□ महाराष्ट्राचे राजकारण दारू आणि दारूच्या पैशाने चालते. एका वर्षात दोन लाख कोटींची दारू फस्त होते. समाजहित महत्त्वाचे की माणसाची दारू पिण्याची इच्छा महत्त्वाची? : डॉ. अभय बंग.
■ नकळत डॉ. बंग हे लोकांच्या खानपानामध्ये ढवळाढवळ करू पाहणार्या हुकूमशाही वृत्तीच्या माकडांच्या हातात ‘समाजहित’ नावाचे कोलीत देत आहेत… जिथे दारूबंदी आहे तिथले राजकारणही अवैध दारूच्या पैशावरच चालते बंग साहेब आणि ते अधिक घातक आहे. सगळ्यात जास्त घातक नशा धर्माची ठरते आहे, तिच्यावर असाच जालीम उपाय सुचवू शकाल काय?
□ साहित्य संमेलन घेणे हे सरकारचे काम नाही. अशी संमेलने साहित्याचे सरकारीकरण करणारी होऊ शकतात. : साहित्य संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांचे परखड मत.
■ स्वायत्त संस्थांना सरकारी रमणा हवा असतो, साहित्यातला ‘स’ न कळणारे मंत्री संत्री विनोदी भाषणं करायला हवे असतात, राजकारण्यांचं पाठबळ हवं असतं; मग सरकारीकरण टाळणार कसं?
□ मी राजीनामा देतो, शिंदेंनी माझ्यासमोर वरळीत लढून दाखवावे : आदित्य ठाकरे यांचे आव्हान.
■ त्यांना ठाण्यात त्यांची जागा राखता आली तरी पुष्कळ… त्यासाठीही तिथे आदित्य ठाकरे यांना उतरावं लागणार नाही. बाळासाहेबांच्या खर्या शिवसेनेचा कोणीही पठ्ठा आसमान दाखवेल!
□ आपण पैसे खर्च केले म्हणून संजय राऊत खासदार झाले : नारायण राणे.
■ चला, एकदा तरी पैसे सत्कारणी लागले म्हणायचे तुमचे!
□ ३० तासांच्या ईडी चौकशीच्या जाचाने बँक अधिकार्याला हार्ट अटॅक.
■ एक दिवस लोक यांचे कार्यालय उभे जाळतील अशाने. त्याशिवाय हे आणि यांचे आका सुधारायचे नाहीत म्हणा!
□ राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीची सरशी, भाजपला फक्त एक जागा.
■ एक जिंकले तेही रेडीमेड आयात करून… ईव्हीएम नसलं की हे इतके वाईट पद्धतीने हरतात कसे?
□ गर्जा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत; पण ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ या ओळींचे कडवे गाळून.
■ त्याजागी ‘दिल्लीच्याच बोळ्याने दूध पितो महाराष्ट्र माझा’ अशी दुरुस्ती केली तर मिंधे आणि महाशक्ती लगेच स्वीकार करतील त्याचा.
□ ठाणेकरांना टपालातून अंमली पदार्थ घरपोच मिळतात… पोलिसांचे कुरियरवर, टपालांवर विशेष लक्ष.
■ काही नामांकित ठाणेकरांचं चालणं-बोलणं-वागणं पाहिल्यावर शंकेची पाल चुकचुकली होतीच… पण तो अंमल वेगळाच आहे म्हणतात!
□ अपक्ष म्हणूनच काम करणार : सत्यजित तांबे.
■ स्वपक्षाशी घात केल्यानंतर अपक्षच राहावे लागणार. तिकडे विखे पाटलांचा दबदबा पाहता न घर का न घाट का, अशी वेळ येऊ देऊ नका म्हणजे मिळवली.
□ मुक्ता टिळक यांच्या कार्याची त्यांच्या सहकार्यांनी जाण ठेवायला हवी होती : कसबा पेठेत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश टिळक यांची जाहीर नाराजी.
■ अहो, घराणेशाहीच्या सक्त विरोधात आहे तुमचा पक्ष. दिवसरात्र कंठशोष करत असतात त्याविरोधात सर्वोच्च नेते. त्याप्रमाणेच झालं तर उलट कौतुक करायला पाहिजे तुम्ही या मूल्यनिष्ठेचं.
□ चिनी नागरिकाबरोबर तुमची भागीदारी कशी? : अदानींना हिंडेनबर्गचा प्रश्न.
■ अहो, ते परात्पर मालक आहेत देशाचे आणि चीनला डोळे लाल करून दाखवणार्यांचे; त्यांना सगळं काही माफ आहे.
□ मतभिन्नता हा मूलभूत हक्कांचाच भाग : सीएएविरोधी आंदोलनप्रकरणी बळीचा बकरा बनून अटक केलेल्या शर्जील इमाम, आसिफ इक्बाल यांची सुटका करताना दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी.
■ कोण आहे रे तिकडे; या न्यायालयाला पाकिस्तानात पाठवा…
□ आमच्या सरकारने समृद्धी महामार्ग बनवला. त्यामुळे येणारी समृद्धी साहित्यिकांनी टिपावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
■ समृद्धी महामार्ग सहा महिन्यांत बनला का हो? त्यामुळे आलेली समृद्धी टिपायची तर एकाच्या घरात एक असे ४० खोकेबहाद्दरांच्या घरात ४० साहित्यिक पाठवावे लागतील… ते परवडेल का?