कथेच्या गरजेप्रमाणे एक आटपाट नगर. नगरात रीतीप्रमाणे आढळणारा कॉमन आणि मिनिमम एक भाऊ. भाऊचा एक चौथाई गावाला झाकोळणारा एक प्रशस्त वाडा. वाड्यात शिरस्त्याप्रमाणे वावरणारी तुपकट ढेरीची रासवट चेहर्याची माणसं. सगळं कसं सह्यकड्याच्या कुशीत आढळणारं सार्वत्रिक चित्र!
आज बरं विशेष काय असावं? भाऊ जनतेच्या काळजाला हेलवणारे प्रश्न झेलण्यासाठी काही भयंकर त्यागाची वगैरे घोषणा करतील अशी शक्यता राजधानीत वाटू लागल्याने सत्य जाणून घेण्यासाठी तिथूनच आलेला मीडियाचा कळप चिरेबंदी वाड्याच्या आत येण्याचं धाडस करणार आहे. त्यानुसार एक झगमगीत गाडीतून तुकतुकीत कांतीची घसा खरवडून क्रांती करणारी मॅडम उतरते. तिच्या आगेमागे मुलाखत शूट करणारा क्रू आहे. भाऊची आखीव रेखीव मुलाखत कुठं घ्यायची, याचा आढावा टीमने घेतलेला असावा, त्याबरहुकूम ती नियोजित ठिकाणी कॅमेरा व इतर अत्यावश्यक बाबींची मांडामांड करू लागतात. मॅडम आपल्या ढापनाच्या आडून तिरक्या नजरेने पाहात तयारी बघत एक उंची सोफ्यावर बसून लेमन टीचे भुरके घेऊ लागतात.
‘नमस्ते मॅडम!’ पाठीत जन्मत: वाक असलेला किंवा सरावाने वाक अंगीकारलेला भाट… सॉरी! भाटे! शक्य तितकं झुकत ओशाळं हसत पुढे येतो.
‘अँ? हां! असू द्या! असू द्या! आपण कोण?’ अति बिझी असलेल्या मॅडम उसन्या सौजन्याने हसत प्रश्न करतात.
‘आम्ही भाऊंचे जिवाचे जिवलग निष्ठावान हरकामे भाटे! म्हंटलं तर कुणीच नाही, आणि म्हंटलं तर हातपुसणं…’ अगदी लाचारीने भाटे आपली ओळख करून देतो.
‘व्हॉट डु यु मीन? काही कळालं नाही मला!’ विचारण्यातला प्रश्न मॅडमचा चेहरा व्यापतो.
‘हे कळालं तरी न कळाल्याचं दाखवायचं राहातं मॅडम!! माझ्यासारख्या अतिशूद्र माणसांची प्रजाती नेत्यांच्या हमखास जवळपास आढळते. नाही! आमच्या बिगर नेता, नेता बनत नाही! असू द्या! पण तुम्हाला काही मागवू का?’ भाटे शक्य तितकं वाकून बोलतात.
‘नो थँक्स! ते पलीकडे आराम खुर्चीत बसून इकडं लक्ष ठेवणारे गृहस्थ कोण?’ मॅडम बर्याच वेळापासून पडलेला प्रश्न विचारतात.
‘ते होय! ते अण्णा…’ भाटे हसून उत्तरतात.
‘अण्णा? म्हणजे भाऊंचे…?’ मॅडम एकदम उठण्याच्या बेतात विचारतात.
‘सख्खे कुणी नाही!’ भाटे क्षणात उत्तर देतात.
‘मग हे इथं काय करतात?’ मॅडमचा पुढचा प्रश्न!
‘ते…? ते त्यांचं काम भाऊंसाठी धुवायचं, पुसायचं… ‘ भाटे टाळायला बघतात.
‘पण काय?’ मॅडम अतीव उत्सुकतेने विचारतात.
‘भाऊ म्हणजे उजेड तर अण्णा म्हणजे अंधार, पण ते जाणून घेणं एवढं महत्त्वाचं नाहीय मॅडम! तुम्ही काय घेणार ते सांगा! भाऊंना यायला अजून थोडा वेळ लागेल,’ लाचारीने हसत भाटे चटकन विषय बदलतो.
‘नाही. नको! पण भाऊ येईपर्यंत ह्या वाड्याला फेरफटका मारता येईल का? मी असलं देखणं काम पहिल्यांदा बघतेय,’ मॅडम उठून उभ्या राहत बोलतात.
‘अलबत! का नाही? भाऊंचा उंची साधेपणा दाखवायला मला आवडेल. तुम्ही तुमच्या पूर्ण टीमसह आत येऊ शकता,’ भाटेच्या होकारावर सर्व टीम मॅडमसह वाड्यात प्रवेश करते.
‘हा आल्यागेल्या पाहुण्यांची सोय ठेवण्याचा रूम! तुमच्यासारखी काही मंडळी याला अभ्यागत कक्ष किंवा दिवाणखाना किंवा मुख्य खोली नाहीतर पाहुणचार रूम पण म्हणतात. पण याचं काम बदलत नाही. इथं लायकी पाहून पाहुणचार दिला जातो,’ अस्सल लाचारीने हसत भाटे पहिल्या खोलीची माहिती देतो. तोच एक ढेरपोट्या एका व्यक्तीला तिथून धक्के मारून हाकलताना दिसतो.
‘साहेब एकदा भाऊंना भेटुद्या, एकदा!’ ती व्यक्ती गयावया करत बोलतेय. बहुतेक तो छोटा-मोठा दुकानदार असावा.
‘निघ. भाऊ दिल्लीत आहेत. त्यांना पंधरा दिवस लागतील आणि आले तरी त्यांना खूप कामं आहेत. तू गप्प अण्णांनी सांगितल्यासारखं कर. चल… तेच, तेच… केव्हापासून!’ ढेरपोट्या त्या व्यक्तीला बाहेर घालवतोय.
‘तर तो होता पाहुणचार कक्ष आणि हा आहे खासमखास कक्ष. या आत या. बघा भाऊंच्या वाडवडिलांनी केलेल्या शिकारी जतन करून ठेवलेल्या आहेत. फक्त माणसं काय ती यात नाहीत. नाहीतर दिसणारे सारे प्राणी टिपले गेलेत…’ भाटे गाईडच्या भूमिकेत उतरतो.
भिंतीवरल्या निरनिराळ्या प्राण्यांचे मुखवटे विस्मयाने बघत टीम थबकत चालतेय.
‘पण साहेबांच्या आधीच्या पिढीत गरीबी होती नं?’ टीममधील कुणीतरी भुईफोड मेंदूवर ताण देत प्रश्नं विचारतो. भाटे केवळ अतीव लाचारीने हसून बघतो आणि केवळ ‘चला!’ एवढं बोलून पुढे निघतो.
‘हे बाथरूम-टॉयलेट वगैरे आहेत, इथं बघण्यासारखं काही नाहीय,’तो भाटे चालत माहिती देतो.
तोच खवट धरून तोंडात बोळा घालून एकाला काहीजण पलीकडल्या खोलीत घेऊन जातात. भीतीने सारी टीम चिडीचूप होते. तरी धीर करून कुणी एक प्रश्न करतोच, ‘त्या खोलीत काय आहे?’
भाटे सुहास्य मुद्रेने केवळ वळून बघतो, प्रश्न कुणी विचारलाय याचा वेध घेतो नि उत्तरतो, ‘ती धुवायची खोली आहे. अण्णांची! पण बघण्यासारखं इंटेरिअर काही नाही तिथं…’
‘खऽत्तो नॉऽऽऽ सऽऽऽई!!!’ वाक्यामागून रडण्याचा आवाज येतो नि क्षणात आवाजाचा बोळा बदलला जातो. पुन्हा शांतता. अख्खी टीम भयचकित मुद्रेने खोलीकडे बघते नि जागच्या जागी थिजते.
‘झालं वाटतं धुवून! चला चला, अजून पूर्ण वाडा बाकी आहे बघायचा,’ भाटेच्या वाक्यासरशी थबकलेली टीम चालू पडते. ‘हा बघा रंगमहाल! याचं मुद्दाम भाऊने नाव असं ठेवलंय. खास दिवसांत इथं सारेच रंग ओसंडून वाहतात. काय?’ भाटे जास्तीच्या रंगीन पद्धतीने सांगू लागतो. इतर मंडळी मेणाचे कापड, लोड, तक्के, गाद्यागिर्द्या, उंची पेय, चांदीचे प्याले, झुंबरं आणि इतर गोष्टी निरखू लागतात, ‘सगळा कसा मैफिल रंगवण्याचा माहौल.’ एक रत्नजडित प्याला नाचवत भाटे माहिती देतो.
भाटेच्या मागे सारे पुढे चालू पडतात.
‘हा निद्रा कक्ष. साहेबांच्या विश्रांतीचं ठिकाण. वहिनी साहेबांच्या परवानगीशिवाय आत कुणालाही जाण्यास मनाई आहे. चला पुढे! ते कोपर्यात किचन वगैरे! झालं सारं पाहून!’ भाटे आपल्या लाचार हसण्यानं फेरफटका पूर्ण झाल्याचं जाहीर करतो.
‘पण आपण तर थोडाच भाग बघितलाय की! मग…?’ एक नवतरुणी पत्रकारितेच्या कुठल्यातरी अभ्यासातले प्रश्नं विचारण्याचे धाडस करते.
‘हं! बाकीचं खास माणसांना बघता येतं. तुमची मर्जी असंल तर…’ भाटे बीभत्स हसत बोलतो. त्यावर मॅडम त्या तरुणीला नजरेनं दटावते.
‘ते खाली तळमजल्यावर तो माणूस लाल काय पुसतोय?’ अक्षरशः किंचाळल्यागत मागून एकजण विचारतो.
‘हात्तीच्या!! तुमचं निरीक्षण फार डीप दिसतंय! पण कसंय? ज्यांनी अंतरंग बघितलेत का नाही वाड्याचे? त्यांना प्रश्नं पडत नाहीत! आणि पडलेच तर… अण्णा! हरी! हरी!!’ भाटेचं बिकट हसू वाडाभर घुमतं.
सगळे भाटेमागं गपगुमान येतात. बाहेर मुलाखतीसाठी केलेल्या सोयीजवळ येऊन आपापल्या वस्तूचा ताबा घेऊन जड डोक्याने झटू लागतात. पण मॅडमसह अर्ध्या क्रूच्या नजरेत ते लाल द्रव पुनःपुन्हा येत रहातं. आणि भयाने दचकणारी ती टीम एकमेकाला आधार देत काम करू लागते.
तोच भाऊ तिथं येतात. त्यांच्या आगेमागे त्यांचा बंदूकधारी लवाजमा सोबत खूषमस्कर्यांची गर्दी असते. भाऊंच्या इशार्यावर सगळी प्रजा हात जोडत, पाया पडत तिथून बाजूला होते.
तो बाजूला बसलेला अण्णा भाऊच्या कानी लागतो. त्याची भेदक नजर पूर्ण टीमवरून फिरते. भाऊ काही क्षण रोखून सगळ्यांकडे बघतात. अण्णा हळूच मूळ जागी जाऊन बसतो.
‘तर तुमची तयारी झालेली दिसते! काय मॅडम? करायची का सुरुवात मुलाखतीला?’ भाऊ आपल्या कडक आवाजात विचारतात.
‘अँ? हां….. करूया सुरुवात. ऐ भाऊंचा क्लोज लावा. चला विचारा प्रत्येकाने आपापले प्रश्न…’ मॅडम निघण्याच्या घाईने आदेश देतात.
‘भाऊ तुम्ही कांदा कसा खातात? म्हणजे फोड करून की वाटून ग्रेव्ही करून…?’ काहीच न सुचल्याने पहिला प्रश्नकर्ता काहीबाही विचारतो. बोलता बोलता त्यानं मुलाखतीसाठी खास काढलेली प्रश्नावली खाली पडते.
भाऊ त्यावर केवळ स्मितहास्य करतो, काही क्षण! पुन्हा गंभीर मुद्रा करून तो बोलू लागतो, ‘आज आपल्या तालुक्यात जो खुनाचा आणि हत्येचा प्रसंग, घटना घडलेली आहे. त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. विरोधक सदरहू प्रसंगात अण्णाचं नाव गोवण्याचा प्रयत्न करत असले तरी उभ्या तालुक्याला माहीत आहे, अण्णा हा समाजसेवक, लोकसेवक आहे. त्याचे माझ्याशी जसे संबंध आहेत तसे आरोप करणार्या सगळ्या व्यक्तींबरोबर देखील व्यक्तिगत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता त्या हत्येच्या प्रकरणात काहीजण ओढून ताणून अण्णांचं नाव घेताय. त्यांना सांगतो, बाबा कायदा आहे ना? तो सगळ्यांना समान आहे. जो यात दोषी असंल, त्याला आम्ही नक्कीच कठोरातली कठोर शिक्षा देऊ. काय? यात माझ्यासारख्या लोकांतल्या कार्यकर्त्याला कुणी बदनाम करू नये. उलट मी त्या नृशंस हत्येतील पीडित कुटुंबातील उरेल त्या मुलाचा पूर्ण शिक्षणाचा खर्च उचलतो. आणि उद्या एकवेळचं भोजन त्यागून मृतात्म्याला श्रद्धांजली देतो. काय?’
मॅडमसह क्रूचं अंत:करण भरून येतं. सारे भरल्या डोळ्याने सद्गदित होऊन उभे राहतात. तोच भाऊ अण्णाकडे बघत आदेश देतात, ‘अण्णा हे आपले पाहुणे आहेत. यांची योग्य ती बडदास्त ठेवा.’
‘नको भाऊ! मुलाखत छान झालीय! तुम्ही सांगाल तोच भाग ठेवूया. बाकी एडिटमध्ये कट करू. ही माझी शेवटची मुलाखत. मी आजच रिझाईन करतेय. आता मिस्टरांच्या धंद्यात त्यांना गृहिणी म्हणून साथ द्यायचा माझा विचार आहे. येऊ का आम्ही?’ मॅडम अजीजीने परवानगी मागते.
‘अण्णा यांना पोहोचवून या!’ भाऊ आदेश देतात. तसा क्रू आपलं बाडबिस्तर गुंडाळून पळ काढतो.