मोबाईल नसलेल्या काळात तरूण मुलं एकमेकांना भेटायला चौकात जमायची. आता चौकात ‘आय लव्ह चौक’ असे सेल्फी पॉइंट दिसतात. तरुणाई म्हटलं की उत्साह, जोश, काही तरी नवीन घडविण्याची क्षमता असलेली असं चित्र तयार होतं; पण या तरुणाईला योग्य दिशा मिळाली नाही तर ती भरकटते. याचाच फायदा काही राजकारणी मंडळी उठवतात. निवडणुकीत जिंकण्यासाठी आपल्या शब्दावर जीव ओवाळून टाकणारे आणि एका इशार्यावर जीव घेणारे तरुण कार्यकर्ते यांना हवे असतात. या राजकारणात तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी यांना पर्वा नसते. कारण, पुढील निवडणुकीत नवीन तरुण यांच्या गळाला लागलेले असतात. सत्तेच्या राजकारणात तरुणांची होणारी फरपट हा ‘चौक’ या सिनेमाचा विषय आहे.
कथा साधारण अशी. गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाचं स्थान कुणाचं यावरून दोन मंडळांत बाचाबाची होते. दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते नगरसेवक भाऊच्या (उपेंद्र लिमये) मर्जीतील आहेत, पण बाचाबाचीच्या एका क्षणी नगरसेवकाचा लहान भाऊ बाल्या याला (अक्षय टाकसाळे) एक कार्यकर्ता कानफटात मारतो. याचाच राग धरून बाल्या मंडळाच्या अध्यक्षाला (शुभंकर एकबोटे) पोलिसांकडून चोप देतो. या घटनेने दोन्ही गटात सुडाची ठिणगी पेटते आणि या आगीत तेल घालायला महापालिका निवडणुकीत दोन वेळा पडलेला उमेदवार अण्णा (प्रवीण तरडे) हजर होतो. नगरसेवक टायगरचा स्वभाव एक घाव दोन तुकडे करणारा, तर अण्णाचा स्वभाव ‘मुँह मे राम बगल में छुरी’. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने ‘फुल टू राडा’ न करता दोघा राजकारण्यांत सुरू होतो शह-काटशहाचा खेळ. या दोघांच्या राजकारणात कार्यकर्ते मात्र मधल्यामध्ये भरडले जातात. उजवा हात, मानसपुत्र, अशा हे राजकारणी देत असलेल्या उपाध्यांना भुलून होतकरू तरुण अंगावर पोलीस केसेस घेतात आणि करीयर मातीमोल करतात. एका प्रसंगात पोलीस विचारतात, उत्सवात गुन्हे नेहमी कार्यकर्त्यांवरच का दाखल होतात नेत्यांवर का नाही यावर अण्णा उत्तर देतो, उत्सव कार्यकर्त्यांचा आहे… बुद्धिबळाच्या खेळात पाहिला बळी प्याद्यांचाच जातो.
मंडळाचा अध्यक्ष आणि बाल्या यांच्यातली दुश्मनी पुढे मोठं रूप घेते. फेसबुक, इन्स्टाग्रामवरील लाईक म्हणजेच यश मानणार्या सनीला (किरण गायकवाड) व्हॉट्सअप ग्रुपमधून काढलं गेलं, हेही मोठ्या वादाचं कारण ठरतं. यातूनच राजकारणी मंडळी तरुणाईच्या इगोला हवा कशी देतात आणि त्यातून भांडणं, मारामारी, खून अशा चढत्या क्रमाने तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त कसं होतं, हे वास्तवदर्शी चित्रण या सिनेमात दाखवलं गेलं आहे.
या सिनेमातील बहुतांश मंडळी मुळशी पॅटर्नशी संबंधित असल्याने की काय या सिनेमावर मुळशी पॅटर्नचा प्रभाव जाणवतो. वेगवान मांडणीने सिनेमाचा पूर्वार्ध रंगतदार झाला आहे, पण उत्तरार्धात प्रसंग गडद करण्याच्या प्रयत्नात सिनेमा काही ठिकाणी एकसुरी भासतो. इन्स्पेक्टर मुळे ही सुरुवातीला खूप प्रभावी व्यक्तिरेखा वाटते, नंतर खूप नगण्य होत जाते. मयूर हरदास यांचे छायाचित्रण प्रेक्षणीय आहे. दिग्दर्शक म्हणून देवेंद्र गायकवाड यांचा पदार्पण असलं तरी सिनेमातंत्रावर त्यांची उत्तम पकड जाणवते. ‘जाळ जाळ झाला रे’ हे गाणं दणकेबाज झालं आहे. सर्वच कलाकारांनी भूमिकेला साजेशी कामे केली आहेत. प्रवीण तरडे यांनी गोड बोलून गळा कापणारा राजकारणी विनोदी अंगाने उत्तम साकारला आहे. उपेंद्र लिमये यांचा नगरसेवक स्टायलिश आहे. अक्षय टाकसाळेने अंगभर सोन्याने मढवलेला आणि बुद्धीने बाल्यावस्थेत असलेला बाल्या ऐटीत रंगवला आहे. स्नेहल तरडे, शुभंकर एकबोटे, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड आणि रमेश परदेशी यांनी भूमिका उत्तम साकारल्या आहेत. गुन्हेगारी आणि राजकारण या विषयावरील चित्रपट पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट पाहा.