‘अय अय थांब. थांबत का नाही रे. जा जा, xxx सोनं नाय लागलं तुझ्या टॅक्सीला.’
असा दमदार आवाज ऐकला आणि माझं लक्ष तिकडे वेधलं गेलं. एक मध्यमवयीन माणूस टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न करत होता. अंगात निळा सफारी सूट. काळेभोर डाय केलेले केस. रांगडा, देवीचे वण असल्यासारखा खडबडीत चेहरा. उजव्या हाताच्या दोन बोटात अंगठ्या. पायात साधीच काळी चप्पल. हातात लेदरसारखा दिसणारा पाउच. या सगळ्या वेशाला न शोभून दिसणारी गळ्यातील तुळशीची माळ. माळ सफारीच्या कॉलरमधून मुद्दाम बाहेर काढलेली वाटत होती. आणि सगळ्या वेशाला एकदम अपेक्षित असा दमदार आवाज. या आवाजात घसा फुटेस्तोवर हा माणूस टॅक्सीचालकांवर ओरडत होता.
कमी अंतरासाठी रिक्षा, टॅक्सी मिळणे हे सगळीकडे अवघडच असते. त्यात दादरमध्ये अजून कठीण. ओला उबरदेखील मिळत नाहीत, मिळाल्या तर कॅन्सल करतात.
कार्यक्रम संपलेला होता आणि माझ्या ठिकाणापासून दादर स्टेशन दीड दोन किलोमीटर होते. चालत जाण्याचा कंटाळा आलेला होता. पण टॅक्सी मिळणे अवघड वाटू लागले म्हणून या दमदार आवाजाला विचारले, ‘दादा, दादर स्टेशन इकडून जवळ पडेल की तिकडून?’
‘तुम्हाला दादर स्टेशनला जायचं आहे का?’ इति दमदार आवाज.
‘नाही, गंमत म्हणून रस्ता विचारते आहे,’ असे उत्तर देण्याचा विचार मनात आला होता, पण तो मी तसाच गिळला. दमदार आवाजाला उत्तर दिले, ‘हो.’
‘थांबा मग. मी तिकडचीच टॅक्सी पकडतो आहे, तुम्हाला देखील सोडतो.’
आता एकदम असे अनोळखी माणसाबरोबर कसे जायचे म्हणून मी नको म्हणाले. पण दमदार दादांनी माझ्या चेहर्याकडे बघून ते ओळखले.
‘अहो मी काय खाणार आहे का तुम्हाला? अजून एक दोन गरजूंना घेऊन जाऊ. बास?’
मला एकदम गरजू कॅटेगरीमधे त्यांनी टाकलेले बघून हसू आले.
‘हसायला काय झालं?’
‘काही नाही?’
‘मग मी काय इथे गंमत करायला उभा आहे की करमणूक करायला? टॅक्सी थांबवा हात दाखवून. बायकांनी थांबवली की लवकर थांबते.’
भलतीच दमदाटी बाई या माणसाची, असे वाटले; पण माणूस निर्मळ मनाचा असावा.
टॅक्सी थांबवण्यात मी सक्रिय सहभाग द्यायला सुरुवात केली. कशीबशी एक टॅक्सी थांबवली, त्याला दादर स्टेशन म्हणून सांगणार तो दमदार दादा ओरडले, ‘माहीम, माहीम.’
मी ओरडले, ‘अहो, माहीम कुठे? दादरला जायचे आहे ना?’
‘आपल्यासाठी नाही, या बाकावर आजी बसल्या आहेत ना, त्यांना करून द्यायची आहे. त्यांना मी तसे वचन दिले आहे.’
हे बघा राजा श्रीराम! इथे स्वतःच्या जाण्याचा पत्ता नाही आणि दुसर्यांना टॅक्सी मिळवून देतोय. होता होईल तितके वाईट भाव मी चेहर्यावर आणले, त्याकडे सरळ दुर्लक्ष करून दमदार दादा आजीकडे वळले आणि म्हणाले, ‘चला आजीबाई, आली तुमची टॅक्सी. आम्हाला सोडता का जाताना दादर स्टेशनला?’
आजीबाई हो म्हणाल्या, तसा लगेच मला म्हणाला, ‘अजून कोणाला यायचे आहे का विचारा. आजीबाई आपल्याला जाताना दादरला सोडणार आहेत. केवढे उपकार आहेत त्यांचे! अशी माणसं मिळतात का हल्ली कुठे?’
पण आम्ही टॅक्सीत बसणार तो टॅक्सीवाला ओरडला, ‘मधेच इथे तिथे थांबवणार नाही. दादर स्टेशनला तर नाहीच नाही. मंजूर असेल तर बसा नाही तर मी चाललो.’
वैतागून आजीबाईंना बसवून आम्ही दुसरी टॅक्सी पकडण्याकडे मोर्चा वळवला. मला आता मजा येऊ लागली होती. दमदार दादांची टॅक्सी थांबवण्याची पद्धत, टॅक्सीवाल्याला झापण्याची पद्धत एकदम अद्वितीय होती. गोड बोलतात की झापतात तेच त्यांना कळत नव्हतं. दादांची मात्र अखंड बडबड चाललेली होती.
‘च्यायला, इथे हे नेहमीचं नाटक आहे. मला तर वाटतं की नोकरी सोडून टॅक्सीच चालवावी आता. गाडीच घ्यावी एखादी. पण प्रॉब्लेम आहे हो.’
मी उगीचच विचारले, ‘पार्किंग का?’
‘नाही हो, पार्किंग खंडीभर आहे इथे. मी शंभर गाड्या आणल्या तरी मला पार्किंग मिळेल.’
दादर माटुंग्याला यांना शंभर गाड्या लावायला कोण पार्किंग देणार होतं ते यांनाच ठाऊक! तितक्यात एक टॅक्सी आली आणि विषय अर्धवट सुटला.
‘आता थांबतो का देऊ थोतरीत?’
आता तो थांबलाच नाही तर हे कसे त्याच्या थोतरीत देणार असा प्रश्न मला पडत होता पण त्यांना हे विचारणे वेडेपणाचे होते.
टॅक्सी थांबली. हे धावत गेले पण तितक्यात एक काकू तिथे आल्या, त्यांनी टॅक्सीवाल्याला विचारले, ‘गिरगाव?’
तो नाही म्हणाला. पण आम्हाला दादर स्टेशनला सोडायला तयार झाला. आम्ही दोघे टॅक्सीत बसलो, टॅक्सी निघणार तितक्यात दमदार दादा ओरडले, ‘अय थांब.’
मी आश्चर्याने विचारले, ‘काय झालं आता?’
ते गाडीतून खाली उतरले आणि त्या काकूंना आवाज दिला, ‘अय म्हातारे, इकडे ये.’
या दादांपेक्षा त्या बाई अगदी तीन चार वर्षेच मोठ्या असतील, पण दादा त्यांना म्हातारे म्हणून आवाज देत होते. काकूंनी विचारले, ‘काय झाले.’
दादा म्हणाले, ‘इकडे ये म्हणतो ना.’
त्या काकू गाडीच्या जवळ आल्यावर म्हणाले, ‘बसा गाडीत. सोडतो तुम्हाला गिरगावला.’
आता मात्र माझी तोंडात बोटे घालायची बाकी राहिली होती. टॅक्सीवाला नाही म्हणतोय. तरी यांचे आपले चालूच. बळजबरी त्यांनी काकूंना टॅक्सीत बसायला लावले. ‘जाईल हो तो गिरगावला. जायेगा ना रे?’
टॅक्सीवाला नाही म्हणाला तसे दादा उखडले, ‘जा ना, तेरे बाप का क्या जाता. भाडा मिल रहा है ना.’
टॅक्सीचालक म्हणाला, ‘नहीं भैय्या, मुझे वसई जानेका है.’
‘तो इनको गिरगाव छोडके वसई जाव ना?’ दमदार दादा.
मी आणि काकू आश्चर्यचकित नजरेने बघत होतो. पण टॅक्सीवाला बधला नाही.
‘अरे जाव ना दोस्त. बुढी औरत है.’
आता टॅक्सीचालकाने उत्तरदेखील दिले नाही. आता आमच्याकडे बघून ते बोलू लागले, ‘बघा, यासाठी मी म्हणतो की गाडी घ्यायची. पण आमच्याकडे घरी विचित्र प्राणी आहे ना, तो आडवा येतो. आमची बायको हो. डोकंच फिरल्यासारखे करते. गाडी घेऊच नको म्हणते. आता जगातल्या सगळ्या गाड्या काय माझ्या गाडीवर येऊन आदळायला जन्माला आल्यात का? पण कोण सांगणार यांना? आपलंच डोकं लावणार. आता एक दिवस गुपचुपच गाडी घेतो. सांगतच नाही घरी. करा तिच्यायल्या काय करायचं ते.’
मग दमदार दादांनी खिशातून पैसे काढले आणि जोरदार दवंडी दिली, ‘मी पैसे देणार आहे. कोणीही पर्सला हात लावायचा नाही किंवा मी देते मी देते करायचे नाही. मी देणार म्हणजे मीच देणार.’
पुढे आम्हाला काहीही बोलायला त्यांनी वावच दिला नाही. स्टेशन आलं, अजूनही टॅक्सीवाल्याला काकूंना गिरगावला सोड हेच दादांचे पालुपद चालू होते.
‘मला तिकडून मिळाली असती टॅक्सी. उगीच इथे आले.’
असे काकू म्हणाल्या आणि दादा मात्र चिडले, ‘अय म्हातारे, गप. तुला गिरगावला सोडतो म्हंटले ना, माझी जबाबदारी.’
त्यांनी रांगेतील पुष्कळ टॅक्सीचालकाना विचारले, पण कोणी तयार होईना. तसे दादा जोरजोरात त्यांच्यावर ओरडत होते, ‘जायचं नाही तर टॅक्सीचा धंदा कशाला करतो मग? पतंग उडव घरी जाऊन.’
‘तुम्ही तुमचे जा भाऊ, मी जाते,’ असे काकू म्हणाल्या की दादा पुन्हा ओरडले, ‘आता तुम्ही गपसता का? बघतोय ना मी?’
या दादांनी आपल्याला मदत केलेली होती, मग टॅक्सी शोधत असताना आपण कसे निघून जायचे म्हणून मीदेखील अजून एकदोन टॅक्सीची चौकशी करत होते.
‘तुम्ही काय करताय इथे?’ दादांनी मला विचारले.
मी म्हणाले, ‘टॅक्सी पकडायला मदत करते. ‘
‘तुम्हाला तिथून स्टेशनला यायला टॅक्सी मिळना आणि तुम्ही आम्हाला शोधून देणार. उशीर केवढा झालाय. जा तुम्ही. मी आहे म्हातारीबरोबर.’
‘अहो राहू दे. मी बघते माझी माझी, ‘ पुन्हा एकदा काकू म्हणाल्या. तसे आता दादा वसकलेच, ‘तुम्हाला गिरगांवला ती टॅक्सी सोडेल म्हणून मी बसवून आणले ना, आता तुम्हाला दुसरी टॅक्सी करून देण्याची जबाबदारी माझी.’
आता पुन्हा त्यांचा होरा माझ्याकडे वळायचा म्हणून मी जिना चढू लागले. दोन पायर्या चढून मागे आले, तर दादा हात धरून काकूंना दुसर्या बाजूला नेत होते. जोरात कुठल्या तरी टॅक्सीवाल्याला थांबवत होते.
मी त्यांच्यासमोर जाऊन त्यांना विचारले, ‘तुमचे नाव काय?’
तर म्हणाले, ‘माझं नाव ऐकून काय माझ्या नावाने सिद्धीविनायकाला पूजा घालणार का तुम्ही?’
मीदेखील त्यांच्यापेक्षा जोरात म्हणाले, ‘घालेन देखील कदाचित. तुम्हाला गाडी घेण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून. तुम्हाला काय ठाऊक?’
आता मात्र त्यांचा चेहरा कमालीचा मवाळला आणि म्हणाले, ‘नावात काय ए ओ. पण माझ्या नावात होकार पणे आणि नकार पण.’
माझ्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह बघून गडगडाटी हसले आणि म्हणाले, ‘होना नावंय माझं. होनाजी म्हणा हवे तर.’
आयुष्यातील कुठल्याही वेळी त्याच्याकडे नकार नव्हताच. होकारच होता फक्त.