साधारणपणे २००५ साली शिवसेना सोडून नारायण राणे यांच्याबरोबर गेलेल्या कोकणातील चार आमदारांनी राजीनामा देऊन काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुका लढवल्या. सत्ता, पैसा आणि दादागिरीच्या जोरावर या पोटनिवडणुका राणेंनी जिंकल्या. रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर आणि वेंगुर्ले विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. मात्र रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन येथे पोटनिवडणूक झाली. तिथे सामान्य शिवसैनिक असलेले तुकाराम सुर्वे यांनी नारायण राणेंच्या श्याम सावंतचा पराभव केला. नारायण राणेंना धक्का दिला. मुंबईतील नायगाव विधानसभा पोटनिवडणूक नारायण राणे समर्थकांनी जिंकली. या सर्व पोटनिवडणुका टप्प्याटप्प्याने झाल्या. १ जून २००६ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक झाली. शिवसेनेने एकच जागा जिंकली.
नारायण राणेंबरोबर गेलेले आमदार फक्त एकदाच चमकले. बाकीच्यांचा राजकीय अस्त झाला. राणेंबरोबर गेलेले एकटे कालिदास कोळंबकर त्यांच्याबरोबर राहिले. बाकी सगळे सोडून गेले. काहींनी शिवसेनेत घरवापसी केली. याच वर्षी महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी खालोखाल शिवसेनेला यश मिळाले. काँग्रेस ९०२, राष्ट्रवादी ८३२, शिवसेना ३५४, भाजपा २९४, शेकाप ६५, स्थानिक आघाड्या ४८६ तर ५५० ठिकाणी अपक्ष नगरसेवक निवडून आले. शिवसेनेसाठी हा कठीण काळच होता.
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक २००६
शिवसेनेच्या पराभवाची मालिका सुरूच होती. पण विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाने ती खंडित केली. ही निवडणूक २४ जून २००६ रोजी झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. दीपक सावंत प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. तसा हा मतदारसंघ शिवसेनेचाच होता, कारण १९८८ सालापासून निवडणुकांमध्ये शिवसेना नेते प्रमोद नवलकर येथून विजयी झाले होते; प्रमोद नवलकरांना त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा फायदा मिळाला. तसा फायदा डॉ. सावंत यांना मिळेल किंवा नाही याविषयी शंकाच होती. म्हणून उद्धवजींनी डॉ. सावंतांसाठी पद्धतशीर प्रचार केला, मतदारांची व्यवस्थित नोंदणी करवून घेतली आणि अत्यंत कठीण परिस्थितीत शिवसेनेला यश मिळवून दिले. वेगवेगळ्या विभागांना भेटी देणे, शाखांना स्वतंत्रपणे भेटी देणे आणि शाखाप्रमुख, विभागप्रमुखांना निवडणुकीची कल्पना देऊन ही निवडणूक कशी प्रतिष्ठेची आहे ते समजावून सांगण्याचे काम उद्धवजींनी केले. तर स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने त्यांच्यावर सोपविलेली कामगिरी नेहमीप्रमाणे चोखपणे पार पाडली. शिवसेना विजयी झाली आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या विजयाची परंपरा शिवसेनेने कायम राखली. आजही मुंबई पदवीधर मतदारसंघावर शिवसेनेचाच भगवा फडकतोय.
नवीन शिवसेना भवन सज्ज!
१९९२-९३मध्ये मुंबईत एकूण १३ बॉम्बस्फोट झाले. तेव्हा शिवसेना भवनाशेजारी, पेट्रोल पंपाजवळ असलेल्या गाडीत बॉम्ब फुटला होता. या बॉम्बच्या प्रचंड स्फोटामुळे शिवसेना भवनाच्या भिंतीला तडे गेले होते. शिवसेनाप्रमुखांच्या केबिनलाही मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. शिवसेना भवनाची तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा शिवसेना भवन पुन्हा बांधण्याचा निर्णय झाला. २७ जुलै २००६, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस. हा शिवसैनिकांसाठी आनंदाचा दिवस. यात आणखी एका आनंदाची भर पडली. या दिवशी सायंकाळी नवीन शिवसेना भवनाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. या आनंदाच्या क्षणी भाजपा नेते गोपीनाथ मुंडे हेही उपस्थित होते.
यावेळी शिवसेनाप्रमुख भाषणात म्हणाले, शिवसेना संपवून टाकणारा कोणी अजून जन्माला आलेला नाही. यापुढेही येणार नाही. शिवसेना संपवायला निघालेले संपले. शिवसेना अबाधित आहे. देशात ऐंशी सेना निघाल्या पण टिकली ती शिवसेनाच. उद्धवला कार्याध्यक्ष तुम्ही केले. मी घराणेशाही करणार नाही. शिवसेनेला पुढे नेण्याची जबाबदारी तुमचीच आहे. पण उद्धवला पक्ष चालवताना काही पथ्ये पाळावीच लागतील. मी जशी शिवसेना चालवली तशीच चालवायला हवी. आता शिवसेना पुढे न्यायची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. तुम्ही उद्धवला साथ द्यायची आहे. बाळासाहेबांनी असे म्हणताच ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी शिवसेना भवनाचा परिसर दुमदुमून गेला.
पक्ष सोडताना थँक्यू तरी म्हणा!
दिनांक १० जानेवारी २००६च्या दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेला ‘फ्री प्रेस जर्नल’मधील शिवसेनाप्रमुखांचे सहकारी आणि ज्येष्ठ पत्रकार ए. आर. कणंगी यांचा लेख फारच मार्मिक होता. नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्यामुळे रागाने व्यथित होऊन त्यांनी लेख लिहिला होता. अग्रलेखाच्या बाजूलाच तो छापण्यात आला. ‘बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना काढली नसती तर आज राजकारणात व सत्ताकारणात ‘व्हीआयपी’ म्हणून मिरवणारे चेहरे कायम अंधारात राहिले असते. बहुजन समाजातील सामान्यातील सामान्य तरुणास बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय शिखरावर नेऊन ठेवले. रस्त्यावर व्यवसाय करणारे फेरीवाले, वडापाव विकणारे, प्रसंगी थोडीफार टगेगिरी करून चरितार्थ करणारे हे तरूण होते. त्यांची राजकीय कारकीर्द घडविण्याचे काम बाळासाहेबांनी केले. ज्यांना समाजात काहीच अस्तित्व नव्हते अशांना बाळासाहेबांनी ‘व्हीआयपी’ बनविले व ते शिवसेनेतून बाहेर पडले. बाहेर पडताना बाळासाहेबांना ‘थँक्यू’ म्हणायचे साधे सौजन्यही या मंडळींनी दाखविले नाही. उलट बाळासाहेबांवर टीकेचा भडिमार केला. त्यात कृतज्ञता वा मायेचा ओलावा नव्हता.
ही मंडळी इतकी मोठी झाली की आपण आपला राजकीय पक्ष सुरू करू शकतो आणि सत्ता काबीज करू शकतो, असे त्यांना वाटू लागले होते. स्वत:ला मोठे होण्यासाठी त्यांनी शिवसेनेचा पूर्ण वापर केला होता आणि आपण बाळासाहेबांपेक्षा मोठे झालो असे त्यांना वाटू लागले होते. शिवसेनाप्रमुखांना आपण दोन-चार गोष्टी सांगू शकतो असाही ‘विश्वास’ त्यांना वाटू लागला. शिवसेना ही संघटना काही एक दिवसात उभी राहिली नव्हती. बाळासाहेबांनी शून्यातून या शक्तिशाली राजकीय वटवृक्षाची निर्मित्ती केली. ही संघटना म्हणजे बाळासाहेबांचे अपत्य आहे हे कुणीही विसरता कामा नये.’
शिवसेना अभेद्य!
याच दरम्यान ‘मार्मिक’ साप्ताहिकात ‘शिवसेना अभेद्य!’ हा ‘मार्मिक’चे सहसंपादक प्रमोद नवलकर यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘गोबेल्स हा एक असत्य बोलणारा महापुरुष होऊन गेला. कोणतीही गोष्ट पुन्हा पुन्हा असत्य सांगितली की लोकांना ती खरी वाटते हा त्याचा सिद्धांत होता. या जगातील सत्य संपवण्याचा त्याने विडा उचलला होता. अखेर गोबेल्स संपला, पण सत्य मात्र अजरामर झाले. माफ करा, माझा समज चुकीचा होता. कारण गोबेल्स संपला नाही तर त्याने जाता जाता अनेक गोबेल्स निर्माण केले. त्यामुळे या देशात आज खोटे बोलण्यासाठी प्राइज देण्याचे ठरले तर दरवर्षी ते आपल्या देशातील नेत्यांनाच मिळेल. खोटे बोलण्यासाठी वेगवेगळे विषय आणि घोषणा असतात. २००५ सालची घोषणा होती ‘शिवसेना संपली’. गोबेल्सची भुतावळ रोज उठल्याबरोबर घोषणा करायची, ‘शिवसेना संपली’ आणि झोपताना प्रार्थना करायची की, ‘शिवसेना संपावी’, हे आजच नव्हे तर शिवसेनेच्या जन्मापासून चाललेले आहे. जन्मत:च शिवसेनेचा गळा घोटण्यासाठी लालबाग-परळमध्ये कंसमामा लपून बसले होते. ते कंसमामा संपले, पण शिवसेना संपली नाही. नंतर मोरारजी नावाच्या एका गांधीवाद्याने शिवसेना संपवण्याची घोषणा करून एका शिवसैनिकाला माहीमच्या नाक्यावर चिरडले. त्या शिवसैनिकाने हौतात्म्य पत्करले, पण शिवसेनेला वाचवले. याचवेळी ई. एस. मोडक नावाचे एक अधिकारी अवतरले. त्यांनी तर शिवसेना संपवण्याचा विडाच उचलला आणि बाळासाहेबांपासून ते सर्व शाखाप्रमुखांपर्यंत सर्वांना एका रात्रीत तुरुंगात डांबले. दत्ताजी साळवी देखील त्यांच्या तावडीतून सुटले नाहीत. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांना तुरुंगात डांबल्यावर मराठ्यांचे राज्य अस्तास जाण्याऐवजी महाराज तुरुंगातून बाहेर आले आणि मोठ्या वैभवाने मराठेशाहीची स्थापना होऊन त्यांचा राज्याभिषेक झाला. ४० वर्षापूर्वी शिवसेनेचा वड होता तसा तो आजही मजबुतीने उभा आहे. म्हणून आज काहींच्या अविचाराने अप्रिय घटना घडत असल्या तरी सच्च्या शिवसैनिकाला खात्री आहे की, ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल.’ शिवसेना अभेद्य ठेवण्यासाठी दोन्ही बाहू उभारून शिवसैनिक सज्ज झाला आहे!’