दहशतवाद हा आता अनेक देशांसाठी प्रचंड विनाशकारी ठरू लागला आहे. प्रगत देशांपासून ते गरीब देशांपर्यंत अनेक देशांतील नागरिकांना वेठीला धरून दहशतवाद पसरवला जात आहे. आफ्रिकेतील नायजेरिया या देशातही गेला काही काळ हीच परिस्थिती असून रविवारी पुन्हा एका दहशतवादी हल्ला झाला आहे.
नायजेरियात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 100 नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. नायजेरियातील दोन गावांमध्ये रविवारी हा हल्ला झाल्याची माहिती नायजेरियाच्या पंतप्रधानांनी दिली आहे. दहशतवादी हल्ल्यात ही दोन्ही गावं बेचिराख झाली आहेत.
या भागात हिंसा आणि नागरी युद्धामुळे 2017 सालापासूनच आणीबाणी लागू आहे. पण तरीही नायजेरियात गेल्या काही काळापासून बोको हराम, इसिस आणि अल कायदा असा दहशतवादी संघटनांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. आताही नायजेरियात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे.
नायजेरियातील मालीनजीकच्या चोम्बान्गू आणि झारोंदारे नावाच्या दोन गावांमध्ये हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियाचे पंतप्रधान ब्रिजी राफिनी यांनी या दोन्ही गावांना भेट देऊन नागरिकांचं सांत्वन केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघानेही या दोन गावांसाठी तातडीची मदत पाठवली आहे.
सौजन्य : दैनिक सामना