विक्रम ननवरे यांच्यावर अनेक अस्मानी-सुलतानी संकटं आली तरी ते डगमगले नाहीत. शून्यातून सुरुवात करून पुन्हा झेप घेताना वेळोवेळी त्यांना साथ दिली ती त्यांच्या मार्केटिंग स्किल्सनी. मल्लाप्पांचा भत्ता विकताना ते, लोकल ते ग्लोबल हा विक्री मंत्र जपत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, त्या जिल्ह्याचं वेगळेपण जपणार्या चवीचे पदार्थ आहेत. या खाद्यसंस्कृतीचं उत्तम मार्केटिंग करून जर ती चव देश विदेशात नेता आली, ते तर खाद्य प्रसिद्ध होईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगारनिर्मितीही होईल.
– – –
डिसेंबर महिन्यात पुण्यातील भीमथडी जत्रेला गेलो होतो. जत्रेची ती शेवटची संध्याकाळ असल्याने, बर्याच स्टॉल्सची निरवानिरव सुरू होती, पण एका स्टॉलभोवती मात्र बरीच गर्दी होती. त्या गर्दीचा केंद्रबिंदू असलेल्या तरुणाच्या हातात भेळभत्त्याचं पाकीट होतं, किंमत विचारल्यावर समोरून उत्तरं आलं, ‘साहेब आधी भत्ता खाऊन बघा, आवडला तरच भाव विचारा, नाहीतर जाऊ द्या. मल्लाप्पांचा भत्ताऽऽ ४ दिवसात ५ हजार पाकीट विकले गेलेलाऽऽ मल्लाप्पांचा भत्ता’ त्याच्या दणदणीत आवाजाने अजून चार हात भत्त्यासाठी पुढे झाले. भेळभत्ता खरोखर कुरकुरीत आणि खमंग होता. मला भेळभत्त्याच्या मार्वेâटिंगची ही पद्धत आवडली. ‘पहले इस्तमाल करे, फिर विश्वास करे’ अशा पद्धतीचं सँपल मार्केटिंग अनेक कंपन्या करतात, पण महाराष्ट्रातल्या ग्रामीण चवीचं, आकर्षक पॅकिंग करून, शहरात विकणं ही संकल्पना वापरली गेली तर, शेकडो स्वयंरोजगार उत्पन्न होतील. उत्तम चवीला दणकेबाज मार्केटिंगची जोड मात्र हवी. बारामतीमधील एक स्थानिक भेळभत्ता, शहरात आणून विकावा ही कल्पना कशी सुचली, मार्केटिंग कला कुठे अवगत झाली, या प्रश्नाची उत्तरे जाणून घ्यायला मी त्यांना भेटलो.
‘मी विक्रम ननवरे, बारामतीमधल्या सोमेश्वरनगरचा. वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार. साधारण सत्तरच्या दशकात गावात ग्रॅज्युएट कमी होते, त्या काळात बी.ए.ची पदवी मिळवून माझे वडील सोमेश्वर साखर कारखान्यात क्लार्क झाले. माझी शाळा साखर कारखान्याच्या समोरच होती. शालेय जीवनात पाहिलेली एखादी घटना जीवनावर मोठा प्रभाव टाकू शकते, माझ्या बाबतीतही काहीसं असंच घडलं. मी रोज बघायचो की साखर कारखान्याला असलेलं मोठं गेट फक्त चेअरमनसाठी उघडलं जायचं, इतर सर्वजण लहान गेटने आत जायचे. मोठ्या गेटमधून आत जाणारा माणूस मोठा असणार, म्हणजे चेअरमन सगळ्यात मोठा असतो, हे माझ्या शाळकरी मनाने पक्क केलं. पण एक दिवस तो मोठा दरवाजा अजून एका व्यक्तीसाठी उघडताना दिसला. हा मोठा माणूस कारखान्याचा चीफ इंजिनियर होता. चेअरमनपेक्षा, इंजिनियर हा शब्द माझ्यासाठी कठीण होता आणि त्याच्यासाठी मोठं गेट उघडलं होतं… तेव्हाच ठरवलं, आपणही असं शिक्षण घ्यायचं की आपल्यासाठी एक दिवस कारखान्याचं मोठं गेट उघडलं जाईल. शाळेत हुशार होतो. चौथीला स्कॉलरशिप परीक्षेत बारामती तालुक्यात पहिला आलो होतो. बारावीला ८७ टक्के मिळाल्यावर पुण्यात मोठ्या कॉलेजला सहज प्रवेश मिळत होता, पण आर्थिक परिस्थितीमुळे माळेगाव बुद्रुक या इंजिनिअरिंग कॉलेजला मेकॅनिकलला प्रवेश घेतला. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला प्रोजेक्ट बनवताना माझे मित्र मेकॅनिकल नॉलेज वापरून प्रोजेक्ट बनवत होते. मला मात्र, स्थानिक समस्या सोडवायला माझ्या प्रोजेक्टचा काय उपयोग होईल, या विचाराने पछाडलं होतं. आमच्या कॉलेजजवळ वीर धरण ते इंदापूरपर्यंत पसरलेल्या नीरा कालव्याच्या दुतर्फा इरिगेशन डिपार्टमेंटने निलगिरीची झाडं लावली होती. निलगिरी औषधी असते, तिचे कैक उपयोग आहेत इथे मात्र हजारो किलो पाने मातीमोल होत होती. किरण थोरात या फार्मसिस्ट मित्राने निलगिरीच्या पानांपासून तेल काढायची एक मशीन बनवली होती. या मशीनचं रिव्हर्स इंजिनीअरिंग करून यातून मोठ्या प्रमाणात तेलनिर्मिती करून रोजगार संधी तयार करता येतील हे मी दाखवून दिलं. त्या एकाच प्रोजेक्टमध्ये मित्राचं मशिनही फेमस झालं आणि रोजच्या परिस्थितीतून तयार होणारी रोजगार संधीही दाखवली. हा वेगळा विचार मांडल्याने मला एक्स्टर्नल परिक्षेत दीडशेपैकी एकशे अठ्ठेचाळीस गुण मिळाले. इतरांपेक्षा वेगळा विचार केला तर मोठं यश मिळतं हा धडा मला इथे शिकायला मिळाला.
२००३ साली, दिल्लीला भारतीय युवा शक्तीच्या कार्यक्रमात रतन टाटांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. ते म्हणाले होते, ‘कुणी तरी एका क्षेत्रात यशस्वी झालंय म्हणून त्याची कॉपी करू नका. तुमच्यात कोणते अंगभूत गुण आहेत, तुमचा स्वभाव कसा आहे याचा करीयर निवडताना विचार करा.’ मी विचार करत होतो की माझ्यात काय गुण आहेत. माझे प्रोजेक्ट्स सगळ्यांपेक्षा वेगळे असतात, मी वेगळा विचार करू शकतो, पण त्याव्यतिरिक्त काय? मित्र म्हणाले, ‘तू बोलायला लागलास तर मातीला सोन्याचा भाव देशील!’ मलाही ते पटलं. लोकल गोष्टी ग्लोबल करायच्या असतील तर मार्केटिंग जमायला हवं. मार्केटिंग आणि सेल्स ही माझी जमेची बाजू लक्षात घेऊन, मी इंजिनिअरिंगनंतर, एमएमसी कॉलेजला २००५ साली एमबीएला प्रवेश घेतला. २००७ला कॅम्पस प्लेसमेंटमधून अमित एंटरप्राईजेस हाऊसिंग लिमिटेड या कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून नोकरीला लागलो. सचिन तेंडुलकर ब्रँड अँबेसिडर असलेल्या या कंपनीचे पुणे, नाशिक, कल्याणला अनेक हाउसिंग प्रोजेक्ट होते. तो काळ सॅम्पल फ्लॅट्स दाखवून घरे विकण्याचा होता. चार भिंती आणि खिडक्या असलेल्या खोल्या दाखवण्याऐवजी, फ्लॅटमधे मोजक्या सामानाची आकर्षक सजावट करून, ग्राहकांना हेच आपलं घरं असं वाटून, विकत घ्यावंसं वाटलं पाहिजे ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असायची. मनोरंजन क्षेत्रात जसं फक्त एंटरटेनमेंट विकलं जातं, तसंच बांधकाम व्यवसायात लोकेशन, लोकेशन आणि लोकेशन हेच विकलं जातं. त्यामुळे योग्य जागी बिल्डिंग उभारली, तर फ्लॅट्स विकायला वेळ लागत नाही. अशा योग्य जागा हुडकायचं काम मी करायचो.
२००७मध्ये थ्री-बीएचके लक्झरीयस घर घेणारा वर्ग हा दहा टक्के होता. टू-बीएचके घर घेणारा ग्राहक तीस टक्के होता. यांत आयटी सेक्टरमध्ये काम करणारे अधिक असायचे. सर्वसामान्य माणूस वन-बीएचके शोधायचा, त्याचा बांधकाम क्षेत्रातील वाटा पन्नास टक्के होता. ग्राहकांचा खिसा पाहून घरं कशी विकायची हे मी इथे शिकलो.
२००८च्या जागतिक मंदीमुळे भारतातलं आयटी सेक्टरही थंडावलं, काही ग्राहक फ्लॅट बुकिंग कॅन्सल करण्यासाठी येत होते, ते धास्तावलेले असायचे. त्यांना मी सांगायचो, आलेली मंदी कायम नसेल, ती दोन वर्षात जाईल; पण तुम्ही आज केलेली जागेची गुंतवणूक मात्र दीर्घकालीन आहे, पुढील पाच वर्षांत या परिसराचा विकास होणार आहे, तुम्ही हातातला फ्लॅट सोडू नका. अशा रीतीने आमच्या कंपनीतील छत्तीस घरांची कॅन्सलेशन्स मी थांबवली. आज त्या जागेचे भाव काही पटीत वाढले आहेत, त्यातील काही ग्राहक आजही भेटल्यावर आभार मानतात. अमित एंटरप्राईजेसमध्ये चाळीस हजार रुपये पगारावर सुरुवात केली होती, दोन वर्षांनी तो सत्तर हजारपर्यंत पोहोचला होता. पण इथे शिकण्यासारखं काही नवीन उरलं नव्हतं. त्यामुळे नवीन जॉब पाहायला सुरुवात केली.
त्याचवेळेस एन.ए. प्लॉट विकण्याचा धंदा जोरात सुरु होता. या क्षेत्रातील नवीन बाजू उलगडून पाहण्याच्या हेतूने सहा महिने मी रणजित डेव्हलपर्स यांच्याकडे कामाला सुरुवात केली. शेती होत नसलेली शेतजमीन, सरकारी परवानगी घेऊन व्यावसायिक कामासाठी विकली जायची. यासंदर्भात लँड एक्वेझिशन (जमीन अधिग्रहण), जमिनीच्या कायदेशीर बाबी आणि प्लॉट्स विक्री कशी करतात हे शिकलो. जमिनीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो असता तिथे महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या मालकांसोबत भेट झाली. ते तेव्हा खेड शिवापूर परिसरात शंभर एकर जमीन अधिग्रहण करण्याचा मोठा प्रोजेक्ट राबवत होते. त्यांना अनुभवी माणूस हवा होता. २००९ साली तिथे जॉइन झालो. २०१०मध्ये भारती हिच्याशी माझं लग्न झालं. ती शाळेत शिक्षिका होती. साखरपुडा आणि लग्नामध्ये आठ महिन्याचा काळ होता. या काळात आमच्यात फक्त नवराबायकोचं नातं न राहता मैत्रीचं नातं निर्माण झालं.
एव्हाना नोकरीत दोन वर्षं पूर्ण झाली होती. नोकरीत बढती मिळून दोन लाख रुपये महिन्याला कमावत होतो. सगळं सुरळीत होतं, पण गाठीशी असलेला अनुभव आणि पगारातून साठवलेले पन्नास लाख रुपये मला स्वतःच काहीतरी सुरू करण्याची साद घालत होते. पुण्यात पन्नास लाखात प्रॉपर्टी व्यवसाय करणं शक्य नव्हतं. बारामतीला परतायचं तर बायकोची संमती मिळणं जरुरीचं होतं. गावातून शहरात येणार्या मुली आपण पाहतो, पण शहरात वाढलेल्या, हातातील चांगली नोकरी सोडून गावाकडे जाण्याचा निर्णय घेणार्या मुली आपल्याला क्वचितच दिसतील. आम्ही दोघांनी विचारविनिमय करून २०१२ला बारामतीला जाण्याचा निर्णय घेतला.
माझा अनुभव बांधकाम क्षेत्रातला होता. त्यातच काहीतरी सुरु करावं या उद्देशाने सर्व्हे करत होतो. निश्चित आराखडा तयार झाला नव्हता. एक बरं होतं की पुण्यातील चाळीस हजार रुपये मासिक खर्चाच्या तुलनेत, बारामतीत आमचं पंधरा हजारात भागत होतं. भारतीला पोदार इंटरनॅशनल शाळेत नोकरी मिळाली. एके दिवशी वर्तमानपत्रात प्रणव डेव्हलपर्सची जाहिरात बघितली. बारामतीमधील बांधकाम व्यवसाय समजून घेण्यासाठी मी त्यांना भेटलो आणि तिथं कन्सल्टंट पदावर कामाची सुरुवात केली. मानधन होतं तेवीस हजार रुपये महिना. वडिलांना कळल्यावर ते म्हणाले, ‘पुण्यातली दोन लाख रुपयांची नोकरी आणि कंपनीची फॉर्च्युनर गाडी सोडून आलेला माणूस फक्त वेडाच असू शकतो’. लहानपणापासून माझे मुलखावेगळे विचार वडिलांना पटायचे नाहीत. मोठा भाऊ सोमनाथ नेहमी आमच्यात मध्यस्थी करायचा. तो म्हणायचा, ‘विक्रम, काही अडचण आली तर मला सांग, मी तुझ्यातला ‘धीरूभाई अंबानी’ मरू देणार नाही.’ त्याचबरोबर मोठी बहीण स्मिता हिने अडचणीच्या प्रसंगी मानसिक आणि आर्थिक आधार दिला. घरातून असा पाठिंबा मिळाल्यावर वेगळंच बळ मिळतं.
मला माझं काम आवडत होतं, मार्केटिंग स्किल्स दाखवण्याची पुरेपूर संधी होती. माहिती घ्यायला आलेल्या ग्राहकाला कंपनीचा साधा सेल्समन देखील फ्लॅट्स विकू शकतो, त्याच्यात आणि माझ्यात काहीतरी फरक हवा. प्रणव ग्रूपसोबत सल्लागार म्हणून काम करताना माझा अनुभव आणि मार्केटिंग स्किल सिद्ध होत होतं. मी इथल्या जमीन गुंतवणूक करणार्या ग्राहकांचा अभ्यास केला. दर महिन्याला पगाराची हमी असणारा शिक्षकवर्ग येथील जागाविक्रीचा प्रमुख ग्राहक होता. घरची शेती अधिक नोकरी म्हणजे प्रगती असं इथे पाहायला मिळतं. नवराबायको दोघेही शिक्षक असतील, तर बचतीचे डबल इंजिन असते. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात खर्च कमी, त्यामुळे ते चांगल्या गुंतवणुकीच्या शोधात असतात. मी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून अशा ग्राहकांपर्यंत पोहचलो.
२०१२पर्यंत बारामती शहरात कधीही मोठ्या हॉटेलमध्ये प्रॉपर्टी एक्झिबिशन झालेलं नव्हतं. फाइव्ह स्टार हॉटेलात जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते, पण अनेक जण बुजरेपणामुळे तिथे जाण्याचं टाळतात. लोकांना हा अनुभव देण्यासाठी मी ताज ग्रूपच्या सिटी इन या हॉटेलमधे भव्य प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन केलं. स्टॉल उभारणीसाठी सामान आणि कारागीर पुण्याहून मागवले. या प्रदर्शनाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या इव्हेंट्मधून अनेक फ्लॅट्स बुक झाले. मोठ्या व्हिजनवर काम करणारा एक बांधकाम विक्री कन्सल्टंट अशी माझी बारामतीत ओळख निर्माण झाली.
सल्लागार म्हणून काम करतानाही मी व्यवसायाची संधी शोधतच होतो, ती संधी एक दिवस चालून आली. भवानीनगर सहकारी साखर कारखानाच्या परिसरात अनेक व्यापारी गाळे होते, पण शहरात दिसणारे शॉपिंग मॉल इथे नव्हते. बदलत्या राहणीमानासोबत शॉपिंग मॉलची गरज होती. तो बांधण्यासाठी अभयसिंह निंबाळकर पार्टनर शोधत होते. जागा त्यांची आणि बांधकाम खर्च माझा, या बोलीवर मी छप्पन दुकानांचे शॉपिंग मॉल प्रोजेक्ट सुरू केलं. हे करताना माझ्याकडे पन्नास लाख रुपये जमा होते, बँकेकडून पन्नास लाख रुपये प्रोजेक्ट लोन घेतलं आणि मित्रमंडळींकडून पन्नास लाख रुपये असे दीड कोटी रुपये जमा करून मी प्रोजेक्ट आराखडा बनवला. बांधकाम क्षेत्रात ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर काम पूर्ण (स्लॅब वाईज) होत जातं, तसे पैसे घ्यायचे असतात. काम पूर्ण झाल्याचं दिसलं तर ग्राहक उरलेले पैसे द्यायला टंगळमंगळ करतात असा अनुभव आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्सबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी संदीप खरे आणि सलील कुळकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला. लोक फ्री पासेस घ्यायला मॉल साइटवर यायचे, यातून मॉलची चांगली पब्लिसिटी झाली. अनेक जण बुकिंगसाठी विचारणा करून जात होते.
आम्हाला एकाच वेळेला पंधरा ग्राहकांनी गाळे बुक केले आहेत, असा ग्रँड इव्हेंट करायचा होता. यासाठी २०१६च्या दिवाळीच्या मुहूर्त आम्ही निवडला. पण आठच दिवसात नोटबंदी जाहीर झाली आणि लोकांची आर्थिक गणितं बिघडली. पुढचे सहा महिने आम्ही आज ना उद्या परिस्थिती बदलेल म्हणून तग धरून होतो. देणेकरी घरापर्यंत येऊ लागले होते. थोडी परिस्थिती बदलेल असं वाटत असतानाच जीएसटी लागू झाला. छोट्या-मोठ्या उद्योजकांची वीस लाखाचा गाळा घेऊन त्यावर जीएसटी भरण्याची तयारी नव्हती. त्यामुळे तो प्रोजेक्ट पूर्णच बंद पडला.
शॉपिंग मॉलमध्ये पैसे अडकले होते. हाताला काहीच काम नव्हतं. ‘तू इंजिनीअरिंग, एमबीए केलं आहेस, तुझ्या ज्ञानाचा इथल्या विद्यार्थ्यांना उपयोग होऊ दे. तू क्लासेस चालू कर’, असा बायकोने सल्ला दिला. इंजिनीरिंगचे क्लासेस सुरूही केले, पण त्यातून मिळणार्या पैशातून डोक्यावरचं मोठं कर्ज फिटणार नव्हतं. समुद्राची जागा समुद्रच घेऊ शकतो, झरा नाही, हे कळत होतं. नवीन संधीची वाट पाहत थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
एक दिवस मॉर्निंग वॉक करताना मला वामन गरुड हे गृहस्थ शेवगा आणि दुधी भोपळा यांचं गरम सूप विकताना दिसले. अनेक लोक थांबून सूप पीत होते. या सूपमधे लोकांना काय आवडतंय हे पाहायला माझ्यातील मार्केटिंगचा माणूस जागा झाला. हे सूप पिऊन दिवसभर ताजतावानं वाटतं असा अभिप्राय काही लोकांनी दिला. मलाही सूपची चव आवडली. मी गरुड काकांना म्हणालो, ‘काका, तुमचं प्रॉडक्ट छान आहे, याला ‘अमृत रस’ हे नाव द्यायला हवं. याचं मार्केटिंग पुण्यात आहे, तिथे चांगले पैसे मिळतील.’ ते म्हणाले, ‘मी तयार आहे, पण भांडवलाचं तू पाहा.’ भांडवलाचं कसं करावं या विचारात होतो, कारण, बारामतीत व्यवसाय गणित जुळलं नव्हतं. पुण्याला जाण्याचा रस्ता ‘अमृत रस’च्या रुपाने मिळाला होता. पण, अंगावर आधीच्या कर्जाचा डोंगर असताना मला कुणी नवीन कर्ज दिलं नसतं. इथे पुन्हा माझी मार्केटिंग कला कामाला आली. बारामतीत एका प्रोजेक्टमध्ये सोळा बंगले बांधून तयार होते. प्रयत्न करून देखील एकही बंगला विकला गेला नव्हता. फ्लॅट्स आणि जमीन विकण्याची मार्केटिंग इथे चालत नाही. मी वेगळा विचार केला. जानेवारी महिना सुरू होता. शेतात कोवळी ज्वारी धरली होती, पुणे-सातारा परिसरात गेट टुगेदरसाठी हुरडा पार्टी आयोजित केली जाते. मी सोळापैकी चार बंगले निवडून तिथे गुंतवणूक करू शकतील, अशा लोकांना हुरडा पार्टीसाठी आमंत्रित केलं. नवीन बंगले पाहून त्यातील काहींनी स्वतःहून बंगल्याबाबत विचारणा सुरू केली. दोन दिवसांनी तिथेच हळदी कुंकू समारंभ आयोजित करून ज्यांनी विचारणा केली होती, त्यांच्या सौभाग्यवतींना निमंत्रण दिलं. नवरा-बायको दोघांना बंगला पाहता आला. चार बंगले तिथेच विकले गेले. बाकी बंगले मी वर्षभरात विकले. पंधरा दिवसात माझ्या हातात चार बंगले विकल्याचं कमिशन होतं. मार्केटिंग कामी आलं. या पैशावर पुन्हा पुण्याकडे प्रस्थान करून अमृतरस विकायची तयारी केली.
२६ जानेवारी २०१९ रोजी मी आणि गरुड काका मिळून अमृतरसची सुरुवात केली. पुण्यात आल्यावरटाटा टेम्पो विकत घेऊन त्याचा फूड ट्रक बनवला. सहकार नगर उद्यानजवळ तळजाई टेकडीवर रोज सातशे आठशे लोक मॉर्निंग वॉकसाठी येतात. तिथे रस्त्याच्या कडेला फूड ट्रक पार्क करून आम्ही अमृत रस विकायला सुरुवात केली. तीस रुपयाला एक ग्लास विकायचो. हळूहळू धंद्यात जम बसला. सकाळी साडेपाच ते दहा या साडेचार तासांत आम्ही रोज सरासरी तीनशे ग्लास सूप विकायचो. नऊ हजार रुपये गल्ला व्हायचा. खर्च काढून आम्हा दोघांना चांगले पैसे मिळत होते. पण आठ महिन्यांनी कोरोना आला. लॉकडाऊन झालं. गरुड काका पुन्हा बारामतीला निघून गेले.
लॉकडाऊनमध्ये देखील माझ्यातील उद्योजक शांत बसत नव्हता, काय व्यवसाय करता येईल, याचा विचार करत असताना
सॅनिटायझर हा शब्द वारंवार कानावर पडत होता. सॅनिटायझर बनवण्यासाठी लागणारं अल्कोहोल चीनमधून आयात करावं लागत असे. त्यामुळे आपल्याकडे सुरुवातीच्या काळात १५० मि.ली. सॅनिटायझरची बाटली पाचशे रुपयांना विकली जात होती. या किंमती कमी करण्यासाठी भारत सरकारने साखर कारखान्यात तयार होणार्या इथेनॉलपासून सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली. सहकारी क्षेत्रातल्या लोकांना त्यांचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायला वितरक नव्हता. मी सोमेश्वर साखर कारखान्यातील इथेनॉल प्रोजेक्टचे डायरेक्टर निंबाळकर साहेबांना भेटून डिस्ट्रिब्यूटर बनलो. होलसेलर, दुकानदार यांची साखळी वगळून डायरेक्ट पुण्यातील सोसायट्यांना कमी दरात सॅनिटायझर विकायला सुरुवात केली. असं करून देखील मला या धंद्यात चांगले पैसे मिळाले. बारामतीहून सॅनिटायझर टेम्पो भरून पुण्यात विकत होतो, टेम्पोवर अमृतरसचा लोगो होता. तो पाहून लोक विचारायचे, ‘यात आंबे आहेत का?’ यातून नव्या तात्कालिक व्यवसायाला सुरुवात झाली, आंबे विकायला सुरुवात केली. त्यातही चांगले पैसे मिळाले. त्यातून शॉपिंग मॉलसाठी घेतलेल्या कर्जातील काही पैसे फेडले. या अनुभवातून शिकलो की येणारं प्रत्येक संकट ही नवीन संधी असू शकते, तुमच्याकडे ते पाहण्याची नजर पाहिजे.
कोरोनाची लाट ओसरल्यावर भीती कमी होऊन लोक मॉर्निंग वॉकला यायला लागले. सॅनिटायझरची मागणी कमी झाल्यामुळे मी तो धंदा बंद केला. कुठला धंदा किती काळ सुरू ठेवायचा हे ज्याला कळतं तो माणूस सहजसहजी बुडीत खात्यात जात नाही. पुन्हा तळजाई टेकडीवर अमृत रस विकायला सुरुवात केली. धंद्याची गाडी हळूहळू रुळावर येत होती. पण गाडीवर सूप विकून एका मर्यादेत पैसे मिळू शकतात, म्हणून आता मोठी उडी मारायचं ठरवलं. अमृत रस पॅकिंग स्वरूपात आणण्याची तयारी सुरू केली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद यांच्याशी संपर्क करून हे सूप पॅकिंग स्वरूपात कसं आणता येईल याबाबत मार्गदर्शन घेतलं. द्रवपदार्थ पॅक करण्यासाठी जागा भाड्याने घेतली. मशिनरी आणि इतर साहित्य घेतलं. आधी मी तीस रुपयांना जे सूप विकायचे, त्याच सूपची किंमत पॅकिंग आणि दुकानदाराचे कमिशन मिळून साठ रुपये झाली. पुणे, मुंबईसोबत दिल्ली, हैदराबाद, बंगलोर येथे जाऊन अमृतरससाठी डिस्ट्रीब्यूटर तयार केले. तो काळ असा होता की इम्युनिटी मिळविण्यासाठी आयुर्वेदिक स्वरूपात जे खाद्यपेय येईल ते प्रत्येकाला हवं असायचं. अमृत रस हे प्रॉडक्ट त्याच कॅटेगरीत बसत होतं. त्याची तडाखेबंद विक्री सुरू झाली, रिपीट ऑर्डर्स येऊ लागल्या. धंदा चांगला सुरू होता, पण कौटुंबिक पातळीवर अनेक संकटे चालून येत होती. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये सापडून बरी झालेली पत्नी २०२२मधे हृदयविकाराच्या झटक्याने गेली. कितीही मोठी आर्थिक संकटं पेलायची माझी तयारी होती. पण सुखदुःखात साथ देणारा आयुष्याचा जोडीदार भरल्या संसारातून उठून जाण्याचा धक्का पचवणं कठीण होतं. मी अडीच वर्षाचा असताना माझी आई सोडून गेली. लग्न झाल्यावर आईची माया आणि बायकोचं प्रेम मला भारतीने दिलं. ती गेल्यावर पंधरा दिवस तर मी भ्रमिष्टासारखा वागत होतो. मोठा मुलगा ईशान चौथीला होता आणि लहान मिहित सिनिअर केजीमधे. दोन लहान मुलांकडे पाहून दुःख पाठीवर टाकलं आणि आयुष्याचा सामना करायला सज्ज झालो. पुन्हा धंद्याकडे वळलो, पण दुसर्या लाटेनंतर काही दिवसांनी लोकांची करोनाची भीती कमी झाली आणि आमच्या प्रोडक्टचा सेल कमी होऊ लागला.
रिटेल काउंटरमध्ये धंदा करताना, दुसर्यांदा मालाची डिलिव्हरी झाली की आधी दिलेल्या मालाचे पैसे दिले जातात. बिल टू बिल असा हा व्यवहार असतो. यामुळे अमृतरसची मागणी कमी झाल्यावर माझे सत्तर लाख रुपये अडकले. आर्थिक संकट डोक्यावर असताना नवीन धंदा काय करावा याचा रोज विचार करत होतो. मुलांकडे लक्ष ठेवायच्या दृष्टीनं पुणे परिसरात करता येईल असा स्टार्टअप धंदा मी शोधत होतो. अनेक पर्यायांचा विचार केल्यावर एक दिवस मला माझ्या गावी धंदा सापडला. ‘मल्लाप्पांचा भत्ता’. वडिलांना भेटून बारामतीहून पुण्याला येताना, मी मल्लाप्पांचा भत्ता बांधून घेऊन यायचो. मुलांची शाळा सुरू झाली. एके दिवशी त्यांना डब्यात मी भत्ता दिला. मुलांनी येऊन कंप्लेंट केली, ‘बाबा मला भत्ता देऊ नका, मित्रच तो भत्ता खाऊन टाकतात आणि आम्ही उपाशी राहतो.’ ही तक्रार ऐकत असताना डोक्यात बत्ती पेटली, मी इतके दिवस शोधत होतो ते प्रॉडक्ट माझ्या गावीच आहे. हे म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं. ग्रामीण भागातील चव आपण चांगलं पॅकिंग करून आणि मार्केटिंग करून शहरात विकू शकतो का या कल्पनेवर काम करायला सुरुवात केली.
मल्लाप्पांचा भत्त्याची गोष्ट सुरू झाली ती १९६० साली. सोमेश्वरनगर कारखान्याचं बांधकाम सुरू असताना सहकार महर्षी मुगुटआप्पा काकडे यांचे पुण्यात कामानिमित्त येणे व्हायचं. १९६० साली कारखाना सुरू झाल्यावर तेथील कर्मचार्यांसाठी किंवा कामानिमित्त येणार्या पाहुण्यांसाठी एक हॉटेल लागेल हे त्यांनी ओळखलं. पुण्यातील समाधान हॉटेलमधील मल्लाप्पा सत्तेगिरी या तरुणाला त्यांनी, तू बारामतीला चल मी तुला जागा देतो, तू तिथे स्वतःचं हॉटेल सुरू कर असं सांगून ते त्यांना बारामतीला घेऊन आले. सोमेश्वर रेस्टॉरंट या नावाने सुरू झालं. पण सर्व गावकरी मल्लापाचे हॉटेल या नावानेच संबोधत असत. वडा, मिसळ यासोबत भेळभत्ता त्यांनी विकायला सुरुवात केली. अल्पावधीत भत्त्याची चव अवघ्या पंचक्रोशीत लोकप्रिय झाली. गरीब असो की श्रीमंत या परिसरात आलेला माणूस घरच्यांसाठी भत्ता विकत घेऊन जात असे. मी देखील लहानपणी अनेकदा हा भत्ता खाल्ला आहे. अमृत रस पॅकिंगसाठी मी हैदराबादला जेव्हा तिथल्या शास्त्रज्ञाना भेटलो तेव्हा आमच्यात गप्पांमध्ये त्यांनी एकदा मला गोष्ट सांगितली की, पुढच्या काळात भविष्यात फक्त पॅकेट फूडच चालेल. उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेवणात वापरणार्या मसाल्यांचे पाहा. आपली आई मिरच्या, धणे, गरम मसाला वगैरे मिक्स करून घरगुती मसाला बनवायची. आज आपण सर्रास रेडिमेड मसाला वापरतो.
आता मल्लप्पांची तिसरी पिढी काम करते आहे. त्यांनी देखील हा भत्ता पॅकिंग करून विकायचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळालं होतं. पण कोरोना काळात त्यांचेही डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अडचणीत आलं होतं. मल्लाप्पांचे नातू अनूप आणि आदित्य मल्लापांचा खाद्य वारसा पुढे चालवत आहेत, त्यांना जाऊन मी भेटलो आणि हे प्रॉडक्ट मी मार्केटिंग करून विकू शकतो, आपण हे करूया का सोबत, अशी त्याला विचारणा केली. ऑक्टोबरमध्ये सुरुवात केली. मल्लपाचा भत्ता या नावाने मी पॅकिंग सुरू केलं. हे प्रॉडक्ट हॅण्ड मेड आहे, त्याचं पॅकेजिंग भपकेदार नको होतं. मॅट फिनिश गावरान लुक दिसेल असं पॅकिंग केलं. याचं लॉन्चिंग करण्यासाठी भीमथडी जत्रेचा मुहूर्त निवडला. आमची मार्केटिंगची पद्धत वेगळी निवडली. आम्ही पॅकेट उघडून आधी लोकांना भेळभत्ता खायला सांगायचो, त्यांना आवडलं की ते स्वतःहून चार पॅकेट द्या, असं सांगायचे. तुम्ही तुमच्या मालाची स्वतःच्या तोंडाने जाहिरात करू नका, ते चांगलं आहे की नाही हे लोकांना ठरवू द्या. आजवरच्या प्रवासात मला विराज देशमुख या मित्राची सावलीसारखी साथ मिळाली. मल्लाप्पांच्या भत्त्याने पुण्यातील खवय्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. आता मुंबई आणि इतर जिल्ह्यात घेऊन जायचा विचार आहे.’
व्यवसाय करताना तुम्ही किती हुशार आहात, तुमच्याकडे किती पैसा आहे यापेक्षा राखेतून झेप घेण्याची ताकद तुमच्यात किती आहे, यावर तुमचा उज्वल भविष्यकाळ ठरतो. विक्रम ननवरे यांच्यावर अनेक अस्मानी-सुलतानी संकटं आली तरी ते डगमगले नाहीत. शून्यातून सुरुवात करून पुन्हा झेप घेताना वेळोवेळी त्यांना साथ दिली ती त्यांच्या मार्केटिंग स्किल्सनी. मल्लाप्पांचा भत्ता विकताना ते, लोकल ते ग्लोबल हा विक्री मंत्र जपत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, त्या जिल्ह्याचं वेगळेपण जपणार्या चवीचे पदार्थ आहेत. या खाद्यसंस्कृतीचं उत्तम मार्केटिंग करून जर ती चव देश विदेशात नेता आली, ते तर खाद्य प्रसिद्ध होईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगारनिर्मितीही होईल… तेव्हा विक्रम यांचं नाव या कल्पनेचे पायोनियर म्हणून घेतलं जाईल, हे निश्चित.