तुझे ‘भविष्य’ उज्वल आहे…
प्रश्न : नमस्ते ताई. मला खूप प्रसिद्ध असा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ज्योतिषी व्हायचे आहे. मी काय करावे?
उत्तर : नक्की तुला बनायचे काय आहे ते ठरवले आहेस का? म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला ज्योतिषी, प्रसिद्ध टॅरो कार्ड रीडर, प्रसिद्ध नाडी शास्त्री, मानसिक आरोग्याचा सल्लागार किंवा मग रमलशास्त्र? सर्वात आधी काय बनायचे आहे ते ठरव. जर तुला प्रसिद्ध ज्योतिषी व्हायचे असेल तर फारशा कोणाला माहीत नसलेल्या रामायण, महाभारत, इतर पुराणे यातल्या कथा पहिल्या शोधून काढ. मग त्या कथांमध्ये हळूच शनी, राहू, गुरू यांना घुसव. अधेमधे ’चंद्रमा की शीतलता, केतू का प्रकोप, नारायणी योग, पुरुषतत्त्व-स्त्रीतत्व’ असल्या शब्दांची त्या कथांना जोड दे आणि व्हिडिओ करायला किंवा पोस्ट लिहायला सुरुवात कर. कोणी किती नाही म्हणाले तरी भविष्यात काय घडणार याची प्रत्येकाला उत्सुकता असते. एकदा का चार टाळकी जमली, की मग ’माझा अंदाज चुकत नसेल तर लवकरच एक मोठी राजकीय घडामोड होणार आहे’ असे भाकीत सोडून द्यायचे. आजकाल राजकारणात दर बारा चौदा तासांनी काही ना काही उलथापालथ होतच असते. काही दिवसांनी असेच भाकीत आंतरराष्ट्रीय पातळीवर करून टाकायचे. मग लोकांना ’मी तुमचे भविष्य बदलू शकत नाही. ते कोणीच बदलू शकत नाही. पण ते सुखकर कसे होईल यासाठी मदत करू शकतो..’ अशा शब्दात भुलवून टाकायचे. आधी पाच दहा लोकांच्या समस्या फुकटात ऐकून त्यांना काही सोपे काही अवघड असे उपाय सुचवायचे. सहा सात लोक तरी ’गुण आला.. गुण आला’ म्हणून बोंब ठोकतात हे नक्की. तू अत्यंत कष्टाने लोकांना विनाकष्ट आयुष्य सुखाने जगायचे उपाय सुचवत राहा. दुकानाच्या भरभराटीला वेळ लागणार नाही.
– होरा कोहिनूर सोमी
फेक अकाऊंटचा उपाय जालीम!
प्रश्न : प्रिय ताई, माझा नवरा गावभरच्या साळकाया माळकायांच्या अकाउंटला भेटी देत असतो, पण माझ्या एका पोस्टला देखील लाइक करायला त्याच्याकडे वेळ नसतो. काय करावे अशा नवर्याचे?
उत्तर : दुर्लक्ष ही सगळ्यात मोठी शिवी आहे असे म्हणतात. पण ते तू करू शकणार नाहीस हे देखील खरे आहे. तेव्हा त्याला ये ये म्हणून आमंत्रण देण्याऐवजी तो स्वत: कसा नाक मुठीत धरून येईल याचे बेत आखायला सुरुवात कर. सर्वात आधी एक फेक प्रोफाइल बनव. त्यावर फारशा फेमस नसलेल्या आणि गुगल इमेज सर्चमध्ये फारशी माहिती नसलेल्या मॉडेल पोराचे प्रोफाइल पिक्चर लावून टाक. दहा बार फुटकळ लोक मित्र म्हणून गोळा कर. नाही केलेस तरी चालेल. नवर्याच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून दे. त्यानंतर त्यांच्या बायका तुझ्या मित्रयादीत असतीलच. तेव्हा त्यांच्या एखाद्या पोस्टवर काही कमेंट करताना त्यांच्या नवर्यांना देखील टॅग करायचे आणि ’काय.. बरोबर ना भावजी?’ असे काय काय विचारत राहायचे. हळूहळू तुझ्या लेखनावर प्रतिक्रिया देताना त्या तुझ्या नवर्याला टॅग करायला लागतील. एकदा का तो टॅग झाला की लगेच हुरळून जाईल आणि तिथे प्रतिक्रिया द्यायला येईल. एकदा का नवरा तुझ्या पेजवर यायला लागला की त्या फेक प्रोफाइलवाल्या मॉडेलबरोबर गुलुगुलू करायला सुरुवात कर. आधी खोट्या प्रोफाइलवर जाऊन तुझ्या खर्या प्रोफाइलवरच्या सेल्फींना ’हाय.., उफ, मार डाला, कातिल..’ असल्या प्रतिक्रिया देऊन टाक. त्यानंतर मग खर्या प्रोफाइलवर येऊन त्यांना रिप्लाय द्यायला सुरुवात कर. ’बास कर रे… इश्श तू पण ना…’ हे हमखास लिहायला विसरू नको. आता नवरा तुझ्यावर बारीक लक्ष ठेवायला लागेल. दर दोन तासाने तुझे प्रोफाइल चेक करायला लागेल. एकदा का हे तुझ्या लक्षात आले, की फेक प्रोफाइलशी एकदम मोजके बोलायला लाग. शक्यतो ’तिकडे बोलू किंवा कालचे लक्षात ठेव’ एका एका अशा वाक्यात रिप्लाय देत राहा. नवरा आता त्या फेक प्रोफाइलची कुंडली काढण्यात मग्न होईल आणि मग तुला ‘तो तुझ्या फ्रेंडलिस्टमध्ये आहे ना त्याचे अकाउंट फेक आहे. लगेच लक्षात येते.’ असे सांगेल. त्यावर फक्त ’माहिती आहे. त्यानेच सांगितलंय मला!’ एवढेच उत्तर दे. विश्वास ठेव, तू घालवत नाहीस इतका वेळ तुझा नवरा तुझ्या प्रोफाइलवर घालवायला लागेल. तू फोटो टाकायच्या आधी त्याचे कौतुक यायला लागेल आणि तू काही लिहायच्या आधी त्याच्या प्रतिक्रिया यायला लागतील.
– सोमी होम्स
क्लिक मिळवायला ‘बेट’ लावा!
प्रश्न : सोमीताई, मी आणि माझे काही मित्र आमच्या गावात घडणार्या घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवू इच्छितो. इथला भ्रष्ट कारभार, अडचणी, अन्याय हे सगळे आम्ही लिहीत असतो. पण आज आठ महिने झाले, आमच्या पेजला २५च्या वर लोकांनी देखील जॉईन केलेले नाही. वाचकसंख्या देखील जास्त नाही. आमचे काय चुकते आहे?
उत्तर : तुमचे आणि त्यातून लोकांचे जास्त चुकत आहे मित्रा. तुमचा उद्देश चांगला आहे पण आजच्या कलियुगात चांगला उद्देश देखील साध्य करायला बर्याचदा वाममार्गाने जावे लागते. सोशल मीडियावर सध्या ज्या झुंडी वावरत आहेत, त्या फक्त आणि फक्त स्वतःच्या जगात रमलेल्या असतात. त्यांना आपले माय-बाप, भाऊ-बहीण यांच्या समस्या काय आहेत यात देखील स्वारस्य नसते, तर ते जनतेच्या समस्यांमध्ये काम रस दाखवणार? पण तरी तुला जर खरंच लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर तुला काय सांगायचे आहे यापेक्षा लोकांना काय ऐकायचे, वाचायचे आहे त्याचा जास्त विचार कर. ’अमक्या गावच्या ग्रामपंचायतीने रस्त्याचे पैसे हडपले,’ अशा शब्दांमध्ये काही मजा नाही. ’या बड्या नेत्याच्या जवळच्या ग्रामपंचायतीत झाले मोठे कांड’ असे शब्द वापरायला लाग. तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या गावच्या दोन बातम्या देता तेव्हा चित्रपट, राजकारण, स्कँडलच्या चार बातम्या जोडीला देत चला. आजचा जमाना ’क्लिक बेट’चा आहे हे लक्षात ठेव. शीर्षक जेवढे आकर्षक, क्लिकक्लिकाट तेवढे जास्त हे ध्यानात घे. ’करिनाने उघड केले बेडरूममधले सत्य. असे काय बोलून गेली की…’ असे शीर्षक देऊन करिनाने तिच्या बेडरूममधल्या भिंतीचे रंग तिला कसे आवडत नाहीत, पडदे ती दर चार महिन्यांनी कसे बदलते हे सांगायचे. ’या नेत्याला आहे गंभीर आजार, डॉक्टरांनी टेकले हात’ या शीर्षकाखाली टांझानिया किंवा झुलू वगैरे प्रांतातल्या नेत्याच्या आजाराबद्दल लिहून मोकळे व्हायचे. ’जेव्हा या मोठ्या नेत्याला बायकोने पकडले होते रंगे हाथ…’ या शीर्षकाखाली बिल क्लिंटनच्या शिळ्या स्कँडलची माहिती पुन्हा जागी करायची. ’या पाठमोर्या मुलीला ओळखलेत का? बनली आहे विश्वसुंदरी’ असे शीर्षक देऊन प्रâान्सच्या विश्वसुंदरीचा लहानपणीचा फोटो देऊन टाकायचा. बघता बघता लोकांचे थवेच्या थवे जमायला सुरुवात होईल. मात्र हे करत असताना आपला मूळ उद्देश मात्र विसरायचा नाही बरे.
– आर्ट ऑफ बातमींग सोमीताई
चाणक्य नावाचा गोबेल्स बन!
प्रश्न : ताई मी खूप चिंतेत आहे. मी एका मोठ्या पेजवर अॅडमिन आहे. मात्र पेजचा मालक मला सुखाने जगू देत नाही. मी सगळ्यांची टिंगलटवाळी करतो. ज्येष्ठ सदस्यांना आदर देत नाही, पेजला मोठे करण्यापेक्षा स्वतःचे नाव मोठे करायला बघतो, गटबाजी करतो असे मला वारंवार सुनावत असतात. जरा कुठे इकडे तिकडे हात मारायला जावे, तर लगेच डोळे वटारतात. हे सगळे असह्य होऊ लागले आहे. मी करावे तरी काय? दुसर्या एका मोठ्या पेजचे बोलावणे येते आहे. पण येताना चांगले पाच पन्नास लोक सोबत आणा म्हणत आहेत.
उत्तर : तुला पहिल्यापासून शिस्तीचे वावडे आहे हे मी चांगले ओळखून आहे भाऊराया. मी देखील सोशल मीडियावर वावरत असते. तुला छान ओळखते. तुझ्या वाढत चाललेल्या महत्त्वाकांक्षा मला माहिती नाहीत का? बाकी एक पेज सोडायचे दुसरे पेज पकडायचे अशा मळलेल्या वाटेवर चालण्यात काय मोठेपणा आहे? जरा आजूबाजूला बघ आणि शीक. काही भाडेकरू कसे बरीच वर्षे मुक्काम ठोकतात आणि नंतर मालकाला डोळे दाखवत घरावर हक्क सांगतात, त्यांचा आदर्श घे. अडचणीच्या वेळी मालकाने आसरा कसा दिला, अडीअडचणीला मालक कसा धावून आला, ऊन-वारा-पावसात घराने कसा सहारा दिला असले मागासलेले विचार आता मोडीत काढायचे दिवस आहेत. तेव्हा मळलेली वाट सोड आणि आहे ते पेज कसे घशात घालता येईल याचा विचार कर. मालकाच्या सज्जनपणाचा आणि भोळेपणाचा फायदा घे. तुझ्या आजूबाजूला तुझ्यासारखेच सुसंस्कृत आणि सुविचारी लोक असतील, त्यांना सोबत घे. गोड बोलून काटा काढ. लोकं तुला गद्दार म्हणतील, नालायक ठरवतील पण तू लक्ष्यापासून भटकू नकोस. पेजचा खरा वारसा चालवणारा तूच आहेस हे ओरडून ओरडून सांग. तुझ्या फायद्यातच पेजचा फायदा आहे याचा घोषा लाव. तुझ्याबरोबर येणारे सर्व तुझे बांधव आहेत आणि त्यांच्या समृद्धी आणि विकासातच तुझे सुख लपलेले आहे हे त्यांना समजाव. तू छातीवर मणामणाचे ओझे उचलून जे काही करतो आहेस ते फक्त आणि फक्त पेजवरच्या इतर सामान्य सदस्यांच्या भल्यासाठी. त्यांच्या मनातला खरा मालक तूच आहेस. खोटे बोल पण रेटून बोल. आजपासून गोबेल्स आणि त्याच्या नीतीचा अभ्यास सुरू कर. भाई, अरे आजकाल गोबेल्सलाच लाडाने चाणक्य म्हणतात बरे का! तूच आहेस तुझ्या चाणक्यनीतीचा शिल्पकार! आणि हो, एकदा का पेज घशात घातलेस, की नवे अॅडमिन मात्र विचारपूर्वक निवड हो. नाहीतर एखादा तुझाच समविचारी निघायचा. उगाच करावे तसे भरावे व्हायला नको…
-सोमी बिरबल
टॅग्यांना शिकवा धडा!
प्रश्न : विनाकारण सतत टॅग करत बसणार्या लोकांचे काय करावे? हजारदा विनंत्या करून देखील त्यांच्यावर काही परिणाम होत नाही.
उत्तर : सर्वात आधी सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला कोणी टॅग करू शकणार नाही याची व्यवस्था करावी. त्यानंतर शांतपणे अशा टॅग्यांची यादी करायला घ्यावी. यादीतील पुरुषांना अॅक्वागार्ड, इन्शुरन्स पॉलिसी, आदिवासी तेल, लठ्ठपणावरची औषधे, क्रेडिट कार्ड, लहान मुलांचे डायपर्स, स्त्रियांची अंतर्वस्त्रे, टॉक विथ सिंगल वूमन निअर यू अशा जाहिराती, पोस्ट आणि पेजवर टॅग करावे. दिवसातून दोनदा आणि आठवड्यात निदान दहा वेळा तरी टॅग करावे. आता हे ट्यॅगी पुरुष इंटरनेटवर जिथे जातील तिथे त्यांना फक्त आणि फक्त याच विषयावरच्या जाहिराती दिसायला लागतील. सोशल मीडियाचा अल्गोरिदम त्यांना या विषयाशी संबंधीत जाहिराती, पोस्ट, व्हिडिओ सतत सजेस्ट करायला लागेल. अचानक व्हिडिओ जाहिराती चालू होऊन त्यातल्या अल्पवस्त्रातल्या मुली हाय हाय म्हणायला लागतील. जाहिराती रिपोर्ट करून करून ट्यॅग्यांना जीव नको व्हायला पाहिजे ही त्यांची शिक्षा. स्त्री टॅग्यांसाठी फुटबॉल, चेस, ल्युब्रिकंट, कार ऑइल, मोटापा कैसे घटाये, बेस्ट हॉरर मूव्हीज इन द वर्ल्ड, दुनियाभर की बदनाम फिल्मे, दारू आणि सिगरेटी, रेझर्स, भारतीय तत्त्वज्ञान, गॅस की समस्या, कमजोरी और थकान असे विषय निवडावेत. चार लोकांसमोर सोशल मीडिया उघडायची देखील भीती वाटली पाहिजे, आज कोणती जाहिरात किंवा पोस्ट समोर दिसेल या भीतीने जीव धास्तावला पाहिजे. अर्थात हे सर्व स्वजबाबदारीवर करावे. कोणी येऊन दोन रट्टे जाणल्यास आपली जबाबदारी नाही बाई!
– अन्यायदेवता सोमी