डॉक्टर मंडळी (डॉक्टरकीशिवाय) काय काय करतात म्हणण्यापेक्षा काय करत नाहीत, असा प्रश्न जनसामान्यांना अनेक वेळेला पडतो. कोणी मॅरेथॉन पळतो. काही हिमशिखरे सर करायला दरवर्षी मे महिन्यात हिमालयात जातात. नाटक, सिनेमा गाजवणे हा तर अनेकांचा आवडता खेळ. काहीजण नाटकांचे लेखन करतात, तर काहींना पटकथा संवाद लिहिण्यात जास्त रस वाटतो. काही डॉक्टर संगीतकार बनतात, काही गाऊनसुद्धा दाखवतात. लेखक म्हणून नावाजलेल्या डॉक्टरांची यादी तर फारच मोठी आहे. फोटोग्राफी हा आवडता छंद सामान्यांना न परवडणारा. तो जोपासून एखाद्या कलादालनात प्रदर्शन मांडण्याइतपत काहींनी प्रगती केलेली आहे. काहींना शिकण्याची हौस असते. मग अर्थशास्त्र, मानसशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, इंडॉलॉजी यांतही ते पदव्या मिळवतात. एखादी कायद्यातील अडचण सोडवताना कायद्याची पदवी घेत सुवर्ण पदके मिळवणार्यांची नावे सहज आठवतील. सैन्यदलात, कॉर्पोरेशनमध्ये किंवा सरकारी नोकरीतले डॉक्टर मॅनेजमेंटच्या पदव्या घेण्यामध्ये माहिर. डॉक्टर झाल्यानंतर काहींना यूपीएससी देऊन आयएएस बनायची ओढ लागते. मुळातच हुशार असलेली ही मंडळी त्यात यश मिळवून विविध पदांवर विराजमान होतात.
डॉक्टर आरोग्यमंत्री महाराष्ट्राला नवीन नाहीत. पण पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व गोव्याचे आत्ताचे मुख्यमंत्री हे डॉक्टरच. यावर कडी म्हणजे काश्मीरचे माजी मुख्यमंत्री. हे तर लंडनला कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करत होते. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात एक सर्जन आहेत, तर दुसर्या मॅडम फिजिशियन आहेत. मुंबईचे प्रसिद्ध बिल्डर हे प्रख्यात डॉक्टरांचे चिरंजीव. अध्यात्मामध्ये अनेक डॉक्टरनी अगदी स्वतःचा पंथ निर्माण करून हजारो अनुयायी निर्माण केले आहेत. संत परंपरेनुसार संन्यास घेऊन गादी चालवणारे डॉक्टर पुण्याला माहिती आहेत. नेव्हीमधून रिटायर झालेले एक कमांडर सर्जन इतिहासाच्या मागे हात धुवून लागले. त्यांची मराठा इतिहासावर पुस्तके आली व गाजली. मित्राची पुस्तके इंग्रजीत आहेत ती मराठीत आणण्यासाठी दुसरा सर्जन सरसावला. त्याने मराठीत सुरस भाषांतर केले.
खेळाची मैदाने गाजवणे हेसुद्धा डॉक्टरांनी सोडलेले नाही. आयर्न मॅनच्या जगभरातील विविध शर्यतीत भाग घेत किंवा मोठे सायकलिंग करून भारतभर भ्रमण करणारे काही महाभाग आहेतच. डॉक्टर झाल्यावर स्वतःचे हॉस्पिटल काढणे, हा झाला सामान्य प्रकार. पण उद्योगासारखी एखादी कार्पोरेट चेन हॉस्पिटल तयार करण्यात आज निदान तीन नावे सांगता येतात. फक्त वैद्यकीय निदान करण्याची यंत्रणा संपूर्ण भारतभर पसरवणारी काही डॉक्टरांची नावे सहज आठवतात. कालिदासाने मेघाचा प्रवास कसा अनुभवला असेल याचा शोध घेण्यासाठी छोटे विमान घेऊन भरारी करणारे एक सर्जन डॉक्टरच.
एवढ्या सगळ्या डॉक्टरांपेक्षा एका अजूनच वेगळ्या डॉक्टरची, खरे तर नामवंत सर्जनची मी आज कथा सांगणार आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबात शिवानंद जन्मला, तोही पुण्याच्या पूर्व भागातील गजबजलेल्या एका पेठेत. मात्र त्याच्या जाणकार वडिलांनी त्याला शाळेत घातले ते मात्र पश्चिम भागातील एका अत्यंत नावाजलेल्या शाळेत. तैलबुद्धीचा शिवानंद शाळेतील सर्व उपक्रमात भाग घेऊनही कायम वरचा क्रमांक टिकवून होता. कोणते विषय आवडतात, असे विचारले तर सगळेच असे उत्तर देई. पण त्यातही मराठीवर त्याचे मनापासून प्रेम.
त्या शाळेतील नामवंत मराठी शिक्षकांचेही त्याच्यावर मनापासून लक्ष असे. शुद्धलेखन, व्याकरण, कवितेचे रसग्रहण, निबंध लेखन आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौफेर वाचन या सार्यामुळे शिवानंद अनेक शिक्षकांचा लाडका होता. त्या शाळेतील मोजकी पूर्व भागातून येणारी मुले, त्यांचा तर तो रोल मॉडेलच होता.
शाळा, अभ्यास, वाचन, खेळ या पलीकडे जाऊन शिवानंदचे वडील त्याला चांगले चांगले मराठी, इंग्रजी सिनेमे आवर्जून दाखवत. शालेय वयात असे सिनेमे पाहण्याची संधी त्या काळात मुलांना फारशी मिळत नसे. वर्षाकाठी एकाच दुसरा सिनेमा पाहिला तरी खूप झाले असे वाटण्याचा तो मराठी कुटुंबातील काळ होता. अतिशय भव्य दिव्य उत्कृष्ट कलाकृती म्हणून आजही नावाजला जाणारा ‘द टेन कमांडमेंटस्’ हा सिनेमा तुडुंब गर्दी असतानासुद्धा शिवानंदला त्याच्या वडिलांनी दाखवला होता. शहराच्या टोकाला असलेल्या थिएटरमधून घरी येताना सिनेमाची समग्र गोष्ट वडील त्याला समजावून सांगत होते. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्याच्या मनाची आणि सांस्कृतिक जडणघडणीची मशागत होत होती. शालांत परीक्षेत शिवानंदने गुणवत्ता यादीत वरचा क्रमांक पटकावला.मराठीत तर तो पहिलाच होता. उत्कृष्ट यशाची ती पहिली चव त्याला चाखायला मिळाली.
शिवानंदचा नंतरचा प्रवास झपाट्याने झाला. कॉलेजची दोन वर्ष संपल्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. शिवानंदच्या सुदैवाने त्याच्यासारखीच तल्लख बुद्धीची दोन मुले मित्र म्हणून मिळाली. या दोघांचेही वडील पुण्यातील प्रख्यात डॉक्टर होते. त्यांच्या घरी जाणे येणे सुरू झाले. तिघांनी कोणतीही स्पर्धा न ठेवता आनंदाने एकत्र अभ्यास केला.
सहज उपलब्ध असलेल्या मित्रांच्या वडिलांचा नेमक्या शब्दांचा उपदेश ऐकत ही सुरुवात झाली. मेडिकल कॉलेजच्या शिक्षणामध्ये पहिले वर्ष अत्यंत खडतर असते. ते झाल्यानंतरची वाटचाल फुलपाखरू होते. आता विद्यार्थी मेडिकलमध्ये रुजला आहे, नक्की डॉक्टर होणार याची एक प्रकारे ती ग्वाहीच असते. पहिले वर्ष संपल्यानंतर मेडिकल कॉलेजच्या आर्ट सर्कलमध्ये शिवानंद रमू लागला. आणि जेमतेम सहा महिन्यातच आर्ट सर्कलचे शिवानंदशिवाय पान हाले ना, अशी परिस्थिती निर्माण झाली. वाचकांना वाचूनही आश्चर्य वाटेल की शिवानंदने एकूण अकरा नाटकांमध्ये भाग घेतला किंवा ती दिग्दर्शित केली. वडिलांनी लावून दिलेली सिनेमाची आवड त्याच वेळेला उफाळून आली होती. पुण्यातील एका प्रमुख वृत्तपत्रात नवीन लागलेल्या इंग्रजी सिनेमाचे परीक्षण लिहून देण्याचा छंद त्याने जोपासायला सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेडिकलला शिकणार्याने इंग्रजी सिनेमाची परीक्षणे लिहावीत व एका प्रमुख दैनिकाने ती प्रसिद्ध करावीत, हे सारे त्या काळातच काय आजही आश्चर्य वाटावे असेच आहे. कलेत व्यक्त होण्याचे उपलब्ध सर्व मार्ग शिवानंदने वयाच्या विशीतच अवलंबायला सुरुवात केली होती.
यानंतरचा ज्याला टर्निंग पॉईंट म्हणता येईल असा एक क्षण त्याच्या आयुष्यात आला. त्या काळात गाजणार्या एका वैचारिक पाक्षिकाच्या संपादकांच्या सहवासात तो आला. त्यांनी जमवलेल्या मांदियाळीमध्ये त्याचाही समावेश झाला. महाराष्ट्रातील नामवंत, विचारवंत व लेखकांची ती मांदियाळी होती. शिकण्याचा त्याचा सुवर्णकाळच होता. हे सारे करताना अभ्यासाकडे शिवानंदाने दुर्लक्ष तर केले नाहीच, पण आवडत्या विषयातील प्रथम क्रमांकही सोडला नाही.
डॉक्टर शिवानंद
मेडिकलच्या शिक्षणाचा प्रदीर्घ कालखंड संपला. इंटर्नशिपचा काळ पाहता पाहता पूर्ण झाला. पदव्युत्तर पदवी कशात असा एक यक्षप्रश्न त्याचे समोर उभा होता. शिवानंदने सर्जरी हा विषय निवडला. त्या काळातील विद्यार्थ्यांशी वागताना कठोर पण रुग्णांशी अत्यंत प्रेमाने वागणारे असे गुरू त्याला मिळाले. सर्जरीचे उत्तम प्रशिक्षण व रुग्णांची जवळीक कशी साधायची याचे अनमोल शिक्षण याची सांगड घालत सर्जरीचे शिक्षण त्याने पूर्ण केले ते सुवर्णपदक घेऊनच. या विषयातील सुवर्णपदक मिळवणे ही आजही अत्यंत कठीण व अभिमानास्पद अशी गोष्ट समजली जाते. हाच काळ कदाचित त्याच्या आयुष्यातील फक्त मेडिकल अभ्यासाचा ध्यास घेतलेला असावा. कारण या तीन वर्षांत अन्य उद्योग करायला फुरसतसुद्धा मिळत नाही.
खडतर वाटचालीचा काळ
शिवानंद व त्याचे कुटुंबीय अतिशय आनंदात होते. एक स्वप्न हाती आले होते. पुढे काय हा मात्र खरा प्रश्न होता. त्याचे उत्तर शिवानंदने शोधले. त्या काळामध्ये न्यूरोसर्जरी हा प्रांत खूपच अवघड असल्याने नवीन होता. तिकडे वळणार्यांची संख्या अत्यल्प असे. पुणे शहरात त्याची शिकायची सोय नव्हती, पण मुंबईत मोजक्या रुग्णालयांत त्याचे प्रशिक्षण मिळत होते.
मुंबईतल्या त्या काळातील क्रमांक एकच्या रुग्णालयात न्यूरो-सर्जरीचे प्रशिक्षण त्याने सुरू केले. पण आजवर चालू असलेल्या यशाच्या घोडदौडीला कुठेतरी चाप लागणार होता, आळा बसणार होता, असा काळ आला होता. मराठीत एक म्हण आहे, सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचे सोंग मात्र जमत नाही. पुण्यातील मेडिकलचे प्रशिक्षण हे त्या काळातही अत्यंत खर्चिक होते. नंतर मुंबईत तीन वर्षे काढणे न झेपणारे होते. कुटुंबाने एकत्रित निर्णय घेतला. शिवानंद सुपर स्पेशालिस्ट न बनता पुण्यालाच सर्जन म्हणून परतला. सर्जरीत गोल्ड मेडल असलं तरी स्वत:चे रुग्णालय सुरू करणे किंवा मोठ्या रुग्णालयामध्ये काम मिळणे हे अशक्यप्राय असते. स्वाभाविकपणे सरकारी नोकरीचा पर्याय शिवानंदने स्वीकारला. याच काळात नाट्यप्रेमातील सहभागी डॉक्टर मुलगी शिवानंदची सहधर्मचारिणी झाली. पुण्याच्या एका उपनगरामध्ये छोटेसे रुग्णालय सुरू करण्याचा दोघांनी घाट घातला. नवरा सर्जन तर बायको स्त्रीरोगतज्ज्ञ अशी जोडी असल्यामुळे अल्पावधीतच पेशंटांचा ओघ सुरू झाला.
लेखनाची ओढ
आता पुन्हा शिवानंदची ओढ मराठी लेखनाकडे झेप घेत होती. त्याने एकाच दमात दोन, वैद्यकीय विषयाशी संबंधित रूपांतरित पुस्तके लिहून हातावेगळी केली. दुर्दैवाने दोन्हीचे विषय काळाच्या फारच पुढचे होते. दोन्ही पुस्तके महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली असली, तरी त्यांना हवा तो प्रतिसाद मिळाला नाही, विक्रीचा उठाव तर सोडाच. एवढेच काय, वैद्यकीय क्षेत्राने सुद्धा दोन्ही पुस्तकांकडे दुर्लक्षच केले. पण या निमित्ताने एक वेगळीच गोष्ट घडली. त्याच प्रकाशकांकडे त्याची ऊठबस सुरू झाली. खरे तर नामवंत लेखकांची कायमच ये जा असलेले ते एक प्रकाशक. परिसस्पर्श व्हावा तशी त्यांनी निवडून प्रकाशित केलेली पुस्तके असतात, असे मत अन्य नामवंत प्रकाशकांचे.
त्यांच्याकडे येणारी विविध हस्तलिखिते वाचून त्यावर स्वीकार वा अस्वीकाराची मोहर उठवण्यासाठी ती शिवानंदकडे येऊ लागली. एक प्रकारे त्यांचा उजवा हात म्हणूनच त्याची आता वाटचाल सुरू झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले दोन मोठे प्रकल्प व अत्यंत गाजलेली एक ऐतिहासिक कादंबरी यामध्ये शिवानंदचा त्यांनी सहभाग करून घेतला. एक प्रकल्प होता संपूर्ण शास्त्रीय लेखनाचा. त्यातील मोजकी पण महत्त्वाची पाने शिवानंदनी लिहून दिली. याच दरम्यान वैयक्तिक आयुष्यात एक मोठाच बदल घडवणारा निर्णय या डॉक्टर दांपत्याने घेतला. पुण्याच्या उपनगरातून थेट पुणे शहरात येण्याचा. याचा एक मोठा फायदा असा झाला की प्रकाशन संस्थेशी दैनंदिन संपर्क ठेवणे शिवानंदला सहज शक्य झाले. आठवड्यातून एकदा, क्वचित दोनदा किमान ३० किलोमीटरचे जाणे येणे वाचले. दैनंदिन संपर्कामुळे कामाचे स्वरूपात मोठाच बदल होत गेला.
खरी ओळख मिळाली
एव्हाना प्रकाशन संस्थेची घोडदौड फारच वेगाने होत होती. अनेक नामवंत जाणकार लेखक जोडून झाले होते. असे लेखक त्यांचे पुस्तकाचे प्रकाशन समारंभ करण्यासाठी आग्रही असत. या समारंभांना आता शिवानंद प्रकाशन संस्थेतर्फे संपादक म्हणून हजर राहू लागला. सामान्य वाचक व जनतेपुढे त्याचे नाव आता दर पंधरवड्याला वृत्तपत्रातून फोटोसकट समोर येऊ लागले. विविध लेखकांशी चर्चा करणे, त्यांना संपादकीय सूचना करणे ही अत्यंत मोलाची कामगिरी आता शिवानंदकडे आली होती. या दरम्यान स्वतःच्या लेखनाकडे अजिबात दुर्लक्ष न होऊ देता सुंदरशी वेगळ्या विषयावरील पुस्तके लिहून त्याने हातावेगळी केली आणि विक्रीच्या खपाचा तडाखाही लावला. आज महाराष्ट्रातील एका प्रख्यात प्रकाशन संस्थेचा संपादकीय चेहरा म्हणून सर्जन शिवानंद कुशलतेनी पुस्तकांवर तितक्याच नजाकतीने सर्जरी करत आहे. स्वतःच्या लेखनानंदात अधून मधून मग्न आहे. नाट्यसिनेक्षेत्रातील व अभिजात गायक यांची चरित्रे संपादन करण्यात त्यांचेकडूनही व्वाऽऽऽ मिळवत आहे. हेच आजच्या आपल्या कथानायकाचे करियर कथेतील वेगळेपण.
तात्पर्य : सगळ्यांनाच शिवानंद होणे जमणारे नाही. मात्र एकच माणूस किती विविध क्षेत्रांमध्ये मनाजोगता विहार करतो याचे हे बोलके उदाहरण आहे. सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे अनेक डॉक्टर अनेक क्षेत्रात भरीव व वेगळी कामगिरी करत आहेत पण संपादनाच्या व प्रकाशनाच्या क्षेत्रात चमकलेले हे एकमेव उदाहरण असावे.