माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला मी सहज म्हटलं की आता फडणवीस सरकार हळूहळू मार्गी लागेल असं दिसतंय. हे ऐकल्याबरोबर पोक्या उसळला. म्हणाला, कसलं मार्गी लागतंय? सगळा बेंगरूळ आणि विस्कळीत कारभार. सरकारातील नाराजीनाट्याचा पाया एकनाथांनी घातला आणि बाकीच्या नाराजांनी त्यावर कळस चढवलाय. सरकार स्थापन होऊन पंचवीस दिवस उलटून गेले तरी मंत्री झालेल्या आणि मंत्रीपद न मिळालेल्या नाराज हावरटांची धुसफूस अजून सुरूच आहे. मध्यंतरी या नाराजांचं संमेलन गुप्तपणे पार पडल्याचं ऐकलं. त्याची खबर फडणवीस यांना लागताच त्यांनी या नाराजांना सज्जड दम दिला. असे बालिश चाळे खपवून घेणार नाही, एकेकाला धडा शिकवेन, असंही काहीबाही ते म्हणाले असं माझ्या कानावर आलंय. त्यावर मी पोक्याला म्हणालो, असं असेल तर फडणवीसांची भूमिका समजावून घेणं हे आपलं नि:पक्ष पत्रकारितेतील कर्तव्यच आहे. त्यामुळे तू ताबडतोब कामाला लाग. पोक्याने माझ्या आज्ञेचं पालन केलं आणि दुसर्याच दिवशी त्यांची मुलाखत घेऊन तो माझ्या घरी थडकला. तीच ही मुलाखत…
– नमस्कार फडणवीस साहेब.
– नमो नम:
– चेहर्यावर नाराजी दिसतेय तुमच्या. काही टेन्शन आहे का?
– मी टेन्शन घेणारा माणूस नाही. राज्यात इतका अनाचार माजलेला दिसतोय, पण टेन्शन घेतलंय का मी? दिलाय का राजीनामा?
– तरीही नाराज दिसताय तुम्ही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण तुम्ही तरी कुणाला सांगणार? तुमच्या बाजूचे अलबते-गलबते. त्यांनाही काही सांगायची सोय नाही. पण मनातली वाफ कोंडून ठेवू नका. कुणापाशी तरी मन मोकळं करा. नाहीतर झाकण उडेल आणि स्फोट झाला तर तुम्हालाच त्रास होईल. तुमची काळजी वाटते म्हणून सांगतो. तुमचा जवळचा पत्रकार मित्र म्हणून माझ्यापाशी तरी मन मोकळं करा. मी नाही सांगणार कुणाला. आयशप्पत.
– ठीकाय पोक्या. या आमच्या नाराज मंत्र्यांनी आणि मंत्रीपद न मिळालेल्या असंतुष्टांनी नाकीनऊ आणलेयत माझ्या. काही कमी दर्जाचं खातं मिळाल्याने तर काही मनासारखं दालन न मिळाल्याने नाराज आहेत. तुमचे भलतेसलते लाड मुळीच खपवून घेणार नाही, असा गेल्या आठवड्यात दम दिल्यावर मंत्रीपद गमावून चालणार नाही असा विचार करून ते पदभार स्वीकारायला तयार झाले, तरी त्यांच्या मनातील खदखद काही संपलेली नाही.
– याचा अर्थ, त्यांनी पदभार स्वीकारला तरी ते पुढच्या काळात तुम्हाला त्रास देत राहणार हे स्पष्ट दिसतंय. या नाराज मंत्र्यांमध्ये कोण कोण कोण आहेत?
– त्यात सहा कॅबिनेट तर तीन राज्यमंत्री आहेत. नेहमीच कशाला ना कशाला चटावलेल्या या मंत्र्यांनाही त्यांची जागा दाखवू शकलो असतो मी. पण शिंदेंना मुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर आपणही कुठेतरी स्वामीनिष्ठा दाखवून शिंदेंकडून शाबासकी मिळवावी अशी यातील
शिंदेनिष्ठांची भावना आहे. पण तुला सांगतो ही सगळी ढोंगबाजी आहे. आमच्या पक्षातलेही काही मंत्री त्यांना कमी समजल्या जाणार्या दर्जाचं खातं मिळाल्यामुळे रुसून बसले आहेत. त्यांनाही मी सोडणार नाही. मात्र अजितदादांना हवं होतं ते अर्थखातं मिळाल्यामुळे त्यांच्या मंत्र्यांमध्ये आनंदीआनंद आहे. शिंदेंच्या लाडक्या बहिणींच्या पैशाच्या हव्यासाला चाप लावण्यासाठी मला अजितदादांचा चांगला उपयोग होईल.
– पण असंतुष्ट सहकार्यांबरोबर काम करताना त्याचा परिणाम राज्याच्या कारभारावर तर होणारच.
– कसलाही परिणाम होणार नाही आणि झाला तरी मला त्याची पर्वा नाही.
– सध्या राज्यातील मोठ्या प्रमाणावरील असुरक्षित वातावरण पाहता अपघात, खून, बलात्कार, अत्याचार, गुंडगिरी लक्षात घेता तुमच्यापाशी असलेल्या गृहखात्याला जनतेने लक्ष्य करणं स्वाभाविक आहे. पण अशावेळी तुमच्या मंत्रिमंडळातील अनेकजण तुमची त्रेधातिरपीट बघून मनातल्या मनात खूश असल्याचं दिसतं. त्यांना मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतील.
– पोक्या, हे न समजण्याइतका मी दुधखुळा नाही. पण मी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही किंवा ते पद दुसर्या कुणा येर्यागबाळ्या मंत्र्याकडे सोपवणार नाही. त्या एकनाथरावांना गृहमंत्रीपद हवं होतं. कशासाठी तर उद्धवसेनेच्या नेत्यांवर सूड घेण्यासाठी, त्यांना खोट्या प्रकरणांत अडकवून तुरुंगात टाकण्यासाठी. पण हे राज्य आणि सरकार काही तुमच्या आपसातील वैरभावनेला खतपाणी घालण्यासाठी स्थापन झालेलं नाही. जो तो आपल्या मंत्रीपदाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करणार असेल तर ते मी चालू देणार नाही.
– त्या धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाचं काय?
– कृपा करून मला त्याबद्दल विचारू नकोस. ते प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे. मी कुणाच्याच बाजूने बोलणार नाही. जो दोषी असेल त्याला पाठीशी घालणार नाही.
– मला वाटतं, केवळ सत्ता मिळवण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी तुमच्या पक्षाने माझ्या मताप्रमाणे शिंदे आणि अजितदादा यांच्या नकली पक्षांना बरोबर घेऊन जे सत्तालालसेचं गलिच्छ राजकारण केलं त्याचीच नासकी फळं मिळतायत तुम्हाला. पैशासाठी विकली जाणारी अवलाद आहे ही. हे असले स्वार्थसाधू कधीही कुणाशीही प्रामाणिक नसतात. हे कळेलच हळूहळू तुम्हाला. विधानसभेतील प्रचंड यश कशामुळे आणि कुणामुळे मिळालं हे चांगलंच ठाऊक आहे तुम्हाला. राज्यात माजलेल्या बजबजपुरीचे पडसाद उद्या पालिकेपासून पंचायत समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळतीलच. फक्त बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला सांगा.
– पोक्या, तुझे आभार. पण गाळात अधिकाधिक रुतत चाललोय मी. यातून सुटका नाही. करावं तसं भरावं हे पटलंय मला.