नरेंद्र मोदी
नवी संसद सबकुछ मोदी
राष्ट्रपतींना विचारतो कोण
माझी छाप उमटवणारा
माझ्याशिवाय आहेच कोण?
निमंत्रणही नाही धाडले
झाला तर मग नसता फांदा
अट्टहास हा माझ्याचसाठी
करू कशाला माझाच वांदा
कोनशिलेवर नाव चमकले
राजदंडही आला हाती
मजला नाही पर्वा कुणाची
जरी मूल्यांची झाली माती
—– —–
राहुल गांधी
कर्नाटकच्या पराभवावर
संसदेचा हा नवा उतारा
कारण नसता खटाटोप हा
चमकोगिरीचा सर्व पसारा
समजून राज्याभिषेक ज्यांनी
संत महंतही केले गोळा
राष्ट्रपतींना वगळून केला
घटनेचाही चोळामोळा
विरोधकांनी धडा शिकवला
तरीही कुठे ती गेली अक्कल
अहंकार हा झाला वरचढ
साष्टांगाची ढोंगी नक्कल
—– —– —–
एकनाथ शिंदे
मोदींना जो नडेल त्याला
मोदी देतील जमालगोटा
किती करू मी पूजा त्यांची
नको दिसूं दे माझा मुखवटा
मोदी तर रेचक व्यापारी
रेचक घेता पळे बिमारी
पोटदुखीवर जालीम औषध
गुण आल्यावर कळे हुशारी
भाजपमधल्या किती नेत्यांना
दिलाय त्यांनी जमालगोटा
कायमची ती गेली कटकट
घरी बसले ते मोजत नोटा
—– —– —–
दीपक केसरकर
एक राज्य एक गणवेश
किती दिवस होते मनात
शाळांपासून करू सुरुवात
पुढचे नंतर सांगू कानात
आम्ही नाही घातला गणवेश
काहीही घालून शाळेत गेलो
विसंगती मग येई जीवनी
एकात्मतेचे सरबत प्यायलो
पालकांच्या माथ्यावर ओझे
पडते डब्बल आहे माहीत
निर्णय केला कसा अचानक
नव्हतो का मी तेव्हा शुद्धीत?
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
कोण म्हणाले आम्ही देतो
सापत्नभावाचीच वागणूक
गजाननाला स्मरून सांगतो
नाही करत आम्ही छळवणूक
ते तर तसे नाही म्हणाले
जरी टीव्हीवर पाहिले तुम्ही
तुमचा टीव्हीच खोटा आहे
छाती ठोकून सांगतो आम्ही
कसं तुम्हाला पटवून देऊ
भाजप आमची निर्मळ पार्टी
कोणालाही घेते सामावून
असली जरी ती बिनडोक कार्टी