प्रेरणा देणे आणि घेणे हे दोन्हीही स्वस्त झाले आहे. किमान ज्ञानावर कमाल प्रेरणा देणार्यांचा सुकाळ आहे. कुठल्यातरी मोठ्या माणसाची प्रेरणादायी गोष्ट सांगायची, टाळ्या मिळवणारे मुद्दे मांडायचे यातून जर प्रेरणा मिळाली असती तर जग केव्हाच बदलले असते. मोटिव्हेशन वा प्रेरणा ही अफूची किंवा व्हिटॅमिनची गोळी आहे का, उचलली आणि दिली. घेणार्यानेसुद्धा ती घेतली आणि लगेच त्याचे आयुष्य बदलले?
– – –
‘आता आपले प्रमुख पाहुणे एकदम मोटिव्हेशनल भाषण करतील,’ असं म्हणत एका प्रमुख पाहुण्याला भाषणासाठी आमंत्रित करण्यात आले. मला अशी प्रेरणादायक भाषणे ऐकायला फार आवडतात. त्यामुळे शहरात असा काहीही कार्यक्रम असला की मी अजिबात चुकवत नाही. मग कुठल्या राजकीय नेत्याचं प्रेरणादायक भाषण असो, आमच्या ऑफिसात एखादं प्रेरणादायक ट्रेनिंग आयोजित केलेलं असो किंवा सार्वजनिक सभेत एखाद्या व्याख्यात्याला प्रेरणा द्यायला बोलावलं असो; मी सगळीकडे आवर्जून जाते. हे सगळं ऐकलं की आपल्याला केवढी तरी प्रेरणा मिळते.
मला तर खरं असं वाटतं की अशा कार्यक्रमांमुळे आणि इतरांनी दिलेल्या प्रेरणेनेच आपलं आयुष्य गतिमान आहे. हे लोक केवढं काही प्रेरणादायक सांगतात, एवढं ‘मोटिव्हेशन’ देतात की विचारता सोय नाही.
मागे एका कार्यक्रमात एका व्याख्यात्याची ओळख करून देताना सूत्रसंचालकाने सांगितले, ‘आता आपण अमुक तमुककडून प्रेरणा घेऊ या. ते एवढी प्रेरणा देतील आणि कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही इतके कार्यतत्पर झालेले असाल की कार्यक्रमाच्या शेवटाची वाट न बघता काम करण्यासाठी धावाल.’ हे मात्र संचालक तंतोतंत खरं बोलले. कार्यक्रमाच्या शेवटी हॉल रिकामा झालेला होता.
काही काळापूर्वी मला एका कार्यक्रमात एक गृहस्थ भेटले. ते काय करतात असे विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, मी मोटिव्हेशन देतो. तुम्ही एकदा माझ्या कार्यक्रमाला याच. अशी प्रेरणा देईन की ज्याचं नाव ते.
मी : या आधी तुम्ही कुठे कुठे अशी प्रेरणा दिलेली आहे?
गृहस्थ : आमच्या तुंगारवाडी गावच्या पतपेढीत मी अशी भाषणे दिलेली आहेत. लोकांना एवढी प्रेरणा मिळाली की त्यांनी त्वरित पतपेढी बंद करून ती शहरात हलवण्याचा निर्णय घेतला. मलादेखील तोपर्यंत मी अशी काही जादू करू शकतो याची कल्पना नव्हती.
असे प्रेरणा देऊन जादू करणारे लोक आजूबाजूला असायलाच हवेत म्हणून प्रेरणेची गरज असलेल्या आणि माझे उधारीचे पैसे तुंबवलेल्या कित्येक मित्रांचे नंबर मी या गृहस्थांना देऊन टाकले. तेवढीच आपली लोकसेवा.
आधीच्या काळी जेव्हा फारशी आधुनिक साधने नव्हती, तेव्हा लोकांचे किती नुकसान झाले याची त्यांना कल्पना नाही. म्हणजे आता कसे प्रेरणा हवी असल्यास लगेच एखादे यूट्युबवरचे भाषण, पॉडकास्ट, टेड टॉक वगैरे ऐकता येतं. गेला बाजार रोजचा प्रेरणेचा मेसेज पाठवणारे तर कित्येक परिचित आहेत.
‘आत्मसन्मान ही विकाऊ किंवा गहाण ठेवण्याची वस्तू नसून जो तिच्यापासून फारकत घेतो, तो लाचारीचे जिणे जगत असतो,’ असा प्रेरणादायक मेसेज मला आमच्या विभागाच्या आमदाराने त्याचा पक्ष बदलला त्या दिवशी पाठवला.
‘छान मेसेज’ अशी प्रतिक्रिया देखील मी नोंदवली, तर त्याने लगेच उत्तर दिले, चुकून हा मेसेज गेला. आजचा मेसेज खरं तर पुढीलप्रमाणे होता, अगतिकता जेव्हा जेव्हा जीविताचा अविभाज्य भाग बनते, तेव्हा प्रत्येक वेळी तडजोड केल्याशिवाय पर्याय नसतो. या मेसेजनंतर तर माझा या आमदार महाशयांविषयीचा आदर दुणावला. प्रामाणिकपणाविषयीची प्रेरणा त्यांच्याकडूनच घ्यावी असे मी मनोमन ठरवून टाकले.
रोजच प्रेरणादायी मेसेज पाठवणार्या मित्रांची तर मी वेगळीच यादी केलेली आहे. रोजचा सकाळचा तासभर मी असे मोटिव्हेशन देणारे मेसेजेस वाचण्यात घालवते आणि मग इकडची प्रेरणा तिकडे ढकलण्यात पुढचा तासभर घालवते. यात आमचा भाजीवाला, दूधवाला, कामवाल्या मावशी, प्लम्बर, कचरा उचलणारा पोर्या अशा कित्येकांचा ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केलेला आहे. त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या अंध:कारमय आयुष्याला काळ्या गर्तेतून बाहेर काढून प्रकाशाची शलाका दाखवणे हे मी माझे कर्तव्य समजते.
आमचे खानदानी महाराज देखील मला रोज एक मेसेज पाठवतात. माझ्या तेहतिसाव्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि मेसेज पाठवला, संसारी माणसाने शक्य होईल तेव्हा, किमान साठीनंतर, आयुष्यात एक तप सलग ईश्वरसाधनेसाठी राखून ऊर्ध्वगती मिळवण्याची सोय केली पाहिजे. महाराज मागच्या वर्षी साठ वर्षांचे झाले आहेत आणि त्यांच्या बत्तीस वर्षीय पत्नीला दोन महिन्यांपूर्वी तिसरा मुलगा झाला आहे. त्याचे नामकरण काय केले असे मी उत्तरादाखल महाराजांना विचारणार होते, पण अशाने त्यांचे प्रेरणादायी मेसेजेस बंद होतील की काय या भीतीने मी तसे करण्याचे टाळले.
मला तर वाटते की व्यसनी लोक, निराशेने ज्यांना घेरले आहे असे लोक, संसारात पिचलेले लोक, कार्यालयीन काम करून ज्यांचे आयुष्य निरस झालेले आहे असे लोक, यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्हाटसप्प, फेसबुक यावर विशेष लक्ष दिले गेलेले आहे. असे प्रेरणादायी मेसेजेस बनवणे ही सोपी गोष्ट नव्हेच. कितीतरी हजरजबाबीपणा त्याकरिता असावा लागतो. ऋतू आणि इतर विषयातील सामान्य ज्ञान असावे लागते. अन्यथा असे मेसेजेस बनवणार कसे?
उन्हाळा आला की पक्ष्यांना पाणी घाला, हिवाळ्यात एका तरी गरजूला गोधडी द्या, कारमधून जाताना भुकेल्याला बिस्किटे खायला घाला, ओझोनचा थर अजून खराब होऊ नये म्हणून एयर कण्डिशनर वापरणे टाळा, पावसाळ्याच्या आधी जांभळाच्या बिया डोंगरावर नेऊन टाका, असे कितीतरी मेसेजेस तयार करण्यासाठी अंगी तत्परता हा गुण असणे गरजेचे आहे. माझ्या मित्रमंडळात, नातेवाईकांत हा गुण ठासून भरला आहे, याचा मला अभिमान वाटतो.
सिंचन विभागात अभियंता असलेल्या एका भावाने मला मेसेज पाठवला, मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. असे मेसेजेस पाठवणार्या लोकांना एक वेगळाच अभिमान असलेला मी बघितला आहे. म्हणजे तो वृथा आहे असे मुळीच नव्हे. आपण हा मेसेज पाठवला नाही तर काय होईल याची कल्पना देखील त्यांना करवत नाही. एखाद्या दिवशी असा मेसेज न पाठवण्याचा धोका पत्करायला ते तयारच नाहीत. माझ्या एका नातेवाईकांचा फोन चोरीला गेला, तर दुसर्या दिवशी त्यांनी सूनबाईंचा फोन उधार घेऊन त्यावरून प्रेरणादायी मेसेज पाठवला. डॉक्टरांचा एखादा डोस चुकवणे जेवढे महाग पडू शकते, तेवढाच त्यांचा मेसेज चुकवणे वाचकांना महाग पडू नये म्हणून त्यांनी जिवाचा केवढा आटापिटा करून प्रेरणा दिली होती. कोण जाणे हा मेसेज वाचण्यात आला नाही आणि त्या दिवशी त्यांच्या वाचकाची प्रेरणा कमी पडली, म्हणून तो काही आगळे वागला तर?
आधीच्या काळी प्रवचन, भारूड, विविध व्याख्यात्यांची भाषणे, पुस्तके असे प्रेरणार्जनाचे स्वरूप होते. लोक मोठ्या तन्मयतेने ते करीत. पण, प्रेरणा जेव्हापासून आपल्या ऑफिसमध्ये विविध ट्रेनिंगच्या स्वरूपात, यूट्युबवर मोफत व्हिडिओच्या स्वरूपात आणि व्हॉट्सअप, फेसबुकवर मेसेजेसच्या स्वरूपात उपलब्ध होऊ लागलेली आहे, तेव्हापासून लोक बेजबाबदारपणे वागू लागले आहेत. त्यांचा हा बेजबाबदारपणा कमी करण्यासाठी त्यांना अजून प्रेरणेची गरज आहे. टाटा, विश्वास नांगरे पाटील, किरण बेदी वगैरे लोकांना तर प्रेरणा देण्याशिवाय आयुष्यात काही कामे होती की नाही असे वाटण्याइतके मेसेजेस त्यांच्या नावे फिरू लागले आहेत.
माझ्या बॉसला एका कार्यक्रमात भाषण द्यायचे होते. त्यांनी काय मुद्दे काढले असावेत असा मला प्रश्न पडला होता. म्हणून मी त्यांना तसे विचारले. त्यांनी स्पष्ट उत्तर दिले, अरे त्यात काय आहे? दोन-चार गोष्टी सांगायच्या आणि मोटिव्हेशन द्यायचं.
मोटिव्हेशन/प्रेरणा ही अफूची किंवा व्हिटॅमिनची गोळी आहे का? उचलली आणि दिली? घेणार्याने सुद्धा ती घेतली आणि लगेच त्याचे आयुष्य बदलले?
प्रेरणा देणे आणि घेणे हे दोन्हीही स्वस्त झाले आहे. किमान ज्ञानावर कमाल प्रेरणा देणार्यांचा सुकाळ आहे. कुठल्या तरी मोठ्या माणसाची प्रेरणादायी गोष्ट सांगायची, टाळ्या मिळवणारे मुद्दे मांडायचे, यातून प्रेरणा मिळाली असती तर जग केव्हाच बदलले असते.
वजन उतरवायला जशी रोज प्रेरणा हवी, रोज काही ग्रॅमचा बदल दिसायला हवा, तरच लोक प्रयत्नात सातत्य ठेवतात; त्याचप्रमाणे या प्रेरणेने आयुष्यात एकतरी सकारात्मक बदल दिसायला हवा.
एकंदर काय, कुठल्याही कामात सातत्य हवं. म्हणूनच सातत्याने लोकांना असे प्रेरणादायी मेसेजेस पाठवण्याचा माझा मानस आहे. कोण जाणे कुठला मेसेज त्यांचं आयुष्य बदलू शकेल? ‘मधासारखे गोड परिणाम हवे असतील, तर मधमाशीप्रमाणे सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ नाही का?