देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी सध्या निधी संकलनासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 100 कोटी रुपयांचा निधी गोळा झाल्याची माहिती श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली. दरम्यान, नेमका कोणी किती निधी दिला याची सविस्तर माहिती येणे बाकी असल्याचे राय यांनी यावेळी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी श्री राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर श्री राम मंदिर जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे आयोध्या येथे राम मंदिराच्या कामांचा शिवधनुष्य हाती घेण्यात आला आहे. तर मंदिर निर्मितीच्या कामांत निधी गोळा करण्यासाठी ट्रस्टतर्फे 15 जानेवारीपासून विशेष संकलन मोहीम सुरू करण्यात आली असून ही मोहीम 27 फेबुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील अनेक नागरिक निधी देण्यासाठी पुढे सरसावले असून आतापर्यंत 100 कोटींचा निधी जमा करण्यात आला आहे.
यात गैर काय
राम मंदिराच्या उभारणीच्या कामासाठी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काही दिवसांपूर्वीच 5 लाख 100 रुपयांचा निधी सुपूर्द केला. यावरून बराच वादंग उभा राहिला असून यासंदर्भात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे विचारणा केली असता, यात गैर काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते हिंदुस्थानी नागरिक असून ते एक राम भक्त आहेत. तर देशात ज्यांना मदत करणे शक्य आहे, त्यांनी या उद्दात कामांसाठी मदत करण्यास हरकत नसल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
सौजन्य : दैनिक सामना