डॉ. हेडगेवारांनी १९२५ साली संघाची स्थापना केली, हे आपण सगळे जाणतोच. संघस्थापना मुख्यत्वेकरून जगाला दाखवण्यासाठी हिंदूंच्या संरक्षणासाठी होती. पण अंत:स्थ हेतू होता ब्राह्मणी वृत्तीचे संरक्षण करणे! टिळकयुगाच्या अंतानंतर गांधीयुग अवतरले आणि मूठभर ब्राह्मणी नेत्यांच्या हातातील स्वातंत्र्यलढा बहुजनांच्या हातात गेला. पुन्हा पेशवाई आणण्याचे स्वप्न भंगल्यामुळे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, टिकून राहण्यासाठी अखेरची धडपड म्हणून संघाच्या स्थापनेची त्यांना गरज वाटली. पण लोकांना सांगताना मात्र ‘ही सांस्कृतिक संघटना समस्त हिंदूंच्या आणि हिंदू संस्कृतीच्या संरक्षणासाठी आहे’ असे सांगितले गेले. याचा अर्थ संघ हा जन्मापासूनच दुटप्पी राहिलेला आहे. म्हणून संघामध्ये कार्यकर्ते कसे घडवले जातात हे समजून घेणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे. यंत्रमानवी कार्यकर्ते बनविण्याचा कारखाना म्हणजे संघाची शाखा, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
गावोगावी शाखांची निर्मिती करणे आणि ती शाखा कशी टिकेल याची तरतूद करणे हे संघ प्रचारकांचे मुख्य उद्दिष्ट असते. लहान मुलांना खेळाच्या निमित्ताने एकत्र बोलाविले जाते. त्यांच्या मेंदूत बालपणापासूनच देशभक्तीच्या नावाखाली धर्मांधता, कट्टरता व इतरधर्मियांचा द्वेष भरला जातो. ह्या बालकाच्या आई-वडिलांना आध्यात्म, आपली महान संस्कृती, संस्कारांच्या नावाखाली गोड बोलून फसवले जाते. परंतु आपला मुलगा शाखेत जाऊन काय शिकतो याकडे कुणीच लक्ष देताना दिसत नाही. शाखेत येणार्या स्वयंसेवकांनी काय वाचावे आणि काय वाचू नये हेसुद्धा संघ प्रचारकच ठरवतात. आपल्या विरोधी विचारांची पुस्तके स्वयंसेवकांनी वाचू नये व त्यांना दुसरी बाजू कधीच कळू नये, याकरिता प्रचारक प्रचंड मेहनत घेत असतात. आपल्याच विचारांची पुस्तके स्वयंसेवकांना मोफत वाचायला दिली जातात. त्या स्वयंसेवकाने दुसरे काहीही वाचण्याचा आणि त्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याची कृती संघस्थानावर ‘अब्रह्मण्यम’ म्हणून संबोधली जाते. समाजामध्ये वावरताना संघ स्वयंसेवकाने संघाला अपेक्षितच वागावे-बोलावे अशीच त्याच्या बुद्धीची जडणघडण केली जाते. स्वयंसेवकांचा विवेक जागृत होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
चतुरस्त्र बुद्धी असलेला माणूस वैचारिक गुलाम करणारी संघाची मानसिकता कधीही स्वीकारणे शक्य नाही. कारण ते स्वयंसेवकांच्या अवघ्या विचारशक्तीवरच घाला घालत असतात. संघाच्या बौद्धिकांत बौद्धिक स्वातंत्र्याला थारा नसतो. संघाच्या शिबिरांतून ठराविक छापाची बौद्धिके सक्तीने आणि अर्थातच शिस्तीने सर्व स्वयंसेवकांना ऐकावीच लागतात. जोशपूर्ण समूह-संमोहनाचा तो उत्तम प्रयोग प्रत्येक शिबिराच्या ठिकाणी मोठ्या चातुर्याने खेळला जातो. तो स्वयंसेवक मग त्याच पद्धतीने विचार करू लागतो, वाचू लागतो, बोलू लागतो आणि काही स्वयंसेवक तर लिहूही लागतात. जे बोलू लागतात त्यांना संघाचे व्यासपीठ असते, जे लिहू लागतात त्यांना संघाची वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके तिन्हीत्रिकाळ उपलब्ध असतात आणि त्याचेच पुनःपुन्हा चविष्टपणे वाचन केले जाते. अशा वाचनातून आणि केल्या जाणार्या चिंतनातून तो स्वयंसेवक भट्टीतून काढल्या जाणार्या विटेसारखा चांगला भाजला जातो आणि तो एकदा का पक्का झाला की मग त्याला कितीही खरे सांगा, तो थंडपणे तुमचे सत्य हाणून पाडतो. त्याची बोलण्याची धाटणी बेमालूमपणे हिटलरी छापाची होते. त्याच्या विचारांचे स्वरूपही मग अनायासे हिंसक बनत जाते. संघस्थानावर आणि शिबिराच्या ठिकाणी मिरवली जाणारी लाठी ऊर्फ त्यांचा तो सुप्रसिद्ध ‘दंड’ जणू राजदंडाचे स्वरूप घेऊ लागतो. मात्र त्यांची बौद्धिक दिवाळखोरी त्यांनी केव्हाच जाहीर केलेली असते.
संघाने संमोहित केलेला तरुण विज्ञानाचा विद्यार्थी असला तरीही आपल्या पुराणांची चिकित्सा करायला बिलकूल तयार होत नाही. तो कायमचा अर्धकच्चा राहतो. मानसिक वाढ खुंटल्यामुळे तो एकांगी विचार करू लागतो. ‘हिंदूंवर अन्याय होतोय’, ‘अल्पसंख्यांकांचे लाड होताहेत’, ‘आर्थिक निकषाच्या आधारे सवलती द्यायला हव्यात’ अशी गोंडस हाळी तो द्यायला लागतो. थोडक्यात काय तर, संघाने तरुणांच्या तारुण्याचे लोणचे घालण्याचा कारखाना उघडला आहे. काही तरुणांना संघ अगदीच बेचव वाटू लागला तर असा तरुण वर्ग संघातून फुटून जाऊ नये आणि फुटला तरी तो आपल्याच कह्यात राहावा यासाठी संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था उभारल्या गेल्या.
राजकारणाशी आमचा काही संबंध नाही’ असे म्हणणारे संघ स्वयंसेवक राजकारणावाचून जगू शकत नाहीत, ही त्यांची फार मोठी शोकांतिका आहे. तरीही ते तसे का म्हणतात याचे कारण समजणे सोपे आहे. आपला राजकारणाशी उघड संबंध आहे असे जर संघाने मान्य केले तर जी कच्चीबच्ची पोरे संघाच्या शाखेवर नित्यनेमाने जातात त्यांचे पालक त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करतील आणि संघाचा जो मजबूत पाया ‘शाखा’ तोच ढासळला जाईल. म्हणूनच संघ उघडपणे ही सांस्कृतिक संघटना आहे, असे सांगतो. पण ज्यांना राजकारणाची आवड असते ती माणसे ‘भाजप’मध्ये सामील होतात. ज्यांना विद्यार्थ्यांमध्ये काम करावयाचे आहे ते ‘अभाविप’मध्ये जातात्ा. ज्यांना कामगारवर्गात काम करून कम्युनिस्टांची कामगारवर्गावरची पकड ढिली करावयाची आहे, त्या व्यक्ती ‘भारतीय मजदूर संघात’ सामील होतात. ज्यांना सेवाभावी व्हावेसे वाटते, त्या व्यक्ती ‘वनवासी कल्याण आश्रमा’त निष्ठेने काम करतात. परंतु ज्यांना काहीच करावयाचे नाही अशा व्यक्ती मात्र संघाच्या पेटीत गुरुदक्षिणा टाकून मोकळ्या होतात आणि वर्षानुवर्षे संघाच्या शाखेवर ‘दक्ष-आरम’चा निरुपद्रवी एकसुरी खेळ खेळत राहतात.
संघाचे स्वयंसेवक कितीही उच्चशिक्षित असोत परंतु शिक्षणामुळे त्यांच्यात पेरलेली ‘धर्मांधता’ संघ किंचितही कमी होऊ देत नाही. संघ प्रतिगामी आहेच, पण सर्व उच्चशिक्षितांची बुद्धी त्यांनी आपल्या विचारांच्या प्रचार-प्रसाराकरिता आणि आपल्या पुराणमतवादाचे-संस्कृतीचे गोडवे गाण्याकरिता व आपल्या संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराकरिता कामात आणली आहे. सुशिक्षित हिंदूंना आपल्या जाळ्यात ओढण्याकरिता हे त्यांचे डावपेच असतात. देशात अनेक ठिकाणी जेव्हा दलित, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीयांवर हल्ले होतात तेव्हा संघाचा ‘हिंदुत्ववाद’ कधीही वर उफाळून येताना दिसत नाही. त्यावेळी त्यांचा हिंदू धर्म खतर्यात येत नाही. कुठल्याही घटनेवर जरी व्यक्ती हिंदू असली तरी त्या व्यक्तीची जात पाहून ह्यांचे हिंदुत्व पेटत-विझत असते.
संघाची कोणी चिकित्सा करू लागले तर त्याला हे स्वयंसेवक सुचवतात की, ‘एकदा शाखेत या. काही दिवस शाखेत राहा, बघा आणि मग टीका करा.’ त्यावर जर असा प्रश्न विचारला की, तुम्ही मुसलमानांचा द्वेष वाढवण्यासाठी मुसलमानी धर्माची चिकित्सा करता तेव्हा तुम्हाला मुसलमानांनी सांगितले की, ‘तुम्ही आधी मुसलमान व्हा आणि मग आमच्या धर्माची चिकित्सा करा’, तर चालेल काय? थोडक्यात काय तर दारूवर टीका करण्याआधी हे स्वयंसेवक म्हणतील, ‘आधी दारू पिऊन बघा, मग टीका करा.’ संघाचे उद्दिष्ट एकचालकानेतृत्व असल्यामुळे ‘आम्ही आदेश द्यायचा आणि स्वयंसेवकांनी कुठलाही चांगला-वाईट विचार न करता तो पाळायचा’, ही संघाची समानता! याचप्रकारे कार्य करतील असे मेंदू तयार करण्याची प्रक्रिया संघात गेली १०० वर्षे सुरू आहे.
संघाच्या दृष्टीने हिंदूधर्माचे रक्षण म्हणजे चातुर्वर्ण्याचे रक्षण, ही गोष्ट या एकांगी वाचन करणार्या तरुणांच्या लक्षात कधीही येत नाही. अशाप्रकारे संघाच्या मुशीतून घडलेला हा तरुण मग पुढे सतीप्रथेचे निर्लज्ज समर्थन करू लागतो. हिंदू स्त्रियांनी चार चार मुले जन्माला घालावीत असे अभिमानाने बोलू लागतो, फुले-आंबेडकरांचे नाव काढले की त्यांचे डोके ठणकू लागते. या विवेचनावरून आता तुमच्या लक्षात आले असेलच की संघात गेलेल्या लहान बालकाची स्वयंसेवक म्हणून जडणघडण स्वत:चे डोके न वापरता आज्ञा पालन करणार्या आणि प्रश्न न विचारणार्या एक यंत्रमानव होण्याच्या पद्धतीने केली जाते ते…
याचे परिणाम आज आपण – विशेषतः गेल्या दहा वर्षापासून कटूतेने भोगताना दिसत आहोत. ही मंडळी तोंडाने गांधीजींना प्रातःस्मरणीय म्हणतात, पण प्रत्यक्षात गांधीजींचा खुनी नथुराम गोडसेचे समर्थन करत असतात. संविधान कपाळाला लावून ‘आम्हाला संविधान किती पूज्य आहे’, असे ते दर्शवतात आणि वेळोवेळी, पदोपदी संविधानाचा अपमान करताना दिसतात. मोदी-शहांपासून भाजपची बाकीची सगळी पिल्लावळ ‘गर्व से कहो… हम हिंदू है!’ म्हणताना मुस्लिम आणि ख्रिश्चनद्वेषाचा कळस गाठत दलितांचाही द्वेषही करत असते.
या तथाकथित सांस्कृतिक संघटनेने सांस्कृतिकरणाच्या नावाखाली स्वातंत्र्यलढ्यात कधी भाग घेतला नाही. तसेच स्वातंत्र्यानंतर ५२ वर्षे तिरंगा झेंडा आपल्या मुख्यालयावर फडकवला नाही. पण आज ते ‘आम्हीच काय ते खरे देशभक्त आणि आम्हाला विरोध करणारे देशद्रोही’ अशा अविर्भावात वावरताना दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांची तोडमोड करून सत्यापलाप करत स्वतःच्या सोयीने इतिहासाची मांडणी करून लोकांची दिशाभूल करण्यात आणि लोकांमध्ये भ्रम पसरवण्यात त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही, एवढे ते तरबेज आहेत. अशा या एकचालकानेतृत्वावर विश्वास असणार्या संधी विचारांच्या राज्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने राज्यावर येऊन हळूहळू लोकशाहीचा गळा घोटत आणला असून त्यांना हवे असलेल्या फॅसीझमच्या मार्गाकडे आता त्यांनी वाटचाल सुरू केलेली आहे. गेल्या ७० वर्षांत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतु:सूत्रीवर आधारित संविधान भारतात चांगल्या प्रकारे मूळ धरू लागले होते. या सगळ्या सामाजिक मूल्यांना आता गळती लागलेली आहे. यावर जर सर्व पुरोगाम्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन या फॅसीस्ट वृत्तीला तोडीसतोड उत्तर दिले नाही तर भारताचे भविष्य अंध:कारमय आहे, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्याची गरज नाही.
(संदर्भ : १) स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव – चंद्रकांत झटाले, २) आर एस एस – जयदेव डोळे)
– जगदीश काबरे