ही संघर्षगाथा आहे वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलियातील यशाचा शिल्पकार वेगवान गोलंदाज शामर जोसेफची. आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करीत त्याने क्रिकेटमध्ये आता आपले स्थान निर्माण केले आहे. त्याचे यश देशाला पुन्हा गतवैभव मिळवून देणारे ठरते आहे.
– – –
शामर हा गयानाच्या पूर्वेकडील बेर्बिके-कॉरेंटाइनमधील बाराकारा या जेमतेम चारशे लोकवस्तीच्या दुर्गम गावचा. हे गाव न्यू अॅमस्टरडॅमपासून २२५ किमी अंतरावर. म्हणजे कांजे नदीतून तिथे बोटीने पोहोचायचे तर दोन दिवस लागतील, इतका प्रवास. या गावात २०१८पर्यंत टेलिफोन आणि इंटरनेट यंत्रणा पोहोचलीच नव्हती. क्रिकेटचे पूर्ण मैदान हे कधीच या बेटावर पाहिलेले नसले, तरी वाळूत सराव करून हा वेगवान गोलंदाज घडला. आता हा तरूण कॅरेबियन जनतेच्या गळ्यातला ताईत बनला आहे. शामर जोसेफच्या कथेत आशुतोष गोवारीकरांच्या ‘स्वदेस’शी साम्य आढळायला सुरूवात होते, ती इथूनच…
तुम्हाला शाहरूख खानचा ‘स्वदेस’ आठवतोय? ‘नासा’मध्ये अतिमहत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेला अनिवासी भारतीय मोहन भार्गव याची ती कथा. आपल्याला लहानाचे मोठे करणार्या कावेरी अम्माच्या शोधात तो मायदेशात परततो. या प्रवासात ग्रामीण भारताचे भीषण वास्तव त्याच्यासमोर उभे ठाकते. या वास्तवाने तो अस्वस्थ होतो. चरणपूर नावाचे हे गाव, जिथपर्यंत पोहोचणे, हेच आव्हान आणि त्यानंतर तेथील विजेपासून अनेक प्रश्न सोडवण्याचा हा लढा जिंकण्यासाठीचा भार्गवचा यशस्वी भगीरथ प्रयत्न हे ‘स्वदेस’चे कथानक. सध्या कॅरेबियन बेटांवरील शामरची अशीच कथा क्रिकेटच्या दुनियेत चर्चेत आहे.
गेल्या चार वर्षांत याआधी फक्त दोन कसोटी विजय मिळवणार्या वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियात गाबा मैदानावर दुसरी कसोटी जिंकून देणारा हा वेगवान गोलंदाज. ज्या मालिकेत कसोटी विश्वविजेत्या आणि जागतिक कसोटी क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला २-० असे निर्भेळ यश मिळवू असा विश्वास होता, ती मालिका अनपेक्षितपणे १-१ अशी बरोबरीत कशी सुटली? याला जागतिक क्रिकेटमध्ये चमत्कार म्हणू लागलेत. या विजयाचा शिल्पकार शामर म्हणूनच प्रकाशझोतात आला आहे.
शामर आणि मोहन भार्गव यांच्या कथेत साम्य भासण्याचे कारण म्हणजे शामरच्या खेळातून मिळालेल्या ऊर्जेने वेस्ट इंडिजला विजयपथावर आणले आणि ‘दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल…’ ही आशा दाखवली. फरक एवढाच की भार्गव सुस्थितीतला, तर शामरची जगण्यासाठीची लढाईसुद्धा तितकीच आव्हानात्मक.
कॅरेबियन क्रिकेट संस्कृतीचा सुवर्णकाळ एकेकाळी क्रिकेटने अनुभवला. मात्र, गेली काही वर्षे या संस्कृतीच्या शोकांतिकाच चर्चेत येत होत्या. दोन वेळा विश्वविजेता बनलेला वेस्ट इंडिजचा संघ नुकत्याच भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथमच पात्रही ठरू शकलेला नव्हता. मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांचे फलंदाज विशेष ओळखले जायचे, तर जगातील सर्वोत्तम अशा त्यांच्या वेगवान मार्याला ‘वेस्ट इंडिजचा तोफखाना’ असे अभिमानाने म्हटले जायचे. एके काळी आग ओकणार्या त्यांच्या वेगवान गोलंदाजांच्या चौकडीसमोर मातब्बर फलंदाजांची भंबेरी उडायची. पण गेल्या काही दशकांत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा हा रूबाब कुठेच जाणवलेला नाही. अशा काळात एक शामर बेबंद ऑसी फलंदाजांची ‘शामत’ आणतो, हेच कथासूत्र.
बाराकाराच्या माळरानात शामर ज्या घरात जन्मला, तिथे अठरा विश्वे दारिद्र्य होते. यात भर म्हणून शामरला तीन बहिणी आणि पाच भाऊ. म्हणजेच कुटुंबाची एकंदर संख्या ही एखाद्या क्रिकेट संघाच्या आकड्याशी बरोबरी करणारी. शामरसाठी बालपणीपासून विंडीजच्या तेजतर्रार सुवर्णकाळातील अखेरचे शिलेदार कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अॅम्ब्रोस ही प्रेरणास्थाने. टीव्हीवर त्यांचा खेळ पाहून गावातल्या वाळूतल्या मैदानांवर त्याच वेगाने चेंडू टाकण्याचा छंदच जणू या जिवाला लागला. गावातल्या झाडांवरील लिंबू, पेरू अशा फळांचे रूपांतर तो चेंडूत करायचा. काही वेळा प्लास्टिकच्या बॉटललाही चेचून तिचा चेंडू केला जायचा.
पण क्रिकेटपटू घडण्याआधीचा त्याचा मार्ग सोपा मुळीच नव्हता. शामर आणि त्याची भावंडे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडिलांसमवेत लाकूडतोडीचे काम करायचे. बाराकारामध्ये लाकडे तोडायची आणि ती कांजे नदीतून बोटीने न्यू अॅमस्टरडॅमला घेऊन जायची, असे हे काम होते. पण एकदा झाड पडण्याच्या दुर्घटनेतून शामर थोडक्यात बचावला. यावेळी त्याची पत्नी गर्भवती होती आणि त्याने लाकूडतोड न करण्याचा निर्णय घेतला. मग कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, याकरिता तो न्यू अॅमस्टरडॅमला निघून गेला. सुरूवातीला एका बांधकामाच्या ठिकाणी शामरने मजुरी केली. नंतर स्कॉटिया बँकमध्ये अँमलगॅमेटेड सिक्युरिटी सर्व्हिसेससाठी त्याने सुरक्षारक्षकाचीही नोकरी केली. दिवसा किंवा रात्रीची १२ तासांची शिफ्ट करताना क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न मात्र त्याने जोपासले होते. मग पत्नीमुळे त्याचे आयुष्य पालटले. तिने त्याला नोकरी सोडून आपल्या महत्त्वाकांक्षेचा पाठलाग कर, असा सल्ला दिला आणि त्याने तो ऐकलाही…
क्रिकेटपटू रोमोरियो शेफर्डने शामरला क्रिकेटमधील पहिली संधी दिली. त्यामुळे गयाना क्रिकेट संघाकडून त्याची कारकीर्द सुरू झाली. पुढे अॅम्ब्रोसच्या वेगवान गोलंदाजांच्या प्रशिक्षण शिबिरातही त्याला सामील होता आले आणि सराव सामन्यातील नेत्रदीपक कामगिरीमुळे त्याने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने छाप पाडली. कालांतराने कॅरेबियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्येही त्याला संधी मिळाली. नोव्हेंबर २०२३मध्ये वेस्ट इंडिज ‘अ’ संघाच्या दक्षिण आफ्रिका दौर्यावर शामरने आणि केव्हिन सिन्क्लेअरने दिमाखदार कामगिरी केली.
डिसेंबर २०२३मध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी संघ जाहीर करताना तब्बल सात बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंना निवडण्याची जोखीम पत्करली. यापैकीच एक म्हणजे शामर. निवड समितीचे लक्ष वेधणार्या शामरला अॅपडलेड ओव्हलच्या पहिल्याच कसोटीत पर्दापणही करता आले, तेही भन्नाट झाले. शामर ११व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि ३६ धावा केल्या. केमार रोचच्या साथीने अखेरच्या गड्यासाठी ५५ धावांची त्याने केलेली भागीदारी उपयुक्त ठरली. त्यामुळेच विंडीजला १८८ धावा उभारता आल्या.
त्यानंतर कसोटी कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर शामरने चक्क ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज स्टीव्ह स्मिथचा (१२) बळी मिळवून खळबळ माजवली. याशिवाय चिवट कसोटी फलंदाज मार्नस लबूशेनलाही त्याने तंबूत धाडले. दुसर्या दिवशी शामरच्या खात्यावर पदार्पणातच पाच बळींची नोंद झाली. दुर्दैवाने पहिली कसोटी विंडीजला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण शामरने आपले स्थान पक्के केले होते.
ब्रिस्बेनचे गाबा मैदान म्हणजे ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला. २०२१मध्ये भारताने मिळवलेला ऐतिहासिक कसोटी विजय वगळल्यास ३६ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजला येथे विजय मिळवता आला होता. त्यामुळे कांगारूंचे पारडे जड होते. पहिल्या डावात विंडीजने २२ धावांची माफक आघाडी घेतली. यावेळी शामरला फक्त एकमेव बळी मिळाला तो अॅलेक्स केरीचा. त्यानंतर विंडीजचा दुसरा डाव फक्त १९३ धावांत कोसळला. यावेळी फलंदाजी करताना मिचेल स्टार्कने टाकलेल्या चेंडूमुळे पायाला दुखापत झाल्याने शामरला मैदान सोडावे लागले.
दुसर्या डावात शामर गोलंदाजीसाठी नसेल आणि हे तुटपुंजे लक्ष्य ऑसी संघ घरच्या मैदानावर आरामात पेलेल असे ठोकताळे बांधले जात होते. परंतु वैद्यकीय चाचणीत फ्रॅक्चर नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे शामर गोलंदाजीसाठी परतला आणि त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे तीन तेरा वाजवत ११.५ षटकांत ६८ धावांत ७ बळी मिळवत विंडीजला आठ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. या सामन्यात शामरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तसेच मालिकेत १३ बळी घेतल्यामुळे मालिकावीर पुरस्कारावरही त्यानेच मोहोर उमटवली.
वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक विजयाप्रसंगी समालोचन कक्षातील माजी महान फलंदाज ब्रायन लाराच्याही डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
शामरच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्याच्या कामगिरीमुळे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानेही त्याला करारबद्ध केले. आता त्याला आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. ऑस्ट्रेलियातील विजयी कामगिरीनंतर तो जेव्हा गयाना विमानतळावर उतरला, तेव्हा त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अशी ही साठा उत्तराची सफल कहाणी शामरच्या कॅरेबियन ‘स्वदेस’ची.