□ मंत्रालयावर दगडांचा वर्षाव; राज्याच्या मुख्यालयातच सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा.
■ एक प्रकारे राज्यातल्या जनतेच्या सरकारविषयक भावनांना मेट्रोच्या कामाने वाट करून दिली म्हणायची!
□ भाडेकरूंना छळण्यासाठीच बिल्डर पृथ्वीवर अवतरलेत! हायकोर्टाची परखड टिप्पणी
■ बिल्डरांचा स्वतंत्र उल्लेख करायची गरज काय? आपल्या देशात भाडेकरूंना वाली आहे तरी कोण?
□ अदानी आणि मोदी यांचा संबंध काय? – मुंबईत राहुल गांधी यांनी तोफ डागली.
■ तुझ पे कुर्बां मेरी जान, मेरा दिल मेरा इमान, यारी मेरी कहती है यार पे कर दे सब कुर्बान (अपना नहीं… देश का)
□ देशातील जनता इंडियासोबत – आदित्य ठाकरे यांचा विश्वास.
■ विविध धर्म, भाषा, चालीरीतींना सामावून घेणारी, भारतीयत्व सर्वोपरि मानणारी आयडिया ऑफ इंडिया टिकवायची असेल, तर दुसरा पर्याय नाही, आदित्यजी!
□ अदानींचा चिनी घोटाळा – ओसीसीआरपीचा स्फोटक अहवाल.
■ कितीही अहवाल आले तरी काही फरक पडत नाही आपल्या ‘राष्ट्रीय परममित्रा’ला!
□ नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तुरुंगवास; मिंधे सरकारची पुरती अब्रू गेली.
■ अशा प्रकरणांत कधीतरी सत्ताधीश नेत्यांनाही तुरुंगवास सुनावला जायला हवा, असंच जनतेचं मत असेल!
□ संसदेचे विशेष अधिवेशन ठरणार लोकसभा निवडणुकीची नांदी?
■ इंडिया इंडिया हा जयघोष आता एनडीएचे कान फाडू लागलेला दिसतोय…
□ शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही – मुनगंटीवार स्पष्टच बोलले.
■ मग बाहेर पडा की त्यातून. कशाला मन मारून राहता तिथे? की पाठीचा कणा बाहेर काढून ठेवल्यावरच संघपरिवारात प्रवेश मिळतो?
□ बोगस डॉक्टरांना कारवाईचे ‘इंजेक्शन’.
■ अशी किती इंजेक्शनं दिली तरी मूळ रोग काही कमी होत नाही, हटत नाही. अस्सल पदव्या घेतलेले डॉक्टर जोवर गावखेड्यांत, गरीब वस्त्यांत जात नाहीत, तोपर्यंत हेच डॉक्टर चुकीच्या उपचारांचं इंजेक्शन देत राहणार आहेत.
□ स्ट्रेचरवरून मृतदेह आणला रुग्णालयात; कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार.
■ स्ट्रेचरवरून आणला ही फार मोठी प्रगती झाली, आदिवासी भागांमध्ये पाठुंगळी उचलून किंवा झोळी करून न्यावे लागतात मृतदेह!
□ साथीच्या आजारांचा विळखा तरी ठाण्याचा आरोग्य विभाग सुशेगाद.
■ सुशेगाद असणे हा सरकारी यंत्रणांना विळखा घालणारा सगळ्यात मोठा साथीचा आजार आहे… त्यावर उपचारही नाहीत.
□ पन्नास खोक्यांचा खर्च कुणी केला ते आधी सांगा – आदित्य ठाकरे यांचा मिंध्यांना सणसणीत टोला.
■ हगल्या-पादल्याला जनतेच्या खिशातल्या हजारो कोटींच्या जाहिराती करणारे, बुलेटप्रूफ मोटारी, महागडं विमान यांच्यावर हजारो कोटींची उधळण करणारे जेवलेल्या ताटांचा आणि निवासाचा हिशोब करतायत… आकडेमोड कौशल्य तिकडे पणाला लावा जरा… डोळे पांढरे होतील!
□ गणेशोत्सवात अधिवेशन… भाजपचे हेच का हिंदुत्व! – शिवसेनेचा खडा सवाल.
■ महाराष्ट्राची किंमत काय ते सांगतायत… मराठी जनतेने मिंधेपणा पत्करला आहे का, ते निवडणुकीत सांगायला लागेल… बाप्पा मोरया म्हणत यांचं कायमचं विसर्जन करावं लागेल!!
□ आरक्षणासाठी आंदोलन करणार्या मराठा तरुणांवर पोलिसांचा बेछूट, अमानुष लाठीहल्ला
■ आता राजीनामा कोण घेणार, कोण देणार? मुळात तेवढी शिल्लक असेल का, हाच प्रश्न आहे.
□ चुकीच्या मार्गाने गेले त्यांना धडा शिकवणार – शरद पवार.
■ जनतेच्या मनातलं बोललात पवार साहेब!
□ ‘एक देश एक निवडणुकी’पेक्षा पारदर्शी निवडणुका घ्या – उद्धव ठाकरे.
■ हुकूमशाहीकडे निघालेत ते उद्धवसाहेब, पारदर्शक निवडणुका घेतल्या तर जनता आपल्याला सत्तेवरून खाली खेचेल, हे त्यांना नीट माहिती आहे.
□ स्वराज्यभूमीच्या नावासह संकल्पनांवर भाजपचा डल्ला.
■ कुछ नया बताओ… ‘अच्छे दिन’पासून सगळी उचलेगिरीच तर आहे…
□ ब्रिटीशही हिंदुस्थान काँग्रेसमुक्त करू शकले नाहीत; मोदी काय करणार – राहुल गांधी यांचा सणसणीत टोला.
■ राहुलजी, फक्त योग्य वेळ आली की मोहब्बत की दुकान बंद करा आणि देश या किडीपासून मुक्त करा… प्रेमाने समजावावे एवढी यांची योग्यता नाही.
□ खटल्यांच्या पैशात दुकानांच्या पाट्या मराठीत करा – सुप्रीम कोर्टाने सुनावले.
■ विषय पैशाचा नाही, महाराष्ट्रात राहून, इथले खाऊन सुटणार्या मराठीद्वेषाच्या कंडाचा आहे आणि आता दिल्लीतले आका मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहेत, या विश्वासाने ही मिजास आलेली आहे.