मी एकूण चार पुस्तकांचे संकलन केले. त्यापैकी १) ‘ज्युदो – एक खेळ’, २) ‘शरीरसौष्ठव’, ३) ‘महाराष्ट्र गीत गाथा’ या तीन पुस्तकांना साहेबांनी प्रस्तावना लिहिल्या. ४) ‘ॐ सूर्याय नम:’ या चौथ्या पुस्तकाच्या वेळी साहेब नव्हते.
व्यायामाचे हे तीनही प्रकार मी शिकलो, शिकवले, अनुभवले, उपलब्ध माहिती वाचून तिचे संकलन करून मग पुस्तके तयार केली. ‘ज्युदो’चे मुखपृष्ठ प्रकाशक ढवळे यांनी प्रसिद्ध चित्रकार रघुवीर मुळगावकर यांच्याकडून करून घेतले. त्याची माहिती देऊन स्पष्टीकरण करण्याच्या निमित्ताने माझी मुळगावकरांशी परिचय झाला. ‘शरीरसौष्ठव’चे मुखपृष्ठ माझा मित्र अरूण पेंडसे याचे होते.
छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर व साहेब ही एक साखळी ‘देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती’ या दुव्यांनी जोडलेली होती. स्वा. सावरकरांसाठी त्यातील देव वगळायचा, पण स्वराष्ट्र व स्वधर्म आणि त्यातही महाराष्ट्र धर्म याबद्दल हे दुवे पक्के होते. ‘ज्युदो’च्या दहा पंधरा ओळींच्या लहानशा प्रस्तावनेतसुद्धा इस्रायली तरुणांप्रमाणेच भारतीय तरूण देशप्रेमी होण्याची अपेक्षा साहेबांनी व्यक्त केली आहे.
‘शरीरसौष्ठव’ची प्रस्तावना लिहिण्यासाठी त्यांनी मला शिवसेना भवनात बोलावले होते. आतील छोट्या खोलीत (अँटी चेंबर) आम्ही बसलो होतो. ते सांगत होते, मी लिहून घेत होतो. मध्येच ते म्हणाले, ‘प्रभुदेसाई, मला इथे ते सावरकरांचे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेले भाषण हवे.’ मी म्हटले, ‘ठीक आहे. पंधरा मिनिटे थांबा. मी आणतो.’ असे सांगून मी जवळच असलेल्या सावरकर सदनात गेलो. स्वा. सावरकरांचे सर्व साहित्य तेथे होते. त्यांच्या अखेरच्या काळातील स्वीय सहाय्यक बाळाराव सावरकर माझे मित्र होते. स्वातंत्र्यवीरांचा अनेक वर्षांचा सर्व पत्रव्यवहार मी निरनिराळ्या फाईल्समध्ये विषयवार व तारीखवार लावून, त्यांच्या नोंदी करून त्याची सूची केली होती. बाळारावांनी मला लगेच ते पुस्तक दिले. मी ते भाषण लिहून घेतले. त्यावेळी बाळाराव म्हणाले, ‘प्रभुदेसाई, आपले सरकार तुमची बरीच काळजी घेते.’ मी म्हटले, ‘काय झाले?’ त्यांचा माणूस तुमच्यामागे आहे.’ त्यांनी साध्या पोषाखातील पोलिसांचा माणूस समोरच्या पदपथावर फेर्या घालताना मला दाखवला. पूर्वी काही वर्षे पत्रव्यवहार लावायला येत असे, तेव्हाही अशी पाळत असायची. आता साहेब आणि सावरकर या दोघांकडेही संबंध म्हटल्यावर पोलिसांचे लक्ष गेले असावे. मी बाहेर पडल्यावर कोपऱ्यावर मला तो भेटला. सर्व चौकशी करून निघून गेला. पूर्वीही केली होती. सरकार कोणतेही असो, स्वातंत्र्यवीरांच्या मागे ससेमिरा असतोच!
मी लहान असताना रा. स्व. संघाच्या एका कार्यकर्त्याबरोबर याच सावरकर सदनात स्वातंत्र्यवीरांना दोनदा भेटलो. एकदा त्यांनी आमची, खरे म्हणजे त्या कार्यकर्त्यांची चौकशी केली. दुसर्यावेळी ते झोपूनच होते. आम्ही केवळ नमस्कार करून परत आलो. ज्यांचे बरेच चरित्र घडताना ऐकले, वाचले, ज्यांचे सर्व साहित्य वाचले, त्या थोर पुरुषाला भेटण्याचा योग माझ्या आयुष्यात होता.
शिवसेना भवनात मी परत आलो. साहेबांनी स्वातंत्र्यवीरांचे ते १९३८च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेले ते प्रसिद्ध भाषण ‘भारतीय तरुणांनो, लेखण्या मोडून टाका नि बंदुका उचला’ ते प्रस्तावनेत उद्घृत केले. त्यावेळी त्यांनी माझ्या नावाची फक्त आद्याक्षरे सांगितली, ‘दि. मा.’ आणि माझ्याकडे पाहून नेहमीप्रमाणे मिश्किलपणे हसले. ‘साहेब, गदिमांच्या पायाशी बसण्याचीही माझी लायकी नाही!’ ते परत हसले. मला आठवले, ‘सलगी देणे कैसे असे!’
साहेबांनी प्रस्तावना लिहिलेले माझे तिसरे पुस्तक म्हणजे ‘महाराष्ट्र गीत गाथा’. साधारण ६०० पानांच्या या पुस्तकात मराठी माणसाच्या अभिमानाचे विषय असलेल्या पुढील विषयांवर सर्व मिळून एकूण ४०० गीते, कविता आहेत. महाराष्ट्र-२६६, सह्याद्री-५२, शिवाजी महाराज-५२, भगवा झेंडा, जरीपटका-९ आणि मराठी भाषा- ६३. एकूण ४०५.
१९७४मध्ये राज्याभिषेक त्रिशतसंवत्सरी साजरी केल्यावर १९७५ साली महाराष्ट्राचे रौप्यमहोत्सवी वर्षे वृत्तपत्रांनी, साप्ताहिकांनी दररोज एक किंवा आठवड्यातून एक गीत प्रकाशित करून साजरे करावे अशी विनंती मी त्यांना केली होती व वाचन करताना जिथे जिथे असे एखादे गीत नजरेस पडले, ते एका वहीत लिहून ठेवण्याची मी सवय लावून घेतली होती. अशा रीतीने जमलेली काव्ये, गीते मी वृत्तपत्रांना, साप्ताहिकांना, मासिकांना पाठवली होती. शासनाच्या ‘लोकराज्य’ पाक्षिकालाही, पण कोणीही काही केले नाही. मग आपणच हे काम का करू नये असा विचार करून मी या पुस्तकाच्या संकलनाला सुरुवात केली. १९८८ साली पुस्तक प्रसिद्ध झाले. जवळजवळ १४ वर्षे या पुस्तकावर मी काम केले.
प्रस्तावनेसाठी साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘या पुस्तकाचे मुखपृष्ठ तुम्ही कुणाकडून करून घेणार? तुम्ही रवी परांजपे यांच्याकडून करून घ्या. मी त्यांना सांगतो. त्यांना भेटा. थांबा, तुम्हाला त्यांचा पत्ता मिळणार नाही.’ त्यांनी लगेच मानेंना हाक मारली आणि मी व प्रकाशक धनंजय ढवळे यांना परांजपे यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. त्यांना दूरध्वनीही केला… ‘शिवरायाची सलगी देणे कैसे असे!’
परांजपे यांनी आम्हाला स्पष्ट सांगितले, ‘साहेबांनी सांगितले म्हणून मी मुखपृष्ठ करेन. पण मग त्यात काहीतरी कमी जास्त आहे म्हणून प्रकाशकांच्या सांगण्यावरून त्यात दुरुस्त्या करणार नाही. त्यांना अशी सवय असते.’ आम्ही काही बोललो नाही. परत येऊन सगळे साहेबांना सांगितले. साहेबांनी म्हटलं, ‘बरं.’
मुखपृष्ठ पूर्ण झाल्यावर मी व धनंजय ढवळे परांजपे यांच्याकडे गेलो. त्यांनी मुखपृष्ठाबरोबरच मलपृष्ठही तयार केले होते. मुखपृष्ठावर शिवाजी महाराजांचे चित्र, महाराष्ट्रातील गड-किल्ले यांचे चित्र होते. पण शिवाजी महाराज हे पहिलेच असे राजे होते की ज्यांनी समुद्राचे महत्त्व ओळखून ‘हिंदी आरमार’ स्थापन केले. तोफखान्याचा उपयोग युद्धात सुरू केला. हे लक्षात घेऊन परांजपे यांनी मलपृष्ठावर हे विषय चितारले होते. मी तर एकदम खूष झालो. पण प्रकाशकांची दृष्टी चिकित्सक असते. माझ्याबरोबर असलेल्या धनंजय ढवळे यांनी शिवाजी महाराजांच्या चित्रातच खोड काढली. परांजपे यांना सांगितले की शिवाजी महाराजांच्या नाकाला जो एक विशिष्ट बांक असतो तो जमलेला नाही. झाले, इथे ठिणगी पडली. परांजपे म्हणाले, ‘मी तुम्हाला अगोदरच सांगितले होते, मी चित्रात सुधारणा करणार नाही.’ ‘ठीक आहे, पण मी हे चित्र छापू शकणार नाही’ ढवळे म्हणाले. मी अवघडल्यासारखा झालो. एक मोठे चित्रकार, एक मोठे प्रकाशक आणि साहेबांनी आम्हाला चित्रकारांकडे पाठवलेले. मी त्या दोघांनाही म्हटले, ‘हे बघा, बाळासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही तुमच्याकडे आलो आणि केवळ त्यांच्या सांगण्यावरूनच तुम्ही हे चित्र काढले व अटही सांगितली होती. मी हे सर्व त्यांना सांगितले आहे. तेव्हा त्यांना काहीही कल्पना न देता आपण कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. आपण हे चित्र त्यांना दाखवू व त्यांचा निर्णय मान्य करू.’ नशिबाने माझे हे म्हणणे दोघांनीही मान्य केले. मी चित्र घेऊन साहेबांकडे आलो. त्यांना सर्व सांगितले. ढवळे यांनी त्यांचे निरीक्षण सांगितले. अगदी इतिहासकाळातील चित्रकारांनी काढलेल्या शिवाजी महाराजांच्या चित्रांचे दाखले दिले. साहेबांनी बराच वेळ चित्र पाहिले. तेही चित्रकार. महाराजांच्या नाकाला तो विशिष्ट बांक असतो हे त्यांनाही माहीत होते. त्यांचीही स्थिती अवघडल्यासारखी झाली. ते स्पष्टपणे काही बोलू शकत नव्हते. ते म्हणाले, ‘हे राहू द्या माझ्याकडे. मी सांगतो परांजपेंना. तुम्ही दोन दिवसांनी ते घेऊन जा.’ चार दिवसांनी आम्ही गेलो, तेव्हा ते चित्र ढवळे यांच्याकडे दिले. त्यांना योग्य तो बदल त्यात झालेला दिसला. त्यांनी परांजपेंना राजी केले होते की आणखी काही हे विचारून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितले नाही. ढवळे नि मी खूष झालो… ‘सलगी देणे कैसे असे!’
मी हे संकलन करत होतो त्यावेळी वाचनात जुन्या कविता, भावगीते, गाणीही येत होती. त्यावेळी जुन्या कविता आणि भावगीते यांचे वेगळे संकलन करून आणखी दोन पुस्तके तयार करावीत अशा विचाराने मी त्याप्रमाणे सुरुवातही केली होती, पण नंतर लक्षात आले की त्यामुळे तीनही पुस्तकांना उशीर होईल. म्हणून मग फक्त ‘महाराष्ट्र गीत गाथा’ हे एकच पुस्तक तयार झाले. पुढे इ.स. २०००मध्ये मोरेश्वर पटवर्धन, वामन देशपांडे इत्यादींनी ‘आठवणीतल्या कविता भाग-४’ व ‘गाणी गळ्यातली, मनातली भाग-१४’ ही पुस्तके संकलित केली. माझी संधी गेल्याबद्दल मला वाईट वाटले.
पहिली प्रत घेऊन मी साहेबांकडे गेलो. ती हातात घेऊन त्यांनी ती चाळली आणि म्हणाले, ‘प्रभुदेसाई, आपण या पुस्तकाचे प्रकाशन शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात करणार आहोत.’ मला क्षणभर काही समजलेच नाही. समजले तेव्हा एवढा आनंद झाला की काही विचारू नका. ते पुढे म्हणाले, ‘उद्याच दसरा आहे. तुम्ही सकाळीच प्रकाशन करण्याची प्रत राजेंकडे आणून द्या. राजे, उद्या यांनी हे पुस्तक आणले की ते माझ्या गाडीत ठेवा. प्रभुदेसाई, तुम्ही संध्याकाळी कार्यक्रमाच्या पाच मिनिटे आधी येऊन उभे राहा. मी आलो की माझ्याबरोबरच व्यासपीठावर चला.’ मी हवेत तरंगतच घरी आलो. मित्र, परिचित जमेल त्या सर्वांना कळवले.
संध्याकाळी व्यासपीठावर जायच्या जिन्याजवळ उभा राहिलो. ‘साहेब आले, साहेब आले’ अशा घोषाबरोबरच शिवसेनेच्या घोषणा सुरू झाल्या. साहेबांच्या गाड्यांचा ताफा आला. गाडी बाहेर उभी राही, आतले नेते, लोक उतरत आणि गाडी पुढे पार्किंगच्या व्यवस्थेकडे जाई. याप्रमाणे गर्दी हळूहळू वाढू लागली आणि साहेब व्यासपीठाच्या जिन्याजवळ आले. तेव्हा पाठीमागून आलेल्या लोंढ्याबरोबर साहेब व्यासपीठावर गेले आणि मी मागे ढकलला जाऊन रस्त्याच्या पलीकडील पदपथावर, तरण तलावाजवळ आलो. मी दोनतीनदा व्यासपीठाजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तेथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकार्याला अनेकदा विनंती केली. पण त्याने मला दाद दिली नाही. बर्याच वेळाने निराश होऊन मी सरळ घरी निघून आलो आणि झोपलो.
दुसर्या दिवशी अनेकांनी मला सांगितले की, साहेब मला शोधत होते. साहेबांकडे गेलो तेव्हा त्यांनी मलाच विचारले, ‘काय हो प्रभुदेसाई? काल तुम्ही कुठे होतात?’ मी सर्व हकीकत सांगितली. मग खूप वेळ आम्ही दोघेही हसत होतो. तरी एक फार मोठी संधी गेल्याबद्दल मला वाईटही वाटले. साहेबांबरोबर माझे एकही छायाचित्र नाही, असे मी लिहिले आहे. इथे पाच-पन्नास निघाली असती, पण नशिबात नव्हते.
इथेही त्यांचे महाराष्ट्र आणि राष्ट्रप्रेम प्रस्तावनेत प्रकट झाल्याचे आपल्याला दिसते. नवीन पिढीला आपले राष्ट्रपुरुष, आपला उज्ज्वल इतिहास, आपल्या पूर्वजांचे पराक्रम याबद्दल चाड नाही आणि या बेपर्वा तरुणांकडे स्वत:कडे ती हिंमत, पराक्रम नाही म्हणून विषाद व्यक्त केला आहे. ही आणि अशी गाणी तरुणांच्या श्रवणी-मुखी सतत असली पाहिजेत. कुठल्यातरी विकृत गाण्यांच्या तालावर तरुणांना नाचविण्याऐवजी असा वीरश्रीयुक्त गाण्यांनी वाद्यवृंद नटले पाहिजे आणि त्या तालावर देशातील तरुणांनी व सैनिकांनी रस्त्यारस्त्यांवर संचलन केले पाहिजे. मग आपल्या देशाला कोणत्याही शत्रूचे भय बाळगण्याचे कारण नाही अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे. ही प्रस्तावना लिहितानाच त्यांनी मला विचारले होते, ‘प्रभुदेसाई, मी तुम्हाला काय म्हणू? ‘माझे एक मित्र’ म्हणू? की ‘एक शिवसैनिक’?
‘साहेब, तुम्ही मला तुमचा मित्र म्हटले यातच मला मोठा बहुमान झाला आहे. पण मला जाणीव आहे की तुमचा मित्र म्हणवून घेण्याइतका मी मोठा नाही. म्हणून तुम्ही मला तुमचा शिवसैनिकच म्हणा.’ मी उत्तर दिले. अत्यंत प्रसन्नतेने हसून ते म्हणाले, ‘म्हणूनच मी तुम्हाला कट्टर शिवसैनिक म्हणतो.’
सही करताना ते ‘बाळ ठाकरे’ अशी करत. त्यातील ‘बा’ काढताना त्यांची मजा बघावीशी वाटे. प्रथम हातात पेन घेऊन ‘बा’ काढायच्या ठिकाणी प्रथम तीनचारवेळा ते हवेतल्या हवेत ‘ब’चा लंबगोलाकार काढल्यासारखे पेन फिरवीत आणि मग त्याच हालचालींचा फायदा घेऊन पेन किंवा जेथे ‘ब’ काढायचा तिथे टेकवून हलकेच ‘बा’ काढत!
साहेबांनी आपल्या पोशाखात आमूलाग्र बदल केल्याचे आपल्याला माहीत आहे. भगवी लुंगी, कफनी, केस, दाढी वाढवलेली आणि गळ्यात, हातात रूद्राक्षांच्या माळा! अगदी विरुद्ध बाजूचा पोशाख. मी एकदोनदा विचारले, पण त्यांनी काही सांगितले नाही. मग मी त्यांना म्हटले, ‘साहेब, हा पोशाख तुम्हाला शोभत नाही. वाघ गवत खाऊ लागला असे वाटते! तुमच्या वृत्ती आणि व्यवसायाला हा शोभत नाही. हा निवृत्तीचा पोशाख आहे. ‘अरे, हटातटाने पटा रंगवुनी जटा धरिसी का शिरी? मठाची उठाठेव का तरी?’ असे ढोंग्यांना खडसावून विचारणार्या शाहीर राम जोशींच्या जातकुळीतील तुमचे वडील प्रबोधनकार. त्यांचा वारसा आणि वसा चालवणारे तुम्ही. हा पोशाख तुम्हाला कसा शोभावा? तुम्ही स्वत:लाच फसवत आहात असे मला वाटते.’ ते फक्त हसले.
त्यांच्यामागील शिवसेनेचे व्याप वाढू लागले तेव्हापासून मी त्यांच्याकडे जाणे कमी केले होते. केव्हातरी ते विचारत, ‘प्रभुदेसाई येणे कमी केलेत?’ ‘साहेब, मी रिकामटेकडा आहे. तुम्हाला खूप काम असते. विशेष काही असेल तर येतो,’ मी म्हटले. पण हळूहळू माझे जाणे जवळजवळ बंद झाले. नंतर साहेबांची प्रकृती बिघडू लागली. मग एक दिवस मी ‘सरां’ना भेटलो व ते साहेबांना भेटायला केव्हा जाणार आहेत ते विचारले. ‘मी उद्याच साहेबांना भेटायला जाणार आहे.’ ते म्हणाले. ‘मग मी तुमच्याबरोबर येतो.’ मी म्हटले. ‘मग उद्या सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास तुम्ही कलानगरच्या दरवाजावर उभे राहा.’ सुरक्षा व्यवस्थेचा त्रास चुकविण्यासाठी ही सोय होती. त्याप्रमाणे मी त्यांच्या गाडीतून कलानगर दरवाजा ते मातोश्रीपर्यंत गेलो. पूर्वीची रचना आता बदलली होती. साहेब पहिल्या मजल्यावर त्यांच्या खोलीत बसले होते. सकाळची न्याहरी चालली होती. मला पाहून ते म्हणाले, ‘हं, मग काय प्रभुदेसाई, खूप दिवसांनी तुम्ही आलात. बसा.’ मी आणि सर बसलो. कपात चहा तयार करून देत म्हणाले, ‘हा चहा घ्या.’
‘मी चहा घेत नाही साहेब.’
माझ्या उत्तरावर ते म्हणाले, ‘हा घ्या. हा हर्बल टी आहे.’
ते खात होते त्यातील सलाड त्यांनी मला दिले. तेही आग्रहाने खायला लावले. सध्या काय करताय, कसे आहात इत्यादी चौकशी केली. मीसुद्धा त्यांच्या तब्येतीची चकशी केली. त्यांचा नेपाळी माणसांवर विश्वास दिसला. कारण मी पूर्वी त्यांच्याकडे जात असे तेव्हा त्यांच्याकडे काम करणारा ‘थापा’च होता आणि आतासुद्धा त्यांची सर्व व्यवस्था पाहणारे दोन तरुण ‘थापा’च होते.
तेवढ्यात सरांनी- मनोहर जोशींनी त्यांना विचारले, ‘साहेब, तुमची आणि या प्रभुदेसाईंची एवढी ओळख कशी?’
‘हिंदुत्वाचे अभिमानी आणि कट्टर शिवसैनिक असलेले दि. मा. प्रभुदेसाई हे माझे मित्र आहेत.’ त्यांच्या या उत्तराने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! जीवनाचे सार्थक झाले असे वाटले!
हेच उत्तर त्यांनी मला स्वत:ला एकदा दिले होते. कुर्ल्याची लहान जागा सोडून मी ‘ब्लॉक सिस्टीम’मध्ये आलो होतो, म्हणजे जरा प्रशस्त जागा घेतली होती. काही अपरिहार्य कारणाने आम्ही तेथे राहू शकलो नाही. कुर्ल्याला परत यावे लागले. ती नवीन जागा एका मोठ्या प्रसिद्ध कंपनीला सर्व करारमदार करून भाड्याने दिली. पण मुदत संपल्यावरही ते जागा परत द्यायला तयार नव्हते. जागा हडप करण्याचा त्यांचा विचार होता. माझ्याच जागेत मी गेलो तर मला मारण्याचीही तयारी करून ठेवली होती. शेवटी मी त्यांच्या सर्व संचालकांना पत्राने ही सर्व हकीकत कळवून त्याला मी वृत्तपत्रात प्रसिद्धी देईन असे कळवले. त्याचा योग्य तो परिणाम झाला आणि माझी जागा माझ्या ताब्यात आली. या सर्व घटनांची माहिती देणारा एक लेख तयार करून मी ‘मार्मिक’साठी साहेबांकडे नेऊन दिला. बरेच दिवस झाले तरी तो घेतला गेला नाही म्हणून साहेबांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘प्रभुदेसाई, मी काय सांगतो ते ऐका आणि लेख प्रसिद्ध करायचा की नाही हे तुम्हीच मला सांगा. ही एक मोठी कंपनी आहे. आपल्या बेरोजगार मुलांना आपण केव्हाही नोकरीसाठी तेथे पाठवतो. हा लेख प्रसिद्ध केला तर हे संबंध बिघडण्याचा संभव आहे. शिवाय तुमची जागा तुम्हाला मिळालीच आहे. मग काय करू?’ ‘साहेब छापू नका.’ मी उत्तर दिले. ‘छान! म्हणून मी तुम्हाला कट्टर शिवसैनिक म्हणतो.’ साहेबांनी मला दिलेले हे प्रमाणपत्र मला खूप मोलाचे वाटते.
साहेबांचा निरोप घेऊन मी निघालो. माझ्या पुस्तकासाठी स्वत:हून रवी परांजपेंना मुखपृष्ठ करायला सांगणे, पुस्तकाचे प्रकाशन शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात करणे, शेवटी मनोहर जोशींना दिलेले उत्तर यातून ‘शिवरायाची सलगी देणे वैâसे असे’ हाच गुण साहेबांमध्ये कसा आहे याचा अनुभव घेतला. केवढा मोठा दैवी योग माझ्या आयुष्यात होता याची जाणीव मला प्रकर्षाने झाली.
साहेब गेले आणि हिंदुत्व, राष्ट्र आणि महाराष्ट्र प्रेमाचे एक वादळ शमले!