‘साहेब, तुमच्या दोस्ताला याड लागलंय का हो?’ खाशाबाने घराच्या दारातून आत शिरता शिरता गोळीसारखा प्रश्न झाडला आणि स्वतःच्या तंद्रीत असलेले साहेबराव एकदम दचकले. त्यांच्या हातातले पुस्तक खाली पडले.
‘साहेब, इतके घाबरता, तर कशाला ती भुताखेताची पुस्तकं वाचता हो?’ खिदळत खाशाबा पुन्हा बडबडला.
‘मूर्ख! घाबरणे आणि दचकणे ह्यातला फरक तुला कळतो तरी का?’ साहेबराव चांगलेच संतापले होते.
‘चिडू नका साहेब. मी आपले काळजीपोटी बोललो. आधीच तुम्हाला छातीचे दुखणे आहे…’ खाशाबा नरमाईच्या स्वरात बोलला आणि साहेबराव एकदम शांत झाले. गेली पाच वर्षे हा गडी त्यांच्याकडे राबत होता. जुना शांताराम सोडून जाताना ह्याला जोडून देऊन गेला होता. खाशाबाने देखील गेली पाच वर्षे तक्रारीला वाव दिलेला नव्हता. बायको,पोरं, संसार काही नसलेल्या आणि निवृत्त आयुष्य जगणार्या श्रीमंत मालकाला तो प्रेमाने जपत होता. त्याची बँकेपासून सर्व व्यवहारांची कामे बघत होता.
‘बरं बरं ते असो. कोणाला वेड लागले म्हणत होतास?’
‘तुमचे मित्र जगनराव आणि कोण?’
‘जगन? तुला वेड लागलेले दिसते. अरे जगन हिंदुस्तानात तरी आहे का? तो बसलाय तिकडे आप्रिâकेत चहाचे मळे पिकवीत..’
‘अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तर. सखुबाईला तीन धारी लिंबू कुठे मिळेल विचारत होता. तिने पण असा सुनावला मग त्याला. काय भगतगिरी करायला लागला का काय कोणास ठाऊक!’
‘बरं बरं.. तू जा आत आणि लाग कामाला. मी बघतो काय भानगड आहे ते.’ बोलता बोलता साहेबराव उठले आणि त्यांनी शर्ट चढवला. जगन परत आला आणि आपल्याला साधा फोनदेखील त्याने केला नाही? इतक्या वर्षाची घट्ट मैत्री आपली आणि जगन स्वदेशी परतलेला आपल्याला तिसर्या माणसाकडून कळावे?’ साहेबरावांना जरासा रागच आला होता, पण तसे ते सरळमार्गी आणि सालस होते, त्यामुळे थोड्याशा रागात का होईना, त्यांनी जगनच्या घराचा रस्ता पकडला.
जगनचे घर त्यांच्या घरापासून दोन गल्ल्या सोडून अगदी हायवेलगत होते. थोडेसे एकांतात असलेले हे घर त्यांना फार आवडायचे. आजूबाजूला फारशी वस्ती नाही, अध्येमध्ये महामार्गावरून जाणार्या जड वाहनांचे आवाज सोडले, तर फारशी वर्दळ नाही. महामार्गाच्या पलीकडच्या बाजूला तर सरळ जंगल चालू व्हायचे आणि तिथे आतमध्ये असलेल्या भिल्ल, कातकर्यांच्या लहान सहान वस्त्या. जगनच्या दुमजली घराच्या सर्व खिडक्या बंद पाहून त्यांना आश्चर्य वाटले. दरवाज्याला मात्र बाहेरून कुलूप नव्हते, म्हणजे जगन घरातच असावा. लगबगीने पुढे होत त्यांनी उत्साहाने घराची बेल दाबली, अगदी दरवाजा देखील ठोठावला. काही वेळाने आत लहानशी हालचाल जाणवली आणि दरवाज्याला छोटीशी फट पडली.
‘कोण आहे?’ जिवलग मित्राचे बोल किती वर्षांनी कानावर पडले आणि साहेबराव सुखावले.
‘जग्या, अरे मी आहे लेका साहेबराव… तुझ्या साहेब्या.’
दरवाज्याची फट थोडीशी मोठी झाली. दुपारची वेळ असून देखील आत जवळपास पूर्ण काळोख होता. लांबून बारीकसा कंदिलाचा उजेड आपले अस्तित्व दाखवण्याचा अट्टहास करत होता.
‘साहेबराव, तुम्ही आता जा. ही भेटण्याची योग्य वेळ नाही,’ एका श्वासात हे वाक्य बोलून जगनने खाडकन दरवाजा बंद केला. आधीच काहीसे रागावलेले साहेबराव ह्या प्रसंगाने एकदम थक्कच झाले. रागाच्या भरात त्यांनी घराकडे सरळ पाठ फिरवली आणि आपल्या घराचा रस्ता पकडला.
रात्री आठ साडेआठच्या सुमाराला रमचा पेग भरता भरता साहेबरावांना आतमध्ये खाशाबाने तळलेल्या कांदाभज्यांचा वास आला आणि त्यांचा गेलेला उत्साह परत आला. ‘लवकर आण रे… राहवत नाही आता.’ रमचा मोठा घोट घेत साहेबराव गरजले. ‘जगनला काय जाम आवडायची आपल्या हाताची कांदा भजी,’ सहज त्यांच्या मनात विचार तरळून गेला आणि पुन्हा एकदा त्यांच्या मनावर विषाद पसरला. खरंच का वागला असेल जगन असा? का टाळले असेल त्याने आपल्याला? तो काही अडचणीत तर नाही? आपण गेलो त्यावेळी तो एकटाच होता का तिथे अजून कोणी होते? तो काही लपवायला तर बघत नव्हता? एकामागे एक प्रश्नांच्या लाटा उसळायला लागल्या आणि नेहमीपेक्षा साहेबरावांचे दोन पेग जास्तीच झाले. अर्थात झाले ते एक बरे झाले, त्यामुळे रात्री त्यांना अगदी शांत झोप लागली.
‘साहेब, ओ साहेब..’ खाशाबाने साहेबरावाला हालवत उठवले आणि झोपमोड झाल्याने साहेबराव एकदम वैतागले.
‘काय रे सकाळी सकाळी? कुठे लढाईला जायचे आहे मला?’
‘साहेब, बाहेर तुमचे मित्र जगनराव आलेत,’ हलक्या आवाजात खाशाबा म्हणाला आणि साहेबराव ताडकन उभे राहिले. कालचा प्रसंग सहज विसरून ते बाहेर
हॉलमध्ये आले. जगन हॉलमध्ये न बसता, बाहेर व्हरांड्यात अस्वस्थपणे फेर्या मारत होता.
‘जगन, अरे बाहेर काय करतो आहेस? आतमध्ये ये की.’ काहीशा नाराजीने जगन आत शिरला.
‘साहेबराव, मी कालच्या प्रसंगाबद्दल माफी मागायला आलो आहे. मला क्षमा करा. रात्रभर मला झोप लागलेली नाही. तुम्ही आपुलकीने मला भेटायला आलात आणि मी…’ जगनचा स्वर कावराबावरा झाला होता. त्याचे लालभडक डोळे देखील रात्रीच्या जागरणाची साक्ष देत होते.
‘अरे वेडा आहेस का? असेल तुझी काहीतरी अडचण. मी काय रागावलो नाहीये तुझ्यावर. आणि बघ, वेळ मिळाल्याबरोबर आलास का नाही धावत मला भेटायला,’ बोलता बोलता साहेबरावांनी जगनचा हात हातात घेतला, ‘आणि काय रे, हे एकदम ‘अहो जाहो’ काय चालू केले आहेस?’
‘प्रत्येक जिवाशी आदराने वागावे बोलावे हा माझ्या साधनेचा महत्त्वाचा भाग आहे साहेबराव,’ जगन म्हणाला.
‘साधना? ती आणि कसली बाबा? मुख्य म्हणजे तू परत कधी आलास? कसा आहेस? धंदा कसा चालू आहे?’ साहेबरावांनी एकदम प्रश्नांची सरबत्ती केली.
‘सगळे सांगतो. पण इथे नको. संध्याकाळी घरी याल? सविस्तर बोलू.’
‘ठीक आहे. पण आता आला आहेस तर नाष्टा, चहा घेऊन जा.’
‘माफ करा साहेबराव, मला परान्न वर्ज्य आहे,’ हात जोडत जगनने निरोप घेतला आणि साहेबराव आश्चर्याने थक्क झाले. ‘अरेऽऽ’ शिवाय बोलण्याची सुरुवात न करणारा, हळूच कातकरी, भिल्लांच्या वस्तीत हजेरी लावून वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसाची चव चाखणारा, एकही रात्र दारूशिवाय न काढू शकणारा जगन तो हाच का?
साहेबराव संध्याकाळची आतुरतेने वाट बघत होते. एकदाचा सूर्य कलायला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात त्यांनी जगनच्या घराची वाट धरली. जगनच्या घराच्या खिडक्या आज देखील पूर्णपणे बंद होत्या. स्वत: जगन त्यांची वाट बघत ओसरीत चुळबुळत बसला होता. साहेबराव जवळ येताच तो उठला आणि त्याने पायात चपला अडकवल्या.
‘अरे जगन घरातच बसू ना. थोड्याच वेळात अंधार पडेल आता.’
‘घरात? नको नको.. आपण थोडे जंगलाकडेच जाऊ,’ जगनच्या आवाजात काहीशी भीती जाणवत होती.
दोघांनी सावधपणे हायवे क्रॉस केला आणि ते जंगलात शिरले. जगन अगदी शांत चालत होता, पण त्याच्या मनात काहीतरी खळबळ सुरू असावी, असे त्याचा चेहरा सांगत होता. जंगलात काही अंतर शिरल्यावर एक पडकी वेस होती. तिथेच दोघेही विसावले.
‘जगन काय झाले आहे? तू असा अस्वस्थ का आहेस?’
‘साहेबराव माझ्या आयुष्यात असे काही विलक्षण घडले आहे की त्यावर माझा स्वत:चा देखील विश्वास बसत नाहीये. मी काय करू, कुठे जाऊ काही उमजेनासे झाले आहे. आयुष्याचे किती दिवस, किती तास उरलेत, ह्याची चिंता मला आतून पोखरत चालली आहे.’ ‘जगन, अरे असे काय वेड्यासारखे बोलतोस? काय झाले आहे नीट सांग बरे. अगदी कितीही अविश्वसनीय असो. मी ठेवीन विश्वास तुझ्यावर,’ साहेबरावांनी त्याला धीर दिला.
‘साहेबराव, मी आप्रिâकेत पोहोचलो आणि तिथल्या व्यापार्याबरोबर भागीदारीत व्यवसाय सुरू केला. पहिली दोन वर्षे व्यवसाय उत्तम सुरू होता, पण मग अचानक व्यवसायात मंदी जाणवू लागली. आमचे इतर प्रतिस्पर्धी फायद्यात जात असताना आम्ही मात्र तोट्यात जात होतो. माझे आणि भागीदाराचे वाद होऊ लागले. त्यातच मला काही शंका आल्याने मी आजवर ज्या गोष्टीत भागीदारावरच्या विश्वासाने लक्ष घालत नव्हतो, त्या गोष्टीत लक्ष घालायला सुरुवात केली. भागीदार मला फसवतो आहे ह्याचे भक्कम पुरावे माझ्या हातात आले. मी ते सारे पुरावे त्याच्यासमोर फेकले आणि फसवून लुबाडलेल्या माझ्या पैशाची मागणी केली, अन्यथा पोलिस तक्रार करण्याची धमकी दिली. आपले पैसे घ्यायचे आणि सरळ स्वदेशाचा रस्ता पकडायचा असे मी ठरवले होते.’
‘मग दिले का त्याने पैसे?’
‘पैसे? एकवेळ त्याने पैसे दिले नसते तरी मला चालले असते. पण त्याने मला अशी काही भेट दिली की माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले.’
‘असे काय केले त्याने?’
‘त्या रात्री मला अचानक ताप भरला. माझ्या अंगात उठायचे देखील बळ उरले नाही. चित्रविचित्र भास होऊ लागले. एक विचित्र आकाराचा, बकर्याचे तोंड असलेला, सहा पाय आणि त्यावर असंख्य नख्या असलेला प्राणी माझ्या आजूबाजूला वावरतो आहे, असा भास होऊ लागला. मी विलक्षण धास्तावलो. काही मित्रांनी मला विविध
डॉक्टरांकडे नेले, अनेक तपासण्या झाल्या पण ‘मानसिक आजार’ या एकाच ठिकाणी येऊन त्यांचे निकाल थांबले. एका रात्रीत मी मानसिक रुग्ण कसा बनेन साहेबराव? कोणत्या शहाण्या माणसाचा यावर विश्वास बसेल?’
‘मी समजू शकतो जगन तुझी अवस्था.’
‘जसा तुमच्याकडे खाशाबा आहे, तसाच माझ्याकडे उझोची म्हणून एक नोकर होता. एकदा मला एकट्याला गाठून तो म्हणाला की, साहेब हा काही आजार नाहीये. तुमच्यावर करणी करण्यात आली आहे. तुमच्यामागे झाबोबाला लावण्यात आले आहे. मला काय बोलावे तेच कळेना. कोण हा झाबोबा? तर म्हणे हे एक प्रकारचे पिशाच्च असते आणि ते माणसाला भ्रम पाडून, भीती दाखवून हळूहळू संपवून टाकते किंवा ठार वेडा बनवते. आधी मला उझोचीचे बोलणे म्हणजे एक भाकडकथा वाटली, पण जेव्हा त्रास असह्य झाला तेव्हा त्याच्याच सांगण्यावरून मी त्याच्या वस्तीतल्या एका माणसाकडे गेलो. त्याला सगळे चिमा म्हणून संबोधायचे. उझोचीने त्याला बहुदा पूर्वकल्पना दिली असावी. त्याने गेल्या गेल्या माझ्यावर कोणत्या तरी प्राण्याचे रक्त शिंपडले. ते माझ्या शरीराला स्पर्श करताच काळे पडले. त्याचे डोळे एकदम ताठ झाले. उझोचीकडे बघत त्याने काहीशी विचित्र मान हालवली आणि उझोचीने मला निघण्याची खूण केली.’
‘मग पुढे?’ साहेबरावांची उत्कंठा आता ताणली गेली होती आणि छातीचे ठोके देखील वाढले होते.
‘उझोची म्हणाला की त्याचा अंदाज खरा ठरला आहे. भागीदाराने सूड उगवण्यासाठी माझ्या मागे झाबोबाला सोडले आहे, करणी केली आहे. मी त्याला उपाय विचारला. त्यावर तो म्हणाला की चिमा म्हणतो आहे की एकतर झाबोबाला पकडून बंद करायचे किंवा मग जुबंगीला बोलावणे धाडायचे.’
‘जुबंगी?’
‘आपल्याकडे कसा राक्षस असतो आणि त्याच्यापेक्षा ताकदवान ब्रह्मराक्षस असतो, तसेच आहे हे. हा जुबंगी सर्व झाबोबांना नियंत्रणात ठेवतो. त्याला आवाहन केले गेले, तर तो येतो आणि करणीसाठी वापरल्या गेलेल्या झाबोबाला पुन्हा पाशबद्ध करतो आणि ज्याने ही करणी केली आहे त्याला देखील धडा शिकवतो.’
‘मग तू काय निर्णय घेतलास?’ थंडगार वार्यात देखील कपाळाला आलेला घाम पुसत साहेबरावांनी विचारले.
‘माझी फसवणूक, मला झालेला शारीरिक आणि मानसिक त्रास यामागचे खरे कारण कळले आणि मी संतापाने पेटून उठलो. कितीही खर्च झाला तरी चालेल पण या जुबंगीचे आवाहन करायचे मी ठरवले.’
‘मग?’
‘पण त्यात धोका होता. आपल्या कामगिरीच्या बदल्यात जुबंगी काही ना काही मागतो आणि ते त्याला द्यावेच लागते. नाहीतर पुन्हा तो झाबोबाला आपल्या आणि आपल्या जिवलगांच्या मागे लावतो.’
‘परमेश्वरा! जगन तू..’
‘हो साहेबराव, संतापाने विवेकबुद्धी गोठलेल्या मी हे सर्व माहिती असून देखील जुबंगीचे आवाहन केले. ती भयाण रात्र मला अजूनही आठवते आहे. जंगलाचा तो अत्यंत निबीड असा भाग होता. मी, उझोची आणि चिमा एका ज्वालेभोवती बसलो होतो. चिमाने आमच्याभोवती हाडांचे रिंगण घातले होते. ते अतर्क्य आणि कठीण, विचित्र उच्चारांचे मंत्र माझ्याकडून वारंवार म्हणून घेतले जात होते… आणि ती वेळ आली. चिमा एकदम गप्प झाला, माझ्या मानेवरचे केस एकदम शहारले. तो आला होता.. जुबंगी आला होता. माणसाचे शरीर, त्यावर बैलाचे भलेमोठे डोके, काटेरी शेपटी जमिनीवर आपटली जात होती, त्याचा नाकपुड्यांतून विचित्र असा हिरवा धूर बाहेर येत होता. त्याचे ते रूप पाहिले आणि मी बेशुद्धच झालो. मी मंत्रबद्ध झालो होतो. मला जाग आली तेव्हा मी घरात होतो. रात्रीत उझोची मला घरी घेऊन आला होता.’
‘मग त्या जुबंगीचे काय झाले?’
‘दुसर्या दिवशी माझा भागीदार कपडे फाडत रस्त्यावर फिरायला लागला होता. रस्त्यात पडलेल्या अन्नापासून शेणापर्यंत काहीही खात होता..’ थरथरत्या स्वरात जगन म्हणाला आणि साहेबराव विलक्षण दचकले.
‘म्हणजे त्याने कामगिरी पार पाडली तर? आणि मग त्या बदल्यात?’
‘त्या बदल्यात त्याने मला नवी शिकार मागितली. मी कोणा निष्पापाचा कसा बळी देणार होतो साहेबराव? मी आगीतून फुफाट्यात पडलो होतो. अशावेळी चिमा माझ्या मदतीला धावला. सध्या मी जी साधना करत आहे, ती त्यानेच मला दिली. अनेक नियम आणि बंधने आहेत, पण निदान मी तरी अजून जिवंत आहे.’
‘मी तरी म्हणजे?’
‘मी त्याची मागणी पूर्ण करत नाही हे पाहून त्याने आधी उझोची आणि मग चिमा…’ हाताच्या तळव्यात तोंड खुपसत जगन बोलत होता आणि त्याचे शरीर थरथरत होते.
‘मेले?’
‘फार अमानुषपणे मारले त्याने त्यांना. चिमा तर महिनाभर दिसेल त्या झाडावर, दगडावर डोके आपटत फिरायचा, असह्यपणे रडायचा, जिवाची भीक मागत ओरडायचा.’ जगनचे वर्णन ऐकून साहेबराव अंगभर शहारले.
‘म्हणून तू परत आलास?’
‘मी तिथे राहिलो असतो, तर अनेक आप्तांचा जीव गेला असता साहेबराव. निदान इथे मी एकटा आहे. माझे काय होईल ते होईल.’
रात्री जगनला त्याच्या घरापाशी सोडून कोरड पडलेल्या घशाने आणि लटपटत्या पावलांनी साहेबरावांनी घराची वाट धरली. डोळ्यासमोर जणू पुन्हा पुन्हा सर्व प्रसंग साकारत होते आणि छातीत काहीशी कळ यायला लागली होती. त्यांनी कसेतरी घर गाठले आणि पलंगावर अंग टाकले.
रात्री अकराला रमचे चार भक्कम पेग आणि खाशाबाच्या हातचा मस्त भाकरी आणि ठेचा खाल्ला, तेव्हा कुठे जरा त्यांच्या जिवाला आराम पडला. बाराच्या सुमाराला खाशाबा स्वयंपाकघरात झोपायला गेला आणि अनिच्छेने साहेबरावांनी बिछान्यात अंग टाकले. राहून राहून त्यांना खाशाबाला सोबतीला बोलवावे असे वाटत होते पण तो आपल्याबद्दल काय विचार करेल असे वाटून तो ते टाळत होते. जगनच्या गोष्टीने त्यांना सुन्न करून सोडले होते. खरंच आप्रिâकेत आजही असे प्रकार चालत असतील? हे सर्व खरे असेल? आणि जगन जसा हिंदुस्तानात परत आला, तसा तो जुबंगी नाही येऊ शकणार? आणि तो खरंच आला तर? पण तो आला तरी इथे जगनशिवाय आहे तरी कोण? जगनला ना मूल ना बाळ, ना कोणी आप्त, हितचिंंतक…
हितचिंतक… आपण जगनचे हितचिंतक नाही? आप्त नाही? या शेवटच्या विचाराने मात्र साहेबराव गारठले. त्यांच्या घशाला पुन्हा कोरड पडायला लागली, छातीतली कळ पुन्हा डोके वर काढायला लागली. कुठून अवदसा आठवली आणि त्या जगनला भेटायला गेलो असे त्यांना वाटू लागले. इतक्यात मागच्या खिडकीत काहीशी हालचाल जाणवली आणि त्यांनी दचकून मागे बघितले. खांद्याच्या वर बैलाचे मुंडके असलेले कोणीतरी आत वाकून वाकून बघत होते आणि त्याच्या नाकपुडीतून हिरवा धूर बाहेर येत होता. बस हीच साहेबरावांची शेवटची जाणीव.. त्यानंतर सकाळी त्यांचे निष्प्राण कलेवर लोकांना मिळाले. हृदयविकाराचा तीव्र झटका…
साहेबरावांचा बारावा तेरावा पार पडला. जगनने स्वत: पुढाकार घेऊन सर्व कार्य पार पाडले. पुन्हा एकदा एकट्या पडलेल्या जगनविषयी सर्व गावाला हळहळ वाटत होती. रात्री सर्व गाव निर्धास्त झोपलेले असताना दारावर अचानक पडलेल्या थापेने खाशाबाला जाग आली.
‘कोण आहे?’
‘मी जगन..’ खाशाबाने लगबगीने दार उघडले.
‘साहेब, तुम्ही इतक्या रात्री?’
‘खाशाबा, माझे या गावात आता मन रमत नाही. हे सर्व कसे आणि का घडले याची तुला कल्पना आहे. खूप अपराधी वाटते आहे रे. मी हे गाव सोडायचा विचार करतो आहे.’
‘काय करणार? कुठे जाणार?’
‘मी माझे घर विकायचा विचार करतो आहे.’
‘मग हातासरशी हे घर आणि जमीन पण विकून टाका की..’ खिदळत खाशाबा म्हणाला आणि जगन देखील त्याच्या खिदळण्यात सामील झाला.
‘तुम्ही भेटलात त्याच दिवशी पॉलिसीच्या नावाखाली सगळ्या कागदांवर सह्या घेऊन ठेवल्या होत्या, आहे ना लक्षात?’ गादीखालून कागदाचा गठ्ठा काढत खाशाबा म्हणाला आणि जगनने त्याच्या पाठीवर कौतुकाने थाप दिली.
‘मित्रा साहेब्या, माफ कर बाबा मला. पण खरंच सांगतो, मी तुझ्याशी सगळे खोटे बोललो असेही नाही. मला व्यापारात खरंच तोटा झाला होता, पण तो माझ्या लबाडीने. पोलिसात तक्रारीची धमकी मी नाही तर माझ्या भागीदाराने मला दिली होती. अंगावरच्या कपड्यानिशी पळून आलो बघ. आणि एक दिवस तालुक्यातल्या बँकेत हा तुझा खाशाबा भेटला अन् मग मला तुला मंत्रबद्ध करावेच लागले. तुझा शेवटचा निरोप घ्यायला आलोय बघ.’
‘जाताना तेवढा बैलाचा मुखवटा जाळायला विसरु नका बरं साहेब…’