बॅट साथ देत नसतानाही चाळिशीपल्याडच्या धोनीनं नेतृत्वक्षमतेच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जला ‘आयपीएल’ विजेतेपद जिंकून दिलं. त्यानं दुखापतीला बाजूला सारून ग्लोव्हज आणि कुशल रणनीतीला आपलं सामर्थ्य बनवलं. संघातील खेळाडूंची उत्तम मोट बांधली आणि मैदानावर पुन्हा येईन हा विश्वास दिला. पण, धोनीवरचं प्रेम आता व्यक्तिस्तोमाकडे जायला लागलेलं दिसतं आहे…
– – –
त्याच्या प्रतीक्षेनं श्वास रोखून ठेवलेले. त्यासाठी आधीचा फलंदाज (बहुतांश वेळा रवींद्र जाडेजा) बाद व्हावा, हीच क्रिकेटरसिकांची इच्छा असायची. जाडेजा बाद झाल्यावर तो मैदानावर अवतरणार आणि या महापुरुषाचं दर्शन घेता येणार या भेटी लागी जिवाच्या ओढीनं मैदान दुमदुमायचं. ‘‘धोनी… धोनी…’’ हा एकच नाद स्टेडियमवर गुंजताना यंदाही पुन्हा एकदा दिसला… तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं फटकावलं… कधी तो फटका सीमापार गेला, त्याला टाळ्या मिळाल्या… त्यावेळी आवाजाची मर्यादा डेसिबेलमधील कमाल मर्यादा ओलांडून गेल्या. पण काही वेळा तो लवकर बादही झाला. अगदीच स्पष्टपणे सांगायचं, तर राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरच्या चेंडूवर तो विजयी षटकार खेचण्यात अपयशी ठरला, तर अंतिम सामन्यात तो शून्यावर बाद झाला. पण या प्रसंगात आवाज शांत झाला… नैराश्य दाटून आलं… असं का घडलं? हे घडायला नको होतं, हे भाव लपले जात नव्हते. तो तितक्याच शांतचित्तानं आपला डगआऊटचा रस्ता धरत होता. त्याचे आकडे मोजमाप करता येणारे नव्हते… कारण त्यानं जे क्रिकेटसाठी, ‘सीएसके’साठी आणि देशासाठी केलं आहे. त्यापुढे अशी कोणतीच तुला होऊ शकत नव्हती आणि ‘अंति विजयी ठरू’ हा चेन्नई संघाबाबतचा विश्वास त्यांचा तीळमात्रही ढळत नव्हता. त्यामुळेच या पिवळ्या वेशातल्या उत्सवाला फारसा फरक पडत नव्हता. कदाचित हे यंदाच्या वर्षातलं त्याचं अखेरचं ‘मैदानी दर्शन’ याच भावनेनं गेली दोन वर्ष हे घडतंय आणि आता हे स्पष्ट झालंय की निवृत्ती घेतलेली नसल्यानं आणखी एखाद-दुसरं वर्ष तरी तो पुन्हा मैदानावर दिसणार… ‘भेटला विठ्ठल माझा…’ या अविर्भावात पुन्हा आसमंतात हळदीची उधळण व्हावी, तसाच तो पिवळा रंग स्टेडियमभर पसरणार. हा पिवळा उत्साह फक्त चेन्नईच्या चेपॉकवरच (एम. चिदम्बरम स्टेडियम) दिसत नाही, तर ज्या-ज्या ठिकाणी इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) कारवाँ जाईल, तिथं चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याला हे पिवळेपण सहज अधोरेखित करतं.
भारताला दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स करंडक असं जागतिक यश मिळवून देणारा कर्णधार ही धोनीची ओळख. पण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीपुढे पूर्णविराम दिल्यानंतरही ‘आयपीएल’मधील त्याचा प्रवास अखंड सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जनं यंदा पाचव्यांदा विक्रमी ‘आयपीएल’ जेतेपद पटकावलं. या यशोगाथेत धोनीचा सिंहाचा वाटा कुणीच नाकारू शकणार नाही. खेळाडू म्हणून ११वी आणि कर्णधार म्हणून १०वी ‘आयपीएल’ची अंतिम फेरी तो खेळला. डेथ ओव्हर्सच्या षटकांमधील त्याच्या फटकेबाजीची आकडेवारीही अचंबित करणारी आहे. तो प्रत्येक ५व्या ते ६व्या चेंडूला षटकार खेचतो. चाळिशीपल्याड गेलेल्या आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार्या धोनीची जादू आता संपली आहे, हे त्यानं पुन्हा खोटं ठरवलं.
कोणत्याही कठीण प्रसंगात सामन्याचा निकाल पालटण्याची क्षमता आणि त्यासाठी मैदानावर हुकूमत गाजवणारी फलंदाजी ही त्याची बलस्थानं त्याला साथ देत नव्हती. १६ सामन्यांत १०४ धावा ही त्याची तुटपुंजी कामगिरी. यातही फारशा एकेरी-दुहेरी धावा काढायला लागू नये, म्हणून १० षटकार आणि ३ चौकारांची आतषबाजी. कारण पायाची दुखापत पिच्छा सोडत नव्हती. त्यावर बँडेड बांधून तो खेळत होता. बॅट जरी मंदावली, तरी यष्टीरक्षणातील चापल्य हे विद्युल्लतेपेक्षाही वेगवान होतं. त्याचे काही झेल आणि यष्टीचीत नव्या पिढीला धडे देणारे. यंदा त्याची धोनी रिव्ह्यू पद्धतीही फारशी परिणामकारक जाणवली नाही. पण त्याच्या यशात सर्वाधिक महत्त्वाची होती त्याची नेतृत्वक्षमता. बुद्धिबळाच्या चालींप्रमाणे त्यानं मैदानावर रणनीती आखल्या आणि त्या प्रक्रियेतून अचूक निकाल मिळवून दिला. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, मथीशा पथिराणा, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगर्गेकर यांच्या युवा पिढीला त्यानं घडवलं. कठीण प्रसंगातही आत्मविश्वास न गमावता निर्धारानं कसं खेळावं, हे त्यांना त्यानं शिकवलं. तर सूर हरवल्यामुळे भारतीय क्रिकेटच्या सीमारेषेबाहेर फेकल्या गेलेल्या अजिंक्य रहाणेला त्यानं जीवनदान दिलं. तो आता जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी पुन्हा मशाली पेटवून सज्ज झालाय. अंबाती रायुडू, मोईन अली या चाळीशीकडे झुकलेल्या अनुभवी खेळाडूंना त्यानं कामगिरी होत नसतानाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. डेव्हॉन कॉन्वे, रवींद्र जाडेजा हे त्याचे हुकूमी शिलेदार. दीपक चहर आणि माहीश तीक्षणा आपली भूमिका चोख बजावत होते. मोठ्या रकमेच्या बेन स्टोक्सचा फारसा उपयोग त्याला झालाच नाही. एकंदर या संघाची अन्य संघांशी तुलना केली तर हा संघ तसा सर्वसामान्यच गणला जाऊ शकेल. पण धोनी असण्याचा आणि नसण्याचा काही फरक हा पडतोच. त्याने चाणाक्षपणे या खेळाडूंची मोट बांधली. त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी तो करून घेऊ शकतो, हा विश्वास त्यांना दिला. चेन्नई सुपर किंग्जचं यंदाचं यश ही त्याचीच परिणती.
अंतिम सामन्यात त्यानं आपला आणि जाडेजाचा क्रम मुद्दाम बदलला. अखेरच्या दोन चेंडूंमध्ये १० धावांचं अवघड शिखर सर केलं ते जाडेजानंच. त्यामुळे जेतेपदाचा चषक घेताना जाडेजाला आणि निवृत्ती जाहीर करणार्या अंबाती रायुडूला त्यानं व्यासपीठावर बोलावलं. या कृतीतून धोनीनं सर्वांची मनं जिंकली.
क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटपटूंना दैवतं मानणारी भारतीय मानसिकता आहेच. त्यामुळेच आता धोनीच्या यशाला दिव्यत्वाची प्रचिती म्हटली जाऊ लागलीय. त्याच्या लोकप्रियतेचं गारूड जनमानसात भिनू लागलंय. तसा धोनीचा स्वभाव अहंकारी, दुष्ट, लोभी मुळीच नव्हता. पण अखेरीस तोही एक माणूसच. षड्रिपूंपासून तो मुक्त कसा असेल? म्हणूनच निवृत्तीची पृच्छा करणार्यांना तो ‘‘तुम्ही कोण?’’ असा सवाल करतो… तर पथिराणाला गोलंदाजी करता यावी, म्हणून मैदानावर पंचांशी हुज्जत घालण्यात तो काही मिनिटे सहज वाया घालवतो. यावर चिडीचूप धोरण असल्याचंही पाहायला मिळतं. कारण धोनीवर कशी कारवाई करावी? धोनी दुखापती असतानाही खेळतोय, म्हणून प्रक्षेपण कंपन्यांच्या प्रेक्षकसंख्येचे आकडे दुथडी भरून वाहतात आणि त्यांच्याकडे जाहिरातीही येतात. म्हणजे मंडळाकडे ‘आयपीएल’ प्रक्षेपण करारातून मोठ्या प्रमाणात पैसा येतो, त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक हा अर्थात धोनी आहे. हे सत्य आहे.
धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्ज या कल्पनेपलीकडील विचारधारेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता संघ व्यवस्थापनात, क्रिकेट मंडळाकडे आणि प्रक्षेपण कंपन्यांकडे आहे का? धोनीचं असणं हे याच सर्व कारणास्तव अपरिहार्य असतं. तोही मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, अशी आत्मविश्वासानं ग्वाही देतो. तूर्तास, त्यानं दुखर्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही केली आहे. पुन्हा सरावही सुरू करील. बॅट, ग्लोव्हज किती साथ देतील माहीत नाही. पण त्याचा तल्लख मेंदू आणि मिडास टच त्याची साथ इतक्यात सोडणार नाही. पुढील ‘आयपीएल’ला तो पुन्हा दिसेल. यंदा त्याचं हे अखेरचं वर्ष असेल, ह्या कल्पनेनं पुन्हा पिवळे वारकरी ‘आयपीएल’ची वारी करतील.
रांचीसारख्या प्रदेशातून तिकीट तपासनीस ते विश्वविजेता कर्णधार हा प्रवास करीत आख्यायिका झालेला धोनी प्रेक्षकप्रेमापोटी खेळेल. धोनी, एमएसडी, माही, थाला अशा विविध गर्जनांनी मैदान दणाणून निघेल. कदाचित आणखी एक जेतेपद येलो आर्मीच्या शिरपेचात असेल आणि त्याचा सेनानी महेंद्रसिंह धोनी पुन्हा निवृत्तीच्या चर्चांना छेद देईल आणि लोकांच्या मनावरील त्याचा पगडा आणखी गडद होत जाईल.