बसचा प्रवास ही कित्येक लोकांसाठी आनंददायी बाब असेल, पण माझ्यासारख्यांसाठी मात्र तो मुलखाचा त्रास आहे…
…म्हणजे असं की जिथेही कुठे घाई करायची असेल, चपळाई दाखवायची असेल तिथे मी एकदम नाकाम आहे. बस स्टॅण्डवर लागली रे लागली, उठून धावत सुटायचं, खिडकीवर चढून रुमाल टाकून सीट पकडायची, असले प्रकार आपल्याला बापजन्मात जमणार नाहीत. माझे मूळ प्रश्न वेगळेच आहेत. रुमाल टाकून सीट पकडायची कसली ही पद्धत? एकदा बसस्टँडवर बस फलाटावर आली. एक काका त्यांच्या कुटुंबाला घेऊन प्रवास करणार होते. काकांनी अत्यंत चपळाईने रुमाल टाकला आणि छोटूला सांगितले, ‘जा रे तू, रुमाल उचलून तिथे बस.’
मग टोपी काढली, टोपी बसमध्ये फेकली. मुलीला तिथे बसायला सांगितलं. एवढेच जण आहेत का म्हणून मी बघत उभे राहिले. पण, नाही. आता काकांनी शर्ट काढला. तो बसमध्ये टाकला. बायकोला बसमध्ये जायला सांगितले. काकांनी आता स्वतःची जागा पकडण्यासाठी धोतर काढलेले होते. ते आत टाकून स्वतः बसमध्ये जाण्याचा पवित्रा घेतला. काकांचे आईवडील बरोबर आल्यावर काका काय करत असतील, असा विचार क्षणभर मनात येऊन गेला. मुळात आतमध्ये बसण्यापासून जिथे युद्धाला सुरुवात होते, तो प्रवास आनंददायी असेलच कसा?
शिवाय, लहानपणापासून लाल डब्याने प्रवास म्हणजे अंगावर काटा येतो. आईच्या कडेवर बसून प्रवास होत होता, तोवर सगळे व्यवस्थित चाललेले होते. पण आम्ही पाचवीत असताना कोणाला तरी अवदसा आठवली आणि विद्यार्थ्यांनी सहल नेण्याची मागणी केली. इतक्या वर्षात सहल म्हणजे आजूबाजूच्या बागा, प्राणिसंग्रहालय, पोस्ट ऑफिस अशी ठिकाणे असायची. पण, आता आम्ही मोठे झालो आहोत आणि दूर सहल न्यायला हवी अशी मागणी झाल्याने शिक्षकवृन्द विचारात पडला.
त्याकाळी रेल्वेचे बुकिंग करून अहमदाबाद, ऊटी, केरळ अशा ठिकाणी मुलांना सहलीला नेण्याची पद्धत नव्हती. बसच्या अंतरावरचा प्रवास चालायचा. शिवाय आतासारख्या खाजगी आरामदायी गाड्यादेखील नव्हत्या. त्यामुळे सगळ्या शिक्षकांना खूप मोठा प्रश्न पडला. अखेर महाराष्ट्रातल्याच एका गावात सहल काढायची ठरली. हे गाव त्यावेळचे पुरस्कारप्राप्त आदर्श गाव होते. जवळच देवीचे सुप्रिसद्ध मंदिर होते. तिथे नेऊन पोरांना देवाच्या पायावर घालून आणण्याचाही विचार शिक्षकांनी केला असावा.
कुठे सहल जाणार याची आम्हाला काही चिंता नव्हती. पहिलीच सहल असल्याने भारी उत्सुकता होती. सहलीच्या नावाने चार दिवस झोप लागली नाही. लाल डब्याचा प्रवास सुरु झाला. त्यावेळी आजसारख्या प्रवासात त्रास होऊ नये म्हणून कुठल्याही गोळ्या मिळत नसत. तशीच वेळ आली तर बस थांबवून रस्त्यात कुठेतरी कार्यक्रम उरकला जाई. मुलांना एवढ्या दूरच्या प्रवासाला नेण्याचा अनुभव शिक्षकांना नव्हता. बस जशी गावाच्या बाहेर पडली, एकेकाने बाहेर तोंड काढून उलट्या करायला सुरुवात केली. या बसला लाल डबा का म्हणतात, ते आता कळले. सहा तास अक्षरशः नाक मुठीत घेऊन प्रवास केला. गाण्याच्या भेंड्या वगैरे योजना जागीच राहिल्या. बरं एवढं करून ज्या स्थळी पोचलो तिथे काही नयनरम्य असेल तर शप्पथ. अभ्यास चुकवायचा म्हणून तिथे गेलो होतो, आणि मास्तरांनी तिथेही वह्या काढून गावातील वृद्धांची मुलाखत घ्यायला सांगितली.
या मुलाखतीत कुठून वाटले आणि एक प्रश्न मी विचारला, ‘गावाला आदर्श गाव हा पुरस्कार कशामुळे मिळाला?’
उत्तर आलं- खूप मेहनतीने आम्ही गाव हागणदारीमुक्त केलाय, त्यामुळे.
सहा तास उलट्या करत हागणदारीमुक्त गाव बघायला जर आम्ही बसचा पहिला मोठा प्रवास केला असेल तर सांगा, या बसप्रवासाविषयी आत्मीयता कशी वाटेल?
पण या बस प्रवासातून आमची मुक्तता नव्हती. अगदी कॉलेजला जायचा प्रवासही लाल डब्याचा होता. लोकांना बसमध्ये काय काय रोमँटिक अनुभव येतात. कित्येक जणांची लग्नं या लाल डब्याने जमवली आहेत. पण या रोमँटिक जोडप्यांवर लक्ष ठेवण्यातच आमचा बस प्रवास कारणी लागल्याने आमचा रोमान्स डब्यातच राहिला.
बरं या बसची नावं काय एक एक. रातराणी असे रात्रीच्या बसला कोणी नाव दिले असेल? नाव ऐकले की रातराणीचा दरवळ येतो, पण प्रत्यक्षात मात्र सगळे घोर घोर घोरत असतात.
शिवनेरी, शिवशाही, शिवाई, अश्वमेध. काय एक एक नावं विचारू नका. ज्या इतिहासाने, त्यातील सनावळींनी लहानपणी छळ छळ छळलं, ते मोठे झाले तरी काही पाठ सोडायला तयार नाहीत. या ऐतिहासिक नावांपायी कित्येक वर्षं मी यातून प्रवास केला नाही. कोण जाणे आत शिरताना कंडक्टर विचारायचा, ‘महाराजांनी अफझलखानाचा वध कधी केला ते सांगा?’ आणि मग मंगळवारी की शुक्रवारी असे दोनच पर्याय आपल्या डोक्यात यायचे आणि आपल्याला प्रवेश नाकारला जायचा.
प्रत्येक बस प्रवासाच्या आधी मला असली स्वप्ने पडतात.
बसचे बुकिंग हा एक अजब प्रकार आहे. लहानपणी ५० पैशाचे रिझर्वेशन आणि संपूर्ण पैसे भरले तर अॅडव्हान्स बुकिंग व्हायचे. आता ते रिझर्वेशन पाच रुपयांचे वगैरे असावे. एका प्रवासासाठी मी रिझर्वेशन करायला गेले. कंट्रोलर म्हणाला, अमुक बसला रिझर्वेशन नाही. फक्त अॅडव्हान्स बुकिंग आहे. त्यांना म्हटलं, अहो पण समजा माझं यायचं कॅन्सल झालं तर?
कंट्रोलर म्हणाला, मग पैसे वाया जाणार मॅडम.
मी- अहो पण तुम्हाला कळतंय का, तुम्हाला जास्त फायदा रिझर्वेशनमध्ये आहे.
कोण मोठी सांगणारी शहाणी आली असा भाव चेहर्यावर आणून कंट्रोलरने विचारले, ‘ते कसं काय?’
मी- समजा मी रिझर्वेशन करून यायचे कॅन्सल केले तर ते पैसे तुमचे झाले आणि शिवाय नवीन प्यासेंजर पूर्ण तिकीट काढून नेता येईल. अॅडव्हान्स बुकिंग असेल तर मात्र मी येणारच, त्यामुळे दुहेरी फायदा नाही.
कंट्रोलर- तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका. बुकिंग करायचे असल्यास करा, नाहीतर जा.
माझं म्हणणं पटूनसुद्धा त्याने मला हाकललं होतं.
‘बॉम्बे टू गोवा’, ‘नवरा माझा नवसाचा’ यांसारख्या चित्रपटांनी बसचे खूप उदात्तीकरण केले आहे, असे माझे ठाम मत आहे. जिथे बसमध्ये बसल्यावर फाटक्या सीट्स, तुटलेले हॅन्डल, घोरणारे किंवा अतीव बडबड करणारे सहप्रवासी याशिवाय माझ्या वाट्याला काहीच येत नाही तिथे ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ मी कसा बघावा? सिनेमात अशोक सराफ नाही तर मेहमूदसारखे कंडक्टर असतात, आमच्या नशिबात मात्र शाकाल किंवा बिज्जलदेवच असतात.
एखादा माणूस रस्त्याने प्रवास करायची किती नयनरम्य स्वप्ने बघतो. छान जेवण करून प्रवासाला बसावं. स्वच्छ बस असावी. समोरच्या स्त्री प्रवाशाने डोक्यात मोगर्याचा गजरा माळलेला असावा. त्याचा गंध सगळीकडे दरवळत असावा. गार वार्यात आपल्याला खिडकीपाशी सीट मिळावी आणि भविष्याची स्वप्नं बघत, अधेमधे डुलक्या काढत, गोड गाणी ऐकत आपण आपलं ठिकाण गाठावं. पण, प्रत्यक्षात काय घडतं? आपण प्रवासाला निघताना नेमके मिसळीचे नाहीतर पुरणाच्या पोळीचे जेवण करून निघतो. बसमध्ये नेमकी फाटलेली मधली सीट आपल्याला मिळते. एवढ्याने काय होतंय, अजूनही प्रवास छान होईल असा विचार आपण करतो. पण जसेही प्रवास सुरु होतो, समोरचा प्रवासी मच्छीचा डबा उघडतो. तो दर्प सगळीकडे पसरतो. त्याचं जेवण होतंय तोवर शेजारचा प्रवासी डुलक्या काढायला लागतो. खिडकीची बाजू त्याची असूनही तिथे डोकं न ठेवता आपला खांदा उशी म्हणून वापरायला लागतो. कानात त्याच्या घोरण्याचा आवाज शिरायला लागतो.
अर्थात, आमच्या नशिबात बसचा प्रवास सुखकर नसला तरी ही बससेवा तमाम राज्याची जीवनवाहिनी आहे, हेही खरंच. गावागावात जिथे अजूनही वीज पोचलेली नाही तिथे बस मात्र पोचलेली आहे. कंडक्टर, ड्रायव्हर तिथल्या गावाला कुटुंबियांसारखे वाटतात. कित्येक लहान मुलांची शाळा या बसमुळे शक्य होते आहे, अन्यथा, गावात शाळा नाही या कारणाखाली ती बंद व्हायची वेळ आली असती. कित्येक खेड्यातील मुलांना गावात राहूनच बसच्या प्रवासाने शहरात नोकरी करणे शक्य झाले आहे. गावातून निघणार्या सकाळच्या बसने शहरातील धन्याला भाकरीचा डबा कंदक्तरकडे देणार्या बायका मी बघितल्या आहेत. म्हातारी आजारी आहे, आज भावाला लेकरू झालं, सोन्या दहावी पास झाला अशी कित्येक निमित्तं गाठायला ही एसटीच मदत करते. तोरणाला आणि मरणाला गावोगावी लोकांना वाहून नेणार्या या बसला निव्वळ लाल डबा म्हणावे तरी कसे?