ज्येष्ठ रंगधर्मी अशोक मुळ्ये यांच्या पोतडीतून नवनवीन कल्पना बाहेर पडत असतात त्यातीलच ‘माझा पुरस्कार’ ही एक कल्पना. यंदा या पुरस्काराचं १८वं वर्ष. मी माझा आणि पुरस्कार मी म्हणेल त्याचा, या संकल्पनेवर चालणारा हा पुरस्कार वर्षातून एकदाच होईल याचा काही नेम नसतो, त्यांना एखादी कलाकृती आवडली, नाटक आवडलं किंवा माणूस आवडला की ते या माणसाला पुरस्कार देणार असं जाहीर करतात. आणि मुळ्यांविषयीच्या आदरयुक्त प्रेमाने ती मोठी माणसंही हा पुरस्कार स्वीकारायला तयार होतात. यंदाचा ‘माझा पुरस्कार’ शिवाजी मंदिर, मुंबई येथे ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सर्व प्रेक्षकांनी उभे राहून माशेलकर यांना टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.
या कार्यक्रमाची रूपरेषा कशी ठरली हे सांगताना न्यायमूर्ती धर्माधिकारी म्हणाले, एके दिवशी एका मराठी वर्तमानपत्रात डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ५० डॉक्टरेट पदव्या मिळाल्या असा छोटासा वृत्तांत आला. ही बातमी वाचून मुळ्ये काका न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना फोन करून म्हणाले की सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्याची नोंद घेतली जाते परंतु डॉ. माशेलकर यांना एवढा बहुमान मिळाल्यानंतर याची नोंद मुंबईत घेतली जायला हवी. त्यांनी ताबडतोब या पुरस्काराचा घाट घातला. एकही शैक्षणिक संस्था नसलेल्या रंगभूमीवरच्या ‘मुळ्ये विद्यापीठा’ची डॉक्टरेट डॉ. माशेलकर यांना देण्याचं ठरलं. ही पदवी स्वीकारताना माशेलकर म्हणाले ‘आजपर्यंत ५१ डॉक्टरेट मिळाल्या, पण ही ५२वी पदवी माझ्यासाठी खूप खास आहे.’
आधुनिक युगातील हळदी घाटीची लढाई असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या हळदीच्या औषधी गुणधर्मांवर आधारित पेटंटसाठी अमेरिकेविरुद्ध मोठी लढाई माशेलकर यांना लढावी लागली. तिची कहाणी त्यांनी कार्यक्रमात सांगितली. हळदीचं पेटंट मिळाल्यावर समाधान न मानता विकसनशील आणि अविकसित देशातील पारंपरिक ज्ञानस्रोतांची नोंद करण्याचा विडा त्यांनी उचलला. मातृभूमीने दिलेले पारंपरिक ज्ञान त्यांनी आधुनिक विज्ञानाशी जोडले. ते म्हणाले हार्वर्ड, केंब्रीज या विद्यापीठात केलं जाणार संशोधन ज्ञान प्रमाण आहे असं मानलं जातं, परंतु आपल्या पूर्वजांनी जीवनाच्या प्रयोगशाळेत मिळवलेलं ज्ञान प्रमाण का मानलं जात नाही याचा विचार करायला हवा. आंतरराष्ट्रीय पेटंट सिस्टम क्लासिफिकेशनमध्ये पारंपारिक ज्ञानाचा समावेश केला जात नाही. हे करण्यासाठी मी भांडलो. पाच देशांची कमिटी करण्यात आली. पेटंट क्लासिफिकेशन बदलण्यात आलं. इथे शून्य सबक्लासेस होते, तिथे आज २७६ सबक्लासेस करण्यात आले आहेत. यामुळे चुकीची पेटंट बंद झाली. याचाच पुढील भाग म्हणून ‘डिजिटल नॉलेज लायब्ररी’च्या माध्यमातून त्यांनी जगातील लाखो पारंपरिक ज्ञानस्रोतांची नोंद केली, ज्याचा उपयोग आज जगभरातील पेटंट कार्यालये करीत आहेत. आज त्यात तीन कोटीपेक्षा अधिक पानांची माहिती आहे.
वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवलेल्या डॉ. माशेलकर यांनी आपल्या भाषणात आपल्या आईच्या संघर्षमय जीवनाचा आवर्जून उल्लेख केला. केवळ तिसरी उत्तीर्ण असलेल्या त्यांच्या आईने मुलाच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट त्यांनी आठवले. ‘शिक्षण म्हणजे भविष्य’ या सूत्रावर विश्वास ठेवत आईने दिलेली शिकवण त्यांच्या आयुष्याचा आधार बनली. गोरगरिबांसाठी विविध संशोधक आणि शास्त्रज्ञ जे काम करत आहेत त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देऊन समाजाच्या उपकाराची परतफेड कर असे आईने सांगितल्यामुळे अंजनी माशेलकर फाउंडेशन स्थापन करून गरिबांसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान सहजपणे कसं उपलब्ध होईल हे ते पाहात आहोत. हिमोग्लोबिनची, स्तनाच्या कर्करोगाची, फुफ्फुसाच्या रोगांचे निदान अतिशय स्वस्त आणि अचूक पद्धतीने करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झोपडपट्टीत वाढलेले माशेलकर १९६० साली एसएससी बोर्डाच्या परीक्षेत एक लाख पस्तीस हजार विद्यार्थ्यांमध्ये अकरावे आले, तेव्हा त्यांना टाटा स्कॉलरशिप मिळून त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकलं. १७ मार्च २००० रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ. के आर नारायणन यांच्या हस्ते माशेलकरांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. नारायणन यांचे शिक्षण देखील टाटा स्कॉलरशिपमुळे पूर्ण होऊ शकलं. हे शक्य करणार्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना देखील त्याच समारंभात पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले, हा योगायोग न विसरता येण्यासारखा आहे.
काही दिवसांपूर्वी निधन पावलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाचा फारसा उल्लेख झाला नाही याची खंत व्यक्त करत माशेलकर म्हणाले, राइट टू एज्युकेशन अॅक्ट, सर्व शिक्षा अभियान, मिड डे मिल स्कीम.. अशा वेगवेगळ्या योजना त्यांच्या काळात राबविण्यात आल्या. त्यांच्या कारकीर्दीत सात नवीन आयआयटी आणि सात नवीन आयआयएम निर्माण केल्या गेल्या. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या पाच नवीन संस्था आणि दहा नवीन एनआयटी यांची स्थापना करण्यात आली.
न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी म्हणाले की एक शास्त्रज्ञ महात्मा गांधीजींची बांधिलकी मानतो ही खूप मोठी गोष्ट आहे. मुळ्ये काकांची माणसांची निवड कधी चुकत नाही, असे सांगून सामाजिक भावनेतून सुरू असलेल्या अव्याहत कामाबद्दल त्यांनी अशोक मुळ्ये यांचा गौरव केला.
स्टेजवर किंवा सभागृहात कितीही मोठा पाहुणा असेल तरी त्याचं दडपण न घेता मुळ्ये काकांची मिश्किल शेरेबाजी सुरू असते, हा धागा पकडून अभिनेते विघ्नेश जोशी म्हणाले की मुळ्ये काकांचे भाषण रंगते, आता आपणच आमचा सर्वोत्कृष्ट वक्ता असा पुरस्कार सुरू करून पाहिला पुरस्कार मुळ्ये काकांना देऊ. तर गायक जयंत म्हणाले, आजच्या जल्लोषात विविध रंग आहेत. पण सफेद रंगात सात रंग असतात, म्हणूनच नेहमी सफेद कपड्यात वावरणार्या मुळ्ये काकांमुळे या कार्यक्रमाला खरी रंगत चढते. यंदा मुळ्ये विद्यापीठाची डॉक्टरेट देण्यात आली हे पाहून माइंड इट कार्यक्रमाचे केदार परुळेकर म्हणाले की पुढील वर्षात माझा पद्मश्री, माझा पद्मभूषण, माझा भारतरत्न असे पुरस्कार काका घेऊन आले तर आश्चर्य वाटायला नको. या सत्काराला जोडूनच सांस्कृतिक जल्लोष साजरा करण्यात आला. जयंत पिंगुळकर, नीलिमा गोखले, विघ्नेश जोशी, ओंकार प्रभूघाटे, श्रीरंग भावे, संपदा माने, केदार परुळेकर, सागर साठे, स्मृती तळपदे कला ग्रुप, आर्चीस लेले, विद्या करलगीकर या कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.