दुसर्यासाठी मनात कणव असली की माणसाला स्वस्थ बसवत नाही. गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील वगैरेंनी समाजकार्य केले. याच समाजसेवकांचे आधुनिक वारसदार आहेत किशोर पवित्रा भगवान गणाई (जगताप). गेली चाळीस वर्षे ते गोरगरीब मुलांच्या कल्याणासाठी झटत आहेत. नापास झाल्यामुळे कुणा मुलाने शाळा सोडली असेल, एखाद्याला शाळेतून काढून टाकण्यात आले असेल, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना उच्चशिक्षणापर्यंत नेण्याचे महान कार्य किशोर जगताप करत आहेत.
विशेष म्हणजे स्वत: अपघातांमुळे डाव्या पायाने अधू असूनही गेली ४० वर्षे ते सिग्नल शाळा, फुटपाथ शाळा व बागशाळा या माध्यमातून काम करत आहेत. शिक्षणक्षेत्रातील बेस्ट ऑफ फाईव्ह, फेरपरीक्षा वगैरे असे अनेक कायदे बदलण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे. काहीवेळा त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही पत्करला आहे. दादा कुणाच्याही मदतीसाठी थांबले नाहीत. कल्याण (पश्चिम) येथे भाड्याच्या जागेत त्यांनी ‘मैत्रकुल’ नावाचे वसतीगृह व विद्यार्थीगृह सुरू केले. आत्ताच या ठिकाणी जवळपास साठ मुलेमुली शिकत आहेत. येथे त्यांची सर्वांगीण प्रगती होत आहे. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतोय. गेल्या मे महिन्यात या संस्थेला पाच वर्षे पूर्ण झाली. ही संस्था तिथे शिकून मोठे झालेले विद्यार्थीच चालवतात. स्वत:च्या शिक्षणासोबत हे विद्यार्थी समाजात शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनही करत आहेत.
जागा भाड्याची असल्यामुळे ‘मैत्रकुल’ला अनेक मर्यादा येत आहेत. यासाठीच स्वत:ची जागा कल्याण परिसरातच घेता यावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तेथे भव्य वाचनालय, अभ्यासिका, पाच लाखांची भव्य बुक बँक प्रयोगशाळा, इतिहास कट्टा, भूगोल कॉर्नर, शेतीशाळा, कलांगण, स्टुडिओ अशा अनेक गोष्टी गोरगरीब मुलामुलींकरिता सुरू करण्याचा किशोरदांचा विचार आहे. पण पैशामुळे सगळे अडते. हेच नजरेसमोर ठेवून दादांनी एक कोटी रुपये जमविण्याचा संकल्प सोडला आहे. सहा ऑगस्ट हिरोशिमा दिनाचे औचित्य साधून दादांनी ‘मैत्रकुल’ ते कुलाबा अशी संकल्प व्हीलचेअर यात्राच सुरू केली आहे. या यात्रेचा आतापर्यंत चौथा टप्पा पूर्ण झाला असून आता ही यात्रा मुंबईतील मानखुर्द येथील चिता कॅम्प येथे आली आहे. शिक्षणवारीची ही यात्रा शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय, बँक, खासगी ऑफिस सोसायची, बाजारात अशा ठिकाणी जाणार आहे. आपणही जेथे कुठे असाल तेथे येऊन या यात्रेचे स्वागत करावे आणि गोरगरीब मुलामुलींचे भविष्य व जगणं घडविण्यासाठी मदत करावी असे किशोरदांनी सांगितले.
या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांना अन्य स्वरूपात मदत देण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ९०२९८९५१२० किंवा ९०२९१२९४६७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.