भारतीय जनता पक्षाच्या ट्रोलावळीचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भक्तांचं दुर्भाग्य असं आहे की त्यांच्यावर नेहमी थुंकून चाटण्याची वेळ येते. ती वेळ त्यांच्यावर इतर कोणी नाही, तर त्यांचे परात्पर आका मोदी हेच आणतात आणि तरीही ते निलाजरेपणाने मोदींनी काय महान मास्टरस्ट्रोक मारला आहे, अशी आभाळ फाटेस्तोवर कौतुकं करत निरर्गल चाटुकारिता करत राहतात… आताही देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय मोदींनी जाहीर केला, तेव्हा त्यांच्या भक्तांचे डोळे पांढरे झाले. अवघ्या आठवड्यापूर्वीच, दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घालण्यापूर्वी धर्म विचारला (जात नव्हे), याचा विखारी प्रचारासाठी वापर करून सगळ्या देशात धर्मद्वेषाची आग पेटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याच आकांनी ठरवून टाकलं, आता देशवासीयांना धर्म नव्हे, जात विचारणार!
मुळात पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कोणत्याही सुबुद्ध माणसाला काय प्रश्न पडायला पाहिजे होते? तिथे पुरेसा बंदोबस्त का नव्हता, इतक्या संवेदनशील ठिकाणी हल्ल्याची तयारी होत असताना सुरक्षा यंत्रणांना सुगावा कसा लागला नाही, देश आणि खासकरून देशातले हिंदू मोदींच्या राजवटीतच सुरक्षित आहेत, तर मग असे हल्ले होतातच कसे, असा हल्ला होणे हे काश्मीरमधील सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या केंद्रीय गृह खात्याचं अपयश नाही का?… बुद्धीचा पिढीजात ठेका मिरवणार्या एकाही मोदीभक्ताला हा प्रश्न पडला नाही… त्यांना त्या हल्ल्यात फक्त एक ओळ सापडली, धर्म विचारून हत्या केल्या गेल्या… ताबडतोब तिचा बाजार मांडला गेला… हल्ल्यातल्या बळींवर अंतिम संस्कार होण्याच्याही आधी, काही तासांत त्यावरून ‘जात नाही, धर्म विचारला’ अशी ओळ तयार करून, पतीच्या मृतदेहापाशी सुन्न बसलेल्या नवविवाहितेचं चित्र तयार करून घेऊन समस्त रिकामटेकडे फॉरवर्डे काकाकाकूंच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रूपवर हा मेसेज फॉरवर्ड होऊ लागला. पाहा पाहा, मुसलमान तुम्हाला हिंदू म्हणूनच ओळखतात, तुमची जात कोणी विचारत नाही, हे हिंदूंच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला गेला… होय, दहशतवाद्यांनी धर्म विचारूनच गोळ्या घातल्या त्या पर्यटकांना, पण, त्यामागे अतिरेक्यांचा जो धार्मिक असंतोषाला चिथावणी देण्याचा अजेंडा होता, तोच हे तथाकथित धर्मवीर पुढे नेत नव्हते का?
शिवाय भारतासारख्या देशात, ‘धर्म नाही, जात विचारली’ असा हुच्चपणा तथाकथित उच्चजातीयांनाच शोभतो, त्यांनाच तो परवडू शकतो. कारण त्यांना इथे उच्चजातीचा टेंभा मिरवत वावरण्याची सोय आहे. तथाकथित खालच्या जातींना विचारा समाजव्यवहारातलं वास्तव काय आहे ते! तिथे धर्म नाही, जातच चालते. रोटीबेटी व्यवहारांपासून ते गुणवत्तेला फाटा देऊन सरकारमध्ये आपली माणसं घुसवणार्या लॅटरल एन्ट्रीपर्यंत अनेक गोष्टी जातीच्या आधारावरच ठरतात. इथे तथाकथित खालच्या जातीच्या माणसाने मिशीची टोके वर ठेवली किंवा लग्नात डीजे वाजवला, इथपर्यंतच्या कसल्याही कारणाने त्याचा जीव जाऊ शकतो. जे आपले देव म्हणून बहुजनांच्या माथी मारले जातात, त्यांच्याच मंदिरात त्यांना प्रवेश दिला जात नाही, चुकून कोणी केला तर तोही जिवाला मुकू शकतो. महाराष्ट्रासारख्या प्रबोधनाची सुधारकी परंपरा (एकेकाळी) असलेल्या राज्यातही नितीन आगेची हत्या किंवा खैरलांजीसारख्या घटना घडत असतील, तर मागास, बिमारू राज्यांमध्ये काय परिस्थिती असेल.
अशा परिस्थितीत देशात जातीय जनगणना झाली तर ज्यांचं लोकसंख्येतलं प्रमाण १० टक्केही नसेल, अशा काही १०-१५ प्रमुख जाती सगळ्या देशावर राज्य करत आहेत, हे स्फोटक वास्तव पुढे येईल आणि मग दोनपाच टक्के आरक्षणाच्या नावाने घसे फोडणार्यांची वाचा बसेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कायम या जनगणनेच्या विरोधात होते. आज राहुल गांधी यांनी ही मागणी लावून धरली असली तरी काँग्रेसनेही सत्ताधारी असताना जातनिहाय जनगणना केली नव्हतीच. ओबीसींना आरक्षण देणार्या मंडल आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठीही विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार सत्तेत यावं लागलं. मंडल आयोगाच्या राजकारणाला उत्तर म्हणून राम जन्मभूमी आंदोलनाला हवा देण्यात आली. बहुजन समाजालाच कमंडली राजकारणाचे वाहक बनवण्याची चतुर खेळी खेळली गेली. तेव्हापासून देशात मंडल विरुद्ध कमंडल असा संघर्ष सुरू राहिला आहे. नियतीची लीला अशी अगाध आहे की या कमंडलधारींवरच मंडलचा हा दुसरा अध्याय लागू करण्याची वेळ आली आहे.
मुळात मोदी यांनी ही घोषणा करण्यासाठी निवडलेलं टायमिंग फारच अजब आहे. सगळा देश हादरलेला असताना, मोदींची पिलावळ युद्ध, युद्ध म्हणून पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेण्यासाठी उत्सुक असताना मोदींनी त्यांचा नेहमीचा यशस्वी मास्टरस्ट्रोक मारला कुठे तर त्यांच्याच भक्तांच्या टाळक्यावर. हिंदू समाज जातिव्यवस्थेत विभागून राहिला, तर त्यात एकोपा दिसणार नाही, तेच हिंदूद्वेष्ट्यांच्या पथ्यावर पडेल, असं यांचं सोयीचं तत्त्वज्ञान आहे. पण मग गेल्या १०० वर्षांत यांनी जातमुक्तीच्या दिशेने काय काम केले हे विचाराल, तर उत्तर शून्य येतं. यांना एकीकडे जातिभेदाची विषम चौकट घट्ट करणारी मनुस्मृती हवी आहे, आपली सांस्कृतिक परंपरा म्हणून चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करायचा आहे, देशातली अठरापगड संस्कृती नष्ट करून तिथे एकच एक (रा. स्व. संघाच्या कल्पनेतला) हिंदू म्हणून ओळख निर्माण करायची आहे, पण त्यातली अन्याय्य जातीय उतरंडही जपायची आहे, असा हा सगळा सावळा गोंधळ आहे. यांच्यातला हा अंतर्विरोध जेव्हा तीव्र होईल, एका टोकाला जाईल, तेव्हा हा सगळा डोलारा कोसळून पडेल.
अर्थात, याची कल्पना असल्यामुळे आज मोदींनी घोषणा केली आणि उद्या जातीय जनगणना सुरू झाली, असे काही होणार नाही. मोदी श्वास घेतात तोच निवडणुकांसाठी आणि निवडणुकांपुरता. तोच त्यांचा ऑक्सिजन आहे. बिहारच्या निवडणुकीसाठी सोडलेलं हे एक पिल्लू असू शकतं…
…त्या अर्थाने त्यांच्या भक्तांसाठी तो मास्टरस्ट्रोकच आहे! नाचो रे नाचो!