जनाई मुक्ताई नेसली रेशमी लुगडी ।
रिंगणामध्ये कान्होबा खेळतो फुगडी ।।
अशा पद्यावर आता फुगड्या रंगल्या असत्या, एखादे रिंगण पार पडले असते. टाळमृदंगाच्या तालाने अवघे अवकाश दुमदुमून गेले असते. पण कोरोनाने आषाढी वारीवर मर्यादा आल्याने वारकरी आपल्या घरातूनच त्या सावळ्या विठूरायाला आळवीत आहेत. तरीही पंढरीच्या वाटेवरून चालताना विवेकी विचारांचा केला जाणारा जागर तर करावाच लागेल!
—-
कोरोनाचे संकट नसते तर आषाढी वारीच्या दिंड्यांचा अर्धा प्रवास पार पडला असता. ‘या रे नाचू प्रेमानंदे। विठ्ठल नामाचिया छंदे।’ अशी साद वारकर्यांनी एकमेकांना घातली असती. मग विचारांचा जागर मांडत किचकट कर्मकांडाना अलगद बाजूला सारून विवेकाच्या वाटेवरील निरंतर चालण्याची दिशा दाखविली गेली असती.
संतपरंपरेपूर्वी समाज किचकट कर्मकांडामध्ये रुतला होता. त्या दलदलीत तो अधिकाधिक रुतत जाईल अशी ग्रंथरचना केली जात होती. रामदेवराय यांचा प्रधान हेमाद्रीपंत याने ‘चातुर्वर्ण चिंतामणी’ हा लिहिलेला ग्रंथ हा त्या कटाचाच भाग होता. या ग्रंथात हजारो कर्मकांडाचा तपशील देऊन त्याचे आचरण करण्याचा धाक निर्माण केला होता. त्याच सुमारास संत चळवळ उदयास आली आणि त्यांनी किचकट कर्मकांडाना सोप्या नामसाधनेचा पर्याय दिला.
संताच्या प्रबोधन चळवळीपूर्वी पुण्याची लालूच आणि पापाचा धाक दाखवून समाजाचे शोषण केले जात होते. पुण्य मिळविण्यासाठी आणि पाप घालविण्यासाठी किचकट कर्मकांडं सांगितली होती. म्हणजे ज्यांच्याकडे आर्थिक बळ आहे त्यांनी यज्ञ करावा, ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही पण शारीरीक बळ आहे, त्यांनी तपश्चर्या करावी. ज्याच्याकडे आर्थिक किंवा शारीरिक बळ नसेल त्यांनी तीर्थयात्रा करावी. यज्ञ हे अत्यंत खर्चिक आणि किचकट असे पुण्य मिळविण्याचे साधन होते. त्यात हत्तीच्या सोंडेएवढी तुपाची अखंड धार, पशूंचे बळी, दुर्मिळ वृक्षांच्या लाकडाच्या समिधा द्याव्या लागत होत्या.
यज्ञासारख्या अत्यंत कठीण आणि खर्चिक साधनेला वारकरी संप्रदायाने नामसाधनेचा सोपा पर्याय दिला. नामसाधनेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी बहुतेक संतांनी हरीपाठ लिहिला. त्यातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरीपाठ तर वारकर्यांनी रोज म्हटला पाहिजे, असा अलिखित नियमच झाला. नित्यनेमाने गायल्या जाणार्या या हरीपाठात ज्ञानेश्वर महाराज यांनी स्पष्ट शब्दांत यज्ञ करून कुणालाही सिद्धी प्राप्त होत नाही, उलट अहंकार होतो, असे सांगून एका अर्थाने समाजाला यज्ञापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. माऊली म्हणतात-
योग याग विधी येणे नोहे सिद्धी ।
वायाची उपाधी दंभ धर्म ।
यज्ञ करायचा नाही, मग पुण्य कसे मिळणार? असा लोकांना प्रश्न पडू नये म्हणून महाराजांनी हरीपाठाची टॅगलाइनच लिहिली.
हरी म्हणा हरी मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ।
म्हणजे यज्ञासारखे किचकट कर्मकांड बाजूला सारून नुसतं देवाचं नाव घेतलं तरी इतके पुण्य मिळेल की त्याचे मोजमापही करता येणार नाही. म्हणजे यज्ञयागासारख्या कर्मकांडांना टाळून भगवंताचे फक्त नाम घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला.
लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होईल की पुण्य मिळाले पण मोक्ष कसा मिळेल? याचे उत्तर तुकाराम महाराज देतात-
मुखी नाम हाती मोक्ष
ऐशी साक्ष बहुतांची
म्हणजे मोक्ष मिळण्यासाठीसुद्धा यज्ञासारख्या किचकट विधीमध्ये अडकण्याची गरज नाही. फक्त नामाचा उच्चार करा मोक्ष मिळेल, असा विश्वास दिला.
पुण्य मिळविण्याचा मार्ग मिळाला, मोक्ष मिळविण्याचा मार्ग मिळाला, पण आम्ही संसारी माणसे आहोत आमच्याकडून काही पाप झाले असेल तर ते जाळण्यासाठी तरी यज्ञाचा मार्ग स्वीकारावा, असा विचार लोकांच्या मनात येऊ शकतो. म्हणून पुढे हरीपाठामध्येच ज्ञानेश्वर महाराज लिहितात-
हरी उच्चारणी अनंत पाप राशी
जातील लयाशी क्षणमात्रे
भगवंताचे नाम घेतले तर पापाच्या राशी लयाला जातील, असा विश्वास त्यांनी भक्तांना दिला.
सामान्य लोकांच्या मनात कायम पापाची भिती दाखवून समाजाचे शोषण करणारी यंत्रणा सतत कार्यरत असते. ते कदाचित प्रश्न निर्माण करतील की, ज्ञानेश्वर महाराज पापाच्या राशी जळतील, असे म्हणाले आहेत. पण तुमचे पाप हे डोंगराएवढे आहे. त्यामुळे ते जर जाळायचे असेल तर यज्ञच करावा लागेल. त्याला संत सेना महाराज यांनी उत्तर दिले आहे. महाराज लिहितात-
घेता नाम विठोबाचे
पर्वत जळती पापाचे
पण त्याही पुढे प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो की या जन्मातलं पाप जळालं, पण मागच्या जन्मातील पापाच्या नाशासाठी तरी यज्ञ करावा का?
तुकाराम महाराज मागच्याच नव्हे तर अनंत जन्मातील पापे जाळण्यासाठी सोपे साधन सांगतात…
नाम संकीर्तन साधन पै सोपे
जळतील पापे जन्मांतरीची
पुण्य मिळाले. पाप जळाले. पण देव कसा भेटेल? याचे उत्तरही तुकाराम महाराजांनी दिले आहे. आणि ते कोरोनाच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे.
ठाईच बैसोनी करा एक चित्त
आवडी अनंत आळवावा
न लगती सायास जावे वनांतरा
सुखे येतो घरा नारायण
म्हणजे पुण्य मिळवून देण्याचे अमिष दाखवून, पाप जाळण्याची आशा लावून यज्ञयागादी कर्मकांडात अडकवून समाजाचे शोषण केले जात होते. त्याला भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय वारकरी संतांनी दिला. पण काही लोकांची अपेक्षा असते की आम्हाला यज्ञाचेच पुण्य पाहिजे, तेव्हा संत सांगतात-
राम म्हणता वाटचाली ।
यज्ञ पाऊला पाऊली ।।
पंढरीची वारी ही भगवंताच्या नामाचा गजर करीत चालत असल्यामुळे आपल्या प्रत्येक पावलावर यज्ञ होत आहे, असे समाधान वारकर्याला मिळते.
संतपरंपरेतील या विवेकाचा जागराला अधिक चालना देण्याचे काम स्त्री संतांनी केले. संत परंपरेत मोठ्या प्रमाणात महिला सामील झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या महिला संत ज्या परिस्थितीतून आल्या आणि त्यांनी जे उत्तुंग काम केले त्याचा नुसता विचार केला तरी थक्क होऊन जायला होतं. आता संत जनाबाईचेच पहा ना! जनाबाईंचं कूळ कोणतं? त्यांचे आई-वडील श्रीमंत होते काय? तर नाही. जनाबाई ही आई-वडिलांशिवाय पोरकी झालेली आणि संत नामदेव महाराजांचे वडील दामाजी यांच्या घरी वाढलेली एक अनाथ मुलगी होती. शेवटपर्यंत ‘नामयाची दासी’ म्हणून ती दामाजी यांच्या घरीच राहिली. एका धुणीभांडी करणार्या दासी महिलेला संतपदी विराजमान करण्याचे औदार्य दाखविणारं जर कोण असेल तर ती संतपरंपरा आहे. दुसर्या आमच्या सोयराबाई. तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार त्या अस्पृश्य समाजात जन्माला आलेल्या. त्यामुळे त्यांना गावकुसाबाहेर राहावे लागत होते. त्या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. त्यावेळच्या समाजव्यवस्थेप्रमाणे चोखामेळा यांना गावात वावरायला बंदी होती. मंदिरात जायची बंदी होती. तरीही त्या संत होऊ शकल्या. एखाद्या वेळी गावात राहून धुणीभांडी करणारी, दळणकांडण करणारीबद्दल मनात आपुलकी निर्माण होईल, गावकुसाबाहेर राहणारीबद्दल आपुलकी निर्माण होईल, पण महिलांचा एक घटक असा आहे, ज्याबद्दल समाजाला कधीच उघडपणे आपलेपणा वाटणार नाही. तो घटक म्हणजे वेश्या! अशा समाजातून तिरस्कारणीय असलेल्या वेश्येची मुलगी कान्होपात्रा संतपदी पोहचते, ही खरी क्रांती म्हणावी लागेल.
संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई पाठक या उच्चकुळात जन्माला आल्या असल्या तरी दोघींनाही तत्कालीन विषमतावादी समाजव्यवस्थेचा खूप त्रास सहन करावा लागला. तरीही सर्व परिस्थितीवर मात करून त्या संत चळवळीत सहभागी झाल्या. तिथे त्यांना समनतेचा अधिकार देण्याचे काम संतपरंपरेने केलेले आहे. स्त्रियांना संधी मिळते तेव्हा त्या कर्तृत्व सिद्ध करून दाखवतात. संतपरंपरेतील या महिला संतांना दिलेल्या समतेमुळे त्यांनी उत्तुंग कार्य केल्याचे दिसते. अर्थात त्यांना तत्कालीन समाजातील विषमतावादी प्रवृत्तीकडून प्रचंड त्रास झाला तरी त्या विरोधाला धीराने सामोरे जात त्यांनी संतांचा समतावादी, विवेकवादी डोळस विचार पुढे घेऊन जाण्यासाठी धीराने पाऊले टाकलेली दिसतात.
त्यातील काही उदाहरणे वानगीदाखल पाहू.
जनाबाईंचे वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई यांनी एका वर्षामध्ये समाधी घेतलेली. संत गोरोबा कुंभार आणि संत सावता महाराज यांचे वयपरत्वे निधन झालेले. नामदेव महाराज हे संतांचा समतेचा विचार घेऊन देशभ्रमण करायला निघालेले. त्यांनी त्यांचा मोठा कालखंड पंजाबमध्ये व्यतीत केला. नामदेव महाराज पंजाबमध्ये असताना पंढरपूरच्या वाळवंटातील वारकर्यांना सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संत जनाबाईंनी केलेलं आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की एखादी स्त्री अशा प्रकारचे काम करू लागली तर ते पुरुषसत्ताक परंपरेला सहजासहजी सहन होत नाही. जनाबाई धीराने कीर्तन, भजन, अभंग रचनाच्या माध्यमातून वारकरी परंपरा वाढविण्याचे काम करत होत्या. एक स्त्री वारकर्यांचे नेतृत्व करते आहे, हे पुरुषसत्ताक व्यवस्थेला सहन होण्यासारखे नव्हते. पण जनाबाईचं काम इतकं नेक होतं की त्यावर काही आक्षेपही घेता येत नव्हता. स्त्रीच्या कर्तृत्वावर जेव्हा आक्षेप घेता येत नाही, तेव्हा तिला कमी लेखण्यासाठी तिच्या राहणीमानावर बोट ठेवून चारित्र्याबाबत संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जनाबाईंच्या बाबतीत तेच झाले. जनाबाईला बदनाम करण्यासाठी काही लोक म्हणू लागले, ‘काय ही जनाबाई! बाजारात जाते, डोक्यावरून पदर घेत नाही, तिला पदराचं भान नाही’. अशा लोकांना जनाबाईंनी थेट सांगितलं, केवळ पदर सांभाळण्याची नाही तर वारकरी संप्रदाय सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर नामदेव महाराजांनी सोपवली आहे. ती मला अधिक महत्वाची वाटते. म्हणून यापुढे तर मी डोक्यावरचा पदर खांद्यांवर टाकून भरल्या बाजारातून जाईल…
डोईचा पदर आला खांद्यावरी ।
भरल्या बाजारी जाईल मी ।।
अशी थेट भूमिका संत जनाबाईंनी घेतली. जेव्हा राहणीमानावर शंका घेऊन जनाबाईला नामोहरम करता येत नाही, असे लक्षात आले तेव्हा तिच्या व्यक्त होण्याच्या स्वतंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला. तुला अभंग लिहिण्याचा, कीर्तन करण्याचा अधिकार नाही, असे सांगून तिच्या प्रबोधन चळवळीलाच थांबविण्याचे कारस्थान रचले गेले. एवढा विरोध पाहून एखादी लेचीपेची स्त्री सरळ सगळं सोडून घरात बसली असती. पण जनाबाईंची भूमिका इतकी तकलादू नव्हती. त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी व्यवस्थेला ठणकावून सांगितले-
हातामध्ये टाळ खांद्यावरी वीणा ।
आता मज मना कोण करी ।।
‘अरे! मी भजनासाठी हातामध्ये टाळ घेतलेला आहे, कीर्तनासाठी खांद्यावर वीणा घेतलेली आहे, मला मनाई करणारे तुम्ही कोण आहात?’
तत्कालीन स्त्रियांना कमी लेखणार्या व्यवस्थेविरोधात लढा देत असतानाच इतर स्त्रियांच्यामध्ये आत्मभान जागृत करताना जनाबाई म्हणतात-
स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास ।
साधु संत ऐसे केले जनी ।।
पंढरपूरच्या वाळवंटात उभ्या राहिलेल्या संतपरंपरेने महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा अधिकार दिला, ही केवढी क्रांती होती? महिला संतांना वारकरी संप्रदायात बरोबरीचा अधिकार मिळाल्यानंतर या महिलांनी जे विचार मांडले ते अत्यंत धाडसी होते. महिलांच्या मासिक पाळीबद्दल आजही पवित्र-अपवित्र अशा संकल्पना मांडल्या जातात. पण सातशे वर्षांपूर्वी संत सोयराबाईंनी स्त्रियांच्या या विटाळाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाने तत्कालीन धर्ममार्तंडांना निरुत्तर केले होते. त्या लिहितात-
देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला ।
सोवळा तो झाला कवण धर्म ।।
विटाळावाचोनी उत्पत्तीचे स्थान ।
कोण देह निर्माण नाही जगी ।।
विटाळच उत्पतीचे स्थान असून तो नसेल तर देहाची उत्पत्तीच होऊ शकत नाही, हा त्यांनी उपस्थित केलेले मुद्दा सोयराबाई किती विज्ञानवादी होत्या हे सिद्ध करतो. त्यांचे हे धाडसी विचार आजही विचार करायला लावणारे आहेत.
मुक्ताबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, निर्मळा यांनी अभंगातून मांडलेले विचार आजही तितकेच टवटवीत आहेत. मुक्ताबाईचे तर वारकरी संप्रदायावर खूप मोठे उपकार आहेत. मुक्ताबाई नसत्या तर ज्ञानेश्वरीच लिहून होऊ शकली नसती. आळंदीतील कर्मठांनी ज्ञानेश्वर महाराजांचा छळ केला. त्यांनी भिक्षा मागून आणलेले पीठ हिसकावून मातीत मिसळले. तेव्हा उद्विग्न होऊन ज्ञानेश्वर महाराज झोपडीची ताटी लावून बसले. केवळ संन्याशाची मुलं म्हणून विषमतावादी क्रूर व्यवस्थेकडून होणारा छळ सहन न होऊन ज्ञानेश्वर महाराजांनी या जगाशी कायमचा संबंध संपवून टाकण्याचा निर्धार करून ताटी बंद केली होती. तेव्हा मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांची समजूत काढली. ती काढण्यासाठी मुक्ताबाईंनी जे ताटीचे अभंग लिहिले त्यात खर्या संतांची लक्षणे सांगितलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांना मुक्ताबाई सांगतात,
विश्व रागे झाले वन्ही ।
संती सुखे व्हावे पाणी ।।
शब्द शस्त्रे झाला खेद ।
संती मानावा उपदेश ।।
संपूर्ण विश्व रागाने आगीसारखे तप्त झाले असेल तर संतांनी पाण्यासारखे शीतळ झाले पाहिजे. कठोर शब्दामुळे मनाला खेद होत असेल तर संतानी तो उपदेश समजावा. अशी समजूत घालून दया क्षमा ज्याच्या अंगात आहे त्यालाच संत म्हणावे, असे मुक्ताबाई म्हणतात. संत कुणाला म्हणू नये हे सांगताना मुक्ताबाई लिहितात-
वरी भगवा झाला नामे ।
अंतरी वश केला कामे ।।
त्याशी म्हणू नये साधू ।
जगी विटंबना बाधू ।।
केवळ नावाला भगवे कपडे घातले असतील आणि अंतःकरणात कामाने वश केलेला असेल तर त्याला साधू म्हणू नये.
आपण सुखसागर होऊन बोधाने जगाला निववावे, असे सांगून ज्ञानेश्वर महाराजांना ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ अशी साद घालतात.
लहानग्या मुक्ताबाईने विवेक जागा केल्याने ज्ञानेश्वर महाराजांनी झोपडीचा दरवाजा उघडला. पुढे समाजात अखंड ज्ञानगंगा प्रवाहित राहील अशी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरीपाठ ही साहित्यरचना केली.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या संत बहिणाबाई शिवूरकर यांनी तर-
संत कृपा झाली ।
इमारत फळा आली ।।
या अभंगाद्वारे वारकरी संप्रदायाचे डॉक्युमेंट करून ठेवलेले आहे.
केवळ स्त्रिया म्हणून महिलांना जी दुय्यम वागणूक दिली जात होती, ती दूर करून संतचळवळीने त्यांना बरोबरीचे स्थान दिले. पंढरीच्या वारीत ही स्त्री-पुरुष समतेची पताका अधिकच डोलाने फडकताना दिसते.
– ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि वारकरी परंपरेतील नामांकित कीर्तनकार आहेत)