अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट जिमी कार्टर यांचं वयाच्या १००व्या वर्षी नुकतंच निधन झालं. कार्टर यांचं नाव इतिहासात टिकेल. त्यांनी १९७८ साली कँप डेविडमधे इसरायलचे पंतप्रधान मेनाचेम बेगिन आणि इजिप्तचे प्रेसिडेंट अन्वर सादत यांच्यात शांतता करार घडवला होता. उद्देश पॅलेस्टाईनमधे शांतता निर्माण व्हावी, प्रश्न युद्धाऐवजी चर्चा करून सोडवण्याचा होता. आज २०२४ साली त्या विभागात शांतता नाही. हजारो माणसं मारली जात आहेत. शांतता निर्माण व्हावी असं म्हणणारी अमेरिकाच पॅलेस्टाईनमधल्या नरसंहाराला मदत करत आहे. इसरायलची सेना पॅलेस्टाईन व लेबनॉनमधल्या जनतेला खलात घालून कुटत आहे, अमेरिका इसरायलला बत्ता पुरवत आहे.
कार्टर
कार्टर प्रेसिडेंट झाले आणि लगेच देशाला उद्देशून केलेल्या पहिल्याच भाषणात ते म्हणाले की त्यांना पॅलेस्टाईनमधे स्थायी शांतता प्रस्थापित करायची आहे. त्यांच्याच पक्षातले लोक म्हणाले की तुम्ही तुमची कबर खोदत आहात, त्या भानगडीत पडू नका. अनुभवी मुत्सद्दी किसिंजरनी कार्टरना सांगितलं की भाषण केलंत ते ठीक झालं, त्यावरून तुम्ही शांततावादी आहात, अशी प्रसिद्धी होईल. पण तिथंच थांबा. शांतता प्रस्थापनेच्या मागे लागू नका.
कार्टरना करार करावासा वाटत होता, कारण ते बॉर्न अगेन ख्रिस्ती होते. सामान्य ख्रिस्ती नुसताच ख्रिस्ती असतो, पण बॉर्न अगेनचा ख्रिस्ताशी थेट आध्यात्मिक संपर्क झाला असल्यानं ते खरे ख्रिस्ती असतात, असं ते मानतात. कार्टरना साक्षात्कार झाला होता की पॅलेस्टाईन विभागात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी ख्रिस्तानं त्यांच्यावर टाकली आहे. कार्टरनी सीआयएनं तयार केलेला शेकडो पानांचा पॅलेस्टाईन पुलिंदा अभ्यासला. त्यात सादत, बेगिन यांचा सर्वांगीण अभ्यास मांडला होता. कार्टर शेतकरी होते. परदेश नीती हा त्यांचा अभ्यासाचा विषय नव्हता. गव्हर्नर असताना ते एकदाच इसरायलला गेले होते, तेव्हाच्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांना भेटले होते. त्या भेटीनंतर ते गोल्डा मेयर यांचा उल्लेख माय ओल्ड फ्रेंड असा करत.
कार्टर जॉर्जियात जन्मले, वाढले. तिथं ज्यू माणसं फारशी नाहीत आणि अरबही फारसे नाहीत. कार्टर यांचा अन्वर सादतशी परिचय होता. एका परदेश दौर्यात ते सादतना भेटले होते. सादत यांनी त्यांना प्रभावित केलं होतं. आपण सादतना आपला विचार पटवून देऊ शकू, मग सादत बेगिन यांना समजावतील, असं कार्टरना वाटत असावं. कार्टर यांचा स्वभाव असा की ते साधारणपणे इतरांचं ऐकून घेत नसत. आपलंच म्हणणं खरं करत असत. त्यांची मतं पक्की असत, आपण नीट अभ्यास केलाय असं त्यांना वाटत असे.
बेगिन
बेगिन हा प्रवृत्तीनं आणि विचारानं दहशतवादी माणूस. वाटाघाटी, मुत्सद्देगिरी त्यांना मान्य नव्हती. १९६७ साली युद्धात बळकावलेला गाझा आणि वेस्ट बँक; सिनाई, हे प्रदेशच नव्हे तर उरलेला सारा प्रदेश इसरायलमधे सामील झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. पॅलेस्टाईनचं अस्तित्वच ते मान्य करत नव्हते. पॅलेस्टाईन हा इसरायलच आहे, कधी काळी परिस्थितीवशात ज्यूंना परागंदा व्हावं लागलं; आता ज्यू आपल्या भूमीत परत आलेत असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळं वाटाघाटी कसल्या करायच्या, युद्धच करायचं असं त्यांचं मत होतं. नो शांतता.
बेगिन यांचा स्वभाव हडेलहप्पी होता. सोबत असलेल्या सहकार्यांचं ते ऐकत नसत, आपल्याच मनासारखं करत.
इसरायलनिर्मितीची चळवळ चालली असताना ज्यूंनी एक लष्कर तयार केलं होतं. कायदेकानूनप्रमाणे चालणारं असं लष्कर, जे पुढं चालून इसरायलचं लष्कर होणार होतं. बेगिन यांचं त्या लष्कराशी जमलं नाही. ब्रिटीश आणि अरब या शत्रूंचा नायनाटच करून टाकायचा, हिंसक वाटेनं, असं बेगिनना वाटत होतं. त्यांनी त्यांचा इरगुन हा स्वतंत्र सशस्त्र मिलिशिया तयार केला होता. ब्रिटीश दूतावास त्यांनी बाँब लावून उडवला; अरब शरणार्थींच्या वस्तीत निष्पाप स्त्रिया व मुलं मारली. पॅलेस्टाईनला स्वतंत्र भूमी द्यावी, त्यांना स्वायत्तता द्यावी, परागंदा पॅलेस्टिनी लोकांना पॅलेस्टाईनमधे परतण्याचा अधिकार द्यावा, इसरायलनं बळकावलेले वेस्ट बँक आणि सिनाई हे प्रदेश त्यांचे त्यांना परत करावेत हे कार्टर यांचं म्हणणं बेगिन कदापी मान्य करणार नव्हते.
सादत
सादत हे लष्करी अधिकारी होते. १९६७ आणि १९७३ या दोन युद्धांत ते इसरायलच्या विरोधात लढले. लोकसंख्या आणि सैनिक या दोन हिशोबांत इजिप्त हा अरब प्रदेशातला सर्वात मोठा देश, त्यामुळं लढाईतही त्यांचेच सैनिक जास्त. १९७३नंतर अरब देशांचे ते सर्वात मोठे नेते ठरले. भरपूर इसरायली सैनिक त्यांनी मारले होते. इसरायलचं अस्तित्व पुसून टाकणं हे त्यांचं ध्येय होतं.
सादत एककल्ली होते. आपण सोडता बाकीची दुनिया दुय्यम असा त्यांचा विचार, कोणाचं ऐकत नसत. हिटलर हा त्यांचा आदर्श होता. केमाल पाशानं एकतर्फी रीतीनं तुर्कियेत क्रांती केली म्हणून केमाल पाशाही त्यांचा आदर्श. सतत युद्ध केल्यानं इजिप्तची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती. त्यांनी रशियाशी दोस्ती करून पाहिली होती. रशियाची श्रीमंती म्हणजे देखावा होता. खरी श्रीमंती अमेरिकेत आहे हे ते जाणत होते. कित्येक पटीनं मोठ्या अरब सैन्याला इसरायलनं सतत हरवलं, कारण अमेरिकेचा भक्कम पाठिंबा इसरायलला होता हे त्यांनी जाणलं होतं. अमेरिकेची मदत मिळवायची, अमेरिकेच्या गटात सामील व्हायचं असा विचार सादत करत होते. कँप डेविड हे एक चांगलं निमित्त आहे असा विचार त्यांनी केला. करारात इसरायल-अमेरिका यांची एखादी गोष्ट मान्य करायची आणि बदल्यात पैसे मिळवायचे असा त्यांचा विचार होता.
पॅलेस्टाईनचं स्वातंत्र्य वगैरे गोष्टींबद्दल त्यांचा आग्रह नव्हता.
सादत कुराण वाचत. पृथ्वीपलीकडं काही शक्ती आहेत, त्या पृथ्वीवरील गोष्टी घडवतात, यावर त्यांचा विश्वास होता. पृथ्वीपलीकडच्या त्या शक्ती खास माणसांना संदेश पाठवून भविष्यात काय होणार आहे ते सांगतात, असा सादत यांचा विश्वास होता. सादतही एक प्रकारे बॉर्न अगेन मुस्लीम होते. एक आध्यात्मिक भविष्यवाला त्यांचा गुरू होता. त्याला सादतनी कँप डेविडमधे आणलं. सीआयएनंही विचारपूर्वक त्याला कँप डेविडमधे प्रवेश दिला.
– – –
कार्टर यांच्याकडं कोणतीही पक्की योजना नव्हती. पॅलेस्टाईनला अधिकार मिळावेत, बळकावलेले प्रदेश इसरायलनं परत करावेत असं कार्टर यांच्या मनात होतं, ते कसं घडेल याचा कार्यक्रम त्यांच्याजवळ नव्हता. अमेरिकेची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, जनतेत सरकारबद्दल चांगलं मत नव्हतं. शांतता कराराचा जुगार नीट झाला तर आपण लोकप्रिय होऊ, दुसरी टर्म आपल्याला मिळेल, नोबेल पारितोषिक मिळेल असा कार्टर यांचा होरा असावा.
तेरा दिवस. सादत आणि बेगिन एकमेकाला भेटायलाही तयार नव्हते. भेटले की भांडत. मग त्यांच्याऐवजी त्यांच्या परदेशमंत्र्यांना भेटवून करार करता आला तर पहावा अशी खटपट कार्टरनी केली. पण बेगिन आणि सादत सहकार्यांचं ऐकत नसल्यानं त्याचाही उपयोग होत नव्हता. कार्टर सायकल दामटवून बेगिन आणि सादत यांच्या केबिनच्या फेर्या करत होते. एकदा त्यांनी जेटिसबर्ग या जवळच्या गावी नेऊन त्यांच्यात काही तरी संवाद होईल असा प्रयत्न त्यांनी केला. तेही जमलं नाही.
बेगिन तसूभरही हटायला तयार नव्हते.
शेवटच्या दिवशी कार्टरनी दोघांनाही सांगितलं की करार केला नाहीत तर अमेरिकेची मदत बंद होईल. पॅलेस्टाईन संपवणं हाच मुख्य उद्देश असल्यानं बेगिन पॅलेस्टाईन हा शब्दही करारात आणायला तयार नव्हते. शेवटी सिनाईवर समझोता झाला. सिनाई हा इजिप्तचा प्रदेश असल्यानं तो इजिप्तला परत करावा, त्या बदल्यात इजिप्तनं इसरायलचं अस्तित्व मान्य करून संबंध प्रस्थापित करावे असा फॉर्म्युला तयार झाला. पॅलेस्टाईनचं स्वातंत्र्य इत्यादी गोष्टींबाबत ‘युनायटेड नेशन्सनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचा विचार करावा’ असं एक मोघम वाक्य करारात टाकण्यात आलं.
हा झाला कँप डेविड करार.
सिनाई आणि अमेरिकेची दोस्ती मिळवण्याचा डाव सादतनी टाकला,
पॅलेस्टाईनवर पाणी सोडलं, इसरायल या शत्रूदेशाला मान्यता दिली यावरून अरब देश आणि इजिप्शियन पब्लिक रागावली. सादत यांचा खून त्यांच्याच सैन्यातल्या अधिकार्यानं केला.
इसरायलनं सिनाई इजिप्तला दिलं हे इसरायली लोकांना आवडलं नाही, ते बेगिन यांच्यावर रागावले. आपण हा उद्योग करून बसलो, याचा धक्का बेगिनना बसला, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. तिथून मरेपर्यंत ते एकांतवासात गेले.
पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला म्हणून अमेरिकेतले ज्यू खवळले. अमेरिकेच्या आर्थिक नाड्या हातात ठेवणार्या ज्यूंनी कार्टरना पुढल्या प्रेसिडेंट निवडणुकीत पाडलं.
१९७८ ते २०२४.
अमेरिका-इसरायल-इजिप्त हा त्रिकोण खुषीत आहे.
इजिप्त आणि इसरायलमधे युद्ध झालं नाही.
गाझा, वेस्ट बँक, लेबनॉन या ठिकाणी होणारा नरसंहार इजिप्त सहन करतोय.
अमेरिका तर नरसंहाराला शस्त्रं पुरवत आहे.
करार झाला. शांततेचा पत्ता नाही.
– निळू दामले