ज्येष्ठ लेखक अरुण काकतकर यांनी आपल्या ‘(घ)बाड’ या पुस्तकात दूरदर्शनवरील नोकरीच्या निमित्ताने भेटलेल्या थोर व्यक्तींच्या आठवणींचा खजिना खुला केला आहे. ‘इंद्रायणी साहित्य प्रकाशनाच्या या पुस्तकात मंगेशकरांच्या घरातील ‘तळवा’ असलेल्या सौ. भारती हृदयनाथ मंगेशकर यांचा त्यांनी करून दिलेला हा परिचय.
– – –
दृश्य १
रात्रीचा दीड वाजला होता… शरीर धर्मआचरणार्थ उठायला लागलं… बाहेर पावसाची मस्त तंद्री लागली होती… श्रावण धुंवाधार कोसळत होता… तर मी अंथरुणावर बसून होतो… दोन तास…
निरंजनानं विचारलं, ‘काही होतंय का तुम्हाला?’
‘नाही! छान आहे मी… डोक्यात चाललंय काहीबाही!’
‘झोपा मग! मी काही मध्यरात्री चहाबिहा करून देणार नाही हं…!’
दृश्य २
(काल्पनिक)
(प्रभुकुंज किंवा श्रीमंगेश..)
‘भारती… मी आज झोपतो आता! चालेल ना?’
‘अहो! फक्त साडेनऊ. जेवण झाल्याशिवाय? मला इतक्या लवकर स्वयंपाक करायची सवय कुठं लावलीये तुम्ही? कमीतकमी दीडपर्यंत जागे राहा… मग मी तुम्हाला गरमगरम जेवायला वाढतेय… दोन वाजता… आत्ताच कसले झोपता!’
तर मी काय म्हणत होतो… पाच बोटं अमृताची वगैरे ठीक आहे. पण ती पाच बोटं भरून ठेवायला एक तळवा लागतो… तळवा सांगत असतो की, ‘तुम्ही तुमचं काम करत राहा, तुमचे कर्मयोग करत राहा… पण तुम्हाला एकत्र धरून ठेवणं, काय हवं-नको ते बघणं हे माझं काम आहे.’ तर मंगेशकरांच्या घरात त्या पाच अमृताच्या बोटांना धरून ठेवणारा एक तळवा आहे आणि तो म्हणजे भारतीवहिनी…
आणि पण पाच बोटे अमृताची म्हणजे कशी… की त्यापैकी त्यातल्या चार ‘विश्वकीर्त नणंदा’ आणि… त्यांच्याहून सगळ्यात त्या घरातलं सर्जनशील माणूस याचा नवरा… तो त्यांचा नवरा…
पं. हृदयनाथ मंगेशकर… आणि दोन नणंदा अशा की ‘चंद्रमे जे अलांछन… मार्तंड जे तापहीन…’ असे स्वर ज्यांचे सोयरे आहेत अशा! म्हणजे.. म्हणजे पहिली देवघरातील चांदीचं निरांजन असतं ना… त्यात मंद तेवणारी, पावित्र्यात उजळणारी तुपाची वात असते तशी आणि दुसरी म्हणजे रंगपंचमी आणि तिसरी तर तिनं स्वतःचं क्षेत्र वेगळंच निवडलंय उषाताईंनी!
शिवाय प्रत्येकीमध्ये काहीतरी आणखी एक कला आहेच. दिदींना छायाचित्रणाची विलक्षण असोशी आहे.. उषाताई अप्रतिम पेंटिंग करतात.. बाळासाहेबसुद्धा चित्र काढतात… हे मला नंतर कळलं… आशाताईंचं पाककलेवर प्रेम! स्वयंपाक अत्यंत उत्तम करतात आशाताई. फारच… आणि मीनाताई त्यांच्या संसारात इतक्या मग्न आहेत… त्या म्हणजे परत एक आणखी कवच आहेत या कुटंबाचं… सगळ्या विश्वकीर्त नणंदा… आणि विश्वकीर्त नवरा यांना.. त्यांच्या सगळ्यांच्या आवडी-निवडी जपत… बरं ही सगळी कलाकार मंडळी आहेत… स्वतः मूक राहून गेली पन्नास वर्षं ही बाई त्या घरासाठी झटतेय, घरपण जपतेय.
म्हणजे स्वतः एकेकाळी मराठी रुपेरी पडद्यावरून प्रेक्षकांना हसून लोटपोट व्हायला लावणार्या, फार मोठ्या कलाकाराची… दामुअण्णांची मुलगी… ती स्वतः एक उत्तम अभिनेत्री… अनेक चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम केलेली. त्याच्यावरून मला आठवलं… की मी पार्ल्याला कॉलेजला होतो १९६२-६३ आणि १९६३-६४ अशी दोन वर्षं… तर माझ्या पुढे दोन वर्षं भारती होती…
कु. भारती दामुअण्णा मालवणकर, अन् ती वांद्र्याहून मोठ्या गाडीनं, तिच्या दोन-चार मैत्रिणींसह यायची कॉलेजला…
आणि मी मात्र चाळकरी मुलगा… मराठी अभिनेत्री म्हणजे फारच अप्रूप… मी अनिमिष नेत्राने बघतच राहायचो… तिने एकदा आमच्या कॉलेजच्या वाद्यवृंदात एक ऑर्केस्ट्रा होता… त्याच्यात एक परफॉर्मन्स केला होता….
तर.. तसे आम्ही एकाच कॉलेजचे. पण हीच भारती पुढे मी मंगेशकरांच्या घरात गेल्यानंतर भारती वहिनी झाली… सगळेजण मामी म्हणतात त्यांना… मी वहिनी म्हणतो…
भारती वहिनी कायम हसतमुख… भारतीला मी आत्तापर्यंत दुर्मुखलेली कधी बघितलीच नाहिये… अगदी खरंच सांगतो… आणि मी म्हटलं नं… मघाशी… ‘चंद्रमे जे अलांछन… मार्तंड जे तापहीन।’
मला असं वाटलं की…
ज्ञानोबांना, ७२५ वर्षांपूर्वी पडलेल्या स्वप्नाला जागं केलं मी..
काय होतं स्वप्न?
‘६३० वर्षांनंतर, दीनानाथांच्या घरी दोन माणकं जन्माला येणार आहेत.. त्यांचं वर्णन मला या पसायदानानं करायला हवं…’
देवघरातल्या रत्नजडित सुवर्ण निरांजनांतल्या तुपाच्या ज्योतीसारख्या, जनसामान्यांच्या काळजांतला झाकोळ वारून ते प्रकाशानं उजळून टाकणार्या स्वरांच्या दोन स्वामिनी… लता आणि आशा…
त्यांचं वर्णन करायला ज्ञानोबांच्या उक्तींतून ओवी प्रकटली..
‘चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन। ते स्वरस्वती कंठभान। सदा सोयरे होतु।।’
निरांजनातल्या ज्योतीच्या उजळाची एक तिरीप, जडवलेल्या एका हिर्याच्या अंतरंगातून परावर्तित होऊन आली तीच तर मुळी सप्तरंगी सप्तस्वरांत आणि बावीस श्रुतींत न्हाऊन..
आणि मग जमली जोडी.. लताच्या नादपावित्र्याची नि आशाच्या वाभर्या गोबर्या उडत्या झुलत्या झुलवत्या रंगपंचमीची…
स्वत्वाच्या प्रकाशतत्त्वानं अंतर्बाह्य उजळून, अलांछित झालेलं शशिबिंब, शीतळ पण बोचरं नसलेलं आणि प्रखर पण विखारविरहित भास्कर, तमारि..
हे वर्णन कोतंच ठरेल इतकं कांचनपुटी ल्यालेल्या कंठांचा… घरातच वावर आहे म्हटल्यावर, बाळासाहेबांच्या प्रतिभेचे पंख आभाळभर न विस्तारले तर नवलच…
पाहा ना! ‘माई माई, कैसे जिऊ री?’
कानांत घ्या हलकेच, स्मरणातून…
‘तुम बिन कैसे’नंतर मीरेला वाटलं, हरीला आपण फार कठोर स्वरांत विचारतोय..
म्हणून, द्विरुक्तीत बाळासाहेबांनी योजलेली स्वरावली सहज दाखवून जाते, ओशाळली मीरा…
तसंच, विराणीच्या अखेरीस…
‘माई माई’
‘ओ माई माई’
ही विरहव्याकूळ साद घालताना, मीरेचा क्लान्त कंठ त्याच स्वराचं कोमल रूप धारण करतो…
शब्दांच्या पलीकडला भाव समजावून घेत, त्याला साजेसं स्वरस्वरूप देणारा, बाळासाहेबांसारखा संगीतकार, म्हणूनच आजकाल अभावानेच आढळतो…
तर… या दोन नणंदांचे संसार अगदी शेजारीच…
म्हणजे मी बघितलंय की दोन फ्लॅट जोडलेले होते एकमेकांना आणि मध्ये माईची खोली म्हणजे माईंची खोली दोन्हीकडून उघडली जायची…
मी आणि बोधनी गेलो होतो… काहीतरी काम होतं.. दिदी माझ्या उजव्या बाजूला सोफ्यावर काटकोनात होत्या… शेजारी बाळासाहेब बसलेले होते, समोरच्या सोफ्यावर उषाताई बसल्या होत्या… मागे मीनाताई काहीतरी काम करत होत्या…. आणि थोड्या वेळाने आशाताईंच्या फ्लॅटमधून माईंच्या खोलीतून आशाताई त्या दरवाजात येऊन उभ्या राहिल्या…
पाच बोटे अमृताची आणि मध्ये आम्ही दोन भांबावलेली माणसं… त्याचवेळी दिदींनी त्यांच्या हातातल्या साखरेच्या गोळ्या घालून मला चहा ढवळून दिला.
जेव्हापासून मी त्यांच्या घरी जायला लागलो… पुण्यात श्रीमंगेशमध्ये किंवा कुठेही असो…. भारती वहिनींना जेव्हा कळलं की मला मधुमेह आहे, तेव्हापासून कधीही मला साखरेचा चहा आला नाही… चहाचा कप, त्याच्या बाजूला ठेवलेली साखरेच्या गोळ्यांची बाटली, हे कायम असायचं…
हे सगळं लक्षात ठेवण्याचं काय कारण आहे?… पण घरातल्या येणार्या माणसांना काय हवं, काय नको… याची नेमकी आठवण त्या ठेवतात… दिदी होत्या तेव्हा दिदींकडे येणारे पाहुणे…. म्हणजे अगदी राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून ते माझ्यासारख्या सर्वसामान्यांपर्यंत… अशी माणसांची ऊठबस घरात असते… आणि अशा सर्व माणसांचं आदरातिथ्य करणं हे सोपं काम नाहीये…. आणि ते ओठ घट्ट मिटून, चेहरा कायम हसतमुख ठेवून…
आणि या सगळ्यांत मुलांवर संस्कार… भारतीवहिनींनी मुलांवर एवढे चांगले संस्कार केलेत की ती मुलं मंगेशकर असूनही अगदी जमिनीवर आहेत… मध्ये एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. शेवटच्या रांगेत बसलो होतो… मंगेशकर रुग्णालयातच होता कार्यक्रम… बाळासाहेब गात होते… हा सगळा कार्यक्रम बघून मी थोडा भावविवश झालो होतो… मी कार्यक्रम संपल्यावर बाळासाहेबांना नमस्कार करायला पुढे गेलो… येताना आदिनाथनं मला बघितलं… माझी अवस्था बघून तो आला… आणि मला हाताला धरून बाळासाहेबांपर्यंत घेऊन गेला… आणि मग मला बाळासाहेब भेटले… हे सगळं कशासाठी…. कोण करतंय आजच्या काळात एवढं…? आपण बघतो; अर्ध्या हळकुंडानं पिवळी होणारी माणसंही नीट वागत नाहीत… शेवटी तो आदिनाथ मंगेशकर आहे… मंगेशकर हे मोठं नाव त्याच्यामागे आहे.
आणि ह्या बाईंनी बाळासाहेबांबरोबर किती आणि कुठे कुठे दौरे केलेत… बरं बाळासाहेबांचं गाणं संपली की दोन ते तीन तासांचा परतीचा प्रवास लगेच… कोकण, विदर्भ असो की मराठवाडा… या सर्व ठिकाणी कार्यक्रम संपला की लगेचच प्रवास… एवढा प्रचंड प्रवास वहिनींनी त्यांच्याबरोबर केला आहे… सगळ्या काळात घराकडेही तेवढंच लक्ष देऊन त्यांनी बाळासाहेबांना साथ दिली आहे… आता ती जबाबदारी थोडीशी राधानं स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे… भारतीवहिनींची पंचाहत्तरी झालीये आणि त्यांच्या आवाजात एवढा गोडवा आहे की कधी कधी प्रश्न पडायचा की फोनवर दिदी बोलताहेत की वहिनी?… आणि एकच गोंधळ व्हायचा.
धक्कातंत्र तर हे मंगेशकरांच्या बाबतीत कायमच असतं… मागे दोन-तीन वर्षांपूर्वी माझी माझी पत्नी सौ. निरंजना ही मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक भारतीवहिनी तेथे आल्या… आम्हाला अपेक्षाही नाही की इतक्या मोठ्या व्यक्तीनं आपली विचारपूस करावी… पण तरीही… त्या खूप काळजीनं, आपलेपणाने आल्या… त्यांची ती भेट खूप ऊर्जा देऊन गेली…
१९७७-७८ मध्ये मी गोव्याला जाऊन मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या काही सहकार्यांचं चित्रीकरण केलं होतं! काही आठवणी त्यांच्या सहकार्यांनी सांगितल्या होत्या… फिल्म इन्स्टिट्यूटची तांत्रिक सुविधा या चित्रीकरणासाठी मिळाली होती… मी स्वतः ते सगळं चित्रीकरण केलं होतं आणि त्या सगळ्या टेप्स वर्षानुवर्षं फिल्म इन्स्टिट्यूटच्या संग्रहालयात पडून होत्या; त्या मिळवण्यासाठी जवळजवळ पाच ते सहा वर्षं दिदींच्या सहीनिशी संचालकांशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्या आमच्या ताब्यात संचालकांनी दिल्या. याचं कारण असं होतं… की त्या टेप्स प्लेबॅक करण्याचं जे मशीन होतं ते फिल्म इन्स्टिट्यूटने भंगारमध्ये काढलं होतं… आणि ते देशात कठंही उपलब्ध नव्हतं… त्या सगळ्या टेप्स ताब्यात घेऊन लंडनला कोलीन म्हणून एक गृहस्थ आहेत… त्यांच्याकडे ही प्लेबॅकची सामग्री होती, त्यांच्याकडे त्या पाठवायच्या होत्या.
तेव्हा भारतीवहिनी स्वतः माझ्याबरोबर आल्या. त्यांनी त्या संचालकांना विनंती केली. त्याच्यानंतर १५ दिवसांनी त्या टेप्स मिळाल्या. सुरेश भागवतांच्या बरोबर त्या सगळ्या टेप्स लंडनला पाठवायची व्यवस्था केली… आणि तिथून त्या डिजीटाइज करून त्याच्या डीव्हीडी इथे पुण्यात आम्हाला मिळाल्या. सगळा खर्च दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानने केला होता… आणि ते सगळं करून घेण्यात जो पुढाकार घेतला होता तो भारतीवहिनींनी घेतला…
चित्रीकरणात फार महत्त्वाची व्यक्ती आहेत गणपतराव मोहिते. याचं जवळ जवळ दोन तासांचं, तर ज्योत्स्ना भोळे याचं जवळजवळ तासभराचं चित्रण आहे. त्याच्यात त्या काही बंदिशी पण त्या गायल्या आहेत. रामनाथ म्हणून एक गोव्याचे गायक होते. त्यांनी दीनानाथांची काही पदं गायली आहेत. दीनानाथ आणि अभिषेकीबुवांचे वडील यांच्या काही अप्रतिम आठवणी त्यात आहेत. हा सगळा दुर्मीळ संग्रह आपल्यासोबत आहे तो केवळ भारतीवहिनी यांच्यामुळेच. त्यांनी या गोष्टींचं मोल जाणलं म्हणून हा अनमोल ठेवा आज आपल्यात आहे…
गदिमा प्रतिष्ठानचा स्मृतिदिन पुरस्कार सोहळा… या कार्यक्रमाला पुण्याच्या चैत्राली अभ्यंकर उपस्थित होत्या. त्यांनी ह्या कार्यक्रमात घडलेल्या एका हृदयस्पर्शी क्षणाचं वर्णन नंतर मला आठवणीने पाठवलं ते जसंच्या तसं मी खाली नमूद करीत आहे…
”टिळक स्मारक मंदिर गच्च भरलेलं… प्रेक्षकांमध्ये मी बसले होते आणि रंगमंचावर अर्थातच मान्यवर पुरस्कारार्थी आणि
प्रतिष्ठानचे सगळे विश्वस्त बसले होते. दरवर्षीप्रमाणे विद्याताईंच्या नावाने दिल्या जाणार्या गृहिणी-सखी-सचिव पुरस्काराच्या यंदाच्या मानकरी होत्या सौ. भारती हृदयनाथ मंगेशकर… आहाऽऽ नाव वाचतानाही अक्षरांच्या मागे स्वरांनी पंख पसरल्यासारखं वाटलं… हलक्या फिकट पिवळसर रंगाचा जरीकाठ असलेली रेशमी साडी, दोन्ही खांद्यांवरून पदर, मोठं लाल कुंकू… असं खानदानी व्यक्तिमत्त्व समोर बसलेलं होतं, भारतीताईंबद्दल मला कायमच एक कुतूहल-आदर-प्रेम वाटत आलंय.. का? असं शब्दात नाही सांगता येणार. पण ती भावना खूप वेगळी आहे हे मात्र खरं.
निवेदक सिद्धार्थ बेंद्रे यांनी पुरस्कार देण्यासाठी नाव जाहीर केलं, भारतीताई जागेवरून उठल्या आणि व्यासपीठावरील संपूर्ण आसन व्यवस्था ओलांडून प्रमुख पाहुण्यांच्याही समोरून थेट उजव्या कोपर्यात उभ्या केलेल्या गदिमांच्या प्रतिमेपाशी गेल्या, वाकून नमस्कार केला आणि मग पुरस्कार घेण्यासाठी वळल्या. व्यासपीठावरील एकाही व्यक्तीच्या हे लक्षात आलं नाही. पण भारतीताईंनी ती कृती केली…
पुरस्कार काय आणि कुठला याहीपेक्षा तो ज्यांच्या नावांनी किंवा कारणांनी मिळतोय त्याचा मान मोठा असतो असं मला वाटतं आणि म्हणून भारतीताई प्रतिमेच्या पाया पडल्या… संस्काराला संस्कार म्हणतो ते यापेक्षा मोठे आणि वेगळे नसावेत.
भाषणासाठी माईक समोर आलेल्या आणि क्षणभर थांबल्या… मनात काय उलथापालथ झाली असेल, क्षणभर थांबून म्हणाल्या, ‘काय बोलू? १९७३ नंतर आज रंगमंचाची पायरी चढल्ये… माझ्या चार नणंदा, माझी मुलं, भाचरं आणि आमचे हे… यांतच आयुष्य गुरफटून गेलं… पण आज पाठीमागे बघताना प्रचंड समाधान वाटतंय…’ पुढं काहीही न बोलता दीदींविषयी भरभरून बोलत राहिल्या भारतीताई…
पुढे कितीतरी वेळ प्रेक्षागृहात टाळ्या वाजत होत्या, पण माझे हात मात्र जोडलेले ते जोडलेलेच राहिले होते…