आजकाल अनेक कामांसाठी ईमेलचा वापर केला जातो. जगाशी संपर्क साधून देणारे ईमेल खाते अधिक सुरक्षित कसे राहील, याकडे प्रत्येकाने लक्ष देण्याची गरज आहे. कारण सायबर ठग तुमच्या केवळ फोनलाच लक्ष्य करत नाहीत, तर ईमेललाही लक्ष्य करतात, त्या माध्यमातूनही आपली फसवणूक करतात. आपला पासवर्ड अधिक भक्कम कसा राहील, हे पाहिले पाहिजे, दर दोन ते तीन महिन्यांनी त्यात बदल केला पाहिजे, तर आपण अधिक सुरक्षित राहू शकू.
माहिती-तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या आहेत, अनेक यंत्रणांच्या वापरात सुलभता येऊ लागली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस माणसांचं त्यांच्यावरचं अवलंबित्व वाढत चाललं आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यावर अति विश्वास ठेवणे मोठा घात करणारे ठरू शकते. त्यातून एखाद्या मोठ्या फसवणुकीला आपण बळी पडू शकतो, मन:स्तापाची वेळ येऊ शकते. त्यामुळे सायबरविश्वात कायम डोळे उघडे ठेवून आणि विचार करूनच कृती करावी. काही वेळा आपल्याला आलेली माहिती बरोबर आहे, असा ग्रह करून घेतल्यामुळे खाते हॅक होण्याचा, अनोळखी व्यक्तीकडून खाते ताब्यात घेण्याचे प्रकार घडू शकतात. अनिता शर्मा यांच्या बाबतीत घडलेला प्रकारच पाहा ना!
अनिता शर्मा वाराणसीमध्ये राहात होत्या. तिथल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करताना आपण टेक्नोसॅव्ही असायला हवे, असे त्यांना कायम वाटायचे. त्यामुळेच संगणकाच्या क्षेत्रात येणार्या नव्या गोष्टी शिकण्यावर त्यांचा कायम भर असायचा. सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक माध्यमांबरोबर त्यांची जवळीक झाली होती. फावल्या वेळात आणि सुटीच्या दिवशी अनिता यांचा अर्ध्याहून अधिक वेळ सोशल मीडियासाठीच खर्च व्हायचा. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदी करणे, ईमेलची तपासणी करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रमंडळींशी संवाद साधणे हा अनिता यांचा छंदच झाला होता.
जूनचा महिना सुरू होता. शनिवारी शाळा अर्धा दिवस होती. त्यामुळे कामे आटपून अनिता दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शाळेतून बाहेर पडल्या. रिक्षात बसता बसता त्यांना मोबाईलवर एक मेसेज आला. तुमच्या ईमेल अकाऊंटचा ताबा दुसरे कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यात म्हटले होते. यापासून बचाव करून खाते सुरक्षित करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा, असा सल्ला अनिता यांना त्या संदेशातून दिला गेला होता. आपले खाते हॅक होण्याच्या चिंतेने ग्रासलेल्या अनिता त्या लिंकवर क्लिक करून खाते सुरक्षित करण्याचे ठरवले. दुसर्या मिनिटाला अनिता यांनी हा मेसेज खरा आहे, बरोबर आहे असे समजून पुढचा मागचा विचार न करता डोळे झाकून त्या लिंकवर क्लिक केले. तेव्हा त्यांना त्यांच्या ईमेलसारखेच वेब पेज दिसत होते. ते पेज खरे आहे की नाही याची पूर्णपणे शहानिशा न करता अनिता यांनी त्यावर ईमेल अॅेड्रेस आणि पासवर्ड टाकला. पण ती वेबसाईट पूर्णपणे फसवी होती, ईमेल सुरक्षित करण्याच्या नादापायी अनिता यांनी त्यावर क्लिक करून आपल्या हाताने आपला पासवर्ड ठगांकडे सोपवून स्वत:ला अडचणीत आणले होते. या माध्यमातून सायबर चोरट्यांनी अनिता यांच्या ईमेलचा वापर करून त्यांच्या खात्यात सहज प्रवेश मिळवला. त्यांनी अनिता यांच्या यादीतील व्यक्तींना ‘आपण अडचणीत आहोत, त्यामुळे तुम्ही मला लगेच ५० हजार रुपयांची मदत खाली दिलेल्या बँक खात्यावर पाठवा अशी मेल पाठवली, त्यानंतर काही वेळात अनिता यांना त्यांच्या मोबाइलवर फोन यायला सुरुवात झाली. काहीजणांनी त्यांना तू सांगितलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले, असं कळवलं. माझं अकाऊंट हॅक झाले आहे, त्यामुळे तुम्ही बँकेत पैसे टाकू नका, असा मेसेज अनिता यांनी मोबाइलवरून सगळ्या मित्रपरिवाराला पाठवला. पण तोपर्यंत सहाजणांनी अनिता खरंच अडचणीत आहे असे समजून त्यांनी दिलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले होते.
अनिता यांना फसवण्यासाठी फिशिंगच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी हे जाळे टाकले होते, त्यामध्ये त्या अलगदपणे फसल्या होत्या. अनिता यांना त्याची कोणतीच कल्पना नव्हती, चोरट्यांनी त्यांचे सोशल मीडिया प्रोफाइल, ऑनलाइन शॉपिंग खाते याची माहिती मिळवून ईमेलला जोडलेले पासवर्ड बदलण्याचे काम बेमालूमपणे पूर्ण केले होते. पुढल्या काही मिनिटांतच सायबर चोरट्यांनी अनिता यांच्या सोशल मीडियावरील खात्यावर ताबा मिळवला आणि त्यावर आक्षेपार्ह माहिती टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनिता अडचणीत सापडल्या होत्या. त्यांनी टाकलेली माहिती वादग्रस्त असल्यामुळे पोलिसांचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला. पण आपण ही माहिती टाकलेली नाही, दुसरेच कोणीतरी आपल्या खात्यामध्ये अनधिकृतपणे घुसून हा प्रकार करत असल्याचे अनिता वारंवार पोलिसांना सांगत होत्या. पण त्यांच्या सांगण्यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. अखेरीस, त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना हा सगळा प्रकार समजावून सांगितला.
दरम्यानच्या काळात, आपल्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे असं सांगणारा मेसेज वारंवार त्यांच्या सोशल मीडियावरून पाठवण्यात येत होता. इतकेच नाही तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार्या त्यांच्या माहितीचा वापर करून काही ठिकाणी खरेदी करण्याचे प्रकार देखील झाले होते. सायबर चोरट्यांनी पाठवलेली त्या लिंकमुळे आपले ईमेल सुरक्षित होणार असल्याच्या भ्रमातून अनिता या चक्रव्यूहात पूर्णपणे फसल्या होत्या. या सगळ्या प्रकाराची त्यांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर तपास करून पोलिसांनी हा प्रकार करणार्या टोळीला आंध्र प्रदेशातून पकडले.
लोकांना फसवी लिंक पाठवून त्यांना फिशिंगच्या जाळ्यात ओढण्याचा धंदा ही टोळी बेमालूमपणे करत होती. नोकरी नसलेले उच्चशिक्षित तरुण त्यामध्ये सहभागी झाले होते, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांच्या मुसक्या आवळल्या. मोबाइलवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेली लिंक क्लिक करण्याचे धाडस कधीच करू नये, त्यामुळे आपणच आपला त्रास वाढवून घेतो, हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
अशी घ्या काळजी…
– ईमेल, ऑनलाइन खाते, यासाठी आपला पासवर्ड भक्कम ठेवा. त्यामध्ये सहज अंदाज लावता येणारी माहिती, उदा. जन्मतारीख किंवा सामान्य शब्द वापरणे टाळा.
– टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (टूएफए) – शक्य असेल तेव्हा तुमच्या ऑनलाइन खात्यांसाठी टूएफे सक्षम करा, त्यामुळे तुमची सुरक्षा भक्कम होण्यास मदत होते.
– अनोळखी मेलकडे लक्ष देऊ नका. ते उघडण्याचे धाडस करू नका, त्यामधून तुमची फसवणूक होऊ शकते. मेलवर आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करण्याचे धाडस करू नका.
– अज्ञात किंवा संशयास्पद स्त्रोतांकडून ईमेल किंवा संदेशांमधील लिंकवर क्लिक करू नका. आपल्याला आलेल्या यूआरएलचे पूर्वावलोकन करून त्याची तपासणी करा.
– आपले ईमेल खाते, ऑनलाइन खाते यांची नियमितपणे तपासणी करा.