अगं बाई आपल्या भारतावर हल्ला झालाय वाटतं!
काय म्हणतेस- माझी अजून अंघोळ पण व्हायचीय-
रावसाहेब, भारतावर हल्ला झालाय ही बातमी खरीय का हो?
आं? काय माहित! अजून काय सर्क्युलर नाय आलेलं वरून.
ए, असं तोंड फिरून मुरका का मारायचा असतो?
आम्ही नाही ज्जा, तुम्ही माझ्या लिपस्टिकवर हल्ला कराल.
म्हणता–म्हणता घराघरात, दारादारात, हपीसामधे, लोकलमधे, रस्त्यावर आणि गावच्या पारा-पारावर लोक बोलू लागले, आयला कोण आहे तो आमच्या महाशक्तीवर हल्ला करणारा? हिम्मत कशी होते यांना आमच्या हिंदूराष्ट्राला आव्हान द्यायची? `मुघल गार्डनचं’ नाव बदलून अमृत उद्यान केलं, गोध्रा दंगलीतले २२ आरोपी निर्दोष सोडले, आमच्या सोदीजींनी नोटबंदी करून कोट्यावधीचा काळा पैसा बाहेर काढला, थाळ्या वाजवून आम्ही कोरोनाला पळून लावलं… त्या पाकड्यांकडे बघा… भिकेला लागलेत. कुणामुळे? अरे सोदी है, तो सब मुमकिन है… ५६ इंची छातीचे हिम्मतवान सोदीजी आमचं नेतृत्व करत असताना, भारत प्रगतीपथावर वेगाने जात असताना तुम्ही हरामखोरांनो, आमच्या संस्थांच्या एकात्मतेवर आणि राष्ट्रीय आकांक्षावर हल्ला करता?
अरे तुम्हाला काय वाटलं, आम्ही अडवाणींना वार्यावर सोडलं म्हणून अदानींनाही सोडू? इतक्या भोळ्या-भाबड्या गरीब कष्टाळू उद्योगपतीवर तुम्ही वाट्टेल ते आरोप करता? चुलीत घालतो तुमचा रिसर्च- म्हणे अदानी समूहाने समभागांची विक्री करताना गैरप्रकार केले, लेखा नोंदीमधे गैरव्यवहार केला, विविध बँकांना अंधारात ठेवून किंवा त्यांच्याशी साटंलोटं करून ८० हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि ते डुबवायच्या विचारत अदानी आहेत… अरे तो राष्ट्रवादाचा कट्टर समर्थक माणूस आहे. तो कशाला आपणच आपल्या राष्ट्राला बुडवेल? तर एलआयसी बुडेल, एसबीआय दिवाळ्यात जाईल, आणखी पाच-दहा बँका नुकसानीत जातील. जाऊ देत ना! हिंदूराष्ट्रासाठी एवढं सोसायला नको? आम्ही खरे राष्ट्रभक्त लोक आहोत. राष्ट्राच्या प्रगतीसाठी, आमच्या विश्वगुरूंसाठी आम्ही तासंतास बँकांच्या आणि संडासाच्या रांगांमध्ये तिष्ठत उभे राहून वाट पाहायला तयार आहोत.
अरे हिंडनबर्ग-हिंडनबर्ग… सारखी रट लावलीय तुम्ही. कोण हिंडनबर्ग? तर नाथन अँडसन नावाच्या अमेरिकन माणसानं २०१७ साली स्थापन केलेली, जगातील आर्थिक घोटाळे शोधून काढणारी संस्था. तिच्यावर विश्वास ठेवणार तुम्ही? २०१४ पासून भारतातील समस्त हिंदुंनी सोदीजींवर विश्वास ठेवलाय, हे ठाऊक आहे का तुम्हाला? १५ लाखांचा सूट घालून ते महागड्या गाड्यांमधून फिरत असले तरी फकीर माणूस आहे तो. राष्ट्रासाठी लग्नाची बायको सोडली, घरदार सोडलं, एका सामान्य चायवाल्याला सर्वोच्च पदी गेल्यावर वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढून घ्यावेसे वाटले. त्याने थोडीशी हौसमौज केली तर पोटात दुखतं तुमच्या? भगवान परशुरामाप्रमाणे मातृभक्त असलेल्या माणसाबद्दल वाट्टेल ते बोलता? अदानींना सोदीजींनी वाढवलं, सीबीआय-ईडीबिडीने अदानींना हात लावायचा नाही, असा सोदीजींनी दम देऊन ठेवलाय. बोला बोला… काय वाट्टेल ते बोला. २०२४ला पुन्हा सोदीच येतील नि तुमची बोलती बंद होईल, लक्षात ठेवा. काय म्हणता… ते हिमालयात जाणार होते झोळी लावून, त्याचं पुढं काय झालं? जातील ना… सध्या देशात थंडीची लाट आहे. थंडी थोडी कमी झाली की ते हिमालयात जाऊनसुद्धा बसतील मनात आलं तर… सोबत अदानींना घेऊन.
– `हा एका कंपनीवरील हल्ला नसून भारतीय संस्थांची एकात्मता आणि प्रगती तसेच आकांक्षावरील हल्ला आहे, असं आपल्या ४१३ पानांच्या खुलाशात अदानी समूहाने म्हटले म्हटलेलंच आहे. हिंडनबर्ग रिसर्चचा २४ जानेवारीचा रिपोर्ट म्हणजे असत्याशिवाय दुसरे काही नाही. निवडक चुकीची माहिती आणि तथ्यहीन आरोप यांचे त्यात मिश्रण आहे, असंही खुलाशात पुढे म्हटलेलं आहे. अरे हिंडनबरग्या, एवढ्या खुलाशावर पण तुझं समाधान नाही? लगेच पुन्हा थोबाड उचकटून म्हणायला लागलास…, अदानी समूहाने केलेला घोटाळा राष्ट्रवादाच्या नावाखाली दडपता येणार नाही. आम्ही केलेल्या आरोपांवर भाष्य न करता त्यांनी दिलेले स्पष्टीकरणही संदिग्ध आहे. आम्ही विचारलेल्या ८८ पैकी ६२ प्रश्नांना अदानी समूह उत्तर देऊ शकलेले नाही. हॅऽ हॅऽ नाय देत उत्तर, काय ती तोडून घ्या… सोदीजींसारख्या महान हिंदुराष्ट्रभक्तावर `बीबीसी’वाल्यांनीही हल्ला केला, गोध्रा दंगलीसंदर्भात फालतू प्रश्न विचारले- दिलं का सोदीजींनी उत्तर? त्या डॉक्युमेंटरीवर सरळ बंदी घातली आमच्या देशात. बसा बोंबलत.
अरे कसली याचिका नि बिचीका? म्हणे वकील एम. एल. शर्मा यांनी ही बंदी घटनाविरोधी असल्याचा आरोप करत जनहित याचिका दाखल केलीय. `गुजरात दंगलीबाबतचे सत्य, अहवाल, तथ्य आणि वृत्त बघण्याचा नागरिकांना घटनेने दिलेला अधिकार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. असू द्या ना. यावर आमचंही म्हणणं आहे की कोरोना, नोटबंदी, गोध्रा, अदानी घोटाळा हे विषय संपलेले आहेत. पेगॅसस प्रकरण पण आता जुनं झालंय. पुन्हा पुन्हा उकरून काढायची काही गरज नाही. जनहित याचिका मागे घ्या ती. वेळ पडली तर या याचिकेविरुद्ध आम्ही हिंदू जनआक्रोश मोर्चा काढू. अभिव्यक्ती स्वातंत्र्यविरोधी कायदा लागू करण्याची मागणी लावून धरू. लव्ह जिहाद, लँड जिहाद अशा प्रश्नांवर हिंडेनबर्गने संशोधन करावं, बीबीसीने माहितीपट काढावेत, अशा मागण्या करू. नाय नाय… अदानी घोटाळ्यावर बीबीसीने माहितीपट काढला तर दाखवू नाय देणार तो आम्ही आमच्या देशात… गोध्रा, अदानी, पेगॅसस सुप्रसिद्ध कोर्ट कॉलेजियम, नोटबंदीबिंदीवर काय पण प्रश्न नाय विचारायचे. तो भारतावरील हल्ला आहे, असं मानलं जाईल.
अय्या, म्हणजे हल्ला-बिल्ला तसा काय प्रत्यक्ष झालेलाच नाही म्हणतेस? बरं झालं बाई… माझी आंघोळ तर झाली पटकन. आता होऊ देत हल्ला नि फल्ला… हल्ल्याला तोंड द्यायला स्वच्छ तन-मनाने मी तयार आहे.
ए… लिपस्टिक पुसली ना रे माझी… किती ते चावायचं…!