कर्करोगाशी लढणं म्हणजे एक प्रचंड मोठं युद्ध लढण्यासारखं आहे आणि कोणतही मोठं आणि दीर्घकालीन युद्ध जिंकायला अव्याहत रसद पुरवठा लागतो. ज्याच्यावर ही वेळ येते ती प्रत्येक व्यक्ती या रोगाशी शारीरिक लढा देतेच, पण हा लढा देण्यासाठी लाखो रूपयांचा खर्च येतो तो प्रत्येकाकडे नसतो. हातातोंडाची जेमतेम मिळवणी करणारी माणसं या संकटाला सामोरं जाताना हबकून जातात. आयुष्यभर स्वाभिमानाने जगलेल्या माणसांना दुसर्याकडे मदतीची याचना करताना तो गहाण ठेवावा लागतो. ‘सूर लागू दे’ हा चित्रपट या संकटावर, लाचारीवर आणि या समस्येवर भाष्य करतो.
मोहन दामले (स्व. विक्रम गोखले) आणि राधा (सुहासनी मुळे) हे मध्यमवर्गीय वृद्ध दाम्पत्य मुंबईतील एका चाळीत राहात आहे. एका बॉम्बस्फोटात मुलगा आणि सून गमावल्यानंतर दोन नातवंडांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी या दोघांवर आहे. यामुळेच निवृत्त झाल्यावर देखील मोहन छोटी मोठी नोकरी करून, कामावर जाताना चालत जाऊन बसचे पैसे वाचवून कसाबसा उदरनिर्वाह करीत असतात. एक दिवस त्यांचा नातू मनू याला (अर्णव कोळेकर) ब्लड कॅन्सर झाल्याचं कळतं. महागड्या उपचारांसाठी २० ते २५ लाख रूपये खर्च येणार असं डॉक्टरांकडून कळतं. मोहन दामले लाचारी पत्करून ओळखीची माणसं आणि वेगवेगळ्या धर्मादाय संस्थाची दारे ठोठवतात; पण हाती पडते फक्त निराशा. कुठूनही मदत मिळत नसताना त्यांच्या एका वृत्तवाहिनीत काम करणारी त्यांच्या चाळीतील मुलगी सोनिया (रिना मधुकर) मोहन दामलेंसमोर एक प्रस्ताव ठेवते. हा प्रस्ताव काय असतो, मनूला उपचार मिळतात का? याची उत्तरं हा सिनेमा पाहताना मिळतील.
जीवघेण्या आजारांना सामोरे जाताना न परवडणारी उपचारपद्धती सर्वसामान्य माणसाला किती लाचार बनवते, याची जाणीव करून देणारा हा विषय खूप चांगला आहे. प्रगत देशांच्या मानाने मागास असलेली आपल्या देशातील आरोग्यव्यवस्था, त्यात सुधारणा करण्याची सरकारी अनास्था, सरकारी रूग्णालयात सोयीसुविधांची वानवा, रूग्णांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन खाजगी रूग्णालयांत केली जाणारी लूट, रूग्णांना मदत करणार्या धर्मादाय संस्थाचा भ्रष्टाचार, कठीण समयी आप्तस्वकीयांनी फिरवलेली पाठ, एकाकी जीवन जगणार्या वृद्धांचे प्रश्न अशा अनेक विषयांना हा चित्रपट स्पर्शून जातो; पण त्यावर लिहिलेली कथा काहीशी जुन्या वळणाची आहे.
ऐंशीनव्वदच्या दशकात चित्रपटांत दिसणार्या चाळी. टमरेलाला धरून केलेले विनोद, दारूडा माणूस, एक प्रेमी युगुल अशी ठराविक मांडणी पटकथेत दिसते. बेडवर पडलेल्या आजारी व्यक्तीच्या आयुष्याचं २४ तास लाइव्ह प्रक्षेपण करणं ही कल्पना (आपल्याकडे तरी) बालिश वाटते. मनूला इन्फेक्शन होऊ नये यासाठी त्याने मास्क लावावा या विषयावर एक मोठा प्रसंग या सिनेमात आहे; पण शेवटी त्याची आजी त्याला उचलून घराबाहेर पडते तेव्हा त्याच्या तोंडावर मास्क नसतो. अशा अनेक उणिवा इथे दिसतात पण पटकथेतील या उणिवांवर मात करताना दिग्दर्शक प्रवीण बिर्जे यांनी हुकमी एक्का स्व. विक्रम गोखले यांच्यावर फोकस ठेवला आहे. गोखले संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यांवर पेलतात. वास्तवात त्यांनी त्यांच्या शेवटच्या आजारात या चित्रपटात काम केलं आहे. काही प्रसंगांत ते आजारपणही पडद्यावर जाणवतं, पण त्यांचा समर्थ अभिनय कुठेही कमी पडत नाही. मोहन दामले यांची भूमिका साकारताना, वय झालेलं असतानाही काम करण्याची गरज, नातवाच्या आजारपणात पैशासाठी केलेली वणवण, ओढवलेल्या परिस्थितीने खचणं, पत्करलेली लाचारी आणि शेवटचा मोनोलॉग त्यांनी ज्या कन्विशनने सादर केला आहे त्याला तोड नाही. सुहासिनी मुळे यांचा चित्रपटातील वावर नाटकी वाटतो आणि मराठी उच्चार खटकतात. रिना मधुकर, मेघना नायडू, आशिष नेवाळकर, जयराज नायर, सुनील गोडबोले, अर्णव कोळेकर यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
सूर लागू दे हे शीर्षक गीत चांगलं जमून आलं आहे. छायाचित्रकार लॉरेन्स यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. संकलक सुबोध नारकर यांनी चित्रपट फार रेंगाळू दिला नाही. विक्रम गोखले यांना अभिनयाचं विद्यापीठ मानलं जायचं, ते का हे हा चित्रपट पाहताना कळतं. सर्वसामान्यांना भिडणारा विषय आणि विक्रम गोखले यांचं पडद्यावरील शेवटचं काम पाहायला चित्रपट पाहायला हवा.