एखाद्या धर्मात, जातीत जन्म होतो, त्यात आपली काहीच कर्तबगारी नसते, तरी या जन्माने मिळालेल्या गोष्टींचा अभिमान का बाळगतात लोक?
– प्रीतम पाटील, इंदापूर
आपल्या बापाने आपल्याला इतर जातीधर्मापेक्षा वेगळ्याच पद्धतीने जन्माला घातलं असावं, असं त्यांना वाटत असावं.
शेजारची माझ्याच वयाची मुलगी मला काका म्हणते, आता मी काय करू?
– प्रथमेश सोनार, वाकड
भाकरी फिरवा. तिने तुम्हाला काका म्हटलं तरी तिला पुतणी समजू नका. समजलात तरी तिच्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या लेकीचं भलं करा. आणि तुमचं वय ८०च्या वर असेल तर काहीच करू नका. गपचूप मागे फिरा. नाहीतर तुम्हाला झोपून फिरावं लागेल.
प्रेमाला उपमा नाही, मग शिरा चालेल का?
– यशवंत पल्लेवार, गडचिरोली
शिरा.. कुठेही, कशातही शिरा. पण सुखरूप मागे फिरा. नंतर म्हणू नका मी सांगितलं उ’शिरा’. नाहीतर तुमचा वडा होईल… (साधासुधा नाही भोकाचा वडा)!!
चंद्रावर आता भारताचं यान उतरलं, ५४ वर्षांपूर्वीच माणूसही उतरला, आता तरी कवी लोक चंद्रावर कविता करणं थांबवतील, अशी आशा करावी काय?
– सय्यद मन्सूर, पाताळगंगा
ते ज्याच्या त्याच्या ‘शुक्रावर’ अवलंबून आहे (ज्यांचं चंद्रावर झेंडा लावण्याएवढं बजेट नसतं, ते कवितेवर भागवतात. दुधाची तहान ताकावर भागवणार्यांच्या ताकात तुम्ही का ढवळाढवळ करताय… सय्यद भाय?)
इस्रोचे प्रमुख म्हणतात की बरेच प्रगत शोध आपल्या वेदांत नमूद केलेले आहेत. त्यावर काही खोडसाळ लोक म्हणतात, पण मग ते शोध टिपून ठेवण्यासाठी पेन आणि कागदाचा शोध का नाही लागला वेदांच्या काळात? आप की क्या राय है इस बारे में?
– पंकज बेटावदकर, कल्याण
मी माझी राय सांगितली म्हणजे तुम्ही मला धर्मद्रोही म्हणून ट्रोल करायला मोकळे (माझ्या मागून तीर मारून मला शिखंडी ठरवताय की स्वतःला अर्जुन समजताय पंकज दादा. आणि दुसर्यांच्या बोलण्याप्रमाणे बोलणार्याला आपण स्वत: काय बोलणार?)
बायको मी सांगेन ते सगळं ऐकेल, असं कधी होईल?
– विलास मोने, दादर
जे तुमची बायको ऐकेल, तेच तुम्ही सांगा ना आणि बघा तुमची बायको तुमचा ऐकते की नाही ते! (तरीही ऐकत नसेल तर तिचे कान तपासून घ्या. किंवा विलासराव तुम्ही तुमच्या आडनावाप्रमाणे बोला. तुम्ही बोलताय याचं तुम्हाला समाधान आणि आपला नवरा आपल्यासमोर बोलत नाही याचं तुमच्या बायकोला समाधान.)
मुलीने दोनवेळा नकार दिला की तो होकार असतो, असल्या टुकार शिकवणी मुलांना दिल्या गेल्या आहेत… मुलगी नाही म्हणते तेव्हा त्याचा अर्थ नाही असाच असतो, हे मुलांना कधी कळणार?
– रेवा पुरोहित, पाचपाखाडी, ठाणे
पण एकदा नाही म्हटल्यावर मुलींना दोनदा नाही म्हणण्याची गरजच काय? इथे संशयाला जागा नाही काय? प्रत्येक वेळी ‘गरीब बिचार्या’ मुलांना दोष देण्यात अर्थ काय?
ज्याने घड्याळाचा शोध लावला, त्याला तेव्हा किती वाजले तो राइट टाइम कसा कळला असेल?
– पंढरी जाधव, विन्हेरे
त्याची कुंडली काढायची आहे का? ज्याने घड्याळाचा शोध लावला तो मुघल नव्हता की आपल्यापैकी नव्हता. त्यामुळे त्याचा ‘गडा मुडदा’ उकरण्यात काही फायदा नाही हे लक्षात घ्या. अपना राइट टाइम कब आएगा उसके बारे मे सोचो पंढरीजी..
‘बायांनो, नवरे सांभाळा’ असा संदेश एकेकाळी नाटककारांनी दिला होता. पण नवर्यांना बायका सांभाळण्याचा सल्ला का नाही दिला कोणी?
– मोहन पांचाळ, रत्नागिरी
काय झालं मोहनराव? बायको सांभाळता येत नाही याचा राग नाटककारांवर काढताय का? (हा तुमचा जस्ट प्रश्न आहे की मनातली खदखद आहे?)
ज्यांची बहीण पोलीस अधिकारी आहे, ते लोक रक्षाबंधन कसे करत असतील?
– वैदेही पाटील, मिरज
पोलीसवाल्या बहिणीला त्यांचे भाऊ ओवाळणी हप्त्याहप्त्याने देत असतील (असं तुम्हाला वाटतं असेल… तर तसं होत नसेल… कारण, बहीण ही बहीणच असते. भावाला राखी बांधो वा न बांधो, भाऊ आपले रक्षण करणारच अशीच तिची भावना असते. तर एखाद्या बहिणीची ‘भावना’, एखाद्याला राखी बांधून, त्याला भाऊ बनवून, तसे फोटो मीडियामध्ये प्रकाशित करून, आपल्यासह आपल्या नवर्याच्याही रक्षणाची हमी मिळवते.