बाहेर पाऊस नुसता रपारप कोसळत होता. ह्या पावसाच्या आणि विजांच्या धुमश्चक्रीमध्ये सापडलेली रहदारी अक्षरशः केविलवाणी भासत होती. काही बहाद्दर ह्या दोघांचा जोर कमी म्हणून की काय, आपल्या गाडीच्या हॉर्नच्या दणदणाटाने लोकांच्या वैतागात अजून भर घालत होते. आधीच मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत असलेली रहदारी, त्यात मध्येच कडाडणारी वीज, तुंबलेले पाणी… रस्त्यावर प्रत्येक जीव ह्या सगळ्यावर करवादलेला होता. मात्र ह्या सगळ्या गदारोळापासून अलिप्त असा शरद मात्र शांतपणे डोळे मिटून गाडीच्या मागच्या सीटवर डोके ठेवून बसला होता.
’साहेब.. पुढे प्रचंड गर्दी आहे. गाडी लाल महालाच्या बाजूने घेऊ का?’ ड्रायव्हरने विचारले अन शरद भानावर आला.
’घे.. कुठूनही घे..’ त्याने त्रासिक स्वरात उत्तर दिले. आज पर्यायच नव्हता म्हणून तो घराबाहेर पडला होता. नाहीतर गेले चार दिवस त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते. दुःख तर होतेच, पण संताप त्यापेक्षा जास्ती होता. शेकडो कामगारांवर छत्र धरून असलेल्या शरदच्या स्वत:च्या डोक्यावरचे छत्र नियतीने काढून जे घेतले होते. मृत्यू हा जीवनाच्या अविभाज्य अंग आहे, हे तो जाणून होता; मात्र तो मृत्यू नैसर्गिक नसेल तर? तर संताप हा साहजिक होता. शरद पिसाळ.. ’पिसाळ इंडस्ट्रीज’चा एकमेव वारसदार आज अनाथ झाला होता. पिसाळ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा जयंत पिसाळ यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूचे कारण होते मेंदूत शिरलेली गोळी…
’साहेब पोहोचलो आपण…’
ड्रायव्हरच्या आवाजाने पुन्हा एकदा त्याची तंद्री भंगली आणि त्याने अनिच्छेने बाहेर पाहिले. ’कमिशनर ऑफिस’च्या पाटीकडे शून्य नजरेने बघत त्याने हलक्या हाताने दरवाजा उघडला आणि तो बाहेर पडला. वडिलांचा खून, पोलिसांचा तपास आणि संशयित आरोपीला झालेली अटक, सापडलेले पुरावे हे सारे काही क्षणभरात त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेले. शेवटी संशयित खुन्याचा चेहरा समोर आला आणि तो मागच्या वेळेप्रमाणेच दचकला. संशयिताचे नाव पोलिसांनी उघड केले, तेव्हा देखील त्याला असाच धक्का बसला होता आणि संशयिताला पुराव्यासकट अटक केल्याचे काल पोलिसांनी जाहीर केले, तेव्हा दुसरा धक्का बसला. बापाच्या सेक्रेटरीने, जिला बाप दत्तक घ्यायला निघाला होता, तिनेच त्या देवमाणसाचा खून करावा? तेही फक्त एका तीन कोटीच्या टेंडरसाठी?
’बसा शरदराव…’ कमिशनर वायचळ खुर्चीकडे इशारा करत म्हणाले. त्यांनी त्यांच्या डावीकडच्या खुर्चीकडे इशारा केलेला पाहून अजून देखील कोणीतरी येणार असल्याचे चाणाक्ष शरदने ओळखले. त्याचा अंदाज अचूक ठरला. तो बसताच कमिशनर साहेबांनी बेल दाबत ’भगत साहेबांना सांग की शरद साहेब आले आहेत,’ असा हुकूम सोडला. इन्स्पेक्टर प्रशांत भगत हे जयंतरावांच्या खुनाचे तपास अधिकारी होते. भगतांनी आत येत कडक सॅल्यूट ठोकला आणि ते शरदशेजारच्या खुर्चीत विसावले. दोन्ही अधिकार्यांमध्ये डोळ्यांनीच काही संवाद झाला असावा. भगतांनी बोलण्याचे लीड स्वत:कडे घेतले.
’माफ करा शरदराव, तुम्हाला असे तातडीने बोलावणे पाठवले. पण कारण तसे महत्त्वाचे होते त्यामुळे..’
’काय झालंय भगत साहेब? एनिथिंग सीरियस?’
’शरदराव, मी काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घ्या. मग आपण त्यावर पुढच्या गोष्टी ठरवू.’
’बोला साहेब…’
’शरदराव, तुमचे वडील जयंतराव ह्यांच्या खुनाची केस आम्हाला वाटली होती तशी ओपन अँड शट केस नाही. आम्ही संशयित महिलेला अटक केली, तिच्याविरुद्ध पुरावे देखील आम्हाला मिळाले. इव्हन हॉटेलच्या ज्या खोलीत हा खून झाला, तिथे गेल्याचे संशयिताने कबूलही केले.’
’मग अडचण काय आहे?’
’आपण गेलो तेव्हा जयंतरावांचा खून ऑलरेडी झालेला होता, असे मानसीचे म्हणणे आहे.’
’हा तुमच्या तपासाचा भाग आहे भगत साहेब. ह्यासाठी मला इथे का बोलावले आहे?’
’तिथे जाण्याचे जे कारण तिने सांगितले आहे त्यामुळे…’
’म्हणजे?’
’मानसीचे असे म्हणणे आहे की जयंतरावांनी तिला काही वेगळ्या हेतूने एकांतात बोलावले होते.’
’वेगळ्या म्हणजे?’
’एक पुरुष एका स्त्रीला ज्या कारणासाठी एकांतात…’
’आर यू मॅड? डोकी फिरली आहेत का तुमची?’ संतापाने शरद आता थरथर कापायला लागला होता.
’शांत व्हा.. शांत व्हा शरदराव. पूर्ण ऐकून तर घ्या,’ कमिशनर साहेबांनी पहिल्यांदाच चर्चेत सहभाग नोंदवला.
’कसे शांत राहायचे? एक ६५ वर्षाचा वयस्क माणूस एका २२ वर्षाच्या मुलीला एकांतात बोलावतो, तेही वासनेपोटी? आणि ज्या मुलीला तो दत्तक घ्यायला निघाला आहे तिलाच? कसे शांत राहता येईल कमिशनर साहेब, त्वेषाने शरद म्हणाला.
इन्स्पेक्टर भगतांनी शांतपणे खिशातून एक मोबाईल काढला.
’ही ऑडिओ क्लिप ऐका..’
आधी थोडीशी खरखर आणि मग एका स्त्रीचा आवाज ऐकायला आला. आवाज नक्की मानसीचा होता.
’हॅलो… मनु येती आहेस ना?’
’सर…’
’अगं घाबरू नकोस. मी काय खाणार आहे का तुला? आणि मी तुला सांगितले ना, फक्त एकदा… फक्त एकदा.. प्लीज..’ पुरुषाचा आवाज ऐकून शरदला धक्काच बसला. आवाज नक्की पप्पांचा होता. लहानपणापासून ऐकलेला तो आवाज तो कसा विसरणार?
’सर, प्लीज नका हे सगळे करू. मी तुमच्या मुलीसारखी आहे सर.’
’अगं दत्तकच घेणार आहे मी तुला. अगदी कायद्याने. २४ तास माझ्या नजरेसमोर राहशील म्हणजे.’
’शी! सर लाज नाही वâा हो वाटत तुम्हाला? मी नाही येणार.’
’आणि मग तुझ्या आईच्या ऑपरेशनचे काय? नाही करणार म्हणतेस? मी तर चेक पण लिहायला घेतलाय बघ…’ शरदने पटकन मान खाली घातली आणि हातानेच टेबलावरचा मोबाइल दूर सारला. त्याचा एकूण रागरंग बघून भगतांनी पटकन तो
ऑडिओ बंद केला. त्याने सुन्न नजरेने भगतांकडे पाहिले.
’असेच आणखी दहा ते बारा कॉल्स आणि काही मेसेजेस आहेत. आम्ही मोबाइल कंपनीशी बोलून खात्री करून घेतली आहे,’ भगतांच्या बोलण्याकडे शरदचे कितपत लक्ष होते कोणास ठाऊक. तो तशाच सुन्न अवस्थेत उभा राहिला आणि दाराकडे निघाला.
’एक मिनिट शरदराव..’
’आता अजून काय राहिले आहे?’ त्याने पडलेल्या आवाजात विचारले.
’मानसीला जयंतराव दत्तक घेत आहेत हे तुम्हाला पसंत नव्हते आणि त्यावरून तुमच्यात प्रचंड वाद झाला होता म्हणे?’
शरदच्या डोळ्यात एक संतापाची ठिणगी पेटली आणि क्षणात शांत झाली, ‘प्रचंड वाद वगैरे नाही, फक्त मी माझा नकार ठामपणे कळवला होता. अर्थात माझा आवाज थोडासा उंचावला होता. पण त्यावेळी घरात फक्त मी आणि पप्पाच होतो. मग मानसीला..’
’तुम्ही तुमच्या पप्पांना भेटायला गेलात, तेव्हा ते मानसीबरोबरच बोलत होते आणि चुकून फोन कट करायचा राहून गेला.’
’तुमचा माझ्यावर संशय आहे?’
’संशय नाही असे मी ठामपणे म्हणणार नाही. पोलिसांच्या परवानगीशिवाय शहर मात्र सोडू नका,’ भगत शांतपणे म्हणाले आणि योग्य तो अर्थ समजून शरदने मान डोलवली.
शरद गेला आणि कमिशनर साहेबांनी भगतांचा ताबा घेतला.
’भगत, हा माणूस जरा देखील घाबरलेला किंवा दचकलेला वाटला नाही. ह्याला बघून हा खून करू शकेल असे वाटत तर नाही. इतक्या वर्षात माझी मुरलेली नजर धोका खाणार नाही.’
’मला देखील असेच वाटते सर. पण शेवटी मानवी स्वभाव… कुठल्या क्षणी माणसाचे मन काय करेल, ते सांगता येत नाही. एका क्षणाचा राग देखील आयुष्याची राखरांगोळी करून जातो.’
’खरे आहे भगत. लेट्स सी. तुम्ही ह्याचे कॉल्स सध्या अंडर ऑब्झर्वेशन घ्या. कोणाशी बोलतोय, काय बोलतोय, नजर ठेवा.’
’येस सर!’
– – –
’मे आय कम इन सर?’
’या भगत या… काय बातमी?’
’सर, पिसाळ केसमध्ये काही नवीन डेव्हलपमेंट घडल्या आहेत.’
’शूट फास्ट…’
’सर, मानसीला जयंतरावांच्या रूमबाहेर पाहणारा एक आणखी साक्षीदार सापडला आहे. त्या हॉटेलचा रूम बॉय जगन. त्याने दिलेल्या साक्षीनुसार त्याने मानसीला जयंतरावांच्या रूममधून धावत बाहेर पळत येताना पाहिले. ती प्रचंड घाबरलेली होती आणि पळता पळता तिची पर्स देखील खाली पडली. ती त्याने लपवलेली होती. ती पर्स आम्ही ताब्यात घेतली आहे.’
’पर्समध्ये…’
’नाही सर. मर्डर वेपन त्यात मिळालेले नाही. ते अजूनही मिसिंग आहे.’
’आणि दुसरे काही?’
’सर आज दुपारी शरदने मानसीच्या घरी फोन केला होता.’
’इंटरेस्टिंग. काय चर्चा झाली?’
’शरदने मानसीच्या वडिलांकडे तिच्या आईच्या तब्येतीची चौकशी केली, मानसीबद्दल चौकशी केली, मानसीच्या आईच्या ऑपरेशनचे पैसे जमले का? किती खर्च आहे? हे सगळे काही विचारले.’
’पुढे?’
’त्याने मानसीच्या वडिलांना मानसीच्या आईच्या ऑपरेशनचा पूर्ण खर्च उचलायचा शब्द दिला आहे. फक्त त्या बदल्यात..’
’त्या बदल्यात?’
’मानसीने जयंतरावांच्या चारित्र्याविषयी कुठेही काहीही उल्लेख करायचा नाही. मरणानंतर आता त्याला बापाची बदनामी नको आहे. तो वेळ पडली तर मानसीला देखील छोटा मोठा वकील द्यायला तयार झाला आहे.’
’मला वाटलेच होते. जयंतरावांच्या जाण्याने पिसाळ इंडस्ट्री डगमगायच्या वाटेवर आहे; त्यात जयंतरावांचे चाळे उघडकीला आले तर बघायलाच नको.’
’सर, ज्या टेंडरमध्ये कमिशन खाण्याचा मानसीवर संशय आहे, त्या टेंडरमधला जयंतरावांचा प्रतिस्पर्धी असलेला खुराना आज अमेरिकेहून परत आलाय. त्याने त्याचा जवाब नोंदवला आहे.’
’काय म्हणतोय तो?’
’तो म्हणतोय की, त्याची आणि मानसीची ओळख आहे. एक दोनदा काही फंक्शन, कॉर्पोरेट मीटिंग्जमध्ये भेटीदेखील झालेल्या आहेत. पण ह्या टेंडरसंदर्भात त्यांची कधीही कुठलीही चर्चा झालेली नाही. रादर, त्याला हे टेंडर नकोच होते. पण सरकारमध्ये बसलेल्या त्याच्या काही मित्रांच्या दबावामुळे त्याने हे टेंडर भरले होते.’
’म्हणजे मानसीने त्याला पिसाळांच्या टेंडरचे रेट्स खुरानाला विकले आणि हे कळल्याने पिसाळ तिला हाकलून देणार होते ही थिअरी…’
’ही थिअरी पूर्णपणे चुकीची सिद्ध होत आहे सर. तशी अफवा पिसाळांच्या ऑफिसमध्ये पसरली होती, त्यातच नेमकी ती टेंडरची फाइल मयत जयंतरावांच्या रूममध्ये मिळाली, नेमकी त्यावेळी मानसी तिथे आली, तिचे ठसे फाइलवर मिळाले आणि संशयित ठरली.’
’मग आता ते टेंडर शेवटी मिळाले कुणाला आहे?’
’खुरानाला..’ चाचपडत भगत म्हणाले आणि केबिनमध्ये शांतता पसरली.
’खुरानावर काही संशय?’
’स्वत: नाही, पण सुपारी दिलेली असू शकते. कारण खुनाच्या चार दिवस आधी तो मेक्सिको अन् अमेरिकेच्या दौर्यावर गेला होता, तो आजच परतला. आम्ही सगळी माहिती मिळवली आहे सर. त्याचा मेक्सिकोचा दौरा तर गेल्या वर्षीच ठरलेला होता.’
’कोणाला संशय येऊ नये, म्हणून त्याने मुद्दाम ही वेळ ठरवली असेल तर?’
’शक्यता नाकारता येत नाही सर. आम्ही त्या दिशेने देखील तपास करतो आहोत.’
’ग्रेट!’
’उद्या मानसीला जामीन मिळेलच. तिच्यावर आता संशय असा उरलेला नाही. पण हा खुराना मात्र माझ्या रडारवर आला आहे.’
’नीट नजर ठेवा आणि मला अपडेट करत राहा.’
– – –
’भगत सर, महाडिक बोलतोय.’
’बोला महाडिक.’
’सर, खुरानाची मोलकरीण आता कचरा ठेवायला बाहेर आली होती. प्रचंड अस्वस्थ वाटत होती. कचर्याची बकेट ठेवली आणि धावत आत पळाली.’
’मग?’
’मी सिक्युरिटीला घोळात घेतले अन् आमच्यापैकी सावंत आत घुसला. त्या बकेटमध्ये रिव्हॉल्व्हर सापडले आहे सर.’
’व्हॉट? महाडिक तुम्ही ती गन घेऊन तातडीने फोरेन्सिकला या. मी पोहोचतोच आहे.’
– – –
’सर, भगत बोलतोय.’
’येस भगत?’
’सर, खुरानाच्या मोलकरणीने स्टेटमेंट दिले आहे. कचरा टाकायला जाताना बकेटची झाकणी खाली पडली आणि तिला आतली रिव्हॉल्व्हर दिसली. त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली होती. तिने बकेट ठेवली आणि धूम ठोकली.’
’पण जर गन नष्टच करायची होती, तर इतरही अनेक मार्ग होते की.’
’खुराना प्रचंड हुशार आहे सर! गन नष्ट करणे हे जवळपास अशक्य काम आहे पुण्यासारख्या शहरात. त्यात पुन्हा कोणी पाहण्याचा धोका. बेस्ट उपाय म्हणजे, सकाळी कचर्यात गन टाकून देणे. खुरानाच्या एरियातले कचरेवाले तर सरळ बकेट डंप करून मोकळे होतात मोठ्या पेटीत. आत काय आहे काय नाही त्यांना काही फिकीर नाही. एकदा का हा कचरा मेन प्लँटवर पोहोचला की मग तर बघायलाच नको!’
’गन कोणाच्या नावावर आहे?’
’नो वन! डायरेक्ट मेक्सिकोमधून आलेली आहे. मालकी हक्काचा तपास लागणे अशक्य आहे. मुख्य म्हणजे मेक्सिको आणि खुरानाचे एक वेगळेच नाते आहे..’
’तुमचा पुढचा विचार काय आहे?’
’सर, गनचा पुरावा आणि खुरानाला मिळालेले कॉन्ट्रॅक्ट ह्याचा अधिक तपास करण्यासाठी खुरानाला ताब्यात घ्यावे म्हणतो आहे.’
’गो ऑन… बोलता करा साल्याला.’
– – –
मानसीवरचा संशय फिटला आणि मानसी मोकळा श्वास घेण्यासाठी मोकळ्या वातावरणात बाहेर पडली. सुटका झाल्यावर तिने आधी धाव घेतली ती घराकडे. घराला कुलूप पाहून तिचा चेहरा सटकन उतरला.
’जोशींच्या हॉस्पिटलमध्ये आहेत सगळे…’ शेजारच्या काकूंनी माहिती पुरवली. मानसी उलट्या पावली घराजवळच्या जोशी हॉस्पिटलला धावली.
’आईचे ऑपरेशन व्यवस्थित झाले आहे. काळजी करू नको,’ मागच्या बाजूने आश्वासक स्वर आला आणि ती मागे वळली. मागे शरद उभा होता. शरदने तिच्या खांद्याला थोपटले आणि दोघेही एका शांत कोपर्यात जाऊन बसले.
’सर, येवढे सगळे होऊन देखील..’
’अगं वेडे, तू तुझा शब्द पाळलास. मी माझा पाळला.’
’तुमची शिस्त मी जाणते सर.’
हो मग! मी काय माझ्या पप्पांसारखा बेशिस्त नाही! इथे फोन टाक विसरून जा, तिथे फोन टाक विसरून जा. कोणाला मेसेज गेलेत, कोणाचे आलेत ते तपासण्याची देखील फिकीर करायचे नाहीत. अगदी कायम गुप्त डिलिंगसाठी ज्या हॉटेलात विशिष्ट रूममध्ये उतरायचे, त्या रूमच्या रुमबॉयचा, जगनचा आवाज अगदी आपल्या आवाजाशी मिळता जुळता आहे हे देखील त्यांना कधी समजले नाही. जिला एक रात्र घालवायला बोलावतो आहे, तिलाच मुलाला सून करून आणायचे आहे हे देखील कधी लक्षात आले नाही म्हातार्याला!’’
’सर आता?’
’आता? आता दोन वर्ष फक्त रोमान्स. मग सरचा ’अहो शरद’ आणि तोवर संशयाच्या आधारे का होईना खुराना लटकला तर त्याचे मेक्सिकोचे सगळे क्लायंट आपलेच..’ डोळे मिचकावत शरद बोलला आणि मानसीला हसू आवरता आवरता नाकी नऊ आले.