नव्याचे नऊ दिवस असतात, तशी राष्ट्रीय पातळीवर नव्याची नऊ वर्षे झाली आहेत… गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अण्णा हजारे यांच्या ‘प्रायोजित’ आंदोलनाच्या आडून उडी मारून, लालकृष्ण अडवाणी आदी ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून दिल्लीचा राज्यशकट हाती घेतला, त्याला आता नऊ वर्षे झाली आहेत. या काळात त्यांनी काही जुन्याच गोष्टी नवी नावे देऊन आणि इव्हेंटबाजी करून लोकांसमोर आणल्या. स्वतंत्रपणे काही नवी तंत्रेही विकसित केली. धक्कातंत्र हे त्यातले एक तंत्र. नोटबंदीपासून कोविडकाळातल्या लॉकडाऊनपर्यंत अनेक घोषणा लोकांना अंधारात ठेवून हे तंत्र वापरून केल्या गेल्या. लोकही मोदींच्या इतके प्रेमात की या धक्क्याने खड्ड्यात पडून आपली हाडे मोडली आहेत, हेही लक्षात न घेता ते टाळ्या, थाळ्या वाजवत राहिले.
हेडलाइन मॅनेजमेंट हे आणखी एक तंत्र. दिल्लीतल्या सगळ्या चॅनेलांच्या प्रमुखांकडे शक्तिशाली राजकीय कार्यालयातून दिवसभराच्या बातम्यांमध्ये काय वर चालवायचे, काय ‘किल’ करायचे, याच्या याद्या दिल्या जातात. हेच राज्यांमध्येही घडते. पत्रकारितेचा स्वतंत्र बाणा अनेक माध्यमसमूहांनी स्वेच्छेनेच गुंडाळलेला आहे, मोदी सरकारचा अजेंडा हे त्यांचे घरचेच कार्य आहे. पण ते करताना लाजेकाजेखातर, ‘ग्राहकां’ना निष्पक्षतेची खात्री पटावी म्हणून विरोधातल्याही काही बातम्या दाखवाव्या लागतात. त्या दाखवण्यावरही बंधने आहेत. यातूनही विरोधकांच्या काही बातम्या डोके वर काढतातच. मणिपूर हिंसाचारासारख्या घटना फार दाबून ठेवता येत नाहीत. मग लोकांचे लक्ष विरोधकांवरून किंवा मूळ मुद्द्यावरून वळवण्यासाठी काही पिल्ले सोडली जातात. ‘एक देश, एक निवडणूक’ अभ्यास समिती आणि संसदेचे ऐन गणेशोत्सवात बोलावलेले विशेष अधिवेशन ही नुकतीच सोडलेली अशीच दोन पिल्ले आहेत… सगळी लकाकी हरवून बसलेले सवंग धक्कातंत्र वापरून, इंडिया आघाडीला मिळणार्या हेडलाइन्स आपल्याकडे खेचून घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी महत्त्वाची बैठक झाली. या आघाडीच्या घटकपक्षांमध्ये कमालीचे अंतर्विरोध आहेत. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि तृणमूल किंवा काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात वैचारिक मतभेद आहेत. अनुक्रमे महाराष्ट्र, प. बंगाल आणि दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये हे पक्ष एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत (महाराष्ट्रात महाविकास आघाडी होण्याआधी काँग्रेस-शिवसेना हे परस्परांचे राजकीय विरोधक होतेच). यांच्यात आघाडी होण्याआधीच मतभेद होतील, राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय करायचे, लोकसभेत काय करायचे, या जागावाटपावरून तंटे होतील आणि आपण मजा बघत राहू, ‘बघा बघा, सत्तेसाठी हे बघा कसे भांडत आहेत’ हे मतदारांना दाखवू, त्यांच्या मनात यांच्याविषयी नफरत निर्माण करू असे मन के मांडे भारतीय जनता पक्षाचे धुरीण खात होते. त्यांच्या हे लक्षात आले नाही की इंडिया आघाडीच्या बैठका आता सुरू झाल्या असल्या तरी मोर्चेबांधणी किमान सहा महिने आधीच झालेली आहे अनौपचारिकपणे. समोरच्यांना गाफील ठेवण्याचे तंत्र त्यांनीही अवगत केले असेलच की! ते मुरब्बी राजकारणी आहेत. या आघाडीने इंडिया असे नाव धारण करून भाजपला पहिला मोठा धक्का दिला. भारत, इंडिया, हिंदुस्थान हे सगळे आपल्या मालकीचे शब्द आहेत, अशा थाटात, स्वातंत्र्यलढ्यात शून्य सहभाग असलेले, हे आयत्या बिळावरचे नागोबा वावरत होते. त्यांना विरोधी आघाडीच्या नावाबद्दल चडफडण्यापलीकडे काहीच करता येईना. ‘भाजप विरुद्ध इंडिया’ अशी लढाई होणार, यातला अध्याहृत अर्थ लक्षात घेऊन एनडीए नावाची मोडून टाकलेली झोपडी पुन्हा उभारली गेली आणि ‘एनडीए विरुद्ध इंडिया’ अशी नेपथ्यरचना केली गेली, हा इंडिया आघाडीने मिळवलेला पहिला विजय. भाजप रोज नवी पिल्ले सोडतो आहे आणि इतरांना भाजपच्या क्रियेला प्रतिक्रिया द्यावी लागत आहे, असा खेळ नव्याच्या नऊ वर्षांत फार खेळून झाला. आता जुने महारथी जागे झाले आणि त्यांनी भाजपला खेळवायला घेतले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या निमित्ताने धार्मिक भावनांची लाट आणून तिच्यावर स्वार होण्याची पूर्ण तयारी मोदींनी केलेली असतानाही हे होते आहे, हे विशेष.
विरोधकांनी कितीही एकजूट केली तरी मोदींना पर्यायी चेहरा त्यांच्याकडे नाही, त्यामुळे आयेगा तो मोदीही, असे गल्लोगल्लीचे मोदीभक्त रेटून सांगतात; पण हल्ली त्यांच्या चेहर्यावर शंका दिसते आणि आवाजही जरा चिरकलेलाच असतो. इंडिया आघाडी ही राजकारणात मुरलेल्या नेत्यांची आघाडी आहे. भाजपच्या बिनतोड भासणार्या युक्तिवादाला उत्तर देण्याच्या भानगडीत ते का पडतील आणि आत्ताच कोणाचा चेहरा का समोर करतील? कारण मोदींना पर्याय कोण हा विचार खुद्द मोदींवरचा विश्वास अढळ असेल, तेव्हाच येतो आणि सद्यस्थितीत मोदींची लोकप्रियता उतरणीला लागलेली आहे. त्यांची तथाकथित जादू कर्नाटकात चालली नाही, ते पुण्यातून उभे राहिले तरी महाराष्ट्रात ती चालण्याची शक्यता नाही. इथे गद्दार आणि महाशक्ती यांच्याविरोधातला रोष किती आहे, याची कल्पना नसती, तर एक तरी निवडणूक घेतली गेली असतीच किमान चाचणी म्हणून. मोदींना पर्याय सांगा, असे म्हणणार्यांकडे हल्ली इंडिया आघाडीचे समर्थक सहानुभूतीने हसून पाहतात. योग्य वेळी तेही नाव जाहीर होईल. आतापासून ते नाव जाहीर करून आयटी सेलला खोटा इतिहास रचण्याची, त्या व्यक्तीला बदनाम करण्याची आणि व्हॉट्सअप फॉरवर्डमधून दुष्प्रचार करण्याची संधी शहाणे राजकारणी कशाला देतील?
सगळ्यांनी मिळून थरावर थर रचून हंडी फोडण्याशी मतलब आहे… हंडी फोडणारा हात कोणाचा आहे, ते महत्त्वाचे नसते, मनोरा किती भक्कम आहे, ते महत्त्वाचे असते, त्यासाठीची एकजूट महत्त्वाची असते… इंडिया आघाडीने असा मनोरा उभारला आहे… आता हंडी कधीही उभारा… लढेगा भारत और फोडेगा इंडिया!