– राजेंद्र भामरे
वर्ष होते १९८६… तेव्हा मी मालेगाव शहरातल्या सिटी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होतो. दोन वर्षांपूर्वीच मी तिथे बदलून आलो होतो. माझे लग्न झालेले नसल्याने १८/२० तास पोलीस स्टेशनला असायचो. बोलका स्वभाव आणि लोकांना हाताळण्याची पद्धत यामुळे संपूर्ण शहरात माझे अनेक मित्र झाले होते. शहरात तेव्हा मालेगाव शहर, किल्ला, आझाद नगर आणि कॅम्प अशी अवघी चार पोलीस ठाणी कार्यरत होती. मालेगाव हे जातीय दंगलींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून शहरास सुमारे १०० वर्षांचा जातीय दंगलींचा इतिहास आहे.
पेशव्यांचे मुख्य सरदार श्री राजेबहाद्दर यांच्या जहागिरीच्या मुख्यालयाचे मालेगाव हे ठिकाण होते. पानिपताच्या तिसर्या युद्धावरून परत येताना उंट, बैलगाड्या इत्यादीवर लादलेले सामान बाजारबुणग्यांच्या (सामानवाहू नोकर आणि कामगार) मदतीने परत आणण्यासाठी उत्तर प्रदेशातील विणकर समाजाच्या मुस्लीम लोकांना त्यांनी मदतीस घेतलेले होते. ते मालेगावात येऊन तिथेच राहिले. सन १८१८मध्ये पेशवाई संपली आणि ब्रिटिशांनी मालेगावचा किल्ला ताब्यात घेतला. सरदार राजेबहाद्दर शरण आले आणि ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. तेव्हा त्यांच्या पदरी असलेल्या अरब पलटणीतील बरेचसे सैनिक मालेगावात स्थायिक झाले, तेव्हापासूनच इथे मुस्लिम लोकांची संख्या अधिक राहिलेली आहे.
इथल्या गणपती उत्सवाचे स्वरूप देखील काही वेगळेच होते. अनेकदा गणेशोत्सवाच्या वेळी तिथे जातीय तणाव निर्माण होऊन दंगे होत असत. मी त्याचा आँखो देखा अनुभव घेतलेला आहे…
तर ते वर्ष होते १९८६, सप्टेंबरचा महिना होता. गणपती उत्सव सुरू झाला होता… तेव्हा उत्सवाचा बंदोबस्त संपूर्ण शहरात एकत्रितरित्या लावला जात असे, त्यामुळे कोणालाही शहरात कोठेही बंदोबस्त मिळत असे. मालेगावात शहरात ‘आझाद नगर’ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात दत्तवाडी, (पवारवाडी) नावाचा एक भाग आहे. त्याच्या चारही बाजूंनी संपूर्ण मुस्लीम वस्ती आहे. मधोमध असलेल्या वस्तीत दत्तवाडीचा सार्वजनिक गणपती असे. मालेगावात त्यावेळी त्याला मानाच्या गणपतींचा दर्जा होता. मुख्य मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी, शहरातील प्रमुख मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील प्रमुख लोक या गणपतीच्या मंडळात जात असत आणि मिरवणुकीत सहभागी होऊन तेथील गणपती मुख्य मिरवणुकीत घेऊन जात असत. याही वर्षी तसे घडले. दत्तवाडी मंडळाची मिरवणूक निघाली तेव्हा साहजिकच एसआरपीसह फार मोठा पोलीस बंदोबस्त तेथे होता. कारण तिथला परिसर मुस्लीमबहुल. मिरवणूक वाजत गाजत फत्ते मैदान चौक येथे आली. तो शंभर टक्के मुस्लीम एरिया. चौकाला लागूनच रस्त्यावर ‘भाऊमियां मशीद’ होती. दत्तवाडी मंडळातील कार्यकर्त्यांनी खूप वेळ मिरवणूक तेथे थांबवली, ढोलताशांचा गजर सुरू होता, कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते, त्यामध्येच त्या ठिकाणी गुलालाचा प्रचंड वापर गेला होता. त्यामुळे मशिदीच्या पांढर्या भिंतीवर खूप सारा गुलाल पडून ती लाल धम्मक झाली होती. बराच वेळ तिथे थांबलेली मिरवणूक एक ते दीड तासांनी पुढे गेली.
त्यानंतर मुस्लीम बांधवांचा जमाव हळूहळू तेथे जमू लागला. गुलालाने लाल झालेली मशीद बघून जमाव हळूहळू प्रक्षुब्ध होऊ लागला. जमावातल्या तरुणांची संख्या चार ते पाच हजार इतकी असेल. हळुहळू त्या भागातील वातावरण बदलू लागले. जमावाने घोषणाबाजी चालू केली होती ‘अल्ला हो अकबर, नारा-ए-तकदीर, दिन दिन दिन’ अशा घोषणा जोरजोरात सुरू होत्या. त्यात काही चिथावणारे होतेच. त्यामुळे जमाव अत्यंत संतप्त व बेभान झाला होता.
आम्हाला खबर मिळाली तेव्हा मी शेजारी असलेल्या ‘नुरानी मशीद’ परिसरात बंदोबस्त करीत होतो. नियंत्रण कक्षाकडून आम्हाला फतेह मैदानात जाण्याची सूचना मिळाली, जाऊन पोहोचलो. तेव्हा जमाव अत्यंत बेभान झालेला होता. तेथे बंदोबस्तासाठी बाजीराव राठोड नावाचे अधिकारी होते. ते त्यावेळी कळवण पोलीस स्टेशनला कार्यरत होते, ते बंदोबस्तासाठी आलेले होते (सध्या ते हयात नाहीत). नाशिक जिल्ह्यात ते अत्यंत गाजलेले आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. मला ते सीनियर होते. मी गेलो तेव्हा ते त्यांच्याकडील रिव्हॉल्वरमधील गोळ्या तपासून बघत होते. मी त्यांना भेटलो तेव्हा ते म्हणत होते की वेळ पडली तर फायरिंग करीन इत्यादी इत्यादी. जमाव मोठा आणि तरुण मुलांचा आहे. बळाचा वापर केला तर जमाव अंगावर येईल, गावात जाईल व प्रचंड अनर्थ होईल, मोठ्या प्रमाणात हानी होईल, असे मी त्यांना सांगितले. क्षणाक्षणाला तणाव वाढत होता.
जमाव साधारण पाचेक हजार तरुणांचा असल्यामुळे आणि तेथे सुमारे वीस-पंचवीस पोलीस व एक एसआरपीएफ प्लाटून एवढाच बंदोबस्त असल्याने तो जमाव कंट्रोल करणे अशक्य होते. काय करावे काही सुचत नव्हते. मी गर्दीत आपले कोणी मित्र दिसतात का, म्हणून बघू लागलो.
तिथे मला माझे कारखानदार मित्र इसरार आझमी दिसले, त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करीत असताना एकदम लक्षात आले की हा जमाव कंट्रोल करू शकेल, असा एकच माणूस इथे आहे आणि तो म्हणजे त्यावेळचे मालेगावचे आमदार निहाल अहमद. इसरार भाईंना विचारले, ‘निहाल साब अब कहाँ होंगे?’ ते म्हणाले, मुझे मालूम है इस वक्त वो कहां रहेंगे… मी त्यांना ताबडतोब न्िाहालभाईंकडे निरोप देऊन पाठविले. निहाल अहमद यांच्याशी माझे चांगले संबंध होते. ‘जमाव प्रचंड हिंसक झालेला आहे. तुम्ही या आणि काहीही करून जमाव शांत करा, कंट्रोल करा. तुमच्याशिवाय कोणीही तो शांत करू शकणार नाही, अन्यथा फार मोठा अनर्थ होऊ शकेल,’ असा निरोप मी त्यांना दिला.
इसरारभाई ताबडतोब गेले. दहा मिनिटांत त्यांच्या स्कूटरवर मागे बसून निहाल अहमद आले. त्यांनी स्कूटर जमावापासून थोडी लांब थांबवली आणि ते चालत जमावाकडे यायला निघाले. येताना त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला. त्यांच्या डोळ्यांत मला आश्वासक भाव दिसले. कुठेतरी रिलिफ वाटला. निहालभाईंनी ओटा असलेली उंच जागा निवडली आणि त्यावर उभे राहिले. त्यावेळी जमाव ‘जला देंगे, मार देंगे, काट देंगे’ इत्यादी घोषणा देतच होता. हात वर करून त्यांनी लोकांना शांत होण्याचे आवाहन केले आणि भाषणास सुरुवात केली. त्या वेळेस जमाव प्रचंड चिडलेला होता. यापूर्वी झालेल्या दंगलींचे संदर्भ, पोलिसांची काम करण्याची पद्धत याचे संदर्भ देत निहालभाई जमावाशी संवाद साधून आपलेसे करीत होते. मशिदीकडे पाहत ते म्हणाले, ‘ये किसने किया है हम उनको छोड़ेंगे नहीं. हरदम ये लोग ऐसा ही करते हैं और अमन पसंद मुसलमानों को चिढाते हैं.’ यावर जमाव आणखीन जोरजोरात घोषणा देऊ लागला. यावर त्यांनी जमावाला हाताने शांत केले व म्हणाले, ये उन लोगों की, तुम्हे फंसाने की चाल है, पर इस बार हम फंसनेवाले नही. सुनो, मैं ये मामला विधानसभा के अंदर लेके जाऊंगा. जगह जगह उठाऊंगा. हम किसी से डरते नहीं, पर ये उन लोगों की चाल है, खुद शुरुवात करना और मुसलमानों को बदनाम करना, पर आज मैं ऐसा होने नहीं दूँगा. हां, लेकिन इसके लिए तुम लोग मेरे साथ होना चाहिए, आप लोग दोगे मेरा साथ? सगळे लोक ‘हां हां देंगे’ असे ओरडू लागले. ‘हम लोग क्या है उनको मालूम नहीं, हम वो हैं जो डिसीप्लीन को माननेवाले हैं और डिसीप्लीन क्या है ये तुमको मालूम है? सुनाऊं आपको?’
यावर जमाव, सुनाव, बोलो बोलो असे ओरडू लागला. निहालसाहेब बोलू लागले, ‘शांत रहो और मेरी बात गौर से सुनो. १९७१ में हमारा पाकिस्तान के साथ युद्ध चालू था. समंदर में हमारे हिंदुस्तान नेव्ही का आयएनएस ‘खुकरी’ करके जहाज था. कॅप्टन मुल्ला उस जहाज के कप्तान थे. अचानक पाकिस्तान का एक बम खुकरी जहाज पर गिरा. खुकरी जहाज टूट गया और धीरे धीरे डुेबने लगा, ये जैसे कॅप्टन मुल्ला ने देखा तो उन्होंने पूरे सैनिकों को उतारना शुरू किया. सारे सैनिक कह रहे थे कि कप्तान साब आप पहले उत्तर जाओ. फिर भी कप्तान मुल्ला ने उनकी बात नही सुनी और उन्होंने सारे सैनिकों को धीरे धीरे धीरे करके नीचे उतारा. नीचे से भी सैनिक आवाज दे रहे थे, कप्तान साहब नीचे उतरो, कप्तान साब नीचे उतरो, फिर भी उन्होंने उसकी तरफ ध्यान नहीं दिया. जितने सैनिक नीचे उतारे जा सकते थे उन्हें छोटी छोटी नावों में बिठाकर उतार दिया और हिंदुस्थान नौदल की परंपरा को बरकरार रखते हुए वहां लगे हुए हमारे तिरंगे झेंडे को सॅल्यूट करते-करते जहाज के साथ मुल्ला साहब भी डूब गए. इसको डिसीप्लीन कहते हैं. तुम मानोगे डिसीप्लीन?’
जमाव : ‘हां हां हम मानेंगे साहब, बिलकुल मानेंगे.’
निहाल भाई : ‘तो फिर मेरी बात सुनो, डिसीप्लीन को मानो और अपने अपने घर को जाओ, बाकी मैं देख लूंगा.’
निहाल अहमद यांच्या आवाहनानंतर जमाव शांतपणे आपापल्या घराकडे निघून गेला आणि आमदार साहेबही हळुहळू जमावातील लोकांशी बोलत निघून गेले.
जातीय संवेदनशील शहरात जनसंपर्काला फार मोठे महत्त्व असते. कारण पाच-दहा हजार संख्येच्या जमावावर बळाचा वापर करणे अशक्य असते. त्या जमावाला कौशल्यपूर्वकच हाताळावे लागते. वेळेवर जागीच निर्णय घेण्याला फार महत्त्व असते. त्या दिवशी आमदार निहाल अहमद नसते, तर दंगल उसळून मोठा अनर्थ घडला असता. पण आपल्या अनुभव आणि वाक्चातुर्याच्या बळावर त्यांनी जमावाची नाडी ओळखली, संवादातून त्याची मने जिंकली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जाताना लोक निहाल साहेब अब इनको नहीं छोडनेवाले, असे म्हणत आपल्या घराकडे निघून गेले.
(लेखक पुण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत.)