□ अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीतूनच कराडची शरणागती.
■ त्याचा अर्थ ओळखा आणि गप्प बसा. एरवी प्रत्येक गोष्टीवर मौलिक ज्ञानप्रदर्शन करणारे दादा सध्या गप्प का आहेत, याचाही विचार करा.
□ खंडणी वाल्मीक कराडनेच मागितली – आरोपी विष्णू चाटेचा सीआयडीसमोर कबुलीजबाब.
■ आता कोणीही काहीही म्हटलं तरी सगळ्यात मोठे आका जे ठरवतील, ते होईल. तोवर कोणाचा बालही बाका होत नाही.
□ केंद्र सरकार शेतकर्यांसाठी दरवाजे का उघडत नाही – सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल.
■ दोन पक्षांच्या पाठिंब्यावर तग धरून असलेल्या केंद्र सरकारमध्ये ही मुजोरी शेतकरी-कष्टकर्यांच्या बाबतीतच कशी येते, हा एक संशोधनाचा विषय आहे. शिवाय यांचे हे गुण समोर दिसत असूनही राज्याराज्यात यांना हेच वर्ग निवडून कसे देतात, तो दुसरा संशोधनाचा विषय आहे.
□ मराठीत बोल सांगितल्याने परप्रांतीयांनी मुंब्य्रात तरुणाला मागायला लावली माफी; पोलिसांनीही परप्रांतीयांचीच बाजू घेतली.
■ कल्याण असो की मुंब्रा, पोलिसांची मराठीद्रोही भूमिका सतत समोर आली आहे; सर्वसामान्य माणसांचा पोलिसांवर असाही विश्वास नाही, मराठी माणसाची थोडीफार आत्मीयता गमावणे पोलिसांना परवडणारे आहे का? यांच्या हाती महाराष्ट्र आणि मराठी माणूस सुरक्षित आहे का?
□ कोल्हापुरात रस्त्यातील खड्ड्यांमुळे मृतदेह तिरडीवरून टुणकन उठून बसला…
■ आता त्या खड्ड्याला त्या अण्णांचे नाव द्या आणि सगळ्या तिरड्या तिथूनच जाऊ द्या… कोणी तिरडेश्वर बाबाही प्रस्थापित होईल तिथे मग लवकरच.
□ ‘आपला दवाखाना’मधील चाचण्या महिनाभर बंदच राहणार.
■ कसला आपला दवाखाना, नुसता नावाचा आपला दवाखाना! निदान गोरगरीबांचा सच्चा कळवळा असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव तरी काढा त्या दवाखान्यांवरून.
□ एसटी महामंडळाच्या खासगी बसेस कंत्राटात २८०० कोटींचा घोटाळा.
■ घोटाळा करायचा नसता तर एसटी महामंडळ सशक्त केलं गेलं असतं, बसेसची संख्या, एसटी डेपोंची अवस्था यांच्यात सुधारणा झाली असती. आपली लालपरी दिमाखदार बनली असती. कंत्राटदारांची धन करायची म्हटल्यावर घोटाळा होणारच ना!
□ निकष डावलून अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार.
■ मुळात निकषांची खातरजमा न करता या बहिणींवर पैशांच्या खिरापतीची उधळण करणार्या, योजनेवर आपली नावं डकवणार्या राज्याच्या तीन मुख्य नेत्यांवर काय कारवाई होणार?
□ मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्याचा एन्काऊंटर होऊ शकतो – विजय वडेट्टीवार.
■ कोणाचे काहीही होऊ द्या, पण, सगळ्यात मोठा आका नामानिराळाच राहणार, हे लक्षात घ्या.
□ खोके सरकारच्या थापेबाजीची हॅटट्रिक; मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची डेडलाईन पुन्हा हुकली.
■ पण सुशिक्षित कोकणवासीयांनी विवेकबुद्धी गहाण ठेवून खोकेसम्राटांवर मतांची उधळण केली आहे ना? आता जाता येता नरकयातनांचे त्रास भोगावे लागतील तेव्हा इतरांकडे एक बोट रोखताना चार बोटं आपल्या स्वत:कडे रोखलेली असतील, याचं भान ठेवा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार खा.
□ नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट; सिडकोचे अधिकारीही चक्रावले.
■ ते कसे चक्रावले? त्यांना काहीच कल्पना नाही? किती निरागस तो आविर्भाव.
□ ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार मोहित कंबोज – आमदार उत्तम जानकर यांचा दणका.
■ एकट्या जानकरांनी बोलून उपयोग काय? विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या अनपेक्षित आणि आश्चर्यकारक पराभवानंतर तरी काही जोरदार विरोधाचे वादळ उभे केले का?
□ तासंंतास चौकशी, बळजबरीने जबाब वदवून घेणे अमानुष – सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले.
■ गेंड्याच्या कातडीची यंत्रणा आहे ती… तिला असे फटके देऊन उपयोग काय? शब्दांचा मार शहाण्यांना असतो… ‘शहा’ण्यांना तो लागत नाही.
□ सत्ता मिळवल्यानंतर लाडकी बहीण योजनेत अटीशर्ती लादणार्या सरकारविरुद्ध काँग्रेस आक्रमक.
■ बैल गेला आणि झोपा केला… ज्या बहिणी इतक्या सहज या आमिषांना भुलल्या, त्यांना त्यांच्या कर्माची थोडी फळे भोगू द्या.
□ जितेंद्र आव्हाडांवर सरकारची पाळत; पत्रकार परिषदेत घुसून पोलिसांनी केले शूटिंग.
■ दिवसाढवळ्या खून पडतायत, मुलींवर बलात्कार होतायत, खून होतायत, मराठी माणसांशी मुजोरीने वागण्याच्या घटना घडतायत आणि अर्धे पोलीस नेत्यांच्या सुरक्षेत गर्क आणि अर्धे हे भिंतीला तुंबड्या लावण्याचे उद्योग करण्यात मग्न; महाराष्ट्र देवाच्याच (देवाभाऊंच्या नव्हे) भरवशावर.
□ धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा निर्णय एसआयटीच्या अहवालानंतर- राधाकृष्ण विखे-पाटील.
■ सगळी सेटिंग झाल्यावर, असं सरळ सांगा की.
□ पोलिसांसमोरच गुंडगिरी; दिव्यात पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर टपरीवाल्यांचा हल्ला.
■ टपरीवाल्यांना पालिकेच्या अधिकार्यांचं भय उरलेलं नाही ते का? पोलिसांचा दरारा का नाही?