जगभरात मोबाइलमुळे भारतात सगळ्यात जास्त फेक न्यूज पसरतात आणि ते देशासाठी घातक आहे, असा सर्व्हे प्रकाशित झाला आहे. लोक आता तरी फॉरवर्ड फॉरवर्ड खेळणं थांबवतील?
– अशोक म्हामुणकर, माणगाव
हा सर्व्हे फेक आहे.. तो प्रकाशित करणारे देशद्रोही आहेत.. हे फॉरवर्ड फॉरवर्ड खेळातूनच सिद्ध होईल… आणि मगच तुम्हाला या खेळाची ताकद कळेल… (फॉरवर्ड फॉरवर्ड हा खेळ बंद करून कोणाच्या पोटापाण्यावर धंद्यावर पाय मारणं बरं नव्हे.)
आमच्या सोसायटीतल्या मराठी बायका हल्ली करवा चौथ आणि छठपूजा साजरी करतात. लोक रामरक्षेऐवजी रामायणाचे पाठ आयोजित करतात आणि मारुतीस्तोत्राऐवजी हनुमान चालिसा म्हणतात. महाराष्ट्र गायपट्ट्यात समाविष्ट झाला का?
– संतोष बेडेकर, गिरगाव
रुको.. जरा सबर करो.. महाराष्ट्राचं नाव बदलून ‘महाउत्तर प्रदेश’ झाल्यावर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही…
हल्ली मराठी सिनेमे लंडनमध्ये का चित्रित केले जातात?
– स्मिता वाळके, रत्नागिरी
चित्रपट कसा बनवू नये याचा धडा लंडनवाल्यांना देण्यासाठी मराठी चित्रपट लंडनमध्ये चित्रित करतात.. असं तुम्हाला माझ्याकडून बोलून घ्यायचं आहे का? पण मी तसं बोलणार नाही.. काय समजलं?
कोणा गोविंदगिरी नावाच्या बुवाला पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात? असल्या भाटांच्या मनोविकारावर नेमकं औषध काय?
– अमोल राणे, चेंबूर
असे विकार बरे होण्यापलीकडे गेलेले असतात.. त्यांची चेष्टा, कुचेष्टा करायची नसते… त्यांना आपलं म्हणा…
लोक पर्यटनस्थळी फिरायला जातात/ हॉटेलात जेवायला जातात/ कॉलेजात अभ्यास करायला जातात की सेल्फी, फोटो, रील्स काढायला?
– महंमद ताजणे, मिरज
तुम्ही जेथे कुठे जाता, तेथे दुसरे काय करतात ते बघायला जाता का? तुमचे कोणी फोटो काढत नसतील… तुमच्या बरोबर कोणी सेल्फी काढत नसेल… तुमच्याबरोबर कोणी रील बनवत नसेल तर तुम्ही पण कोणाबरोबर रील बनवू नका… सेल्फी काढू नका… कोणाचे फोटो काढू नका… त्यांना फाट्यावर मारा… फिट्टमफाट… तुम्हाला कोणाचा त्रास नाही… मला तुमचा त्रास नाही.
सर्व लोकांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही, असं म्हणतात… पण, हे खरं आहे असं वाटतं तुम्हाला आजच्या काळात?
– प्रतीक घोसाळकर, पुणे
ज्यांना ज्यांना हा काळ ‘अमृतकाळ’ वाटतोय, त्यांच्या नंदनवनात तुम्हाला फिरायचं नसेल तर नका फिरू. पण उगाच असा प्रश्न विचारून नंदनवनात फिरणार्यांच्या हातात कोलीत देण्याचा शहाणपणा नका करू… अशा प्रश्नांचं उत्तर देण्याचा अतिशहाणपणा मी करणार नाही… तेवढा शहाणा मी नक्कीच आहे… (असं मलाच वाटतं).
अयोध्येतील रामाच्या मंदिरात रामाशेजारी सीता का बरे नाही?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव.
का? तुम्हाला बायको असूनही ती बरोबर नकोय अशी काही आयडिया हवी आहे का? मग एखाद्या ‘शासकीय शास्त्रीजीं’ना विचारा. ते असं काही शास्त्र सांगतील की बायको असतानाही तुम्ही एकटे सर्व विधी (घरातलेही आणि शास्त्रातलेही) करू शकाल.
पुरूषांना फुगलेली पुरी आवडते, मग फुगलेली बायको का आवडत नाही?
– अशोक परब, सावरकर नगर, ठाणे.
काही दिवसांच्या उपाशी माणसाला कशीही चालते… पुरी. मग फुगलेली काय करपलेली सुद्धा चालते… पुरी (पुरी बद्दल उत्तर दिलंय… बायकोबद्दल वेगळं उत्तर द्यायची गरज आहे?)
पुरुषांना लग्न केल्याचा नेमका काय फायदा होतो?
– गोविंद केसरकर, राजापूर
खड्ड्यात पडलेला माणूस दुसर्यांना सावध करतो का? मग तोट्यातल्या माणसाला फायद्याचं काय विचारताय? (कितीही आडून प्रश्न विचारा.. अशा प्रश्नावरून सुद्धा माणूस घाट्यात आहे हे कळतंच गोविंदराव.)
प्रेमाच्या नात्यात पूल असावा की कुंपण?
– सावनी भेलके, यवतमाळ
नात्यात फक्त ओलावा असावा… मग पुलाची गरज लागत नाही की कुंपणाचीही… (हे सोशल मीडियावर टाकू नका. मी तिथूनच उचललेलं आहे.) नातं ओव्हरफ्लो होऊ देऊ नका. स्थळ, काळ आणि वेळ ही त्रिसूत्री सांभाळा आणि मनसोक्त उपभोगा… नात्यातला आनंद!