असेल आणि निर्बंध वाढू द्यायचे नसतील तर जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोचलो तरच हे साध्य होऊ शकते. किंवा जन-सहभाग असा हवा की लक्षणे नसलेले, लसीकरण पूर्ण झालेले असे सर्व लोक प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून चुकून झालेला लक्षण-विहीन संसर्ग पुढे जाणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतील.
४. सर्वात महत्वाचा धोका आहे भविष्यातील लपवाछपवीचा! जेव्हा विविध देशांनी दक्षिण आप्रिâका व इतर शेजारील देशांवर निर्बंध घातले, तेव्हा दक्षिण आप्रिâकेचे सरकार दुखावले गेले. त्यांच्या शास्त्रज्ञांनी नवा उप-प्रकार वेळेत शोधून वेळेवर सर्व जगाला खबरदार केले आणि जगाला नियंत्रणाचा विचार आणि जनतेची जागृती करायला थोडासा तरी वेळ मिळाला, पण याबदल्यामध्ये शिक्षा केल्यासारखे प्रवास निर्बंध त्या देशावरच लादले गेले. आता त्या देशात पुढील प्रयोग करण्यासाठी साधनसामुग्री व रसायनांची कमतरता निर्माण झाली आहे. भविष्यात दुसर्या एखाद्या देशामध्ये जिथे पर्यटन महत्वाचे आहे तिथे नवा उप-प्रकार सापडला तर विमानप्रवासावर निर्बंध येऊन पर्यटन बंद पडेल म्हणून तो देश नवा उप-प्रकार जगाला सांगणारच नाही आणि त्यामुळे रुग्णसंख्या अचानक वाढून सर्वच देशांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होईल!
डब्ल्यूएचओ देखील अशा प्रवासनिर्बंधांचे समर्थन करीत नाही. विमानप्रवासाबाबत जोखीमाधिष्ठित उपाययोजना व मार्गदर्शक आराखडा देशांसाठी प्रसिद्ध केलेला आहे.
प्रत्येक करोनाबाधित व्यक्ती आपल्याला सापडली तर पुढील प्रसार टाळणे शक्य होईल आणि प्रत्येक करोना-बाधित व्यक्ती तेव्हाच सापडेल जेव्हा जन-सहभाग वाढेल, हे तुमच्याही लक्षात आले असेलच!
वरील सर्व शास्त्रीय मीमांसा समजू शकणारी व्यक्ती जन-सहभागासाठी, नियम पाळण्यासाठी, तपासणीसाठी, अलगीकरण आणि विलगीकरणासाठी अगदी आनंदाने तयार होईल. आपल्या प्रिय देशाच्या सुरक्षेसाठी काही कृती करण्याची संधी वारंवार मिळत नसते. मात्र अशा जागृत लोकांची संख्या सध्या बरीच कमी आहे आणि घोडे नेमके इथेच पेंड खाते.
विषाणूविरुद्ध जनतेची एकजूट झाली नसेल तर विषाणूला फैलाव करायला बराच वाव मिळतो. आपल्या आजूबाजूला किंवा ओळखीच्यांमध्ये कितीतरी जण आहेत जे मास्क लावत नाहीत, लस घ्यायला तयार नाहीत, इतर नियम पाळत नाहीत, कोविडसदृश्य लक्षणे असतानाही समाजात मुक्तपणे वावरतात, तपासणी करून घेत नाहीत, अलगीकरण करून प्रसार थांबवत नाहीत, इतर नियम पाळणार्या व्यक्तींची खिल्ली उडवतात, इतरांना नियम पाळण्यापासून परावृत्त करतात, हा सर्व कटच आहे असे समजून बिलकुल काळजी घेत नाहीत, नियम पाळणार्यांना संसर्ग होतो किंवा लस घेतलेल्यांना संसर्ग होतो असे समजतात, चुकीची/ खोटी/ धोकादायक माहिती इतरांना देतात आणि असे बरेच काही! जसे प्रत्येक सिगारेट ओढणार्याला कर्करोग होत नाही, तसेच यातील बर्याच व्यक्ती अजूनपर्यंत कोविडपासून दूर राहिल्या असतील किंवा त्यांना लक्षण-विहीन कोविड होऊनही गेला असेल. पण त्यामुळे त्यांचे हे चुकीचे वागणे अजूनच वाढते.
असे वागणारे/ बोलणारे फक्त परिचित असतात असे नाही, बर्याच वेळा हे शिक्षित किंवा अधिकाराच्या पदावरील लोकही असतात. आमच्या संपर्कातील एक डॉक्टर स्वतः मास्क लावत नव्हते आणि इतरांना देखील मास्क काढून बोलायला लावायचे. कधी अशी व्यक्ती मिडियामधील मोठे फॅन फॉलोइंग असलेले कोणी असू शकते जी सल्ला देते– ‘सौम्य लक्षणे असतील तर का करता तपासणी? तपासून घेऊच नका म्हणजे सुरक्षित व्हाल.’ पण यामुळे संसर्ग किती फैलावेल आणि रुग्णसंख्या काही आठवड्यामध्ये किती वाढेल याची चिंता त्यांना देशाबाहेर बसून करायची गरज नसते.
व्हॉट्सअॅपमधून भराभर फॉरवर्ड केले जाणारे आणि महिनोमहिने फिरणारे मेसेज साथ नियंत्रणाच्या कामात मोठा अडथळा आणतात. करोना विषाणू नाहीच मुळी, अशा अर्थाचा मेसेज एखादा अल्पशिक्षित वाचेल, तेव्हा सर्व यंत्रणांवरून त्याचा विश्वास उडणारच ना. मास्कसारख्या स्वस्त आणि तरी उपयुक्त अशा उपायाविषयी तर सर्वांच्याच मनामध्ये किंतु निर्माण झालाय. कितीतरी देशांमधील उदाहरणांनी मास्कची उपयुक्तता प्रत्यक्ष सिद्ध झाली असली तरी आपली जनता अजून विषाणूची साइझ आणि मास्क मधील छिद्रे यावर अडकलेली आहे. कितीतरी जणांची एलर्जी मास्क वापरल्याने कमी झाली तरी अजून बरेच जण मास्क वापरल्याने ऑक्सिजन कमी होतो असे समजून मास्क हनुवटीवर लावतात. तसेच टेस्टिंग करण्याविषयी अगदी काही डॉक्टरांमध्येही बरेच गैरसमज आहेत. उदा. आता टेस्टिंग बंद करा, नुसताच उपाय करा असा विचार किंवा सीडीसीने आरटीपीसीआर चुकीची ठरवली म्हणून ती विश्वासपात्र नाही असे मानायचे किंवा लक्षणे आल्यावर ३-५ दिवस थांबून मग टेस्ट करायची, असे एक ना अनेक गैरसमज ही शास्त्रीय वाटणार्या मात्र तद्दन चुकीचा अर्थ लावणार्या फॉरवर्ड मेसेजेसची कमाल आहे. बुद्धिभेद करून मनातील भीती व गैरसमज वाढवणारा आणि भीती-पोटी किंवा अति-आत्मविश्वासाने चुकीचे निर्णय घ्यायला लावणारा मोबाइल सतत खोट्या व अर्ध्या कच्या माहितीचा मारा आपल्यावर करीत असताना कशी होणार आपली एकजूट?
जनता एकजूट होऊन नियंत्रण व्यवस्थेच्या व सरकारच्या पाठीशी उभी राहिली की काय होते हे अमेरिकेतील मेयन प्रांताने दाखवून दिले आहे. तेथील सीडीसीचे डायरेक्टर डॉ. शहा आहेत आणि मेयनमधील जनता त्यांच्या सल्ल्यानुसार चालते. त्यामुळे वृद्धांची संख्या सर्वात जास्त, ग्रामीण भाग आणि सुविधा कमी असून देखील तेथील रुग्णसंख्या सर्वात कमी, मृत्यूसंख्या सर्वात कमी आणि लसीकरणाचा दर मात्र अमेरिकेमध्ये सर्वात जास्त आहे!
महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही ही माहिती एकमेकांसोबत शेअर करा. शास्त्रीय माहिती मिळाली की योग्य निर्णय घ्यायला मदत होते. तुमच्या गावासाठी/ गल्लीसाठी/ कामाच्या ठिकाणासाठी वर सांगितलेले सर्व उपाय आपल्या स्तरावर कसे अमलात आणू शकतो याची चर्चा करा. लसीकरण वाढवा. लसीकरण न झालेल्या व्यक्तीमुळे संपूर्ण गटाची सुरक्षा कमी होऊ शकते. सरकार आणि सार्वजनिक आरोग्य खाते वर सांगितलेले उपाय करून साथ नियंत्रित करून तुम्हाला सुरक्षित आयुष्य देण्यासाठी विविध नियम आणि उपाय करीत आहेत. सिनेमा हॉलमध्ये मास्क लावणे बंधनकारक आहे, यांसारखे उपाय मनापासून स्वत:च्या आणि राज्याच्या सुरक्षेसाठी पाळा. पिक्चर सुरू झाल्यावर हळूच नाक मास्कबाहेर काढलेत तर कळणार नाही कोणाला, पण एखादी व्यक्ती ओमायक्रोनने बाधित असेल तर संसर्ग सहज पसरू शकेल. शाळेमध्ये मुलांनी व शिक्षकांनी पूर्ण वेळ मास्क लावायचा आहे. त्यामधून सूट घेऊ नका. नियम सुरक्षेसाठी आहेत. जेवढे अधिक नियम पाळाल, तेवढी अधिक सुरक्षा मिळेल. स्विस चीज मॉडेल सुरक्षेसाठी आदर्श आहे. सुरक्षेचा प्रत्येक नियम संसर्ग पूर्णपणे टाळू शकत नाही. आणि म्हणून बरेच जण नियम पाळणे सोडतात. त्याऐवजी एका वेळी एकाहून अधिक नियम पाळले की एकत्रितपणे हे नियम आपली सुरक्षा करू शकतात. (चित्र पहा) उदा. सर्व उपस्थितांनी लस घेतली, प्रत्येकाने मास्क देखील वापरला, कार्यक्रमातील लोकांची संख्या नियंत्रित ठेवली, कार्यक्रमात शारीरिक अंतर राखले, बंदिस्त हॉलमध्ये न करता मोकळ्या हवेत कार्यक्रम केला की सुरक्षा बरीच वाढलेली असते? आणि याऐवजी, काही होत नाही, करोना झूट आहे, आता साथ संपली आहे असे म्हणून मास्क न वापरता, बंदिस्त जागी गर्दी जमवली की मग काही आठवड्याने रुग्णसंख्या हमखास वाढलेली आढळते.
आजकाल झूम मीटिंगसारखी तंत्रे वापरून तज्ज्ञांची भाषणे किंवा शंकानिरसनासारखे कार्यक्रम सहजपणे आखता येतील. मनातील गैरसमज दूर झाले की मग योग्य ज्ञानाला जागा मिळते. जेव्हा आपण अधिक जाणतो तेव्हा आपली कृती देखील आपोआपच योग्य होते. मनातील भीतीवर मात करायची असेल तर बेफिकिरी किंवा गैरसमज याने मात करू नका. योग्य शास्त्रीय ज्ञान मिळवाल तेव्हा मनातून या छोट्याश्या विषाणूचे भय जाईल आणि संसर्ग टाळण्यासाठीचे योग्य उपाय तुमच्याकडून घडतील.
ओमायक्रोन का निर्माण झाला माहित आहे का?
कारण तशी परिस्थिती आपणच निर्माण केली आहे.
लसीकरण वाढते तसे करोनाला एखाद्या शरीरामध्ये अनिर्बंध संख्यावाढ करणे शक्य होत नाही. आणि त्यामुळे उत्परिवर्तन होण्याची शक्यता देखील कमी होते. आपली सर्वांची एकजूट नाही तशीच जगभरातील देशांची देखील एकजूट नाही. प्रगत देश केवळ त्यांच्या जनतेचा विचार करीत आहेत. काही देशांमध्ये ७०-८० टक्के लसीकरण होऊन, मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे आणि आता सर्वांना बुस्टर देखील दिले जात आहेत. मात्र जगातील लसींची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे काही अप्रगत देश असे आहेत ज्यातील डॉक्टर देखील अजून पूर्णपणे लसीकृत झालेले नाहीत आणि लसीकरणाचा टक्का अगदी ५-१० टक्के पण नाही.
आपले जग खूप जवळ आलेले आहे. आणि प्रत्येक देशाला अन्न किंवा इतर गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून राहावे लागते. विमानप्रवास संपूर्ण बंद होणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही देशामध्ये नवा उत्परिवर्तित विषाणू तयार होणे हे सर्व जगासाठी मोठे संकट असते. ओमायक्रोन उपलब्ध तपासण्यांमध्ये लक्षात आला म्हणून लगेच सापडला. पुढचा व्हेरियंट तपासणीमध्येही सापडत नसेल तर जग मोठ्या अडचणीत सापडेल. यावरील उपाय डब्ल्यूएचओने सुरुवातीपासूनच सांगितला आहे! कोव्हॅक्सअंतर्गत सर्व देशांनी लसींचे डोस दान करून जगभरातील एकूण एका देशांमध्ये कमीतकमी ४० टक्के लसीकरण या वर्षाअखेर पूर्ण करायला हवे होते. पण ऐकले नाही जगाने आणि ज्याची भीती होती ते घडले. एकाच वेळी ५० बदल असलेला ओमायक्रोन जगासमोर आला. जोपर्यंत सर्व देश जास्तीत जास्त जनतेचे लसीकरण पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत वर सांगितलेल्या समूह-सुरक्षेच्या उपायांनी आणि जन-सहभागाने रुग्ण संख्या नियंत्रित ठेवणे व नवा उप-प्रकार निर्माण होऊ न देणे एवढेच आपल्या हाती आहे.
जगभरातील देशांनी आतातरी जागे व्हावे आणि एकत्र येऊन जगाच्या सुरक्षेचा विचार सर्वात आधी करावा हा संदेश घेऊन वैश्विक साथीचा दुसरा टप्पा सुरू होतोय. पहिल्या लाटेमध्ये संसर्ग ओळखण्यासाठी तपासण्या करण्याची क्षमता वाढवली, तसेच आता जिनोम सिक्वेन्सिंग करण्याची क्षमता प्रत्येक देशाने वाढवायला हवी हा देखील संदेश देतोय. रुग्णसंख्यावाढीचे ग्राफ पाहता स्व-नियमन आणि नियमांचे काटेकोर पालन करून एकजुटीने रुग्णसंख्या कमी ठेवायचीच आणि त्यासाठी प्रत्येक रुग्ण (फक्त ओमायक्रोनचा नाही, डेल्टा करोनाचा पण) ओळखायचाच हा निश्चय महाराष्ट्रातील तमाम जनतेने करायला हवा!