हिंदी सिनेमाच्या कथांमध्ये अनेक तर्हेची पात्रे आढळतात. नायक, नायिका, सहायक अभिनेता, सहायक अभिनेत्री, विनोदवीर, चरित्र भूमिका साकारणारे अभिनेते आणि खलनायक ही मंडळी आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. यांच्या जोडीने विविध छोट्यामोठ्या भूमिका कथेच्या मागणीनुसार सिनेमात दिसतात. डॉक्टर, वकील, न्यायाधीश, दुकानदार, पोलीस इन्स्पेक्टर-कमिशनर ही पात्रे बर्याच सिनेमात आढळतात, पैकी पोलीस इन्स्पेक्टरचे पात्र अधिक प्रमाणात आढळतं. मुदलात एकूण सिनेमाच्या दोन अडीच तासांच्या लांबीत हे रोल अवघ्या काही मिनिटांचे असतात. मात्र तरीदेखील या भूमिकांमधून आपला ठसा उमटवणारे काही अभिनेते होऊन गेले. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेले पोलिसी पात्र इतके खरेखुरे वाटायचे की हा इसम खरोखरच्या जीवनात पोलीस आहे की काय वाटावे! सत्तर एमएमच्या सिनेमास्कोप पडद्यावर अनेक अभिनेते, अभिनेत्र्या नायक नायिका म्हणून आपला ठसा उमटवू शकले नाहीत, मात्र अवघ्या काही मिनिटांच्या पोलिसाच्या भूमिका करून हिंदी सिनेमाच्या इतिहासात अजरामर होण्याची जादू काहींनी साधली! हे कशामुळे शक्य झाले याचे उत्तर एकच येते, ते म्हणजे या अभिनेत्यांची आपल्या कामावरची निष्ठा आणि रसिक प्रेक्षकांचे त्यांच्यावरचे अपार प्रेम! नायक-नायिकांना मिळणारे ग्लोरिफिकेशन या अभिनेत्यांच्या वाट्याला आलं! कोणताही रोल छोटा नसतो आणि कोणताही अभिनेता मामुली नसतो, तो ज्या भूमिकेत प्राण फुंकतो ती भूमिका सजीव होते हे नक्की! या वर्गातली हिंदी सिनेमाच्या इतिहासातली दोन ख्यातनाम नावं म्हणजे जगदीश राज आणि इफ्तिखार! जगदीश राज यांच्यापेक्षा इफ्तिखार यांची कारकीर्द मोठी होती आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य चढउतारांनी भरलेलं होतं. आताचे साल म्हणजे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होय!
सय्यदना इफ्तिखार अहमद शरीफ हे त्यांचे पूर्ण नाव! ते एक उत्कृष्ट गायक आणि चित्रकारही होते. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात काही चित्रपटांमध्ये ते नायक म्हणूनही दिसलेले. मूळचे जालंधरचे रहिवासी असलेले त्यांचे वडील कानपूरमधील एका कंपनीत उच्च पदावर होते. चार भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात थोरले असणारे इफ्तिखार २६ फेब्रुवारी १९२२ रोजी जालंधरमध्ये जन्मलेले. मात्र त्यांचे बालपण कानपूरमध्ये गेलेलं. त्यांना गाण्याची खूप आवड होती. त्यांना सैगलचे वेड होते आणि त्याच्यासारखे प्रसिद्ध गायक व्हायचे होते. त्यावेळी सर्व मोठ्या म्युझिक कंपन्या कोलकात्यात असल्याने इफ्तिखार वयाच्या २०व्या वर्षी कोलकात्यात आले. तेव्हाचे प्रसिद्ध संगीतकार कमल दासगुप्ता हे एचएमव्ही कोलकाता येथे काम करायचे. तिथेच इफ्तिखारांची ऑडिशन झाली. एचएमव्हीने त्यांच्या दोन गाण्यांचा खाजगी अल्बम रिलीज केला, त्यानंतर ते कानपूरला परतले. पण काही दिवसांनी त्याला एम. पी. प्रॉडक्शनकडून ताबडतोब कोलकात्याला येण्यास सांगणारी तार आली. इफ्तिखारांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि स्पष्ट भाषेने कमल दासगुप्ता इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी इफ्तिखारना अभिनेता म्हणून काम मिळावे अशी शिफारस केली होती.
दरम्यान कानपूरमधील सईदा नावाच्या मुलीसोबत इफ्तिखारांचे संबंध पक्के झाले होते. तार आल्यावर ते कोलकात्यात आले आणि कंपनीत रुजू झाले. पण तो चित्रपट फार काळ गेला तरी सुरू होऊ शकला नाही. त्याचवेळी ते कोलकात्यात त्यांच्याच इमारतीत राहणार्या हाना जोसेफ या ज्यू मुलीच्या प्रेमात पडले. नंतर सईदासोबत ब्रेकअप केल्यानंतर त्यांनी हानाशी लग्न केले. लग्नानंतर हाना जोसेफला रेहाना अहमद हे नवीन नाव मिळाले. इफ्तिखारांचा पहिला चित्रपट ‘तकरार’ हा १९४४ साली आर्ट फिल्म्स-कोलकाताच्या बॅनरखाली बनला होता. याची नायिका जमुना ही त्या काळातील स्टार अभिनेत्री होती. इफ्तिखारांचे ‘घर’ आणि ‘राजलक्ष्मी’ हे दोन चित्रपट १९४५ साली प्रदर्शित झाले. १९४७ मध्ये इफ्तिखार हे ‘ऐसा क्यूं’ आणि ‘तुम और मैं’ या चित्रपटांमध्ये दिसले. दरम्यान, १९४६मध्ये त्यांची मोठी मुलगी सलमाचा जन्म झाला आणि १९४७मध्ये त्यांच्या पत्नीने दुसर्या मुलीला जन्म दिला. इफ्तिखारांनी आपल्या पहिल्या प्रेमाला जागत या मुलीचे नाव सईदा ठेवलं. यावरून लक्षात यावं की ते किती हळव्या मनाचे होते!
फाळणीच्या काळात इफ्तिखारांचे आई-वडील, भावंडांसह सर्व जवळचे नातेवाईक पाकिस्तानात गेले. दंगलीमुळे कलकत्ता सोडावा लागला असला तरी इफ्तिखारनी भारतात राहण्यास पसंती दिली. ते धर्मवेडे असते तर आपल्या मातापित्यासमवेत ते ही पाकिस्तानला गेले असते. मात्र या भूमीवर आणि आपल्या कलेवर त्यांचे निस्सीम प्रेम होते त्यामुळे त्यांनी भारतभूमी सोडली नाही. १९४८ मध्ये ते पत्नी आणि दोन मुलींसह मुंबईत आले आणि त्यांनी खारमधील एव्हरग्रीन हॉटेलला आपले घर बनवले. पुन्हा एकदा संघर्षाचा टप्पा सुरू झाला. पण काम मिळणे सोपे नव्हते. भुकेजलेली मुलं त्यांच्या पत्नीपाशी असत आणि पोटातली आग भागवण्यासाठी इफ्तिखार पायपीट करत फिरत! अनेकदा त्यांच्या घरच्या सर्वांना उपवास घडलेला! घराच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांच्या पत्नीला ऑफिस सेक्रेटरी म्हणून काम करावे लागले. दुसरीकडे जी काही मिळतील ती छोटी कामं इफ्तिखार करत राहिले. पण त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल मात्र झाला नाही. हा कालखंड त्यांची परीक्षा घेणारा नि खडतर दिवसांचा साक्षीदार ठरला.
एकदा कोलकात्यात कानन देवी यांनी इफ्तिखारची ओळख अशोक कुमार यांच्याशी करून दिली होती. मुंबईत आल्यावर इफ्तिखारनी ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये अशोक कुमार यांची भेट घेतली. अशोक कुमार यांनी इफ्तिखारच्या प्रतिभेस अचूक ओळखले. बॉम्बे टॉकीजच्या ‘मुकद्दर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका देऊ केली. पुढे अशोक कुमार यांनीही इफ्तिखार यांच्याकडून चित्रकला शिकली आणि वयाने त्यांच्यापेक्षा खूप मोठे असूनही त्यांनी इफ्तिखार यांना आपला कुंचलागुरू मानले. इफ्तिखार किती उत्तम चित्रकार होते हे ‘दूर गगन की छांव में’ या चित्रपटाच्या शीर्षकगीताच्या पार्श्वभूमीसाठी काढलेल्या चित्रांवरून कळते. १९५० आणि ६०च्या दशकात इफ्तिखारनी ‘सगाई’, ‘साकी’, ‘अबशार’, ‘आगोश’, ‘बिराज बहू’, ‘मिर्झा गालिब’, ‘देवदास’, ‘श्री ४२०’, ‘संदारी डाकू’, यांसारखे चित्रपट केले. ‘अब दिल्ली नहीं दूर’, ‘दिल्ली का ठग’, ‘रागिणी’, ‘बेदर्द जमाना क्या जाने’, ‘कंगन’, ‘नाचघर’, ‘छबिली’, ‘कल्पना’, ‘कायदा’, ‘प्राध्यापक’, ‘रांगोळी’ ‘, ‘बंदिनी’, ‘मेरी सूरत तेरी आंखे’, ‘दूर गगन की छांव में’, ‘संगम’, ‘शहीद’, ‘फूल और पत्थर’, ‘तीसरी कसम’, ‘तीसरी मंझील’, ‘हमराज’, ‘ संघर्ष’, ‘आदमी और इंसान’ आणि ‘इंतकाम’सारख्या जवळपास ७० चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या-मोठ्या सर्व प्रकारच्या भूमिका केल्या, पण त्यांना विशेष ओळख मिळवता आली नाही. संघर्ष अव्याहत चालूच होता. १९६९ साली ‘इत्तेफाक’ हा चित्रपट आला आणि त्यांचे नशीब पालटले. यात पोलीस निरीक्षकाच्या महत्त्वाच्या भूमिकेत ते दिसले होते. पोलिसांचा गणवेश इफ्तिखारना इतका साजून दिसला की त्यानंतर त्यांच्याकडे कामाची कमतरता राहिली नाही. लवकरच त्यांनी खारमध्ये स्वतःचा फ्लॅटही विकत घेतला. याचे श्रेय त्यांनी अशोक कुमारना देऊ केलं. कारण त्यांच्याच शिफारसीवरून बी. आर. चोप्रा बॅनरमध्ये त्यांची एंट्री झाली होती! ‘इत्तेफाक’च्या आधी ते ‘कानून’, ‘हमराज’ आणि ‘आदमी और इंसान’ यातही दिसले होते.
जवळ चार पैसे जमा झाल्यावर इफ्तिखारनी लेकीचे लग्न मोठ्या थाटात लावून दिले. आंतरधर्मीय विवाह होता तो! जावई विपिनचंद्र यांना अभिनेता व्हायचे होते, त्यांचे आजोबा डेहराडूनचे विख्यात उद्योगपती नि नगराध्यक्षही होते. इफ्तिखारांची मुलगी सलमा पतीसोबत सासरी निघून गेली. १५ वर्षांच्या सहजीवनानंतर त्यांचा घटस्फोट झाला. इफ्तिखारना याचा मोठा धक्का बसला. अपत्यांना सोबत घेऊन सलमा मुंबईला परतली तेव्हा ते सैरभैर झाले होते. त्यांनी तिला एन. सी. सिप्पींच्या कार्यालयात नोकरी मिळवून दिली. या दरम्यान दुसरीकडे १९७० आणि ८०चे दशक इफ्तिखारनी खूप चांगले गेले. यशाच्या चढत्या काळात त्यांनी ‘शर्मिली’, ‘मेहबूब की मेहंदी’, ‘गॅम्बलर’, ‘कल आज और कल’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘जवानी दीवानी’, ‘अचानक’, ‘जंजीर’, असे चित्रपट केले. ‘मजबूर’, ‘दीवार’, ‘धर्मात्मा’, ‘शोले’, ‘कभी कभी’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘डॉन’, ‘त्रिशूल’, ‘नूरी’, ‘काला पत्थर’, ‘कर्ज’, ‘दोस्ताना’, ‘रॉकी’, ‘साथ साथ’, ‘राजपूत’, ‘सदमा’, ‘इन्कलाब’, ‘जागीर’, ‘तवायफ’, ‘अंगारे’ आणि ‘अवाम’ हे सिनेमे तर अफाट गाजले. ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केले. ‘बेखुदी’ (१९९२) आणि ‘काला कोट’ (१९९३) हे त्यांचे शेवटचे चित्रपट होते. पण आजही ते चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहेत.
इफ्तिखार संवेदनशील होते. त्यांनी यशाचा गर्व बाळगला नाही नि त्याचा माजही केला नाही. भले ते पाकिस्तानला गेले नसले तरी त्यांच्या कुटुंबातील जितकेही सदस्य पाकिस्तानात गेले होते, त्यांच्या ते संपर्कात राहिले. त्यांचे मोठे बंधू इम्तियाज अहमद हे पाकिस्तान टीव्हीचे प्रसिद्ध अभिनेते झाले. पाकिस्तान सरकारने त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्यापेक्षा लहान असलेला भाऊ मुश्ताक अहमद हा पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्समध्ये पायलट होता. निवृत्तीनंतर तो अमेरिकेत गेला, मात्र इफ्तिखारनी मुलुख सोडला नाही! त्यांच्या वहिनी शमीमबानो कराचीत राहायच्या. त्यांची त्यांच्यावर खूप माया होती. इफ्तिखारांचे सावत्र भाऊ नि शेंडेफळ असणारे सर्वात कनिष्ठ बंधू इक्बाल अहमद पेशाने डॉक्टर होते. त्यांच्या पत्नीही डॉक्टर होत्या. हे दांपत्यही अमेरिकेत राहत होते. विशेष बाब अशी की काही गैरसमजातून त्यांचे ज्या मुलीशी ब्रेकअप झाले होते त्या सईदाचं सारं कुटुंब फाळणीनंतर पाकिस्तानला गेलं होतं. ते रावळपिंडीत राहायचे. सईदाने ब्रह्मचर्य स्वीकारले होते. तिने कधीच लग्न केले नाही. याचा आघात इफ्तिखारना सहन करता आला तो त्यांच्या जीवनसंगिनीमुळेच! कदाचित म्हणूनच त्यांनी आपल्या दुसर्या मुलीचे नाव सईदा ठेवलं होतं.
मात्र नियतीने इथेही त्यांना धोका दिला नि दुःखाच्या डागण्या दिल्या. इफ्तिखारांची कन्या सईदा पती मोईन शेख याच्यासोबत जुहू-मुंबईत राहायची. तो सीएट टायर्समध्ये व्यवस्थापक होता. सईदाला दोन मुलं झाली. नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी या कुटुंबावर पहाड कोसळला. सईदाला कॅन्सर झाल्याचे समजले. तब्बल पाच वर्षे ती कॅन्सरशी झुंज देत राहिली. ७ फेब्रुवारी १९९५ रोजी ती लढाई हरली. लाडक्या लेकीच्या मृत्यूचा धक्का इफ्तिखार यांना सहन झाला नाही आणि अचानक त्यांचा मधुमेह खूप वाढला. त्यांना मुंबईच्या उपनगरातील मालाड (पूर्व) येथील ‘सुचक हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. शेवटी, मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या २४ दिवसांनी, १ मार्च १९९५ रोजी त्यांचे निधन झाले.
अवघ्या काही मिनिटांच्या भूमिकेद्वारे अभिनयाची नि व्यक्तिमत्वाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडणार्या इफ्तिखारना वैयक्तिक आयुष्यात सातत्याने हेलकावे खावे लागले. त्यांची नि मातापित्यांची ताटातूट झाली, पहिल्या वहिल्या प्रेमास ते मुकले, एका मुलीचा घटस्फोट झाला तर लाडकी मुलगी अकाली गेली. इतकी दुःखे पचवूनही हा माणूस कॅमेर्यापुढे आल्यावर भूमिकेशी अगदी समरस होऊन जायचा. लोकांना वाटायचे की हा माणूस खरेच पोलीस असावा. सुखदुःखाने त्यांच्यासोबत चोर-पोलिसांचा खेळ खेळला असला तरी त्यांनी मात्र आपला रोल असा काही पार पाडला की हिंदी सिनेमामधला त्यांचा पोलीस इन्स्पेक्टर कुणीच विसरणार नाही. रसिक प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले, आजही त्यांचे नाव निघते!
‘डॉन’मधला अमिताभ आणि त्याचा ‘ग्यारह मुल्क की पुलीस’चा फेमस डायलॉग इथे सर्वांनाच ठाऊक आहे आणि त्या सर्वांचे अमिताभइतकेच इफ्तिखारवरही प्रेम आहे. ही इथली गंगाजमनी संस्कृती! जगदीश राज यांनी तर पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करण्याचा जागतिक विक्रम केला! माणूस भूमिकेच्या लांबीवरून इथे लहान मोठा ठरत नाही हे इथलं वैशिष्ट्य होय. दॅट्स व्हाय, आय लव्ह बॉलिवुड!