अलीकडे बायकांचे कपडे घालून, तसेच केस वाढवून, तशाच टिकल्या, बिंद्या लावून बुवाबाजी करणारे लोक दिसतात… इतकं बायकी सोंग काढल्यावर हे ‘बुवा’बाजी करतात, असं कसं म्हणायचं?
– पुरुषोत्तम केळेकर, कुडाळ
एवढं तुम्हाला वाटतं, खटकतं तर हे बाईबाजी करतात असं तुम्ही म्हणा… पण तुमच्या मागे कोणी ‘आका’ असेल तर… पण प्लीज आम्हाला असे प्रश्न विचारू नका. उगाच आमच्या काळजात ‘धस’ होतं!!
तुम्हाला कोणी व्हिडिओ कॉल केला आणि तुमच्यावर भयंकर आरोप करून तुम्ही डिजिटल अरेस्टमध्ये आहात, आता लाखो रुपये भरा, नाहीतर खरोखर अटक होईल, असं सांगितलं, तर तुम्ही काय कराल?
– विघ्नेश जोगळेकर, शनिवार पेठ, पुणे
अहो, जो कर भरतो त्याला डर कशाला? असे कॉल करणारे पण माणूस बघून पुड्या बांधतात… ते जाळं टाकतात आणि आणि ज्याच्यासाठी जाळं टाकतात ते येडे, कोणीतरी मासोळी आपल्या जाळ्यात अडकेल म्हणून येडे बनतात… तुम्ही शहाणे दिसताय… चुकून नकळत येडे बनलात तर सरळ तक्रार करा… अशी आमच्या खांद्यावरून ‘तुम्ही काय कराल?’ असं विचारत बंदूक चालवू नका…
नव्या वर्षात डाएट आणि व्यायाम करून सिक्स पॅक अॅब्ज कमावण्याचा संकल्प तुम्ही सोडला आहे की नाही? इन्स्टाग्राम स्टार बनाल रातोरात.
– मानसी शिदोरे, नौपाडा, ठाणे
मानसी ताई, सिक्स पॅकवालाच पाहिजे असा अट्टा धरणार्या तायांच्या नादाने, कितीतरी जीजू सिक्स पॅक कमवायला जातात… आणि जिम मध्येच आयुष्याचा पॅक अप करून घेतात… (तसे व्हिडिओ बघितलेत इंस्टाग्रामवर) अशा तायांनाच विनंती आहे, की सिक्स पॅकवालाच पाहिजे असा हट्ट करणार नाही असा संकल्प तुम्हीच करा… (आमचा संकल्प म्हणाल तर आमच्या पोटाचा ‘फॅमिली पॅक’ होणार नाही याचीच काळजी घ्यायची ठरवलीय… दर वर्षाप्रमाणे.)
पूर्वी मुलांना डॉक्टर, इंजीनियर, सायंटिस्ट, पायलट किंवा अभिनेता वगैरे बनायचं असायचं, आता मुलांना गुंडगिरीचं आकर्षण वाटतं, दोनचार मर्डर केलेल्या भाईचं जबरदस्त फॅन फॉलोइंग असतं… आपल्या समाजात नेमका काय बिघाड झालाय?
– विश्वनाथ भोईर, पनवेल
याच्याआधी कधी असं घडलं होतं का, याचा विचार करा आणि खरंच शोध घ्यायचा असेल तर हे कधीपासून घडायला लागलं, याचा शोध घ्या… (आम्ही क्ल्यू दिला आहे. आता पुढचं तुम्ही शोधा… स्पष्ट बोललो तर हे गुंडगिरीचं आकर्षण असणारे, आमच्याकडे आकर्षित होतील… आणि प्रश्न विचारणारा राहील बाजूला, उत्तर देणार्यापुढे नवीन प्रश्न उभे राहतील.)
नाट्यसृष्टीतले तुमचे ‘आका’ कोण?
– श्रीनिवास बेलोसे, तळेगाव
तुम्हाला ‘महाआकां’वरचा फोकस हलवून दुसरीकडे शिफ्ट करायचा आहे का? लब्बाड्… तसं असेल तर ही आयडिया जुनी झालीय. सर्वसामान्य लोकांनाही कळायला लागलीय.
संतोषराव, तुम्ही पण सुपार्या घेता की नाही? इव्हेंटला जाता की नाही? खरी कमाई त्यातच आहे म्हणतात.
– पोपटराव पाटील, पुसद
सुपारी घेणं आणि वाजवणं ‘ती एक वेगळी’ कला आहे. ‘ती वेगळी कला’ आम्हाला जमत नाही. (खरं म्हणजे आम्हाला कोणी सुपारी देतच नाही… कारण आम्हाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही… असं आमचं आम्हीच मानतो. आणि रसिकांच्या टाळ्या हीच आमची कमाई मानतो. देतील ‘ते..’ मानधन घेतो… (ते सुद्धा मिळाले तर… अशा वेळेला कलाकारांनी सुपारी घेतली तर बिघडलं कुठे? दिलं की नाही बॅलन्स उत्तर…)
सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडी पाहता ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ हे तर स्पष्टच आहे, पण तो जाणार कुठे आहे? तुम्हाला काही आयडिया?
– अस्लम शेख, वाई
अस्लम मियाँ… तुमच्या घराखाली एखाद प्रार्थनास्थळ आहे, अशी कुणी ‘आवई’ उठवली, तर ‘वाई’ सोडून तुम्ही कुठे जाणार? त्यामुळे तुम्ही तुमच्या नावाचा आणि गावाचा विचार करा.. ज्यांना निवडून दिलय ते महाराष्ट्र कुठे जाणार याचा विचार करतील. एक वेळ ते निवडून कसे आले याबद्दल शंका घ्या… पण निवडून आलेल्यांवर शंका घेऊ नका. त्यांनी महाराष्ट्राला जिथे न्यायचं ठरवलंय तिथे ते नेणारच. तुमच्या शंकेचं वाळूत केलेल्या लघुशंकेप्रमाणे होईल… फेस ना पाणी!